मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लिंकन

विकास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
या वर्षी हॉलिवूड मधील सर्वात जास्त अ‍ॅकॅडमी अर्थात ऑस्कर अ‍ॅवॉर्ड्स कुणाला मिळणार याचे उत्तर स्पिलबर्गचा "लिंकन" हा महीना-दिड महीन्यापूर्वी प्रकाशीत झालेला चित्रपट बघताना सहज मिळाले! मध्यंतरी वाचल्याप्रमाणे, डॅनिअल डे लुईस या ब्रिटीश नटास (खाली डावीकडील) स्पिलबर्गने लिंकनचे काम करशील का म्हणून विचारले. त्याने स्पिलबर्गला एक वर्षे थांबण्यास सांगितले. नाराजीने का होईना पण स्पिलबर्ग स्वतःच्या निवडची खात्री असल्याने थांबला. नंतर जो आला तो डॅनिअल डे लुईस नव्हताच.... इतका की असे म्हणतात, की तो स्टेजवर असताना स्पिलबर्ग अमेरीकन इन्फॉर्मल वेष सोडून प्रेसिडंट लिंकनसमोर आदराने फॉर्मल वेषातच येऊ लागला!
Daniel Day Lewis       Lincoln

स्त्रोत: विकीपिडीया
हा चित्रपट लिंकनच्या आयुष्यातील केवळ शेवटच्या चार महीन्यांवर आधारीत आहे. जानेवारी १८६५ ते लिंकन हत्या, १४ एप्रिल १८६५... या चार महीन्यात जे काही घडले त्यामुळे पुढे सर्वच काही मानवतेच्या दृष्टीकोनातून चांगल्याकरता बदलणार होते... त्या बदलाचे नाव होते emancipation - इमॅन्सिपेशन. याचा अर्थ "बंधमुक्त" करणे असा होऊ शकेल.

चित्रपटाची पूर्वपिठीका:

जानेवारी १, १८६३ला लिंकनने अमेरीकन नागरी युद्धाच्या काळात संयुक्त राष्ट्रात सहभागी असलेल्या राज्यांतील कृष्णवर्णीयांना गुलामगिरीतून मुक्त केल्याची राष्ट्राध्यक्षाच्या अधिकारात नाही तर राष्ट्राचा सरसेनापती (कमांडर इन चीफ) म्हणून घोषणा केली होती. त्याचे कारण असे होते की १८५७ साली सुप्रिम कोर्टाने काँग्रेस आणि राष्ट्राध्यक्षास गुलामगिरी संपवण्याचा हक्क नाही असे जाहीर केले होते... त्यामुळे ही घोषणा केवळ युद्धकाळापुरतीच मर्यादीत होती. ती कायम स्वरूपी करण्यासाठी घटना दुरूस्तीची गरज होती. अमेरीकन राज्यपद्धतीत घटना दुरूस्ती करण्यासाठी (मला वाटते) सिनेट आणि काँग्रेसमधे २/३ मताने दुरूस्ती संमत होणे गरजेचे असते. लिंकनने केलेले Emancipation Proclamation हे लिकंन ज्या पक्षाचा होता (आणि जो पक्ष त्या काळात गरीबांचा कैवारी/लिबरल होता!) त्या रिपब्लीकन प्क्षाकडे, सिनेटमधे मते होती. त्यामुळे तेथे घटना दुरूस्ती विधेयक संमत होऊ शकले. पण ती अवस्था काँग्रेसमधे नव्हती...

चित्रपटाचा सारांश

वरील पूर्वपिठीका लाभलेल्या अवस्थेत लिंकनला काही करून नागरी युद्ध संपण्याच्या आत ही घटना दुरूस्ती करून घेयची होती. १८६५ मध्ये लिंकनच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी टर्म चालू झाली होती. नागरी युद्ध चालू होतेच, दोन्हीकडील लाखो सैनिकांना आपले जीव गमवावे लागले होते. सामान्य पण अनेक गेले... मात्र हे जास्त वेळ चालणार नाही आणि दक्षिणेकडील फुटीर राज्यांना संयुक्त अमेरीकेसमोर शरणागती पत्करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली होती. लिंकनला ती परीस्थिती वास्तवात येण्याआधी ही घटना दुरूस्ती करायची होती नाहीतर लोकशाहीतील नंबरगेम मधे दक्षिणेकडील राज्यांमुळे ही घटना दुरूस्ती होऊ शकली नसती. त्यात उत्तरेकडील डेमोक्रॅट्स हे विरोधात होते तसेच सर्वच रिपब्लीकन्स देखील पाठींबा देणारे नव्हते. जानेवारीत नवीन काँग्रेस मधे रिपब्लीकन मते वाढणार होती. त्यामुळे सल्लागारांच मत होते की तो पर्यंत थांबावे. पण लिंकनची तयारी नव्हती. त्याला एकतर दोन्ही बाजूंनी (डेमोक्रॅट्स - रिपब्लि़कन) पाठींबा आहे हे दाखवायचे होते. तसेच एकदा का युद्ध समाप्ती झाली की अनेकांचा विचार बदलू शकतो असे वाटत होते. त्यावरून केलेले साम-दाम-दंड-भेदाचे राजकारण आणि काय वाट्टेल ते होवोत पण मी ही घटना दुरूस्ती करणारच असा स्वपक्षियांपासून सर्वांनाच दमात घेणार्‍या आणि त्यात केवळ स्वतःच नाही तर माणूसकीस विजय प्राप्त करून देणार्‍या लि़कनची ही गोष्ट आहे. वास्तवीक लिंकन हा काही पहील्यापासून उदारमतवादी नसावा. पण नंतरच्या काळात त्याच्या लक्षात आले आणि त्यामुळे हा देश केवळ गोर्‍यांची मालमत्त रहाणार नाही आणि त्यासाठीची सुरवात ही गुलामगिरी संपवण्यातूनच होणार हे त्याने ओळखले, त्यासाठी तो जगला, लढला आणि त्यासाठीच जीव दिला. चित्रपटात, लिंकनचे आणि त्याकाळातील अनेक पैलू स्पिलबर्गसारखा समर्थ दिग्दर्शक असल्याने फार चांगले दाखवले गेले आहेत. त्यात लिंकनची पत्बी मेरी टॉड लिंकन, तीचे भावविश्व, लिंकनशी केलेली वैचारीक देवाणघेवाण बघण्यासारखी आहे. तिचा एक मुलगा विली आधीच आठव्या वर्षी लिंकनच्या व्हाईट हाऊसमधेच गेलेला असतो त्यामुळे दुसर्‍या मुलाने सैन्यात जाऊ नये असे तीला वाटत असते. पण दुसरा मुलगा रॉबर्ट हा हार्वर्ड सोडून सैन्यात जायचा हट्ट करत असतो. युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांना बघण्यासाठी लिंकन त्याला घेऊन जातो आणि बाहेरच जेंव्हा एका खड्ड्यात असंख्य तुटलेले पाय टाकलेले तो बघतो, तेंव्हा घाबरायच्या ऐवजी अधिकच हट्ट करून तो म्हणतो की मी सैन्यात गेलो नाही तर स्वतःस कायम दोषी समजेन... लिंकनला त्याचे म्हणणे मान्य करावे लागते. विलीच्या मृत्यूमुळे हळवे झालेले लिंकन पतीपत्नी, त्या वेळेस १२ वर्षाच्या टॅड लिंकन ह्या धाकट्या मुलाच्या बाबतीत सगळे लाड करत. ते अगदी सहजरीत्या या चित्रपटात त्या छोट्याच्या धावपळीत दाखवले आहे. सरते शेवटी,लिंकन त्याच्या सहकार्‍यांबरोबर डावपेच आखत असताना त्याचा काळा मदतनीस सांगायला येतो की बायकोने (मेरी टॉड लिंकन) नाटकाला निघायची तयारी झाली आहे असे सांगितले आहे. मग लि़कनच्या तोंडात एकच वाक्य दिले आहे, निघायची वेळ झाली, जरी मला येथे थांबायला आवडले असते... आणि पाठमोरी लिंकनची आकृती जाताना दाखवली आहे. कुठे गोळीबार नाही की काही नाही. फक्त नाटकाच्या स्टेजवर कोणीतरी येऊन धक्कादायक बातमी म्हणून सांगते... लिंकनच्या घरात असलेले गुलामीतून मुक्त झालेले कृष्णवर्णीय आणि त्यांचे अभिनय तसेच त्यांच्या कथा देखील बघण्यासारख्या आहेत. तत्कालीन राजकारणी आणि त्यांची तत्कालीन हाव देखील दाखवलेली आहे. मात्र टॉमी ली जोन्सने सादर केलेला थॅडीयस स्टीवन्स हा ज्येष्ठ काँग्रेसमन वेगळाच (रॅडीकल रीपब्लीकन) असतो. त्याच्या बोलण्यातून समजते की ३० वर्षे तो गुलाममुक्तीसाठी आवाज उठवत असतो. वास्तवीक सर्वांना समान मानणार्‍या या असामान्य राजकारण्यास देखील ऐनवेळेस इतरांकडून घटना दुरूस्ती संमत करून घेण्यासाठी म्हणून रेशिअल इक्वॅलीटीचा मुद्दा बाजूस ठेवण्याची तडजोड करावी लागते. पण किमान गुलामांना मुक्त करणे पदरात पाडण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटाच्या सुरवातीस दोन काळे सैनिक युद्ध छावणीत पाठमोर्‍या लिंकनशी बोलताना घेतलेत. त्यातील एक म्हणतो आज तुम्ही आम्हला गुलामगिरीतून मुक्त करत आहात. अजून पन्नास वर्षांनी एखादा काळा सैन्यात अधिकारी होईल, अजून शंभर वर्षांनी अजून हक्क मिळतील वगैरे... थोडक्यात कृष्णवर्णीय विचारी लोकांमधील आशावाद आणि pragmatism सहज दाखवला आहे. हा चित्रपट ज्या दिवशी बघितला तो मार्टीन ल्युथर किंग डे होता, ओबामाने नुकतीच त्याच दिवशी दुसर्‍यांदा शपथ घेतली होती. नंतर मनात विचार घोळत राहीले, साधारण दिडशे वर्षांपूर्वी लिंकनने कृष्णवर्णीय गुलामांना मुक्त केले, साधारण पन्नास वर्षांपूर्वी (म्हणजे इमॅन्सिपेशन प्रोक्लमेशन नंतर साधारण १०० वर्षांनी)मार्टीन ल्युथर किंग मुळे कृष्णवर्णियांना नागरी हक्क (सिव्हील राईट्स) मिळाले. त्या नंतर साधारण ४० वर्षांनंतर या देशाने कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष पाहीला. हक्क मिळाल्याने संधी मिळाल्या, संधीचा स्वकष्टाने वापर केला आणि त्या आधीच्या दशकात टप्याटप्याने सर्वोच्च न्यायालयातले न्यायधिश, अनेक विद्यापिठांचे प्रेसिडंट्स, ४ स्टार जनरल कॉलीन पॉवेलसारखे लष्करी अधिकारी आणि पॉवेल-काँडोलीजा राईस सारखे सेक्रेटरी ऑफ स्टेट्स , अनेक राजकार्णी, गवर्नर्स, खेळाडू, नट, उद्योजक झाले...या सर्व पायर्‍यांकडे बघताना काय दिसते? तर हे बदल झगडून झाले, एकदा झाले की ते घटनेने, कायद्याने, न्यायाने आणि पर्यायाने जनतेने मान्य केले, केवळ वरकरणीच नाही तर मनापासून आत्मसात केले. ते देखील एकदम झाले नाही. पण (अगदी तुरळक अपवाद वगळता) द्वेषाचे राजकारण करत याचा कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला नाही. परीणामी सगळे प्रश्न सुटले असे कोणीच म्हणणार नाही पण देश मोठा होत जाण्यास हातभार नक्कीच लागला...

वाचने 4115 वाचनखूण प्रतिक्रिया 20

सहज गुरुवार, 01/24/2013 - 06:51
सिनेमा व ओळख दोन्ही आवडले. युद्ध संपतेय न संपतेय, तहाची बोलणी होतायत न होतायत, घटना दुरुस्ती होतीय न होतीय, लिंकन बरोबर तहाची बोलणी लाबंवतो, इकडे काँग्रेस मधे नरो वा कुंजरोवा टाईप मत सांगतो, शेवटी बील पास होते... सिनेमा उत्कंठावर्धक आहे. डॅनियल डे लुईस ग्रेट आहेच पण इतर कलाकारही उत्तम, विशेषता लॉबिस्ट/ पॉलीटिकल कन्सल्टंट बिल्बो च्या भूमीकेत जेम्स स्पेडर.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 01/24/2013 - 07:24
सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईनच. मोठ्या अपेक्षेने या चित्रपटाला गेलो. चित्रपटाचे शिर्षक अमेंडमेंट १३ असे असते तर माझा झाला तो अपेक्षाभंग झाला नसता. चित्रपट उत्कृष्ट असला तरी, गांधी, मेकिंग ऑफ महात्मा प्रमाणे तो जीवनपट अजिबातच नाहीये.

In reply to by श्रीरंग_जोशी

विकास गुरुवार, 01/24/2013 - 07:39
चित्रपट उत्कृष्ट असला तरी, गांधी, मेकिंग ऑफ महात्मा प्रमाणे तो जीवनपट अजिबातच नाहीये. गांधी चित्रपटाचा उद्देश १९८०च्या सुरवातीच्या हॉलीवूडच्या जगास गांधीजींची ओळख करून देणे असा होता. म्हणून तो जीवनपट/चरीत्रपट होता. लिंकनवर अनेक चित्रपट आहेत ज्यात कदाचीत तुम्ही म्हणता तसे केले असेल. पण ह्या चित्रपटाचा उद्देशच "१३ वी घटना दुरूस्ती" म्हणून होता. त्याची काही सद्यस्थितीतली राजकीय आणि सामाजीक कारणे देखील होती जी स्पिलबर्गच्या डोक्यात होती.

मन१ गुरुवार, 01/24/2013 - 08:52
separate but equal हे स्टेटस मिळणेही त्या काळात दुष्प्राप्य गोष्ट होती हे खरेच. बाकी " लिंकन " ह्या मिथकाबद्दल लिहिअण्यासारखं बरच काही आहे. माझ्याहून अधिक तुमच्यासारखांनाच अधिक ठाउक असणार.

पिंपातला उंदीर गुरुवार, 01/24/2013 - 09:47
आवडल. नक्की पाहणार. War of the worlds नंतर माझा आवडता स्पीलबर्ग मावळतीला लागला की काय अशी भीती वाटली पण Adventures of Tintin आणि आता लिंकन ने ती भीती खोटी ठरवली : )

ऋषिकेश गुरुवार, 01/24/2013 - 10:08
उत्तम ओळख अवांतरः काळा सहकारी पेक्षा आफिकन-अमेरिकन सहकारी अधिक योग्य वाटले असते. किमान लिंकनविषयक लेखात तरी. मात्र अधिक विचार करता तत्कालीन परिस्थितीनुरूप बरोबरच आहे. सध्याचे मापदंड नकोत :)

In reply to by ऋषिकेश

विकास गुरुवार, 01/24/2013 - 10:17
काळा सहकारी पेक्षा आफिकन-अमेरिकन सहकारी अधिक योग्य वाटले असते. जरी अफ्रिकन अमेरीकन ही संज्ञा अधिकृत वापरली जात असली, तरी काळा / ब्लॅक हा शब्द आजदेखील वापरला जातो. लिंकन चित्रपटात तत्कालीन परीस्थितीनुसार निग्रो हाच शब्द वापरलेला आहे, काळा देखील नाही. :-)

रामपुरी गुरुवार, 01/24/2013 - 21:17
"त्या नंतर साधारण ४० वर्षांनंतर या देशाने कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष पाहील" निव्वळ "आरक्षणा"मुळे हे घडले नाही हे याठिकाणी नमूद करावेसे वाटते.

धनंजय गुरुवार, 01/24/2013 - 22:16
नक्की बघणार. शेवटच्या परिच्छेदातले एक वाक्य कळले नाही :
या सर्व पायर्‍यांकडे बघताना काय दिसते? तर हे बदल झगडून झाले, एकदा झाले की ते घटनेने, कायद्याने, न्यायाने आणि पर्यायाने जनतेने मान्य केले, केवळ वरकरणीच नाही तर मनापासून आत्मसात केले. ते देखील एकदम झाले नाही. पण (अगदी तुरळक अपवाद वगळता) द्वेषाचे राजकारण करत याचा कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला नाही.
निक्सनने घालून दिलेला "सदर्न स्ट्रॅटेजी" धोरणाचा उपयोग आजतागायत होतो. आजतागायत दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये गृहयुद्धातील दक्षिणेकडचा झेंडा फडकवण्याबाबत राजकारण घडते. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर झगडला, पण कशाच्यातरी - आणि कोणाच्यातरी - विरोधातच झगडला ना? त्याच्या हरताळांवर पोलिसी कारवाई करणारे राजकारणी नेते त्या राजकारणाच्या जोरावर निवडून आलेच ना? अमेरिकेत वंशद्वेषाच्या राजकारणाचा स्वार्थाकरिता वापर अपवादात्मक आणि तुरळक म्हणता येणार नाही.

In reply to by धनंजय

विकास गुरुवार, 01/24/2013 - 22:40
पण (अगदी तुरळक अपवाद वगळता) द्वेषाचे राजकारण करत याचा कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला नाही. हे वाक्य मी अत्याचार करणार्‍यांच्या संदर्भात नाही तर ज्यांच्यावर अत्याचार झालेत त्यांच्या, म्हणजे कृष्णवर्णीयांच्यासंदर्भात वापरले होते. अर्थात ते स्पष्ट झाले नाही, विशेष करून आधीच्या वाक्याशी संलग्न केल्यावर... हे तुमचा प्रश्न वाचल्यावर लक्षात आले. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर झगडला, पण कशाच्यातरी - आणि कोणाच्यातरी - विरोधातच झगडला ना? म्हणून तर सुरवातीसच म्हणले की, " तर हे बदल झगडून झाले," पण मला असे वाटते की, (पुढे म्हणल्याप्रमाणे), "एकदा झाले की ते घटनेने, कायद्याने, न्यायाने आणि पर्यायाने जनतेने मान्य केले, केवळ वरकरणीच नाही तर मनापासून आत्मसात केले. ते देखील एकदम झाले नाही." मार्टीन ल्युथर किंगला झगडावे लागले. असे सामाजीक बदल एका रात्रीत होत नसतात तर उत्क्रांतीसारखे होत असतात. सिव्हील राईट्स मिळाले पण ते जनतेने एकदम नाही तरी आत्मसात करत गेलेच. निक्सनने सदर्न स्ट्रॅटेजी केली खरी आणि ती रिपब्लीकन पक्षाने आत्मसात केली पण असेल, पण त्यांना देखील त्यापासून लांब जावे लागले. तुम्ही दिलेल्या दुव्यातच म्हणूनच शेवटी ओबामाला मिळालेल्या दोन्ही वेळच्या मतांमधून सदर्न स्ट्रॅटेजी चालू शकत नाही हे दाखवून दिले आहे. शिवाय रिपब्लीकन पक्षात काँडोलिजा राईस, कॉलीन पॉवेल सारखे कृष्णवर्णीय आहेत, हर्मन केन सारखी व्यक्ती रीपब्लीकन पक्षातून राष्ट्राध्यक्षपदाचा प्रयत्न करू शकते... ही उदाहरणे आहेतच.. पण माझा मुद्दा तरी देखील किंचित वेगळा होता. झगडणे दिसले, "तुम्ही-आम्ही" फरक दाखवणे दिसले, अजून खरवडले तर स्वतःचा आणि स्वतःच्या समुदायाचा स्वार्थ बघितला गेलेला पण दिसेल... पण केवळ द्वेषावर राजकारण करत अत्याचार झाले म्हणत ओरडण्याऐवजी, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले असे कायम दिसले. त्याचा एक परीणाम म्हणून देशाचे कायमचे मानसीक विभाजन झाले असे वाटत नाही. या संदर्भात एक आवडलेला चित्रपट म्हणजे, "ए टाईम टू कील". बघितला नसेल तर अवश्य पहा. तसेच दुसरा चित्रपट (सत्यघटना) ज्यात ठरवून एका काळ्या बास्केटबॉल खेळाडूस अडकवले होते, तो म्हणजे डेन्झल वॉशिंग्टनचा "हरीकेन".

पैसा Sat, 01/26/2013 - 00:49
एका महान माणसावर त्याच उंचीचा चित्रपट बनवणे कठीण असते, त्याला देव्हार्‍यात नेऊन बसवणे किंवा शिवाजी महाराज घरात मध्यमवर्गीय पुरुषाप्रमाणे गप्पा मारत बसलेले काही कादंबर्‍यांमधे दाखवले जातात तितके सामान्यीकरण या दोन्ही गोष्टी टाळून समतोल साधलेला इथे दिसतो आहे. लिंकन हा नुसताच मानवतावादी नव्हता तर मुरब्बी राजकारणी होता हेही स्पष्टपणे समोर येते आहे. अगदी मस्त परीक्षण. चित्रपट नक्की बघेन.

श्रीरंग_जोशी Sat, 01/26/2013 - 01:16
अमेरिकेतल्या चित्रपटगृहात १००% खुर्चा भरलेल्या फार क्वचित पाहायला मिळतात तो योग लिंकनच्या वेळी साधला गेला. मी तर बरेचदा १०-१२ प्रेक्षक असतांना चित्रपट पाहिले आहेत. परिक्षण चांगले झाले आहेत. लिंकन यांच्या पत्नीची भुमिका करणारी अभिनेत्री चित्रपटात बरीच रोहिणी हट्टंगडी यांच्यासारखी भासली :-).

शुचि Sat, 02/16/2013 - 17:55
परीक्षण फार आवडले.कालच हा चित्रपट पाहीला. अतिशय आवडला. डॅनिअल डे लुईस याने विलक्षण सामर्थ्याने ही भूमिका पेलली आहे. "कृष्णवर्णियांना गुलामगिरीतून मुक्त केल्याची घोषणा" हा वॉर्-अ‍ॅक्ट असल्याने युद्धोपरांत अनेक पळवाटा निघू शकत होत्या. आम जनतेसाठी युद्ध (सिव्हील वॉर) युद्ध थांबणे हे निकडीचे होते. मात्र युद्ध थांबल्यानंतर कृष्णवर्णियांची गुलामगिरी राहीली तरी त्यांना विशेष खेद नव्हता.....त्यामुळे लोकमताचा रेटा हव असल्यास, युद्ध थांबण्याआधीच घटनादुरुस्ती करण्याची अतिशय निकड होती. एक संसदेतील अधिकारी दाखविले आहे ज्याच्या तोंडून डेमोक्रॅटस (लिंकन विरोधी) ना हे वदवून घ्यायचे असते की "ऑल आर इक्वल इन गॉडस आईज" ज्यायोगे रेशिस्ट लोकांचा पाठींबा घटनादुरुस्तीस मिळणार नाही. पण तो अधिकारी ठासून हेच सांगतो की "ऑल आर इक्वल बिफोर लॉ." लिंकन यांचे त्यांच्या बायको-मुलांबरोबरच्या नात्याचे पदर स्पिलबर्ग ने उलगडून दाखविले आहेत. शेवटी आगीतून भरारी घेतलेला फिनीक्स पक्षी व लिंकन यांची हत्या यांची दिग्दर्शकाने सांगड घातलेली आहे. युद्धोपरांत वॉर-अ‍ॅक्ट मध्ये काय पळवाटा निघू शकत होत्या ते कोणाच्या लक्षात आले असेल तर ते वाचायला आवडेल.