Skip to main content

गँग्स ऑफ वासेपूर - गेट वेल सून, अनुराग!

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 23/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार असतो. यात म्हणे रुग्ण मधूनच स्वत:च्या मूळ स्वभावाशी एवढा विसंगत वागतो, की "हाच का तो?" असा समोरच्याला प्रश्न पडावा. शिवा, सरकार, सत्या, कंपनी, बनवणारा रामगोपाल वर्मा पुढे RGVकी आग, जेम्स, डिपार्टमेंट बनवेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? हिंदी चित्रसृष्टीत रामू हा या आजाराचं सर्वात ठळक व एकमेव उदाहरण आहे.... असा मझा कालपर्यंतचा भ्रम होता. गुलाल, ब्लॅक फ्रायडे, उडान, यासारख्या चित्रपटांचा अनुभव गाठीशी , व मनोज बाजपेयीसारख्या कसलेल्या अभिनेत्याला घेऊन अनुराग कश्यप साहेबांनी "गँग्स ओफ वासेपूर" प्रदर्शित केल्यामुळे सहाजीकच अपेक्षा उंचावल्या होत्याच ("तेरी कह के लूंगा" वगैरे जाहिरातीमध्ये दिसणार्या ओळी, वास्तवीक प्रेक्षकांना उद्देशून होत्या हे समजेपर्यंत उशीर झाला). असो. या वास्तवदर्शी वगैरे चित्रपट बनवू पाहणार्यांची काही गृहतिके, काही ठाम समज असावेत. १. गरज असो अथवा नसो, भ***, भो***, गां** आदि शब्दांची स्वैर उधळण ही चित्रपटातील संवादांना वेगळ्या उंचीवर नेते. २. चित्रपटातील प्रमुख स्त्री पात्र जितकी भडक, आक्रस्ताळी, कर्कश दाखवता येतील तितक चित्रपट वास्तवाच्या अधिक जवळ जातो. प्रसूतीच्या वेळच्या किंकाळ्या दीर्घकाळ व बारकाईने दाखवणे हा तर प्रतिभेचा उत्कर्षबिंदू. ३. प्रमुख पात्रांच्या प्रणयक्रीडा, किमान त्याबद्दलचे सतत उल्लेख, वर्णनं ही कथानकाची गरज नसताना घुसवता आली तर उत्तमच. ४. हिंसा दाखवायची म्हणजे रक्ताची थारोळी, कल्पक व निर्विकारपणे केलेले खून, हे प्रचंड प्रमाणात आल्याशिवाय थरार वास्तवाबरहुकुम दाखवता येत नाही. यातील बहुतेक 'क्लिशें' ना धक्का न लावता, कथानक, पटकथेची पर्वा न करता कश्यप साहेबांनी तीन तास प्रेक्षकांचा अंत पाहिला आहे. चित्रपटाची कथा सुरू होते ती एका टोळीने कोणत्यातरी हवेलीवर जोरदार सशस्त्र हल्ला चढवण्यापासून. हल्ला संपतो न संपतो तोच फ्लॅशबॅक सुरू... बिहार / झारखंडमध्ये धनबादजवळ वसलेल्या वासेपूरमध्यक, पेशाने कसाई असलेल्या कुरेशी जमातीच्या मुसलमानांचं वर्चस्व असतं. याच कुरेशींपैकी एक सुलताना डाकू इंग्रजांच्या कैदेतून पळून आलेला असतो. एका चकमकीत, तो स्वतःच्या नावावर दरोडे घालणार्या तोतया शाहिद खान च्या सर्व टोळीचा खातमा करून त्याला एक साथिदार व गर्भवती बायकोसोबत पळून जायला भाग पाडतो. हा शाहिद, धनबादला जाऊन कोळश्याच्या खाणीत मजूरी करू लागतो. याच दर्म्यान, त्याची बायको मुलाला जन्म देऊन प्राण सोडते. कालांतराने देश स्वतंत्र होतो, इंग्रज जाऊन भारतीय खाणमालक येतात, खानकामगारांची अवस्था मात्र होती तशीच राहते. नवीन खाणमालक रामधीर सिंहने पूर्वीच शाहिदमधला स्पार्क, जिगरा इत्यादी हेरून ठेवलं असतं. तो शाहिदला स्वतःचा पाळीव पेहेलवान (मजूरांना धमकावून, प्रसंगी मारून मुटकून कामाला लावणारा गुंड) नियुक्त करतो, व नंतर तो डोईजड होण्याची शक्यता दिसताच त्याला आधी परगावी, आणी तिथूनच यमसदनी पाठवतो. शाहिदचा साथिदार कसाबसा त्याच्या मुलाला, सरदारला घेऊन निसटतो. आता सरदारचा 'जिंदगीका मक्सद' एकच - रामधीरचा नायनाट. आता एकीकडे रामधीरचा सूड, दुसरीकडे पठाणांना त्रास देणार्या कुरेशेंच्या टोळ्या, यातील चकमकी, वर्चस्वासाठी स्पर्धा, डावपेच असे रंगेल असं आपल्याला वाटत राहतं, आणी टप्प्या टप्प्यानी आपली निराशा होत राहते. पुढे रामधीर, त्याचा मुलगा दोघंही आमदार होतात, सरदार खानचं (मनोज बाजपेयी) एका भडक , कर्कश वागणार्या बाईशी लग्न होतं, दोन मुलं वगैरे होतात. बायको पोटुशी असल्याने 'नाईलाजाने' तो इतर ठिकाणी तोंडं मारत राहतो, असं बराच वेळ दाखवलंय. याचबरोबर तो रामधीरच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाक, त्याच्या जमिनीवर अवैध कब्जा कर, असल्या कुरापती चालू करतो. एका प्रसंगात तर चक्क पोलीस चौकीत रामधीरसमोर त्याच्या मुलाला फटकावून जेलमध्येही जातो. तुरुंगातच गावठी बाँब बनवण्याची कला आत्मसात करून कैद तोडून पळूनही जातो (अगदी ८० च्या दशकातील चित्रपटात असायचे तसे, पोलिसांना नाच गाण्यात गुंगवून ठेवून). पळून गेल्यावर पोलीस मागावर असताना हा ज्याच्या घरी आश्रयाला असतो, त्याच्याच बहिणीवर लायनी मारणे, अतीशय लोचट वागणे, चावट शेरेबाजी करणे वगैरे चाळे करत राहतो. त्याच्या या लीलांना ती भाळते देखील, आणी हा चक्क तिच्याबरोबर दुसरा घरोबा करतो. मग पहिल्या बायकोच्या मनात मत्सर, तिच्याकडे दुर्लक्ष, इत्यादि आलंच. दर्म्यान दिग्दर्शकाला आठवतं, की अरेच्चा! हा टोळीयुध्दांवरचा चित्रपट आहे, नाही का! मग प्रेक्षकांना सरदारच्या प्रणयक्रीडांमध्ये 'अजून' जास्त वेळ मंत्रमुग्ध न ठेवता तो सरळ प्रचंड खूनखराबा, रक्ताचे पाट दाखवायला लागतो. बराच वेळ कोणी ना कोणी कोणाला ना कोणाला तरी क्रूरपणे मारत राहतं. रक्ताच्या नुसत्या चिळकांड्या..एका दृश्यात तर प्रेताचे खाटीकखान्यात तुकडे करताना दाखवलंय. आता बोला. आहे की नाही हार्ड हिटिंग आणी रियालिस्टिक! सरदारच्या मुलांची उपकथानकं जोडून, चित्रपटकर्ता, प्रेक्षकांना अजून तासभर तरी या कथानकाची (!) चव घेता यावी याची सोय करतो. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मनोज बाजपेयी अपेक्षेप्रमाणेच परिणामकारक. त्याच्या तोंडी जी भाषा दिली आहे ती मात्र कित्येकदा व्यक्तिमत्वास शोभत नाही ('कष्ट', 'जीवन' 'मृत्यू' इत्यादी शब्द बिहारी मुसलमान सहसा बोलताना वापरत नसावेत). बाकी कलाकारांची फौज अगदीच नवोदित आणी यथातथा आहे. सरदारची बायको भडक वावरामुळे लक्षात राहते. सरदारची मुलं तर फक्त कळकटपणा हा निकष ठेवून निवडली असावीत. रामधीर सिंह मुद्दाम अंडरप्ले करतोय, की मुळातच तो इतका बथ्थड अभिनेता आहे याचा पत्ता लागू देत नाही. गँग्स..चं संगीत त्याला अजून काही पायर्या खाली घेऊन जातं. अत्यंत कर्णकटू भेसूर, किरट्या आवाजात चिरकलेली अगम्य बिहारी/भोजपुरी/बुंदेलखंडी/ का काहीतरी भाषेतली गाणी सतत उंच स्वरात पार्श्वसंगीत म्हणून वाजवून वाजवून शिसारी आणली आहे. सर्वाधिक भितीने खिळवून ठेवणारा चित्रपटातला प्रसंग म्हणजे शेवट... "TO BE CONTINUED" अशी धमकीवजा सूचना वाचून घाम फुटतो. म्हणजे हा ३ तासांचा(बघताना ६ तासांचा वाटतो) छळ कमी म्हणून याचा एक सीक्वेल येऊ घातलाय, आणी महागडं तिकीट विकत घेऊन आपण त्याला हातभार लावलाय ही अपराधीपणाची भावना आतल्या आत खात राहते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8346
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

हा हा हा! जबर्‍या झालय परिक्षण. आजच मटाला याचे कवतिक वाचले होते आणि वर ' हा पिक्चर बघायचा तर मनाची एक विशिष्ठ तयारी पाहिजे' (तरच कळेल... तुम्हाला कळला/आवडला नाही म्हणजे तुम्ही अगदीच सामान्य डोक्याचे आहात- हे अध्याहृत) त्यावरुन एकंदर पिक्चर कसा आसेल याचा अंदाज आलाच होता... धन्यवाद!

खतरनाक परिक्षण!

परीक्षण जबरी आहे. फुकट युट्युबवर बघायला मिळाला तर थोडा वेळ बघायचा प्रयत्न करेन म्हणते.

श्रीरंग - परिक्षण चांगले लिहिलेत परंतु इतक्या आजकालच्या काही टुकार हिंदी चित्रपटांना मिपा च्या व्यासपिठावर एवढे प्रतिभावान परीक्षक लाभताहेत हे त्यांचं सुदैव की आपलं दुर्दैव?

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रतिभावान परिक्षक? नाही हो. परिक्षण वगैरे लिहिणं हे मोठ्या लोकांचं काम आहे. (त्यातील बहुतेकांना हा चित्रपट खूपच आवडल्याचं दिसतंय). आम्ही आपलं चित्रपट बघून जे जाणवलं ते लिहिलंय. बाकी तांत्रिक बाजूंबद्दल वगैरे अगदीच तुटपुंजे ज्ञान असल्याकारणाने फारसे लिहिले नाहे. (एडिटर मात्र या चित्रपटात चुकलाय, खास. किंवा एडिटर वगैरे भानगडच नसावी.)

हाहाहाहा....जबर्‍या लिहिल आहे परिक्षण. अगदीच टुकार आहे चित्रपट. त्या अनुराग कश्यपला लागलय येड. बहिसटला आहे तो कलकी बरोबर राहुन. मनोज वाजपेयी, तिग्मांशु धुलिया, नवाजुद्दीन शेख का खान अशी नावं पाहुन पिच्चर पहायला गेलो आणि झक मारली. फक्त शिव्या, मनोज वाजपेयीचा चळीकपणा आणि अधुन मधुन मारामार्‍या हे सोडुन काहीच नाहीये. शेवटी TO BE CONTINUED असे वाचुन तर चक्कर आली.

भयंकर परीक्षण आहे. गोष्ट काय ते कोणी परत एकदा समजून सांगेल काय? डोकं चक्करलंय!

In reply to by पैसा

>> गोष्ट काय ते कोणी परत एकदा समजून सांगेल काय परिक्षणकर्त्यांनीही सुचवले आहे की हा चित्रपट फुकट पाहायला मिळणे हेही महागात पडू शकते? कथा कळली नाही हे एका अर्थाने बरेच झाले. मग कशाला विकतची डोकेदुखी ओढवून घेताय, पैसातै?

परीक्षण आवडले पण का कुणास ठाऊक ते नकारात्मकतेचा चश्मा घलून लिहिल्याप्रमाणे वाटतय. जालावर इतरत्र या चित्रपटाचा रेव्हू चांगला आला आहे. अर्थातच मी स्वतः चित्रपट बघितलेला नाही त्यामूळे जास्त खोलात शिरणार नाही पण तरी एक वाचक म्हणून नक्केच सांगेल की सामान्यतः चित्रपटातील जमेच्या बाजुसुद्दा सांगाव्यात. परीक्षण केवळ नकारात्मकच असावे हा माझ्या मते गैरसमज आहे. (लेखकाला उद्देशुन म्हणत नाही) पु.प.शु. अमृत

In reply to by अमृत

परिक्षण नकारात्मकच असावे, असा माझा गैरसमज नाही. बिहार / झारखंड मधील काही ऑथेंटिक* लोकेशन्सचा* कॅनव्हास* म्हणून सुंदर वापर केलाय. (खास अनुराग कश्यप टच) तरीही तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. परिक्षण अति नकारात्मकतेकडे झुकल्याचं निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद! *या शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द कोणाला माहित असल्यास सुचवावेत

In reply to by श्रीरंग

ऑथेंटिक - अस्सल लोकेशन्सचा - स्थळांचा कॅनव्हास - माहीती नाही पण इथे निसर्गरम्य शब्द चपलख बसतो. टिका सकारात्मक घेतल्याबद्दल _/\_ अमृत

विनोदी लिखाण या सदरात चपखल बसेल. चित्रपट तुम्हाला आवडला नाही. तो इतका खराबच आहे हे पटत नाही. गाणी तर आपल्याला लयीच आवडली आहेत या सिनेमातली. असो, लिखाण विनोदी म्हणून आवडले परीक्षण म्हणून नाही.

In reply to by इष्टुर फाकडा

चालायचंच. चित्रपटांबाबत वेगवेगळी मतं असायचीच. बर्याच मोठमोठ्या समिक्षकांनी कौतुक पण केलंय चित्रपटाचं. एस्स. खानवलकर बाईंची गाणी आणी पार्श्वसंगीत मला मात्र अगदी एच्च. मंगेशरावांच्या तोडीचं वाटलं.

In reply to by श्रीरंग

एच्च. मंगेशरावांशी तुलना आवडली :) बाकी त्यांच्या संगीतानेही मनोरंजन तेवढेच झाले हे मात्र खरं आहे.

श्रीरंग साहेब,अगदी योग्य परीक्षण.माझ्या मनातले लिहिल्यासारखे वाटले...चित्रपट कालच पाहिला..अनुराग कश्यपचा 'रामू' झालाय यात काही वाद नाही.त्याचे नाव ऐकून मागे एकदा "द्याट गर्ल इन येलो बूट्स" नामक चित्रपट(!) पहायला गेलो आणि प्रचंड भ्रमनिरास झाला...हा चित्रपट पण तसाच बकवास वाटला...काही सीन्स मात्र खरच अफलातून वाटले...

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अगागा !!! पाहिलात की काय बिकाशेट? प्रतिसादा वरुन तरी आवडलेला दिसतोय. मग २-४ ओळी खरडा की. मंदीमुळे शब्द आटलेत की काय? ;)

In reply to by गणपा

अजून बघितला नाहीये! मात्र त्याच्याबद्दल जे जे ऐकलंय आणि ज्यांच्याकडून ऐकलं आहे आणि बघितलेले प्रोमोज, त्यावरून हा चित्रपट इतका टाकाऊ नाहीये एवढं मात्र नक्की वाटतंय. अगदी गेट वेल सून वगैरे म्हणणं म्हणजे... जौद्या! चित्रपट बघेन तेव्हा लिहीन नक्की! ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अहो कार्यकर्ते, प्रोमोज, पब्लिसिटी, अनुराग कश्यप, मनोज बाजपेयी, इत्यादींना भुलूनच मी देखील पाहिला होता. मलाही आधी वाटलं नव्हतं, इतका वाईट असेल असं. त्यामुळेच अपेक्षाभंग झाल्यासारखं वाटलं. असो.

मात्र तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला का? मी 'मात्र त्याच्याबद्दल जे जे ऐकलंय आणि ज्यांच्याकडून ऐकलं आहे' असं लिहिलं आहे. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तुम्ही "प्रोमो बघून" असंही लिहिलंय. लिखाणातील त्रुटींबद्दल तुम्ही 'गेट वेल सून' अशी शेरेबाजी केलीत असा माझा समज होता. पण इतर कोणीतरी चित्रपट पाहिला असून त्याची मतं माझ्याशी जुळत नाहीत म्हणून तुम्ही टीका केलीत याचं आश्चर्य वाटलं. असो. लेखनाच्या बाबतीत काही कमी जास्त जाणवल्यास जरूर निदर्शनास आणुन द्या, चित्रपटाबद्दलची माझी मतं चूक की बरोबर हे चित्रपट स्वतः पाहून मग सांगितलंत तर बरं होईल.

हम्म मी स्वत काही हा चित्रपट पाहिलेला नाही पण ज्यानी पाहिलाय त्यांच्याकडून सकारात्मक रिव्ह्यूज ऐकलेत त्यामुळे एकदा बघेनच तुमचे मुद्देही ध्यानात राहतील

या वयात खुनाखुनी वगैरे हिंसात्मक गोष्टी अजिबात बघवत नाहीत! सबब हा पिच्चर बघने आमच्याच्याने जमणार नाही असं दिसतंय!

In reply to by शिल्पा ब

>>>या वयात इतर ठिकाणच्या प्रतिसादांवरुन आपण फार बाल देखील वाटत नाही नी वृद्धदेखील. त्यामुळेच अधिक स्पष्टीकरण अपेक्षित... ;) (मिळाला ना अपेक्षित प्रतिसाद ? :P ;) )

बॉक्स ऑफिसवर आपटला म्हणे. ' चांगले सिनेमे कमी बनतात असं तुम्ही म्हणता. पण , जेव्हा ते बनतात तेव्हा ते चालवायचे कुणी ? ' - (उखडलेला ) अनुराग कश्यप उवाच. कश्यपांच्या अनुरागला श्रीरंगरावांचा पत्ता द्यावा काय? १०-१२ मेंब्र कमी केलीत त्यांनी. ;)

In reply to by गणपा

बास का!! गँग्स.. अनुरागच्याच 'नो स्मोकिंग' पेक्षा अंमळ बरा होता, आणी बराच बरा चालला. :) >> १०-१२ मेंब्र कमी केलीत त्यांनी. तसेही, यापैकी कित्येकांचा यूट्यूबवर पाहण्याचा इरादा होता / आहे. :)

या चित्रपटाचं वर आधारित गँगस ऑफ मराठी संस्थळं असा चित्रपट काढायचा आहे, आपली आपली उमेदवारी जाहीर करावी हि विनंती.

अनुराग कश्यपचा मी फ्यान आहे, त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवून सिनेमा बघितला गेला हे मान्य करतो. त्या अपेक्षांवर अगदीच पाणी फेरलंय, असं काही नाही....म्हणजे अगदी गेट वेल सून, अनुराग वगैरे जास्तच होतं. असो, सिनेमा ठीक होता, गाणी लई आवडली. चित्रपटाच्या शेवटी पुढल्या भागाचा प्रोमो बघितला की नाही? श्रेयनामावली संपल्यावर हा ट्रेलर आहे. व्हीडो इथे बघा.. हे शूट मी केलेले नाही हां ;-)

In reply to by श्रीरंग

ठिक होता. जस शाळा पुस्तक वाचलेल्यांच शाळा बघताना झाल तसच काहीसं या बाबतीत झालं. मुळात अनुरागच नाव असल्याने अपेक्षा फार होत्या. गॉडफादरची भारतीय नक्क्ल अगदीच टाकावू नाही वाटली. या पेक्षा कितीतरी भिकार सिनेमे चालताना पहिलेत. दुसरा भाग येणार असल्याचे कळले. लेट्स सी.

In reply to by सुहास झेले

पुढच्या भागाचा प्रोमो शेवटी होता हे नंतर समजलं. मी चित्रपट संपताच त्वरित निघून गेलो. तसेही, बहुधा पुढचा भाग सिनेमागृहात पाहणार नाहीच.

झक मारली आणि हा चित्रपट पाहिला :( परीक्षण अगदी बरोबर लिहिल आहे . चित्रपटात खूप काही चांगल्या गोष्टी असून अतिशय दर्जा-हीन चित्रपट पाहिल्या सारख वाटल , त्या अनुराग ला धरून एकदा तुडवावा !!!

श्रीरंग तुमची लेखनशैली आवडली. अनुराग कश्यप ने भारतीय दर्शकांच्या माथी सिनेमा न चालण्याचा दोष देऊन स्वतःचे बौद्धिक दिवाळे काढले आहे. मनी , यशजी , किंवा अगदी अमीर ते सर्व खानावळी कुठलाही सिनेमा चालेल ह्याची खात्री देऊ शकत नाही, व सिनेमा चालण्याचा कोणताही ठोस फोर्मुला नाही. नाही म्हणायला बॉलीवूड मध्ये वेगवेगळे ट्रेंड येत राहतात. ९० च्या दशकातील अती मेलोड्रामा धाटणीचा यश चोप्रा चा मोह्बते हा सिनेमा त्यावेळी घराघरात फुकट व रोज दिसणाऱ्या क मालिकांमुळे व तुलसी व मिहिर मुळे साफ झोपला. तेव्हा जितेंद्र ला एका पार्टीत गमतीत तुझ्या मुलीच्या सिरीअल मुळे माझे रात्रीचे शो खाली जात आहेत असे ते म्हणाले होते. पण दर्शकांच्या माथी दोष मारला नाही. झा ह्यांचे राजनीती चालतो तर आरक्षण मात्र ... खुद मनी ने रावण पार झोपला तेव्हा भारतीय प्रेक्षकांच्या अभिरुचीला बोल लावले नाही. अनुराग ला खरच गेट वेल सून ची गरज आहे. अवांतर उद्या माझ्या अजून पर्यंत एकही धाग्याने शतक पहिले नाही.( बहुदा अचूक विषय ,अचूक वेळी माझ्या हातून निवडला गेला नसावा किंवा इतर बरेच ) म्हणून जर मी मिपाकरांना ह्या प्रकरणी दोषी ठरवले तर मला माझे अवतार कार्य येथून..... अनुराग ला हेच लागू पडते.