वाचनीय 'सायकॅमोर रो'
लेखनप्रकार
नुकतीच जॉन ग्रीशम यांची 'सायकॅमोर रो' ही कादंबरी वाचून संपवली. ही कादंबरी बहुधा २०१३ साली प्रकाशित झाली. मी एका-दोघांच्या हातात ही कादंबरी पाहिली होती. आधी याच लेखकाचं 'अ टाईम टू किल' वाचलं होतं. आवडलं होतं. 'किल' मध्ये अमेरिकेतल्या सुप्त वर्णभेदाचे दाहक चित्रण अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत केले होते. कादंबरीचा नायक जेक ब्रिगेन्स हा एक तरुण वकील आहे. स्वतः गोरा असूनदेखील माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद असता कामा नये हे त्याचे तत्व असते. त्याच्या फर्मचा दारुडा मालक वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी असला तरी त्याला कृष्णवर्णींयांविषयी आपुलकी असते. 'किल' मध्ये जेक एका कृष्णवर्णीय बापाची बाजू न्यायालयात हिरीरीने मांडतो. हा दुर्दैवी कृष्णवर्णीय एका दुर्दैवी मुलीचा बाप असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचे दोन गोरे अतिशय क्रूर पद्धतीने त्या लहानग्या मुलीला करकचून बांधून ठेवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करतात आणि नंतर तिला फेकून देतात. अतिशय हलाखीत जीवन जगणारे ते कृष्णवर्णीय कुटुंब हादरते. त्या मुलीचा बाप संतप्त होतो. इतक्या वर्षांचा मनात खदखदत असलेला राग उफाळून येतो. गोर्यांनी कित्येक दशके कृष्णवर्णीयांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे आधीच त्यांचे जगणे कवडीमोल झालेले असते. एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखे त्या गोर्यांनी त्या कोवळ्या मुलीचे लचके तोडलेले असतात. कृष्णवर्णीय माणसे म्हणजे जणू गोर्यांची मालमत्ता असून त्यांचा जन्मच गोर्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर लाचारी पत्करण्यासाठी झालेला आहे हा सुप्त संदेशच त्या दोन गोर्यांनी त्यांच्या या कृत्यातून दिलेला असतो. मुलीचा बाप पेटून उठतो आणि आरोपींना न्यायालयात घेऊन जात असतांना तो त्यांचा खून करतो. अर्थातच त्याला ताबडतोब अटक होते. जेक ब्रिगेन्स हा एक साधारण वकील असतो. ही कहाणी ऐकून तो अस्वस्थ होतो आणि त्या बापाचा खटला चालवतो. ज्युरींसमोर तो बापाची बाजू भक्कमपणे मांडतो. दरम्यान कट्टर गोर्यांची एक छुपी संघटना (क्लॅन) जेकचा मोठा बंगला जाळून खाक करते. जेक, त्याची बायको, आणि त्यांची गोड मुलगी हना यांना सतत धमक्या दिल्या जातात. पण न डगमगता जेक खटला जिंकतो आणि त्या दुर्दैवी मुलीला आणि तिच्या बापाला न्याय मिळवून देतो. वर्णभेदाचे नेमके आणि वास्तवाच्या जवळ जाणारे प्रभावी चित्रण म्हणून 'किल' ची प्रशंसा करावी लागेल.
'सायकॅमोर रो' ही कादंबरी 'किल' चा दुसरा भाग (से॑क्वेल) आहे. कथानक संपूर्णपणे वेगळे असले तरी गाभा तोच आहे, वर्णभेद! 'सायकॅमोर रो' ही १९८७-१९८८ च्या कालखंडात रचण्यात आलेली कादंबरी आहे. म्हणजे आजपासून जेमतेम २५-२६ वर्षे आधी! आणि त्या काळातही वर्णभेद किती तीव्र होता हे या कादंबरीच्या माध्यमातून लक्षात येते. 'किल' चा कालखंड १९८५ मधला आहे. अमेरिकेतले वर्णभेदाच्या समूळ उच्चाटनासाठी घडवले गेलेले यादवी युद्ध १८६१ च्या कालखंडातले आहे. 'गॉन विथ द विंड' या कादंबरीमध्ये लेखिका मार्गारेट मिशेल या वर्णभेदाचा आणि त्यावर आधारलेल्या यादवी युद्धाचा विस्तृत पट मांडतात. पण 'गॉन विथ द विंड' ही कादंबरी प्रामुख्याने स्कारलेट या अल्लड नायिकेच्या वैयक्तिक आयुष्याचा धांडोळा घेते. अमेरिकेतल्या दक्षिण भागात राहणार्या कृष्णवर्णीय लोकांवर 'गॉन विथ द विंड' आणि 'किल' आणि 'सायकॅमोर रो' या कादंबर्या परस्परविरोधी भूमिका मांडतात. 'गॉन' मध्ये दक्षिणेतील राज्यांमधील गोरे संस्थानिक कृष्णवर्णीयांना (गुलाम असले तरीही) कुटुंबातील समान घटक मानून त्यांच्याशी आपुलकीचे संबंध ठेवतात असे म्हटले आहे. आणि त्यामुळे उत्तरेतील राज्यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्यासाठी दक्षिणेतील राज्यांवर केलेले आक्रमण निरर्थक आहे अशी भूमिका 'गॉन' मध्ये दिसून येते. 'सायकॅमोर रो' आणि 'किल' मध्ये मात्र अमेरिकेतील दक्षिणेकडची राज्ये कृष्णवर्णीयांना किती तुच्छ, हीन, आणि क्रूर वागणूक देत असत याचे चित्रण आढळते. आश्चर्य वाटावे अशी गोष्ट अशी की १८६१ पासून अगदी अलिकडे म्हणजे १९८८ पर्यंत वर्णभेद शाबूत होता. किंबहुना तो अजूनही शाबूत आहे. १००-१२५ वर्षे उलटून गेल्यानंतरही हा भेदभाव पूर्णपणे लोप पावलेला नाही. कायद्याने बरीच बंधने आणली असली तरी मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात हा भेदभाव अजूनही धगधगतो आहेच. एक-दोन आठवड्यांपूर्वी फर्ग्युसन या मिसोरी (उच्चार बरोबर आहे की नाही कल्पना नाही) राज्यातल्या वर्णभेदावरून उसळलेल्या दंगलीतून हे स्पष्ट होते. अजूनही अमेरिकेत मोठ्या कंपन्यांमध्ये कृष्णवर्णीय लोकं कमी प्रमाणात आढळून येतात. त्यांची जगण्याची शैली गोर्या लोकांपेक्षा अगदी निराळी आहे. एक अदृष्य भिंत अजूनही जाणवते. शिक्षण कमी, गुन्हेगारी जास्त आणि म्हणून कृष्णवर्णीयांची दहशत अमेरिकेत अजूनही जाणवते. एकटे फिरत असतांना कृष्णवर्णीयांचा एखादा गट हल्लागुल्ला करत येत असेल तर धडकी भरतेच. माझा ज्या मोजक्या कृष्णवर्णीयांशी अगदीच नगण्य असा संबंध आला तो मला चांगला अनुभव देऊन गेला. जिथे गरज होती तिथे त्यांनी मला मदतच केली. पण त्यांच्या वागण्या-बोलण्यामध्ये अजूनही रांगडेपण जाणवते. कदाचित त्यामुळे त्यांची भीती वाटत असावी. इतक्या वर्षांमध्ये त्यांच्या देहबोलीमध्ये फारसा फरक पडल्याचे जाणवत नाही. पण हा भेद इतक्या वर्षांनंतरही पूर्णपणे नष्ट झालेला नाही हे वास्तव खरोखर खेदजनक आहे. भारतात जातीव्यवस्थेवर आधारित भेदभाव अगदी संपूर्णपणे नष्ट झालेला नसला तरी सामाजिक आयुष्यात एके काळी जोरकस असणारी भेदभावना बर्यापैकी बोथट झाल्याचे जाणवते. वागणे, बोलणे, शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक स्तर, आरोग्य, सुरक्षा अशा सगळ्याच बाबतीत भारतातील जातीधर्मावर केला जाणारा भेदभाव बर्याच अंशी कमी झाल्याचे जाणवते. अलिकडच्या काळात काही प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांनी विषारी फुंकर घालून या भेदाचा वणवा वैयक्तिक लाभासाठी पसरवला आहे हे देखील एक वास्तव आहेच. जातीवर आधारित राजकारण हे भारतातले कटू वास्तव आहे आणि त्यासाठी भारतातले आपमतलबी राजकारणी सामाजिक शांतता आणि सलोखा वेठीस धरतात हे दुर्दैवी आहे. अर्थात अमेरिकेत मुद्दा वर्णभेदाचा आहे आणि भारतात जातीधर्माचा! दोहोंमध्ये फरक असणारच. भारतात वर्णभेद नाही. अमेरिकेत जातीभेद तसा कमीच आहे. मूळ अधोरेखित मुद्दा एकच आहे आणि तो म्हणजे विशिष्ट समुहाने संपूर्ण समाजावर वर्चस्व मिळवण्यासाठी निर्माण केलेल्या भिंती! माणसाने माणसाला माणूस म्हणून वागवणे ही झाली माणूसकी आणि वैयक्तिक मह्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भेदभावाला खतपाणी घालून समाजाला अस्वस्थ करून सोडणे हा झाला स्वार्थ! दोन्ही माणसाच्या मनात जन्मलेल्या भावना. एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आणि दुसरी माणसामाणसात फूट पाडणारी. जी नि:संशय बरोबर आहे तिचा विजय होणे महत्वाचे. 'सायकॅमोर रो' मध्ये (आणि 'किल' मध्येदेखील) हेच अधोरेखित केले आहे.
'सायकॅमोर रो' ची सुरुवात होते जेकच्या पडझड झालेल्या आयुष्याने. घर जळून खाक झालेले असते. तीन वर्षांपूर्वी जिंकलेल्या एका मोठ्या खटल्याने जेकचे नाव झालेले असते पण आर्थिक आघाडीवर जेक मेटाकुटीला आलेला असतो. विम्याचा खटला सुरुच असतो आणि जळून खाक झालेल्या घराच्या विम्याचे पैसे देण्यासाठी विमा कंपनी टाळाटाळ करत असते. एका अगदी छोट्या अपार्टमेंटमध्ये जेक आणि त्याचे कुटुंब कसेबसे राहत असते. हाती खटले जास्त नसल्याने जेकची आर्थिक आवक खूपच कमी झालेली असते. जेक या ओढगस्तीला वैतागलेला असतो. असेच निराशेने भरलेले दिवस जात असतात आणि एका दिवशी जेकच्या कार्यालयात एक पत्र येते. त्याच्या गावातल्या एका विक्षिप्त गोर्या माणसाचे ते पत्र असते. त्या माणसाचं नाव सेथ असतं. सेथ सत्तरीच्या पुढचा असतो. एक-दोन दिवसांपूर्वी सेथने एका झाडाला गळफास अडकवून आत्महत्या केल्याची बातमी जेकच्या लक्षात असते. कँन्सरच्या तीव्र वेदनांना कंटाळून सेथने आत्महत्या केल्याचे त्याने लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या हस्ताक्षरातले हे पत्र आपल्याला यावे याचे जेकला आश्चर्य वाटते. जेक ते पाकिट उघडतो. त्यात एक पत्र आणि सेथचे एक स्वहस्ताक्षरातले दोन पानी मृत्यूपत्र असते. त्यानुसार सेथने त्याच्या संपत्तीचा ९०% हिस्सा त्याची तीन वर्षे अतिशय निरपेक्ष वृत्तीने उत्तम अशी देखभाल करणार्या कृष्णवर्णीय लेटी या मध्यमवयीन गरीब मोलकरणीला देण्याची सूचना असते. राहिलेल्या १०% संपत्तीपैकी ५% त्याच्या लहानपणीच पळून गेलेल्या धाकट्या भावाला आणि राहिलेले ५% त्याच्या चर्चला देण्याची सूचना असते. सेथने आपल्या मुलांना म्हणजे एक मुलगा आणि मुलगी यांना एक कपर्दिकही न देण्याची सूचना केलेली असते. त्याच्या पत्रात त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेनुसार वाटणी करण्याची जबाबदारी त्याने जेकवर टाकलेली असते. आपल्या मुलांना एक छदामही देण्यात येऊ नये ही त्याची इच्छा त्याने मोठ्या उद्वेगाने लिहिली असते. इतर कुठलाही वकील या इच्छापत्राच्या अंमलबजावणीच्या कारवाईत सहभागी असू नये असेही त्याने नमूद करून ठेवलेले असते. याशिवाय मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार कुठे आणि कसे करावेत या सूचनादेखील त्याने लिहून ठेवलेल्या असतात. जेक सेथला कधीच भेटलेला नसतो. एक विक्षिप्त, अतिशय आजारी गोरा म्हातारा म्हणून त्याची गावात ओळख असते. जेकने आधीच्या बलात्काराच्या खटल्यात सर्वस्व पणाला लावून एका कृष्णवर्णीय कुटुंबाला न्याय मिळवून दिला असल्याने सेथचा जेकच्या प्रामाणिकपणावर आणि न्यायबुद्धीवर विश्वास असतो. तसे सेथने त्याच्या पत्रात नमूद केलेले असते. जेक कर्तव्यबुद्धीने सेथच्या संपत्तीचा वकील म्हणून काम सुरू करतो. त्याची अंतिम इच्छा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे अशी जेकची भावना असते. साधारण एक वर्षापूर्वी सेथने एका नामवंत वकीली फर्ममधून एक टाईप केलेले मृत्यूपत्र तयार करवून घेतलेले असते. त्यात सगळी संपत्ती सेथने आपल्या मुलांना मिळावी अशी तजवीज केलेली असते. कायद्याने स्वहस्ताक्षरातले आणि मृत्यूच्या एक-दोन दिवस आधी केलेले मृत्यूपत्र ग्राह्य असणे तर्काला धरून असते. सेथची दोन्ही मुले त्याच्या या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देतात आणि आधीचे मृत्यूपत्र दाखल करतात. त्यांचा युक्तिवाद असा असतो की मरतांना सेथला खूप औषधी आणि वेदनाशामके सुरू असल्याने सेथ बहुतांश काल गुंगीत होता. त्यामुळे लेटीने त्याच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्याला हवे तसे मृत्यूपत्र त्याच्याकडून करवून घेतले; म्हणजेच सेथचं स्वहस्ताक्षरातलं मृत्यूपत्र हे 'अनड्यू इन्फ्ल्युअन्स' खाली तयार झालेले आहे आणि तो ते मॄत्यूपत्र तयार करतांना सारासार विचार करण्याची क्षमता हरवून बसला होता. म्हणजेच सेथकडे हे मृत्यूपत्र तयार करतांना 'टेस्टामेंटरी कपॅसिटी'चा (म्हणजे पूर्ण विचार करून निर्णय घेण्याच्या क्षमतेचा) अभाव होता.
लेटी ही एक अत्यंत गरीब कृष्णवर्णीय बाई असते. नवरा दारुडा असतो. घरी आई, दोन बहीणी, त्यांची मुले, तिच्या स्वतःच्या मुली, तिच्या मुलींची मुले असा मोठा पसारा असतो. एका अत्यंत छोट्या घरात हे सगळे राहत असतात. अतिशय तुटपुंज्या कमाईवर हा सगळा गाडा लेटी ओढत असते. सेथची काळजी मात्र ती खूप आत्मीयतेने घेत असते. त्याच्या घरातली सगळी कामे करणे, त्याला आंघोळ घालणे, त्याला वेळोवेळी बाथरूमला घेऊन जाणे, सगळी औषधी वेळच्या वेळी देणे, अशी सगळी कामे लेटी पार पाडत असते. हे सगळं इतकं मन लावून करण्यात तिचा अंतस्थ हेतू दूषित असतो असा युक्तिवाद सेथच्या मुलांचा वकील करतो.
न्यायालयात खटला उभा राहतो. साक्षी-पुरावे गोळा करण्याचे कठीण काम सुरु होते. दोन्ही गटातले वकील आपापल्या परीने माहिती गोळा करण्यास सुरुवात करतात. जेकचा हेतू स्वच्छ असतो. त्याला सेथच्या अंतिम इच्छेचा मान ठेवायचा असतो. सेथच्या मुलांचा हेतू अर्थातच सेथची संपत्ती मिळवण्याचा असतो. एका विक्षिप्त आजारी म्हातार्याची संपत्ती असून असून किती असणार असा प्रश्न सगळ्यांना पडतो. त्याची संपत्ती मोजण्याचे काम एका निरीक्षकावर सोपवले जाते. दोन घटस्फोटांमध्ये सेथ कफल्लक झालेला असतो हे गावातल्या सगळ्या लोकांना माहित असतं. त्यामुळे जे काही कीडूक-मिडूक असेल ते गाजावाजा न करता वाटून घ्यावे असे बर्याच लोकांचे मत असते. एका कृष्णवर्णीय गरीब बाईला ९०% हिस्सा मिळणार म्हणून गोर्या लोकांना राग आलेला असतो. आणि शेवटी सेथच्या संपत्तीचा आकडा समोर आल्यानंतर भले भले थक्क होतात. सेथकडे २४ मिलियन डॉलर्सची संपत्ती रोख स्वरुपात असते! शिवाय ८० एकर जमीनदेखील असते! इतकी अमाप संपत्ती त्या संपूर्ण कांऊंटीमध्ये कुणाकडेच नसते. आणि या संपत्तीचा ९०% हिस्सा लेटीसारख्या क्षूद्र कृष्णवर्णीय बाईला मिळणार हा विचार वर्णद्वेशाची एक ठिणगी पाडतो. नंतर सुरू होतो ज्युरी निवडण्याचा खेळ. दोन्ही गटातले वकील जिंकण्यासाठी अनुकूल अशी ज्युरी निवडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. गावात बहुसंख्य गोरे असल्याने ज्युरीत जास्त गोरे येणार आणि ते गरीब लेटीच्या विरोधात मत नोंदवणार म्हणून जेक अस्वस्थ होतो. ज्युरीमध्ये जास्तीत जास्त गोरे आणण्यासाठी विरोधी पक्षाचा वकील अफाट कष्ट घेतो. मग सुरू होतो वर्णभेदावर आधारलेला थरारक खेळ! पुढे काय होतं, कोणती कोणती रहस्ये बाहेर पडतात, खटला कुठली कुठली वळणे घेतो, लेटीला संपत्तीचा ९०% हिस्सा खरोखर मिळतो का, सेथची मुले या खटल्यात विनाकारण भरडली जातात का, या सगळ्या खटल्यामागे षडयंत्र असते का, कुणाची बाजू खरी असते, इत्यादी प्रश्नांची उकल लेखक खुबीने करतो.
जॉन ग्रीशम यांचा कायद्यावर आधारित कथानके रचण्यात हातखंडा आहे. प्रत्येक शब्दाला वाचकांची उत्कंठा वाढवत नेण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. बर्याच प्रसंगात कथानक अपेक्षित वळणे घेते पण वाचतांना वाचकांना खिळवून ठेवण्यात लेखक खासच यशस्वी होतो. प्रसंगा-प्रसंगाला अनपेक्षित वळणे घेत जाणारे घटनाक्रम, प्रसंगाची नाट्यपूर्ण आणि रहस्यमय पेरणी, पात्रांचे जिवंत वर्णन, आणि डोळ्यासमोर प्रसंग उभे राहतील इतके जिवंत लिखाण ही या कादंबरीची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. भाषा खूपच ओघवती आणि समर्थ आहे.
असाच एका रस्त्यावरून मी चालत जात असतांना एका जुनी पुस्तके विकणार्या विक्रेत्याकडे मला हे पुस्तक दिसले. पुस्तक हाताळल्याने तसे जुनाट वाटत होते. 'किल' वाचले असल्याने उत्सुकता चाळवली गेली. मी पुस्तक विकत घेतले आणि वाचायला सुरुवात केली. जसा वेळ मिळेल तसा मी वाचत गेलो. साडेपाचशे पानांची ही कादंबरी मला आठवणीत ठेवावा असा वाचनानंद देऊन गेली. काहीतरी चांगले वाचल्याचे समाधान ही कादंबरी देऊन गेली.
काही काही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचावीत अशा दर्जाची असतात. 'गॉन विथ द विंड' ही कादंबरी अशीच आहे. 'सायकॅमोर रो' मी काही वर्षांनी कदाचित पुन्हा वाचू शकेन. 'गॉन' चा पट खूप विस्तृत आहे. एका अल्लड नायिकेचा यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडत जाणारा जीवनप्रवास 'गॉन' अतिशय समर्थपणे मांडते. 'गॉन' मध्ये वर्णभेदाची किंचित पार्श्वभूमी आहे. 'गॉन'चे लिखाणदेखील समर्थ आणि जिवंत आहे. १९३६ सालची कादंबरी असल्याने भाषा किंचित क्लिष्ट आणि आजकाल फारशी वापरात नसलेली असली तरी वाचनाचा जो आनंद 'गॉन' देते तो अवर्णनीय आहे. 'सायकॅमोर रो' चे कथाबीज तसे सोपे आणि छोटे आहे; पण लिखाणाचा दर्जा वाचनाचा अपेक्षित आनंद देऊन जातो. 'द गॉडफादर' ही कादंबरी देखील असाच आनंद देऊन जाते.
'सायकॅमोर रो' माणसाच्या मनातील पाशवी प्रवृत्तींवर झगझगीत प्रकाश टाकतांना वाचकाला विचार करण्यास भाग पाडते. आणि हा विचार केवळ एका सामाजिक प्रश्नाच्या अंगाने येत नाही तर एका खटल्याच्या रोमांचकारी वर्णनातून देखील हा विचार डोकावत राहतो. आणि हे बेमालूम मिश्रण वाचकाला खिळवून ठेवते. माणसांमाणसात कुठल्याच कारणाने भेदभाव असू नये हा विचार बळकट करणारी ही कादंबरी अवश्य वाचायला हवी असे सुचवावेसे वाटते.
वाचने
6958
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
छान ओळख
In reply to छान ओळख by कपिलमुनी
वर्षा गजेंद्रगडकर यांनी केलाय
In reply to वर्षा गजेंद्रगडकर यांनी केलाय by स्वप्नांची राणी
धन्यवाद
चांगले परिक्षण आणि नवीन
अ टाईम टू किल वाचली आहे.
मराठी अनुवाद आलाय का ?
In reply to मराठी अनुवाद आलाय का ? by धर्मराजमुटके
हेच विचारायचे होते.
In reply to मराठी अनुवाद आलाय का ? by धर्मराजमुटके
THE CLIENT
आभारी आहे.
In reply to आभारी आहे. by आदूबाळ
मस्त!
In reply to आभारी आहे. by आदूबाळ
आहा !! हे माहीत नव्हते कि
In reply to आहा !! हे माहीत नव्हते कि by राजाभाउ
ब्लीचर्स म्हणून अजून एक आहे.
वाह! छान लेखन.
सध्या ग्रिशॅमची ' द फर्म '
In reply to सध्या ग्रिशॅमची ' द फर्म ' by सस्नेह
' द फर्म '
पाडस
In reply to पाडस by धर्मराजमुटके
ते अत्रे सभाग्रहात नेहमी
जॉन ग्रिशॅमच्या अनुवादित कादंबर्या...
In reply to जॉन ग्रिशॅमच्या अनुवादित कादंबर्या... by मुक्त विहारि
येडपट लेखक? का हो?
In reply to येडपट लेखक? का हो? by आदूबाळ
आमच्या मते...
In reply to आमच्या मते... by मुक्त विहारि
वा: मुवि
>>>अमेरिकेतल्या सुप्त
द चेंबर -- हे ग्रीशमचे पुस्तक
बरीच पुस्तके
In reply to बरीच पुस्तके by समीरसूर
अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची
In reply to अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची by आदूबाळ
लय भारी
In reply to अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची by आदूबाळ
अॅगाथा ख्रिस्तीचे
In reply to बरीच पुस्तके by समीरसूर
ड्रॅक्युला - ब्रॅम स्टोकर
हायला अदुबाळ सही रे.
In reply to हायला अदुबाळ सही रे. by प्रमोद देर्देकर
हो. छात्र-प्रबोधन नावाच्या
In reply to हायला अदुबाळ सही रे. by प्रमोद देर्देकर
बाबा भांड
In reply to बाबा भांड by वॉल्टर व्हाईट
लिंक गंडलीये
In reply to लिंक गंडलीये by वॉल्टर व्हाईट
आभार
In reply to बाबा भांड by वॉल्टर व्हाईट
कदाचित नसावी.
In reply to कदाचित नसावी. by एस
धन्यवाद
मस्त. वाचनखूण साठवतेय
@वॉल्टर व्हाईट-आदुबाळ धन्स
जॉन ग्रिशम ची पुस्तके इंग्रजी
अ टाइम टु किल वाचल्यावर १५
In reply to अ टाइम टु किल वाचल्यावर १५ by स्पंदना
धन्यवाद
मस्तं
कसलं सुरेख लिहिलंय!
तुमच्या या धाग्यामुळे नुकतेच
In reply to तुमच्या या धाग्यामुळे नुकतेच by आदूबाळ
कादंबरी
In reply to कादंबरी by समीरसूर
कोणा नवख्याचा कव्हर ड्राईव्ह
In reply to कोणा नवख्याचा कव्हर ड्राईव्ह by आदूबाळ
शक्य आहे