Skip to main content

ते म्हणले

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 18/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
ते म्हणले शोधा चर्च, मशिदी, नी देवळे दिसली फक्त प्रतिके आणि शोधकांचे थवे थवे, आत असताना डोळे मिटून बसणारे बाहेर तुझी शिकवण नजरेआड करणारे ते म्हणले भेटण्या देवा, गरीबांची कर सेवा. भेटले. भेटले अनेक सन्धीसाधू बगळे पुढ्यात वाढलेले झटक्यात मटकावर बाजुच्या भुकेल्यांचा घास हिरावणारे ते म्हणले, अरे देव म्हणजे निसर्ग! डोंगर दर्‍या नद्या सौन्दर्य चाखल्यावर कडाडले भुकंप लाखो घरे उध्वस्त करणारे पेटले वणवे मुक्या श्वापदाना भाजणारे ते म्हणले, वेड्या देव तुझ्यातच आहे! मन एकाग्र करुन आत डोकावल्यावर दिसले लहान मूल, साधनेत द्ंगा करणारे त्यानेच मुखवटे चढविले असणार, सैतानी दिसणारे ते म्हणले, हे म्हणले, जे जे काही म्हणले, ते म्हणले, हे म्हणले, जे जे काही म्हणले! सगळेच बुलशिट, नक्की कोणास माहित नव्हते! सगळे सन्धीसाधूच, देवावर तिजोर्‍या भरणारे! श्रद्धेच्या अन्धारात तीर मारून भक्ष्य शोधणारे! आणि दुर्गम गुहेतले कृपण ऋषी, ज्ञानी म्हणविणारे? भले त्याना अर्थ कळो, जगाला न सांगणारे! कंटाळलोय मी तुला शोधून शोधून, आता हे देखील माहीत नाही मला, तू सापडल्यास काही फरक पडेल किंवा नाही. तरीही, कुतुहल शमत नाही म्हणून, एकदा तरी सांग तुझे घर कुठे आहे..... एकदा तरी सांग तुझे घर कुठे आहे.....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2735
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

देव काय अशी शोधायची गोष्ट हाय व्हय अरुण काका? सोडा हो तुम्हा आम्हाला नाही सापडाय्चा तो. बसु दे त्याला निवांत.

आणि देव या 'जनांत मनांत' कुठं सापडणार ? कदाचित 'जे न देखे रवी' मधे शोधला तर मिळेल!

अरुणराव - कवितेतून मांडलेला विचार आवडला. परंतु शीर्षकात व जागोजाग 'म्हणले' असं क्रियापद वापरलेलं आहे. जर इतर शब्दरचनेत भाषाशैली ग्रामीण भागातली असती तर ते शोभून दिसले असते. परंतु उपरोक्त भाषाशैलीला 'म्हणाले' हे क्रियापद अधिक शोभून दिसलं असतं असं मला वाटतं.

कवितेतला आशय पोहचला. बाकी, देव-बीव कै नसतं. [ तो अनुभूती वग्रैचा विषय असू शकतो] :) आमच्या मित्रानं दिलेल्या कव्वालीतले ही ओळ मला खासच आवडते. पुन्हा लिहितोच. ''अपनी पेहचान की खातीर है बनाया सबको, सब की नज़रों से मगर खुद को छुपा के रक्खा है, तुम एक गोरख धंदा हो'' बाकी, श्रीरंग_जोशी जे 'म्हणाले' त्याच्याशी सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद. तुमच्या मित्राची कवालीतील ओळ खूपच भावली. म्हणले विषयी मी खाली थोडे म्हणलो आहे.

कवितेचा आशय आणि प्रयत्न आवडला पण निराशावादी सूर नाही आवडला. देव सर्वव्यापी आहे. (म्हणजे त्याच्या मागे 'व्याप' भरपूर आहेत.) एका एस्टीचे ब्रेक निकामी झाले. एस्टी घाटातून चालली होती. ब्रेक निकामी झाल्याने तिची दरीकडे होणारी वाटचाल रोखणे चालकाला अशक्य झाले होते. सर्वजण 'आता आपण मरणार' ह्या विचारांनी भयभित झाले होते. पांढर्‍याफटक चर्येने देवाचा धावा करू लागले. हळू हळू दरीकडे सरकणारी एस्टी एका मैलाच्या दगडाला अडकून थांबली. सर्व ६० प्रवासी आणि चालक सुखरुप वाचले. 'तो' दगड म्हणजे देव तसेही, कुठे नाहीच भेटला तर, खालील पत्यावर 'रमेश देव' नक्की भेटेल. अ/४, ऋतुराज अपार्टमेन्ट, एस्. एन्. डि. टी. कॉलेज जवळ, जुहू मार्ग, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई - ४०० ०५४

अरुण मनोहर सर , कविता उत्तम आहे. देवांच्या नावाने उच्छाद मांडणार्‍या संधीसाधू लोकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कवितेतील तुमची तळमळ समजली. खुप सुंदर. ते म्हणले शोधा चर्च, मशिदी, नी देवळे दिसली फक्त प्रतिके आणि शोधकांचे थवे थवे, आत असताना डोळे मिटून बसणारे बाहेर तुझी शिकवण नजरेआड करणारे ह्या ओळी अप्रतिम . मुळात आजकाल रोजच्या बोलण्यात आपण मराठी बोलताना इंग्लिश , हिंदी व ईतर भाषातले शब्ब्द वापरतोच की मग कवितेत जर आपल्या मातीतलाच ग्रामीण शब्ब्द आला तर तो नक्कीच चांगलाच आहे. मस्त कविता.

In reply to by निश

>> मग कवितेत जर आपल्या मातीतलाच ग्रामीण शब्द आला तर तो नक्कीच चांगलाच आहे. मान्य आहे, परंतु तो शब्दच ग्रामीण हवा, केवळ एकाच क्रियापदाचे रूप ग्रामीण वापरले जाणे जरा वेगळे वाटले एवढेच...

सर्व रसिकाना धन्यवाद. हे मुक्तक लेखकाच्या मनातले आहे. मनात बोलताना (आणि मिपावर (डोळा मारणारी स्मायली)) आपण व्याकरणाचा येवढा विचार करीत नसतो. मनातले सन्भाषण स्वैर सुरू असते. "म्हणले" मधे गप्पा गोष्टी करताना येते तशी मोकळीक वाटली होती, म्हणून तसे म्हणलो. ग्रामीण सन्दर्भ माझ्या मनात नव्हता. तसा असता तर तशा बाजात लिहिण्याचा प्रयत्न जरूर केला असता. अस्सल वर्‍हाडी भाषेत लिहीणे मला जमत नाही, पण तसा आव आणून लिहायला आवडते.

उत्तम मुक्तक! देवाच्या शोधाबद्दल काय सांगणार? "तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी!"