लिंकन
लेखनप्रकार
या वर्षी हॉलिवूड मधील सर्वात जास्त अॅकॅडमी अर्थात ऑस्कर अॅवॉर्ड्स कुणाला मिळणार याचे उत्तर स्पिलबर्गचा "लिंकन" हा महीना-दिड महीन्यापूर्वी प्रकाशीत झालेला चित्रपट बघताना सहज मिळाले!
मध्यंतरी वाचल्याप्रमाणे, डॅनिअल डे लुईस या ब्रिटीश नटास (खाली डावीकडील) स्पिलबर्गने लिंकनचे काम करशील का म्हणून विचारले. त्याने स्पिलबर्गला एक वर्षे थांबण्यास सांगितले. नाराजीने का होईना पण स्पिलबर्ग स्वतःच्या निवडची खात्री असल्याने थांबला. नंतर जो आला तो डॅनिअल डे लुईस नव्हताच.... इतका की असे म्हणतात, की तो स्टेजवर असताना स्पिलबर्ग अमेरीकन इन्फॉर्मल वेष सोडून प्रेसिडंट लिंकनसमोर आदराने फॉर्मल वेषातच येऊ लागला!
स्त्रोत: विकीपिडीया
हा चित्रपट लिंकनच्या आयुष्यातील केवळ शेवटच्या चार महीन्यांवर आधारीत आहे. जानेवारी १८६५ ते लिंकन हत्या, १४ एप्रिल १८६५... या चार महीन्यात जे काही घडले त्यामुळे पुढे सर्वच काही मानवतेच्या दृष्टीकोनातून चांगल्याकरता बदलणार होते... त्या बदलाचे नाव होते emancipation - इमॅन्सिपेशन. याचा अर्थ "बंधमुक्त" करणे असा होऊ शकेल.
स्त्रोत: विकीपिडीया
चित्रपटाची पूर्वपिठीका:
जानेवारी १, १८६३ला लिंकनने अमेरीकन नागरी युद्धाच्या काळात संयुक्त राष्ट्रात सहभागी असलेल्या राज्यांतील कृष्णवर्णीयांना गुलामगिरीतून मुक्त केल्याची राष्ट्राध्यक्षाच्या अधिकारात नाही तर राष्ट्राचा सरसेनापती (कमांडर इन चीफ) म्हणून घोषणा केली होती. त्याचे कारण असे होते की १८५७ साली सुप्रिम कोर्टाने काँग्रेस आणि राष्ट्राध्यक्षास गुलामगिरी संपवण्याचा हक्क नाही असे जाहीर केले होते... त्यामुळे ही घोषणा केवळ युद्धकाळापुरतीच मर्यादीत होती. ती कायम स्वरूपी करण्यासाठी घटना दुरूस्तीची गरज होती. अमेरीकन राज्यपद्धतीत घटना दुरूस्ती करण्यासाठी (मला वाटते) सिनेट आणि काँग्रेसमधे २/३ मताने दुरूस्ती संमत होणे गरजेचे असते. लिंकनने केलेले Emancipation Proclamation हे लिकंन ज्या पक्षाचा होता (आणि जो पक्ष त्या काळात गरीबांचा कैवारी/लिबरल होता!) त्या रिपब्लीकन प्क्षाकडे, सिनेटमधे मते होती. त्यामुळे तेथे घटना दुरूस्ती विधेयक संमत होऊ शकले. पण ती अवस्था काँग्रेसमधे नव्हती...चित्रपटाचा सारांश
वरील पूर्वपिठीका लाभलेल्या अवस्थेत लिंकनला काही करून नागरी युद्ध संपण्याच्या आत ही घटना दुरूस्ती करून घेयची होती. १८६५ मध्ये लिंकनच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी टर्म चालू झाली होती. नागरी युद्ध चालू होतेच, दोन्हीकडील लाखो सैनिकांना आपले जीव गमवावे लागले होते. सामान्य पण अनेक गेले... मात्र हे जास्त वेळ चालणार नाही आणि दक्षिणेकडील फुटीर राज्यांना संयुक्त अमेरीकेसमोर शरणागती पत्करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली होती. लिंकनला ती परीस्थिती वास्तवात येण्याआधी ही घटना दुरूस्ती करायची होती नाहीतर लोकशाहीतील नंबरगेम मधे दक्षिणेकडील राज्यांमुळे ही घटना दुरूस्ती होऊ शकली नसती. त्यात उत्तरेकडील डेमोक्रॅट्स हे विरोधात होते तसेच सर्वच रिपब्लीकन्स देखील पाठींबा देणारे नव्हते. जानेवारीत नवीन काँग्रेस मधे रिपब्लीकन मते वाढणार होती. त्यामुळे सल्लागारांच मत होते की तो पर्यंत थांबावे. पण लिंकनची तयारी नव्हती. त्याला एकतर दोन्ही बाजूंनी (डेमोक्रॅट्स - रिपब्लि़कन) पाठींबा आहे हे दाखवायचे होते. तसेच एकदा का युद्ध समाप्ती झाली की अनेकांचा विचार बदलू शकतो असे वाटत होते. त्यावरून केलेले साम-दाम-दंड-भेदाचे राजकारण आणि काय वाट्टेल ते होवोत पण मी ही घटना दुरूस्ती करणारच असा स्वपक्षियांपासून सर्वांनाच दमात घेणार्या आणि त्यात केवळ स्वतःच नाही तर माणूसकीस विजय प्राप्त करून देणार्या लि़कनची ही गोष्ट आहे. वास्तवीक लिंकन हा काही पहील्यापासून उदारमतवादी नसावा. पण नंतरच्या काळात त्याच्या लक्षात आले आणि त्यामुळे हा देश केवळ गोर्यांची मालमत्त रहाणार नाही आणि त्यासाठीची सुरवात ही गुलामगिरी संपवण्यातूनच होणार हे त्याने ओळखले, त्यासाठी तो जगला, लढला आणि त्यासाठीच जीव दिला. चित्रपटात, लिंकनचे आणि त्याकाळातील अनेक पैलू स्पिलबर्गसारखा समर्थ दिग्दर्शक असल्याने फार चांगले दाखवले गेले आहेत. त्यात लिंकनची पत्बी मेरी टॉड लिंकन, तीचे भावविश्व, लिंकनशी केलेली वैचारीक देवाणघेवाण बघण्यासारखी आहे. तिचा एक मुलगा विली आधीच आठव्या वर्षी लिंकनच्या व्हाईट हाऊसमधेच गेलेला असतो त्यामुळे दुसर्या मुलाने सैन्यात जाऊ नये असे तीला वाटत असते. पण दुसरा मुलगा रॉबर्ट हा हार्वर्ड सोडून सैन्यात जायचा हट्ट करत असतो. युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांना बघण्यासाठी लिंकन त्याला घेऊन जातो आणि बाहेरच जेंव्हा एका खड्ड्यात असंख्य तुटलेले पाय टाकलेले तो बघतो, तेंव्हा घाबरायच्या ऐवजी अधिकच हट्ट करून तो म्हणतो की मी सैन्यात गेलो नाही तर स्वतःस कायम दोषी समजेन... लिंकनला त्याचे म्हणणे मान्य करावे लागते. विलीच्या मृत्यूमुळे हळवे झालेले लिंकन पतीपत्नी, त्या वेळेस १२ वर्षाच्या टॅड लिंकन ह्या धाकट्या मुलाच्या बाबतीत सगळे लाड करत. ते अगदी सहजरीत्या या चित्रपटात त्या छोट्याच्या धावपळीत दाखवले आहे. सरते शेवटी,लिंकन त्याच्या सहकार्यांबरोबर डावपेच आखत असताना त्याचा काळा मदतनीस सांगायला येतो की बायकोने (मेरी टॉड लिंकन) नाटकाला निघायची तयारी झाली आहे असे सांगितले आहे. मग लि़कनच्या तोंडात एकच वाक्य दिले आहे, निघायची वेळ झाली, जरी मला येथे थांबायला आवडले असते... आणि पाठमोरी लिंकनची आकृती जाताना दाखवली आहे. कुठे गोळीबार नाही की काही नाही. फक्त नाटकाच्या स्टेजवर कोणीतरी येऊन धक्कादायक बातमी म्हणून सांगते... लिंकनच्या घरात असलेले गुलामीतून मुक्त झालेले कृष्णवर्णीय आणि त्यांचे अभिनय तसेच त्यांच्या कथा देखील बघण्यासारख्या आहेत. तत्कालीन राजकारणी आणि त्यांची तत्कालीन हाव देखील दाखवलेली आहे. मात्र टॉमी ली जोन्सने सादर केलेला थॅडीयस स्टीवन्स हा ज्येष्ठ काँग्रेसमन वेगळाच (रॅडीकल रीपब्लीकन) असतो. त्याच्या बोलण्यातून समजते की ३० वर्षे तो गुलाममुक्तीसाठी आवाज उठवत असतो. वास्तवीक सर्वांना समान मानणार्या या असामान्य राजकारण्यास देखील ऐनवेळेस इतरांकडून घटना दुरूस्ती संमत करून घेण्यासाठी म्हणून रेशिअल इक्वॅलीटीचा मुद्दा बाजूस ठेवण्याची तडजोड करावी लागते. पण किमान गुलामांना मुक्त करणे पदरात पाडण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटाच्या सुरवातीस दोन काळे सैनिक युद्ध छावणीत पाठमोर्या लिंकनशी बोलताना घेतलेत. त्यातील एक म्हणतो आज तुम्ही आम्हला गुलामगिरीतून मुक्त करत आहात. अजून पन्नास वर्षांनी एखादा काळा सैन्यात अधिकारी होईल, अजून शंभर वर्षांनी अजून हक्क मिळतील वगैरे... थोडक्यात कृष्णवर्णीय विचारी लोकांमधील आशावाद आणि pragmatism सहज दाखवला आहे. हा चित्रपट ज्या दिवशी बघितला तो मार्टीन ल्युथर किंग डे होता, ओबामाने नुकतीच त्याच दिवशी दुसर्यांदा शपथ घेतली होती. नंतर मनात विचार घोळत राहीले, साधारण दिडशे वर्षांपूर्वी लिंकनने कृष्णवर्णीय गुलामांना मुक्त केले, साधारण पन्नास वर्षांपूर्वी (म्हणजे इमॅन्सिपेशन प्रोक्लमेशन नंतर साधारण १०० वर्षांनी)मार्टीन ल्युथर किंग मुळे कृष्णवर्णियांना नागरी हक्क (सिव्हील राईट्स) मिळाले. त्या नंतर साधारण ४० वर्षांनंतर या देशाने कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष पाहीला. हक्क मिळाल्याने संधी मिळाल्या, संधीचा स्वकष्टाने वापर केला आणि त्या आधीच्या दशकात टप्याटप्याने सर्वोच्च न्यायालयातले न्यायधिश, अनेक विद्यापिठांचे प्रेसिडंट्स, ४ स्टार जनरल कॉलीन पॉवेलसारखे लष्करी अधिकारी आणि पॉवेल-काँडोलीजा राईस सारखे सेक्रेटरी ऑफ स्टेट्स , अनेक राजकार्णी, गवर्नर्स, खेळाडू, नट, उद्योजक झाले...या सर्व पायर्यांकडे बघताना काय दिसते? तर हे बदल झगडून झाले, एकदा झाले की ते घटनेने, कायद्याने, न्यायाने आणि पर्यायाने जनतेने मान्य केले, केवळ वरकरणीच नाही तर मनापासून आत्मसात केले. ते देखील एकदम झाले नाही. पण (अगदी तुरळक अपवाद वगळता) द्वेषाचे राजकारण करत याचा कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला नाही. परीणामी सगळे प्रश्न सुटले असे कोणीच म्हणणार नाही पण देश मोठा होत जाण्यास हातभार नक्कीच लागला...
वाचने
4115
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
सिनेमा
लिंकन
In reply to लिंकन by श्रीरंग_जोशी
उद्देश
चांगला परिचय...
बघणार..
चांगला परिचय.
आवडल. नक्की पाहणार. War of
उत्तम ओळख
In reply to उत्तम ओळख by ऋषिकेश
अजूनही
नक्की बघणार. सिनेमा बघून
सिनेमा बघणार. कधी ते माहित
बघावाच लागेल
मला हा सिनेमा बघायचाच आहे
परिक्षण आवडले.
नक्की बघणार
In reply to नक्की बघणार by धनंजय
उलट...
सुरेख परिक्षण
सुरेख ओळख
परिक्षण आवडले
परीक्षण फार आवडले.कालच हा