वाघ-या भाग - २
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वाघ-या भाग - १पुढे चालू…. दरेकर खाली उतरून आले तसे किशाने तोंडातल्या काडीला 'फ्फू' करून उडवून लावले अन उठून उभा राहिला. त्याची हालचाल दिसताच दरेकरांनी हातानेच त्याला जागेवर थांबण्याची खूण केलीं व ते पुढे आलेल्या पोटाला सावरीत त्या तीन तरूणांकडे चालू लागलें. आता किशा आणि मंडळीचे डोळे दरेकरांच्या हालचालीला बांधले गेले. सूर्य अजून तिरपा होऊन धरणात बुडून जायला तयार झाला होतां. तांबडा-पिवळा रंग ढगांच्या अंगावरून खाली सांडून आभाळभर पसरला होतां. मागे हात बांधलेल्या शंकर आप्पांच्या फे-या एव्हाना थांबल्या होत्या आणि दादया, परशा यांनी एकेक दगड बसायला शोधलां होता. किशा हताशपणे एकटक दरेकर आणि त्या तीन तरूणांकडे बघत होता. तिघातला एक, जो अंगावर व्हाईट पोलो टी, नवी जीन्स आणि रेबॅन बाळगून होता त्याच्यात आणि दरेकर साहेबांत असे काही हसून आणि खिदळून संभाषण सुरू झाल जस एखाद्या लग्नात आलेले पाहुणे, आपण कशासाठी आलोय हे विसरून दणदणाटी गप्पा हाणत असतात. किशाचा संयम सुटायला लागला होता. त्याच्या मनात वैतागून घरी परत फिरायचेच विचार येत होते, पण बघतो तर काय, त्याच्या पायांची काही हालचाल होण्यापूर्वीच दादया तरातरा दरेकर साहेबांकडे जायला निघाला होता. त्याच्या तोंडातून काही वेडवाकड निघायच ह्या विचाराने वयस्क शंकरआप्पा देखील त्याच्या मागून निघाला. "सायेब, लावाव का वाघ-या?" दादया, दरेकरांच्या हास्यपूर्ण संभाषणाला मध्येच तोडत विचारता झाला. तोपर्यंत शंकरआप्पाही त्याच्या मागे येऊन उभा राहिलेला. दरेकरांची एक भुवई वर गेली, "हे कोण सायेब हायेत माहित हाये का? सीआयडी इन्स्पेक्टर! काय चोरी-चकाटी केली ना, सरळ कोठडी! काय?" दरेकर तावात बोलले अन रेबॅनचीही जरा हालचाल झाली. दाद्या अन शंकरआप्पाने रेबॅनला हात जोडून नमस्कार केला. शंकरआप्पा म्हणाला, "सायेब, फक्त वाघ-या लावाच्यात, तेबी हापिसांच्या लांब, तिकाडल्या खाल्ल्या आंगाला. हिकड कोण फिराकनार बी नाय." दरेकरांना आता त्यांच्यात विशेष रस राहिला नव्हता म्हणून त्यांना झटकून लावल्यासारखे ते म्हणाले, "हं! जावा पटक्यानी, लावा जाळ्या." दादया नि शंकरआप्पाला एकदम हायसे वाटले. दरेकरांना नमस्कार करून चटकन ते वळले आणि पावलं दोन पावलं पडली असतील तोवर दरेकरांचा परत मागून आवाज आला, "दोन ससे अतनुरेकड द्या उद्याच्याला, तो पोच करील माझ्या घरी!" शंकरआप्पाचे खोल डोळे गलबलले, कसबसं तो म्हणाला, "सायेब हिथ आधीसारक सस नायती घावत. त्यात अतनुरेसायेबांचा योक ससा दर बारचीला, त्यो पाण्याच्या टाकीपसला किशा हाये का, त्येच्या पोराच्या साळत मास्तरनी पैस भराय नाय म्हणून चार सस आणाय सांगितल्यात. त्याहिच्यात पुना भावकीत बी घावल ती शिकार वाटाय लागती." "बघितल का सर कांगावा! सांगा त्यांना, ह्या परिसरात शिकार करण बेकायदेशीर हाये का नाय? तरी मी परवानगी देतोय. त्या जंगलाच्या खात्यावाल्यांना सगळ कस ढीगानी पोच होत रे? सुक्काळीच्यांनो!" दरेकर आवाजात जरब आणीत बोलला. दोघांचेही डोळे भिरभिर करू लागले अन आवाज दूर मावळतीच्या सूर्यासारखा खोल पाण्यात बुडून गेला. "निघा!" दरेकर अस म्हटल्यावर पुढच काही ऐकायला दोघेही तिथे थांबलेच नाहीत. शंकरआप्पा नि दादया परत आल्यावर चौघांची जुजबी बातचीत झाली आणि शिकारीच सार सामान उचलून चौघे धरणातून पाणी खाली ज्या बाजूला जात त्या झाडीत गायब झाले. इकडे दरेकर साहेब रेबॅनला आपल्या फेमस (आजिबात नसलेल्या) सर्व्हिस रेकॉर्डबद्दल आणि इतर खात्यातल्या आपल्या ओळखीन्बद्दल आळवून आळवून सांगत होते. तसेच अधून मधून, 'हे साहेब आहेत काय अजून? ते साहेब म्हणजे तुम्हाला सांगतो….' अशा निरर्थक गप्पांच्या पुडया सोडीत बसले होते. रेबॅन आणि कंपनीला जेव्हा ह्या गप्पा अगदीच असह्य झाल्या तेव्हा त्यांनीही दरेकरांना पाणी लावत त्यांच्यातील 'गाईड' जागा करीत पूर्ण धरण, दरवाजे कसे उघडतात, कसे बंद होतात, पाण्याच्या वेगवेळ्या पातळ्या इत्यांदीची माहिती घेतली. तसेच धरणांच्या दरवाजांसमोर, भरावावर त्यांनी दरेकरांच्यातला फोटोग्राफरही जागा केला. "त्या कान्डीला नाय र, त्या त्या तरवाडाच्या फांदीला लाव फासा." किशा दादयाला सूचना देत होता. पलीकडे काही अंतरावर शंकरआप्पा नि परशाचंही भराभर खड्डे कर, काही जाळी पसरून ठेव काही झुडूपा-झुडूपातून सहजासहजी दिसणार नाही अशा रीतीने बांध अस काम चालल होत. सुर्य बुडून बराच वेळ झाला होता. किडे-किटकांचा खेळ सुरू झाला होता. रातकिडे आणि बेडकांच्या स्पर्धाही सुरू झाल्या होत्या. अजून काही मिनिटातच सर्व काही अंधारमय होणार आहे याची कल्पना असल्याने चौघांची त्रेधा उडाली होती. अचानक त्या वातावरणात 'खाडर्र-ढर्डर्र' असा मोठा आवाज झाला आणि पाठीमागून गाडीच्या इंजिनाचा कर्णकर्कश्श आवाज झाला आणि बंद पडला. कशाचा आवाज झाला हे पाहायला चौघेही त्या दिशेला धावले. धरणाच्या भरावावरून एक कच्चा रस्ता धरणाचे पाणी जिकडे जाते त्या प्रवाहाला समांतर असा नागमोडी वळणे घेत, झाडा-झुडपांना सोबतीला घेत खाली उतरत पुन्हा समोरच्या एका टेकडीच्या बाजूने हळूहळू वर जात होता. त्या कच्च्या रस्त्यावर किशाने वाघरी लावली होती. त्या जाळीने त्या तीन तरूणांची गाडी अडविली होती. गाडी थांबल्याने हेडलाईटच्या दिव्यासमोर झालेली किड्यांची गर्दी लांबूनही दिसत होती. चौघे पळतच गाडीजवळ पोचले. गाडीची ड्रायव्हरच्या दरवाजाची काच खाली आली. रेबॅनवाला सीआयडी इन्स्पेक्टर गाडी चालवत होता. रेबॅन आता डोळ्यांवरन निघून गळ्याजवळ टीशर्ट मध्ये विसावला होता. चौघांकडे पाहत तो म्हणाला,"काय रे! जाळ लावून गाड्या पकडता की काय?" शंकरआप्पाने हात जोडले. किशाला त्यानेच हळू कानात सांगितले साहेब कोण आहेत ते. किशाचा हात आपसूक कपाळावर गेला सलाम करण्यासाठी! परशा आणी दादयाने तोवर गाडीच्या बोनेट आणि चाकात अडकलेल जाळ फाडून-तोडून काढल होत. ती एकच त्यांची सगळ्यात मोठी आणि मजबूत वाघरी होती! साहेब बहुधा चांगल्या मूडमध्ये होते त्यांनी स्माईल देत विचारले, "कायरे, या धरणात मासे पकडता का?" शंकरआप्पा "होय जी" म्हणाला. "याच परिसरात जरा सुट्टी घालवायला आहे मी अजून आठेक दिवस! तेव्हा, उद्या दुपारनंतर चक्कर टाकतो इकडे परत. जरा ताज्या माशांचा बंदोबस्त करा आणि एखादा ससा!" शंकरआप्पा मानेनेच 'होय' म्हटला आणि साहेबांनी निरोपासाठी हात वर करीत गाडी सुरू केली. त्या कच्या रस्त्यांच्या खाच खळग्यातून गाडी डुलत-डुलत धरणाच्या भरावावर हळू-हळू चढायला लागली. रस्त्यावर पडलेल्या तुटक्या जाळीकडे पाहत किशाचा सलाम सावकाश खाली आला. समाप्त!
प्रतिक्रिया
शोषणाचे दुर्दैवी वास्तव!
बिचारे!
नाही…
....खिन्न करणारी.
अशीच अवस्था आहे-
@पैसाजी
ओके!
ससे, डुकरे यांची संख्या खूप
जास्त माहिती हवी आहे
या विषयावर आणि आदिवासींच्या
पण या कथेत लिहिल्याप्रमाणे
छान मांडलय.
जगायच तरी कस ह्या लोकांनी? तो