✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कृष्ण आणि कर्ण

स
स्वानंद वागळे यांनी
Wed, 03/28/2012 - 17:44  ·  लेख
लेख
मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. याच कादंबरीने लोकांना महाभारत ये एका महान ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पहाण्यास प्रवृत्त केले. कर्ण किती महान होता हे याच पुस्तकामुळे लोकांना कळू शकले. आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या कर्णासाठी, वाचताना नकळतच एक आदराची जागा आपल्या मनात बनते. एवढा दानशूर असूनदेखील भगवंत कृष्ण त्याचाशी एवढे निर्दयीपणे का वागले? नको नको म्हणत असताना देखील त्यांनी अर्जुनाला नि:शस्त्र कर्णावर बाण चालवण्यावस का भाग पाडले असेल? पु. ल. देशपांडेंचा ही लेखनात एका ठिकाणी पु. ल. म्हणतात की “कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”. मला स्वतंत्रपणे विचार करताना असे वाटते की ज्या प्रकारचा मृत्यू श्री कृष्णांनी कर्णासाठी ठरवला तो कदाचित बरोबरच होता. अनेक वेळेला त्यांनी अर्जुनाला पाठीशी घातले हा देखील एक कृष्णानितीचाच भाग होता. असे मला वाटते. या सर्व गोष्टीत अर्जुनाला वाचवण्यापेक्षा त्यांचा कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान देण्याचा त्यांचा हेतू असावा असे मला वाटते. एक विचार सर्वांनी करून पहा की जर अर्जुनाने कर्णाला सरळ युद्धात हरवले असते तर कर्णाला आज कोणी महान म्हटले असते का? किंवा युद्धात रथाचे चाक जमिनीत रूताल्यावर ते जमिनीतून बाहेर काढणे हे त्या वेळी महत्वाचे होते का? कर्ण रथाचा वापर न करता लढू शकत नव्हता का? जेंव्हा अर्जुन बाण चालवत होता तेंव्हा कर्णाने रथाचे चाक मोकळे करायचे सोडून धनुष्य का नाही उचलले? या प्रश्नांचे उत्तर मिळवायचा कोणी कधी प्रयत्न केला आहे का? मला वाटतं की कर्णाला देखील कृष्णांचा हा डाव कळला असावा म्हणूनच त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न नाही केला. अर्जुन आणि कर्ण यांमध्ये नि:संशय रित्या कर्ण जास्त महान धनुर्धर होता. परंतु त्याच्या आयुष्यात त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला कपटाने मारण्यात कर्ण देखील होता. अभिमन्यू चे कवच मागून भेदण्याचे कामही त्याचेच. परशुरामाशी खोटे बोलून दिव्या अस्त्र मिळवणारा कर्ण देखील हाच होता. ध्युतामध्ये पांडवांवर मोहिनी टाकून त्यांना कपटाने हरवनाऱ्या कौरवांच्या बाजूने कर्ण लढला कारण काय तर त्याच्या पडत्या काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. पण याच कर्णाने कधी दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी हा कर्ण शांत राहिला कारण काय तर द्रौपदीने त्याला साकडे घातले नाही? हा युक्तिवाद तर कधीही न पाटण्याच्या पलीकडचा वाटतो. तरीही श्री कृष्णांनी त्याला नि:शस्त्र असताना अर्जुनाकडून मृत्यू आणविला. याचमुळे आज कर्णाला सहानुभूती तरी मिळते. लोक आजही सर्वकालीन महान धनुर्धर म्हणूनच उल्लेख करतात. जर श्री कृष्णांनी सरळ युद्धात कर्णाला मृत्यू दिला असता तर आज “मृत्युंजय” चा शेवट आणि एकंदर संपूर्ण विषयाच पूर्ण पणे वेगळा असता असे मला वाटते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
30702 वाचन

💬 प्रतिसाद (121)

प्रतिक्रिया

स्वानंद वागळे साहेब , मस्त लेख.

निश
Wed, 03/28/2012 - 18:03 नवीन
स्वानंद वागळे साहेब , मस्त लेख. “कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”. - हे वाक्य ह्या लेखाती ल high point आहे. संपादित. पण तुमचा लेख मस्त. अजुन येउ द्यात.
  • Log in or register to post comments

वागळेसाहेब,

प्रास
Wed, 03/28/2012 - 18:05 नवीन
कृपया महाभारत मूळातून वाचावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

प्रास साहेब, हे सांगून सांगून

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 03/28/2012 - 22:36 नवीन
प्रास साहेब, हे सांगून सांगून कित्येक थकले, मी पण सोडून दिले आता सगळ्यांना सांगणे. कधी कधी मूड लागला तर सांगतो. पण मला वाटते की हा सावंतांच्या प्रतिभाशक्तीचा गौरव आहे की तद्दन खोट्या (मूळ महाभारताशी फारकत घेतलेल्या) गोष्टींनाच लोक खरे समजतात आणि वरून त्यावर निबंध लिहितात, चर्चा पण करतात. आता तर मी लोकांना सांगणार आहे कि राधेय वाचा !!! त्यामुळे माझे पण इत्यलम् च :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

मुळातुन म्हणजे?

Nile
गुरुवार, 03/29/2012 - 02:46 नवीन
जय, भारत की महाभारत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

नीळेसाहेब,

प्रास
गुरुवार, 03/29/2012 - 10:25 नवीन
कृपया महाभारत मूळातून वाचावे ही विनंती.
कृपया वांझोटे फाटे फोडू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

योग्य उत्तर!!! खरे तर मी

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 03/29/2012 - 11:06 नवीन
योग्य उत्तर!!! खरे तर मी माझ्या मागच्या प्रतिसादात लिहिणार होतो, की परत कुणी विचारू नका जय, भारत की महाभारत म्हणून. कारण दर वेळेला किमान एक जण बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतोच. एक तर तीन ग्रंथांची थिअरी पण वादग्रस्त आहेतच. तो संपूर्ण वेगळा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

हाहाहा.

Nile
गुरुवार, 03/29/2012 - 11:33 नवीन
उत्तरांबद्दल धन्यवाद. मागे कोणीतरी महाभारत वादग्रस्त आहे असेही म्हणाला होता. असेल कोणी तरी वांझोटा! तुमच्या पोथी पुराणात व्यत्यय नको! चालुंद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

नीळेभाऊ,

प्रास
गुरुवार, 03/29/2012 - 17:10 नवीन
प्रतिसादादरम्यान वांझोटे फाटे फोडण्याचा व्यत्यय न आणण्याचे ठरवल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

छान

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 03/28/2012 - 18:10 नवीन
झाला आहे लेख, पण एकदा इरावती कर्व्यांचे युगांत वाचून पहा. कदाचित तुमच्या मतांमध्ये फरक होईल. बाकी पुलंचे जे वाक्य तुम्ही दाखल्याखातर दिले आहे ते बरोबर वाटले नाही. ते वाक्य एका मोठ्या प्रासंगिक विनोदाचा भाग आहे. एका लहान शाळकरी मुलाच्या मनातले विचार मांडतांना ते वाक्य आले आहे, ते पुलंचे मत असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

+१

सुधीर
Wed, 03/28/2012 - 19:19 नवीन
तेच म्हणतो, इरावती कर्वे यांचे युगांत वाचून "दिमागकी घंटींया बजता है साला" असं झालं होतं. अजून एक पुस्तक आहे, पर्व - एस एल भैरप्पा, कोणी अनुवाद केला आहे ते आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

>>>पर्व - एस एल भैरप्पा, कोणी

यकु
Wed, 03/28/2012 - 19:19 नवीन
>>>पर्व - एस एल भैरप्पा, कोणी अनुवाद केला आहे ते आठवत नाही. एस. एल. भैरप्पा म्हटलं की उमा कुलकर्णी या नावाची दिमाग में घंटी बजती है.. कुठंतरी ऐकलं असणार.. वाचलेलं नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

उमा कुलकर्णी

सुधीर
Wed, 03/28/2012 - 19:34 नवीन
बरोबर! पण नाही आठवलं, कारण युगांत सर्वप्रथम वाचले होते, त्यामुळे त्याची छाप जास्त होती. शिवाय तुम्ही बरोबर पकडलतं, कारण लायब्ररीतून आणलं होतं, पण काही कारणास्तव पूर्ण करणं शक्य नाही झालं. त्यामूळे विस्मृतीत गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

पर्व.

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 12/12/2013 - 06:50 नवीन
खरच फार भारी आहे ही कादंबरी.महाभारतातल्या सगळ्या गोष्टींचे लॉजिकल विश्लेषण आहे यात.माझ्या आवडत्या पुस्तकापैकी एक आहे हे.त्यांची "मंद्र" नाही भावली फारशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

एका लहान शाळकरी मुलाच्या

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 03/29/2012 - 11:10 नवीन
एका लहान शाळकरी मुलाच्या मनातले विचार मांडतांना ते वाक्य आले आहे, ते पुलंचे मत असेल असे वाटत नाही.
सखाराम गटणे आणि त्याचे पुलंच्या लेखनातील जीवन विषयक सूत्र आठवले !!! पुलंचा विनोद समजायला इतका कठीण असेल असे वाटले नव्हते कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

ह्म्म्म्म

आदिजोशी
Wed, 03/28/2012 - 18:18 नवीन
कर्णाला अर्जूनाने अनेकवेळा समोरासमोर हरवले आहे. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी समस्त कौरव बंधू + कर्ण ह्यांना भीम आणी अर्जूनाने पिदवले, विराट राजाच्या सैन्यासोबत अख्ख्या कौरव सेनेला (कर्णासकट) नि:शस्त्र करून पिटाळून लावले. त्यामुळे श्रेष्ठ धनुर्धर अर्जूनच होता ह्यात वाद नाही. कपटाने वागलेल्या माणसाला मॄत्यूही तसाच मिळतो हे जगाला दाखवण्यासाठी कर्णाचा मॄत्यू नि:शस्त्र असताना घडवून आणला. कर्णाला अवहेलना सहन करावी लागली कारण त्याने जनमानसात ओळख सूतपूत्र असूनही राजकुमारासारख्या प्रतिष्ठेची अपेक्षा धरली. अर्थातच लोकांनी शिव्या घातल्या जे समाजरितीला धरूनच होते. जर कर्णात खरोखर धमक असती तर दुर्योधाचं आंदण राज्य न स्विकारता स्वतःच्या जिवावर लढाया करून तो सम्राट बनू शकला असता. त्यापासून त्याला कोणी रोखू शकले नसते. पण त्यानेही सोप्पा मार्ग स्विकारला. अँटी हीरो टाईपच्या मॄत्युंजय मधील व्यक्तीचित्रणामुळे कर्णाला उगाच भलतेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. कर्णाला त्याच्या आईने जन्म होताच त्यागले ह्या एका घटनेमुळे त्याच्या पुढच्या आयुष्यात त्याने केलेल्या अनेक भयानक चुका लोकांनी आंधळ्या प्रेमाने नल अँड व्हॉईड केल्या. कर्णाचे अपराध आणि चुका मोजत बसलात तर त्या जवळ जवळ दुर्योधना इतक्याच होतील. कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान कॄष्णाने नव्हे तर शिवाजी सावंत ह्यांनी दिले. अवांतरः पु.लं.चं ते वाक्य बिगरी ते मॅट्रीक मधील एका शाळकरी मुलाच्या तोंडी आहे. त्यामुळे त्याला कितपत सिरियसली घ्यायचे ते बघा.
  • Log in or register to post comments

>>कर्णाला इतिहासात कायमचे

बॅटमॅन
Wed, 03/28/2012 - 18:35 नवीन
>>कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान कॄष्णाने नव्हे तर शिवाजी सावंत ह्यांनी दिले. +१. हेच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

+१११११११

प्यारे१
Wed, 03/28/2012 - 18:36 नवीन
बळंचकर आहे मृत्यूंजय...! द्रौपदी वस्त्रहरणाची आयडीया मूळात कर्णाचीच होती... अ‍ॅण्टी हिरो/ खलनायकाला ग्लॅमर देऊन त्याला मोठं करायची लाटच आल्यासारखं झालंय हल्ली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

-१ +१ = ०

sagarpdy
Wed, 03/28/2012 - 19:38 नवीन
कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान कॄष्णाने नव्हे तर शिवाजी सावंत ह्यांनी दिले.
-१ मृत्युंजय हातात यायच्या आधीपासूनच कर्णाला एक वेगळंच वलय आहे असंच वाटत आलंय
“कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”.
पु.लं.चं ते वाक्य बिगरी ते मॅट्रीक मधील एका शाळकरी मुलाच्या तोंडी आहे. त्यामुळे त्याला कितपत सिरियसली घ्यायचे ते बघा.
+१ ठकासी असावे महाठक, असे समर्थ रामदासांनी म्हटलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

मराठी साहित्यातली असामान्य कलाकृती

सुधीर
Wed, 03/28/2012 - 19:06 नवीन
मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. तुम्हाला "मृत्युंजय" वाटतं तर मला "ययाति"! मृत्युंजयचा साहित्यिक दर्जा नक्कीच महान आहे. पण ययाति वैचारिक पातळीवर अजून महान वाटते.
  • Log in or register to post comments

कर्णाला इतिहासात

विजय_आंग्रे
Wed, 03/28/2012 - 19:08 नवीन
>>कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान कॄष्णाने नव्हे तर शिवाजी सावंत ह्यांनी दिले.<< "सूर्यराव म्हणजे सामान्य योध्दा नव्हे. भारती जैसा कर्ण योध्दा, त्याच प्रतिमेचा असा शूर पडला." वरिल उल्लेख "सभासद बखरीत" साल्हेरच्या लढाईत मारल्या गेलेल्या "सूर्यराव काकडे" यांच्या बाबतीत मिळतो. सभासद बखरही शिवाजी सावंतानी लिहली आहे का.?
  • Log in or register to post comments

पण मी काय म्हंटो, कर्ण महान

यकु
Wed, 03/28/2012 - 19:14 नवीन
पण मी काय म्हंटो, कर्ण महान होता की कृष्‍ण लुच्चा होता की शिवाजी सावंतांनी हाईप केली यापेक्षा कृष्‍ण, कर्ण आणि शिवाजी सावंतदेखील एवढा महानपणा या सगळ्यांच्या अंगी असूनही कुणीच कुणाचं काही ** मतपरिवर्तन करु शकत नाहीत (झालं तरी काय दिवे लागणार आहेत म्हणा ;-) ) , सगळेच ज्याला जे भावतं तेच छातीला धरुन बसतात हे मजेशीर आहे.. ;-) स्वगत: भागो, नै तो लै टोले पडेंगे... ;-)
  • Log in or register to post comments

सगळेच ज्याला जे भावतं तेच

sagarpdy
Wed, 03/28/2012 - 19:26 नवीन
सगळेच ज्याला जे भावतं तेच छातीला धरुन बसतात हे मजेशीर आहे..
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

या संदर्भात

विकास
Wed, 03/28/2012 - 19:21 नवीन
या संदर्भात, दाजीशास्त्री पणशीकरांचे, "कर्ण खरा कोण होता?" हे पुस्तक देखील वाचण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

आदि जोशींचे बरोबर आहे...

योगप्रभू
Wed, 03/28/2012 - 19:47 नवीन
कर्ण अर्जुनाइतका श्रेष्ठ धनुर्धर नव्हता. तो हलक्या कानाचा, द्रौपदीला कायम वखवखलेल्या नजरेने बघणारा, नीच विचार करणारा आणि भर सभेत ते बोलून दाखवण्यास न लाजणारा होता. दुर्योधनाला चुकीचे सल्ले देणार्‍या दुष्ट चौकडीत कर्ण होताच होता. पांडव वनवासात असताना त्यांना खिजवण्यासाठी दुर्योधन दास-दासी-वैभव-सैन्य घेऊन गेला. ती कल्पना कर्णाचीच होती. त्यावेळी चित्ररथ गंधर्वाशी झालेल्या लढाईत कर्ण दुर्योधनाला सोडून पळून गेला होता कारण चित्ररथाशी मायावी युद्धात कर्णाचा निभाव लागला नव्हता. मात्र त्याच चित्ररथ गंधर्वाला अर्जुनाने स्वतःच्या बाणांचे पाणी पाजले होते आणि जीवदान देऊन स्वतःचा मित्र बनवले होते. त्या मैत्रीला जागून चित्ररथाने अर्जुनाच्या विनंतीवरुन बांधलेल्या दुर्योधनाला सोडून दिले. अर्थात कर्ण पराक्रमी होताच यात वाद नाही. तो निष्ठावान सूर्योपासक आणि दानवीरही होता. पण 'ढेकणाच्या संगतीने हिरा तो भंगला' अशी त्याची अवस्था झाली.
  • Log in or register to post comments

आदि जोशींचे बरोबर आहे...

सुहास..
गुरुवार, 03/29/2012 - 03:43 नवीन
आदि जोशींचे बरोबर आहे... >>> एक दम सत्य !! महाभारत घडले तेव्हा आमचा उनकचा अध्यक्ष अ‍ॅड्या आणि योगप्रभु काका, ईतर पांडवासवे द्रोणांकडे शिकायला जात होते ;) विशेष म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण होताना, ज्या साड्या कृष्ण पुरवित होता त्या खुद्द अ‍ॅड्या ने तुळशी बागेतल्या लक्ष्मी साडी सेंटर मधुन आणल्या होत्या आणि प्रभु काकांकडे म्हणे युध्दात बाण पुरवायचं कॉन्ट्रॅक्ट होतं ;) ( मार खातय अ‍ॅड्याचा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

तपशिलात थोडी दुरुस्ती..

योगप्रभू
गुरुवार, 03/29/2012 - 12:10 नवीन
माझ्या शिक्षकांबाबत सुहास यांच्या नोंदीत थोडी दुरुस्ती करतो. मी द्रोणांकडे शिकायला गेलो, पण ते पैसे घेऊन फक्त कौरव राजपुत्रांना शिकवत असत. इतरांना कृपाचार्य शिकवत असत. त्यामुळे द्रोणांनी मला कृपाचार्यांकडे हाकलले. मी इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमधील असल्याचे समजताच त्यांनीही मला हाकलून दिले. त्यानंतर निराश मनःस्थितीत असताना मला मिपा नावाचे रम्य उपवन दिसले. तेथे मी सोकासुर, धम्यासुर, परासुर आदिंच्या संगतीला लागलो. पुन्हा विद्या शिकण्याची उबळ आली. आता इबीसी नको तर कास्ट सर्टिफिकिटच्या जोरावर प्रवेश मिळवून बघू म्हणून परशुरामांकडे गेलो. बोलण्याच्या नादात मी असुरांच्या संगतीत राहिल्याचे सांगताच परशुरामांनीही मला 'भ्रष्ट ब्राह्मण' म्हणून हाकलून दिले. अखेर मी सांदिपनी मुनींच्या मोफत गुरुकुलात शिकलो. तेथे पूर्वी सुदामा हा गरीब ब्राह्मणही मोफत शिकला होता. युद्धात बाण पुरवायचं कॉन्ट्रॅक्टही माझ्या अंगाशी आले. युद्ध संपताच सगळ्यांनी बिल देण्याबाबत काखा वर केल्या. दिवाळखोर अशा स्थितीत मी वणवण भटकू लागलो. उपासमारीने माझी भूक इतकी वाढली, की मी मिपा उपवनातील एकचक्रा नगरीत शिरुन भोजन फस्त करु लागलो. लोकांनी माझे नाव बकासुर ठेवले. मध्यंतरी एकचक्रा ग्रामस्थ आणि माझ्यात समेट झाला. एकचक्रा नगरीतील सानिका-स्वप्नील, जागुताई आदी गृहिणींच्या सुंदर पाककृतींचा डबा मला मिपा उपवनात आरामात मिळू लागला. मग मी एकचक्रा नगरीतील ग्रामस्थांना छळणे सोडले. त्याऐवजी पुराणातील भंकस गोष्टी मिपा उद्यानात बागडणार्‍या मुलांना सांगून त्यांचे मनोरंजन करण्याचे काम पत्करले. आता हा तपशील नीट लक्षात ठेवाल ना? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

लय भारी

कवितानागेश
गुरुवार, 03/29/2012 - 13:52 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

मृत्यूंजय

कपिलमुनी
Wed, 03/28/2012 - 19:48 नवीन
मृत्यूंजय शब्द्बंबाळ वाटला .. राधेय बरेच संतुलीत अहे
  • Log in or register to post comments

आठवी-नववीमध्ये कधीतरी

अमेरिकन त्रिशंकू
Wed, 03/28/2012 - 19:51 नवीन
आठवी-नववीमध्ये कधीतरी मृत्युंजयची पारायणे करून भारावून गेलो होतो पण नंतर कधीतरी पुन्हा एकदा वाचायला घेतलं पंचवीशीत तेव्हा अतिशय शब्दबंबाळ वाटलं होतं आणि अजुनही वाटतं. एखाद्या व्यक्तीला किती ग्लोरिफाय करावं ह्याचं उत्तम उदाहरण आहे मृत्युंजय म्हणजे. अशीच थोडीफार परिस्थिती (शब्दबंबाळपणा) बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या "राजा शिवछ्त्रपती"ची आहे. बाबासाहेबांनी निदान त्यात काल्पनिक प्रसंग घुसडले नाहीयेत. अर्थात मृत्युंजय ही कादंबरी असल्याने शिवाजी सावंतांनी थोडेफार स्वातंत्र्य घेतले असेल काल्पनिक प्रसंग घालण्याचे. वरील ३-४ ओळी या पूर्णपणे माझी वैयक्तिक मते आहेत.
  • Log in or register to post comments

कर्णाचे महानपण त्याचे श्रेष्ठ

मृत्युन्जय
Wed, 03/28/2012 - 19:52 नवीन
कर्णाचे महानपण त्याचे श्रेष्ठ धनुर्धर असण्यात नाही आहे तर त्याच्या असामान्य जिद्दीत, चिकाटीत आणि शब्दाला जागण्याच्या वृत्तीत आहे. कर्णाने त्याच्या प्रतिज्ञेतुन कधीच पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला नाही. वास्तविक काहितरी कारण काढुन इंद्राला कवच कुंडले नाकारणे किंवा कुंतीला तिच्या ४ मुलांच्या जन्माची भीक घालणे तो टाळु शकला असता. कर्ण जसा वागला तसा तो का वागला याचे कारण शोधायचे झाल्यास त्याला जन्मभर केवळ त्याच्या सामाजिक स्थितीवरुन जी अवहेलना सहन करावी लागली त्याकडे बघायला लागेल. ज्या काळात स्त्री ही पुरुषाची केवळ विषयवस्तु अथवा धन मानली जायची आणि त्याउप्पर पुरुषांनी दिली नाही तर जिला फारशी किंमत नव्हती त्याकाळात द्रौपदीने त्याचा तेजोभंग केला. त्याचीच परिणिती वस्त्रहरणात झाली. आजच्या काळचा विचार करता तो चक्क बलात्काराचा प्रयत्न होता पण त्या काळच्या रितीरिवाजांप्रमाणे नव्हता. त्या काळचे मापदंड आजच्या काळाला लावुन आपण महाभारतातील व्यक्तिरेखांचे मुल्यमापन करु लागलो तर कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते (कृष्णाने मित्रविंदेशी तर अर्जुनाने सुभद्रेशी पळवुन नेउन लग्न केले. त्यातील मित्रविंदेच्या हरणाबद्दल दुमत आहे. सुभद्रा हरणाबद्दल माझ्यामते नाही. चु. भू. द्या. घ्या. ), पांडव खूनी होते (वारणावरतात जाळलेले ५ अभागी आदिवासी आणि त्यांची आई), युधिष्ठिर आणी त्याचे भाऊ वासनांध होते (द्रौपदीबद्दल ती भावाची बायको होणार आहे हे माहिती असताना तिच्याबद्दल मनात निर्माण झालेली अभिलाषा) यातल्या वरीलपैके प्रत्येक मुद्द्यावर किमान १०० पानी चर्चा करता येइल. दोन्ही बाजूंनी. महाभारत एवढे सरळ असले असते तर ते एवढे मोहक झालेच नसते. यातल्या प्रत्येक पात्राला काळी आणि पाढरी अश्या दोन्ही बाजू आहेत आणि त्या समजुन घेउन प्रत्येक पात्राचे मूल्यमापन केले तर बरे होइल. अर्जुन आणु कर्ण दोघेही महान धनुर्धर होते पण तरीही अर्जुन कांकणभर सरसच होता. महाभारतात अनेक वीरांनी प्रसंगी इतरांना धोबी पछाड दिली आहे. कर्णाला सात्यकी, भीम आणि अर्जुनाने हरवले त्यर कर्णानेही या तिघांनाही हरवले (अर्जुन त्याच्या भार्गवास्त्राला घाबरुन पळुन गेला. जोपर्यंत वैजयंती शक्ती त्याच्याकडे होती तोपर्यंत त्याच्याशी युद्ध टाळले). अभिमन्युने सर्वांना हरवले पण अखेर दौशासनी कडुन हरला. भीष्मांनी सगळ्यांना हरवले पण अभिमन्युशी त्यांची एक प्रकारे टाय झाली. कर्णही असाच काही जणांकडुन हरला, बर्‍याच जणांना त्याने हरवले. कृष्ण ज्याला हरवु शकलानाही त्या जरासंधाला त्याने हरवले. भीमाला जरासंधाला मारण्यासाठी १८ दिवस खर्ची करावे लागले तर कर्णाने अर्ध्या दिवसापेक्षा कमी वेळात त्याला प्राणांची भीक मागायला लावली. युद्धात आजूबाजूला कौरवांकडचे सगळे अतिरथी पडल्यानंतर, स्वतःचा मुलगा मेल्यानंतरही तो निकराने लढला. हाती आलेल्या ४ पांडवांना जीवदान दिले, अर्जुनाला मारण्याची पराकाष्ठा केली, मुख्य म्हणजे स्वतःच्या शब्दाला त्याने जीवापाड जपले कारण आयुष्यभर सग्ळे कमावुन्देखील त्याला मिळाली नव्हती ती प्रतिष्ठा, शब्दाला जागुन त्याने ती मिळवली. महाभारताचे वर्ण एका वाक्यात करता येइल "कुंतीच्या पाच मुलांविरुद्ध कुंतीच्या एका मुलाच्या बळावर लढले गेलेले युद्ध" एक इंग्रजी म्हण आहे "Success is to be measured not by the positino he has achieved but by the obstacles which he has overcome to achieve that position". राजपुत्राचा शिक्का बसल्यावर बाहुबळावर जग जिंकुन घेणे खुप सोप्पे आहे. पण एका सूतपुत्राला ते केवळ बाहुबळावर शक्यच नव्हते. त्या काळची सामाजिक स्थिती बघता हे सहज लक्षात येइल की केवळ शूद्र होता म्हणुन शंभुक मारला गेला, सूत होता म्हणुन अमर्यादित शक्ती आणि सत्ता असुनही कीचक पडद्यामागे राज्य चालवत राहिला राजा नाही होउ शकला, फक्त निम्न जातीतला होता म्हणुन एकलव्याला शिक्षण नाकारले गेले आणि मग अंगठा सुद्धा गमवावा लागला. त्या समाजरचनेत समाजाच्या नाकावर टिच्चुन राज्य करायचे असेल तर, प्रतिष्ठा मिळवायची असेल तर थोडेफार खोटे बोलणे भाग आहे हे कर्ण उमजला होता. मुळात तो परसुरामांशी खोटे देखील या कारणाने बोलला की : १. द्रोणांनी त्याला ब्रह्मास्त्र नाकारले आणि २. परशुराम देखील केवळ ब्राह्मणांना विद्या शिकवीत. लिहित बसलो तर मिपाची बँडविड्थ कमी पडेल त्यामुळे आवरते घेतो. पण एवढे जरुर म्हणेन की कर्ण महान नक्की होता. त्याच्या हातुन चुका घडल्या. तश्या त्या महाभारतातील सर्वच पात्रांच्या हातुन घडल्या. काहींच्या झालक्या गेला, काहींच्या चुकांना धर्माचा मुलामा मिळाला पण कर्णाच्या चुकांना चुकाच ठरवले जाउनसुद्धा त्याच्यामागे अद्भुत तेजाचे, विस्मयतेचे, दानाचे, निश्चयाचे, जिद्दीचे, विजीगुषु वृत्तीचे जे वलय आहे त्या साठी तो महान होता. युद्धात तो अर्जुनाला भारी पडला की नाही किंवा तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता की नाही किंवा तो खरोखर दानी होता की नाही हे गौण आहे. मर्त्य मानवांमध्ये तो असामान्य होते यात त्याचे महानपण आले
  • Log in or register to post comments

++++१

पिवळा डांबिस
Wed, 03/28/2012 - 20:35 नवीन
अत्यंत सुरेख प्रतिक्रिया! कर्णाच्या चुकांना चुकाच ठरवले जाउनसुद्धा त्याच्यामागे अद्भुत तेजाचे, विस्मयतेचे, दानाचे, निश्चयाचे, जिद्दीचे, विजीगुषु वृत्तीचे जे वलय आहे त्या साठी तो महान होता. युद्धात तो अर्जुनाला भारी पडला की नाही किंवा तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता की नाही किंवा तो खरोखर दानी होता की नाही हे गौण आहे. मर्त्य मानवांमध्ये तो असामान्य होता यात त्याचे महानपण आले क्या बात है! जियो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अगदी

सर्वसाक्षी
Wed, 03/28/2012 - 23:08 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सुंदर प्रतिसाद, अतिशय

५० फक्त
Wed, 03/28/2012 - 20:43 नवीन
सुंदर प्रतिसाद, अतिशय धन्यवाद, मुळ लेखापेक्षा तुमचा प्रतिसादच जास्त वाचनीय आहे. तुमच्या कडुन या विषयावर ऐकायला आवडेल, कधी संधी मिळते आहे ते बघु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

प्रतिसाद आवडला रे मृत्युंजया.

गणपा
Wed, 03/28/2012 - 20:55 नवीन
प्रतिसाद आवडला रे मृत्युंजया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सुंदर प्रतिक्रिया

शुचि
Wed, 03/28/2012 - 22:19 नवीन
सुंदर प्रतिक्रिया. "Success is to be measured not by the positino he has achieved but by the obstacles which he has overcome to achieve that position". क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कै च्या कै

एक मुलगा
Wed, 03/28/2012 - 23:49 नवीन
>> कृष्ण ज्याला हरवु शकलानाही त्या जरासंधाला तुम्ही कृष्णाला तुमच्या आमच्या प्रमाणे एक माणूस समजता काय? जरासन्धाला का मारले नाही हे तुम्हाला माहीत आहे काय? या धाग्यावर प्रतिक्रीया करणार्या लोकाना श्रीमद भागवतम थोडीही माहीत असती तरे असे मूर्ख पणाचे प्रतिसाद आले नसते यालाच मूर्खपणाचे मेन्टल स्पेक्युलेशन म्हण्तात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुम्ही कृष्णाला तुमच्या

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 10:27 नवीन
तुम्ही कृष्णाला तुमच्या आमच्या प्रमाणे एक माणूस समजता काय? देवातला माणूस समजा अथवा माणसातला देव. यापैकीच एक मानतो. तुम्ही कसे समजता त्यावर अवलंबुन आहे. एकदा मानव जन्म घेतला की त्याच्या सग्ळ्या लिमिटेशन्स सकट जगले राम आणि कृष्ण दोघेही. काळानुरुप दोघांच्या विचारसरणीत फरक होता एवढेच. जरासन्धाला का मारले नाही हे तुम्हाला माहीत आहे काय? जमले नाही म्हणुन मारले नाही. हंस आणी डिंभक कसे मेले माहिती आहे का तुम्हाला? त्यांना सरळ सरळ का नाही मारले? फक्त भागवतात लिहिले आहे म्हणुन एखादी गोष्ट माझ्याच्याने मान्य होत नाही. त्याबरोबर थोडाफार (फारसा करुन उपयोग नसतो नाहितर सगळे महाभारतच खोटे वाटायला लागते) विचारही करावा आणि (असल्यास) स्वतःची बुद्धीही वापरावी या धाग्यावर प्रतिक्रीया करणार्या लोकाना श्रीमद भागवतम थोडीही माहीत असती तरे असे मूर्ख पणाचे प्रतिसाद आले नसते मी श्रीमदभागवत, हरिवंश, महाभारत (के एम गांगुली भाषांतरित), जैमिनी भारत, गीतारहस्य, पर्व (के एल भैरप्पा), महाभारतावरच्या नावाजलेल्या जवळ जवळ सगळ्या कादंबर्‍या, रमेश मेनन यांचे महाभारत, युगांत, व्यासपर्व इत्यादी सर्व वाचले आहे. याउप्पर काही वाचण्यायोग्य असेल तर जरुन सांगावे. नक्की वाचेन. हे सग्ळे वाचुन हे मत बनले आहे. मृत्युंजय हे मी महाभारतावरचे वाचलेले पहिले आणि शेवटचे पुस्तक नाही. श्रीमदभागवत केवळ वाचण्याऐवजी समजुन घेतले असते तर असा मुर्खपणाचा प्रतिसाद आला नसता. यालाच मूर्खपणाचे मेन्टल स्पेक्युलेशन म्हण्तात याला विचार बुद्धीचा अभाव म्हणतात जो मतिमंदांमध्ये अपेक्षितही नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

>>>>मी श्रीमदभागवत, हरिवंश,

प्यारे१
गुरुवार, 03/29/2012 - 10:58 नवीन
>>>>मी श्रीमदभागवत, हरिवंश, महाभारत (के एम गांगुली भाषांतरित), जैमिनी भारत, गीतारहस्य, पर्व (के एल भैरप्पा), महाभारतावरच्या नावाजलेल्या जवळ जवळ सगळ्या कादंबर्‍या, रमेश मेनन यांचे महाभारत, युगांत, व्यासपर्व इत्यादी सर्व वाचले आहे. आपल्या वाचनाचा आदर आहे. पण... कदाचित कर्णाची व्यक्तीरेखा आपल्या मनात वर दिल्या प्रमाणे (पहिला प्रतिसाद) असेल तर ते या 'बर्‍याचशा' वाचनाचं आणि त्यानंतरच्या आपल्या निष्कर्षाचं फलित म्हणावं/मानावं लागेल. मुळात व्यासांनी लिहीलेला जय नावाचा इतिहास, त्याचा हरिवंश नावाचा ग्रंथ आणि त्याचंच विस्तारीत महाभारत असा प्रवास आहे. (बरोबर ना लोक हो? ) मूळातून एखादी गोष्ट वाचण्याचं कारण असं असतं की जर आपण त्या लेखकाचे शब्द वाचले तर फक्त त्याच शब्दांचा अर्थ लावण्याचं काम आपल्यावर येतं नी खरोखरीच लेखकानं त्या व्यक्तीरेखेला नेमक्या कशा प्रकारे सादर केलं आहे ते समजू शकतं. त्या वेळच्या सामाजिक परंपरा, चालीरिती, मान्यता इ.इ. चा आजच्या बदललेल्या काळाशी लावून त्या त्यानुसार इन्टरप्रिटेशन करण्यापेक्षा मूळ लेखकानं काय लिहीलंय ते आणि तेच आपण आपल्या बुद्धीनुसार घेतलं तर ते जास्त उपयोगी ठरतं. बॉन्ड मूव्हीमध्ये बॉन्ड अनेक जणींबरोबर झोपतो म्हणून त्याच्यावर व्यभिचारीपणाचा शिक्का आपण लावत नाही. किंवा त्यानं केलेल्या नासधुसी बद्दल त्याच्यावर खटला देखील दाखल केला जात नाही. अनेक लोक अकारण बळी पडतात त्यांच्या खुनाची शिक्षा बॉन्डला होत नाही कारण खलनायकाला संपवणे हा मुख्य हेतू असतो. आणि त्यावर मुख्य फोकस असतो. आणि तसाच असणं अपेक्षित असतं. खलनायकाला संपवताना खलनायकाच्या चांगल्या गुणांचा विचार आपण करत नाही. तो भलेही एखाद्या देशाच्या/ नागरिकांच्या भल्यासाठी लढा देत असला तरी तो खलनायक'च' ठरतो, ठरवला जातो. वाल्मिकींची सीता वनात जाताना 'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' म्हणाल्याचं कुठं वाचलं नाहीये. पण आज आपल्याला राम त्या कारणासाठी अन्याय्य वाटतो कारण आपण गीतरामायण वाचले/ऐकलेले असते.... बघा पटतंय का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आपल्या वाचनाचा आदर आहे. पण...

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 11:38 नवीन
आपल्या वाचनाचा आदर आहे. पण... कदाचित कर्णाची व्यक्तीरेखा आपल्या मनात वर दिल्या प्रमाणे (पहिला प्रतिसाद) असेल तर ते या 'बर्‍याचशा' वाचनाचं आणि त्यानंतरच्या आपल्या निष्कर्षाचं फलित म्हणावं/मानावं लागेल. मी कित्ती वाचले आहे हे सांगायचा तो क्षीण प्रयत्न नव्हता पण "भागवत वाचले असते तर......" या प्रतिसादाचे ते उत्तर होते. वाचयचेच आहे ना? मग फक्त भागवत का? सगळेच वाचा. भागवत आज सग्ळ्यात करप्ट (म्हणजे नंतर भाग घुसडलेले) मानले जाते हे प्रतिसादकर्त्याला माहिती असेलच अशी आशा आहे. सगळे वाचावे, स्वत: विचार करावा, त्यातुन स्वतःचा बोध घ्यावा. सगळ्यांनी तो एकाच प्रकारे घ्यावा अशी काही सक्ती नाही. पण म्हणुन वेगळा विचार करणार्‍यांना मुर्ख म्हणने बौद्धिक दिवाळखोरी ठरेल. मुळात व्यासांनी लिहीलेला जय नावाचा इतिहास, त्याचा हरिवंश नावाचा ग्रंथ आणि त्याचंच विस्तारीत महाभारत असा प्रवास आहे. (बरोबर ना लोक हो? ) अरेरे. त्या वादात नका हो पडु तुम्ही. काय फरक पडतो की काय कशाच सबसेट आहे की नाही ते? मूळातून एखादी गोष्ट वाचण्याचं कारण असं असतं की जर आपण त्या लेखकाचे शब्द वाचले तर फक्त त्याच शब्दांचा अर्थ लावण्याचं काम आपल्यावर येतं नी खरोखरीच लेखकानं त्या व्यक्तीरेखेला नेमक्या कशा प्रकारे सादर केलं आहे ते समजू शकतं. बरोबर बोललात, त्या वेळच्या सामाजिक परंपरा, चालीरिती, मान्यता इ.इ. चा आजच्या बदललेल्या काळाशी लावून त्या त्यानुसार इन्टरप्रिटेशन करण्यापेक्षा मूळ लेखकानं काय लिहीलंय ते आणि तेच आपण आपल्या बुद्धीनुसार घेतलं तर ते जास्त उपयोगी ठरतं. हेच मी वरती लिहिले आहे. आजच्या काळानुरुप त्या काळाचे मुल्यमापन करु नये. बॉन्ड मूव्हीमध्ये बॉन्ड अनेक जणींबरोबर झोपतो म्हणून त्याच्यावर व्यभिचारीपणाचा शिक्का आपण लावत नाही. किंवा त्यानं केलेल्या नासधुसी बद्दल त्याच्यावर खटला देखील दाखल केला जात नाही. अनेक लोक अकारण बळी पडतात त्यांच्या खुनाची शिक्षा बॉन्डला होत नाही कारण खलनायकाला संपवणे हा मुख्य हेतू असतो. आणि त्यावर मुख्य फोकस असतो. आणि तसाच असणं अपेक्षित असतं. बरोबर आहे. बॉण्डपटात बॉण्ड कधीच चुकीचा नसतो. तसेच जर कृष्णार्जुनाबद्दल म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला. अन्यथा मतमतांतरांना जागा आहे. खलनायकाला संपवताना खलनायकाच्या चांगल्या गुणांचा विचार आपण करत नाही. तो भलेही एखाद्या देशाच्या/ नागरिकांच्या भल्यासाठी लढा देत असला तरी तो खलनायक'च' ठरतो, ठरवला जातो. खलनायक कोण हे कसे ठरवणार? महाभारत मुळात धर्मयुद्ध कसे? दुर्योधन खलनायक कसा? मुळात तोच खलनायक नसेल तर इतर कसे? मी काय म्हणतो तो या धाग्याचा विषय नाही. वेगळा धागा सुरु करा. धुमाकूळ घालु :) वाल्मिकींची सीता वनात जाताना 'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' म्हणाल्याचं कुठं वाचलं नाहीये. पण आज आपल्याला राम त्या कारणासाठी अन्याय्य वाटतो कारण आपण गीतरामायण वाचले/ऐकलेले असते.... हॅ हॅ हॅ. तुम्ही माझेच मुद्दे मांडता आहात की? दुर्योधन (आणी कर्ण) खलनायक वाटतो कारण तसे महाभारतात लिहिले आहे. त्याचे चूक की बरोबर हा विचार मूळात कोणी केला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>>दुर्योधन (आणी कर्ण)

प्यारे१
गुरुवार, 03/29/2012 - 14:13 नवीन
>>>>दुर्योधन (आणी कर्ण) खलनायक वाटतो कारण तसे महाभारतात लिहिले आहे. त्याचे चूक की बरोबर हा विचार मूळात कोणी केला आहे का? माझं तेच म्हणणं आहे की जर लेखकानं ते पात्र तसं रंगवलंय तर त्याला तसंच ठेवा की.... चूक बरोबर चा निर्ण य तुम्ही का घेताय? आपली (वैयक्तिक नका घेऊ) अक्कल कुणी का पाजळावी. शोले मध्ये रमेश सिप्पीनं अमिताभच्या पात्राला मारलं. आजच्या काळात ठाकूरच्या विधवा बहूला नवरा मिळेल म्हणून कुणी दिग्दर्शक अमिताभच्या पात्राला जिवंत ठेवील. आणि दोन चार पोरं वीरुकडं गोष्टी ऐकायला जातील. व्यासांना अपेक्षित त्यांनी संजयाच्या तोंडी सांगून ठेवलंय... यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर विषय संपला ना? तुम्हाला इन्टरप्रिटेशन करायचीत ना? करा. पण ती तुमची असतील. मूळ लेखकाची नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अतिशय प्रामाणिकपणे सहमत.

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 14:26 नवीन
अतिशय प्रामाणिकपणे सहमत. (कुणी व्ययक्तिक घेउ नये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

माझं तेच म्हणणं आहे की जर

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 14:29 नवीन
माझं तेच म्हणणं आहे की जर लेखकानं ते पात्र तसं रंगवलंय तर त्याला तसंच ठेवा की.... चूक बरोबर चा निर्ण य तुम्ही का घेताय?आपली (वैयक्तिक नका घेऊ) अक्कल कुणी का पाजळावी. आता पुस्तक न वाचताच कोणी आपली अक्कल का पाजळावी? आणि वाचल्यानंतर मग जर स्वतःची बुद्धी वापरायचीच नसेल तर वाचन कशाला करावे? आपल्यावर राज्य करणारा गोरा साहेब म्हणाला म्हणुन हिटलर दुष्ट आणि स्वतः साहेब मात्र देवाचा अवतार होय हो? आणि स्टॅलिन देवाचा मित्र म्हणुन परमदयाळु मानायचा काय हो? लेखकाने जे लिहिले आहे त्यावर स्वतःची बुद्धी वापरावीच (असेल तर. वैयक्तिक नका घेउ) व्यासांना अपेक्षित त्यांनी संजयाच्या तोंडी सांगून ठेवलंय... यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर व्यासांनी स्वतः काहीच मतप्रदर्शित केलेले नाही देवा. त्यांनी फक्त कथा सांगितली. त्यात जन्मेन्जयाला जे ऐकायची इच्छा होती ते त्याला वैशंपायनांनी सांगितले. त्यांनी जेव्हा त्याला सांगितले ते सौतीने ऐकले. सौतीने जे ऐकले ते त्याने काही ब्राह्मणांना सांगितले. त्या ब्राह्मणांनी इतरांना सांगितले किंवा त्यांच्यापैकी कोणीतरी ते स्वतः लिहिले. यात व्यासांचे स्वत:चे काहीच मत नाही आहे. त्यांनी दुर्योधनाला सुष्ट ही म्हणले नाही आणि दुष्टही नाही. वेळोवेळी इतर लोक त्यांच्याबद्दल काय बोलले ते त्यात आहे. आणि वैंशंपायन *जज्ञ्मेंजयाला कथा सांगतोय म्हटल्यावर जे पात्र पांडवांबद्दल चांगले बोलले तेवढेच त्यात येणार की हो. * जन्मेंजय = == अर्जुन -आभिमन्यु - परीक्षित - जन्मेंजय. विषय संपला ना? आत्ता कुठे सुरु झाला. तुम्हाला इन्टरप्रिटेशन करायचीत ना? करा. पण ती तुमची असतील. मूळ लेखकाची नव्हे. वर सविस्तर मतप्रदर्शन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>आता पुस्तक न वाचताच कोणी

प्यारे१
गुरुवार, 03/29/2012 - 14:43 नवीन
>>>आता पुस्तक न वाचताच कोणी आपली अक्कल का पाजळावी? आणि वाचल्यानंतर मग जर स्वतःची बुद्धी वापरायचीच नसेल तर वाचन कशाला करावे? आपल्यावर राज्य करणारा गोरा साहेब म्हणाला म्हणुन हिटलर दुष्ट आणि स्वतः साहेब मात्र देवाचा अवतार होय हो? आणि स्टॅलिन देवाचा मित्र म्हणुन परमदयाळु मानायचा काय हो? लेखकाने जे लिहिले आहे त्यावर स्वतःची बुद्धी वापरावीच (असेल तर. वैयक्तिक नका घेउ) अधोरेखित वाक्याबाबत सहमती. मूळ पुस्तक/ ग्रंथ च (त्याची कॉपी) वाचावा. त्यात लेखकाला काय म्हणायचे आहे ते पाहावे. मुख्यत्वे काय अपेक्षित आहे ते जाणून घ्यावे. बाकीचा विषय सोडावा. बाकी व्यासांना महाभारतकार म्हणून उगीच क्रेडिट दिले जाते नाही? अवांतर : माणसानं मोराचा फुललेला पिसारा बघावा.... त्याचा पार्श्वभाग बघायला कशाला जावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अधोरेखित वाक्याबाबत सहमती.

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 14:53 नवीन
अधोरेखित वाक्याबाबत सहमती. मूळ पुस्तक/ ग्रंथ च (त्याची कॉपी) वाचावा. त्यात लेखकाला काय म्हणायचे आहे ते पाहावे. मुख्यत्वे काय अपेक्षित आहे ते जाणून घ्यावे. बाकीचा विषय सोडावा. आपल्या दोघांना तर एकच म्हणायचे आहे की. वा वा. बाकी व्यासांना महाभारतकार म्हणून उगीच क्रेडिट दिले जाते नाही? तर हो. अजुन २ वर्षांनी शिवाजी सावंतदेखील मृत्युंजयकार म्हणुन प्रसिद्ध पावतील की. व्यासांचा महिमा महान तर आहेच. एवढे मोट्ठे काव्य सुत्रबद्ध करणे सोप्पे थोडेच आहे भावा अवांतर : माणसानं मोराचा फुललेला पिसारा बघावा.... त्याचा पार्श्वभाग बघायला कशाला जावं? :) :) :) :) :D :D :D :D :D असेच म्हणतो. मोराने पिसार फुलवला नसेल तर तो त्याला फुलवायला लावावा आणि बघावा. माणूस पार्श्वभागालाच पिसारा समजायला लागला तर मात्र पिराब्लेम आहे बर का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मृत्युन्जय आपण खरच

आत्मशून्य
Fri, 03/30/2012 - 01:08 नवीन
मृत्युन्जय आपण खरच अभ्यासपुर्ण प्रतीसाद देत आहात व अनेक पैलु समोर आणत आहात. पण काही मुलभुत शंका माझ्या मनात खरोखर उरत आहेत ज्या बहुदा फारच सामान्य बुध्दी असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या मनात अजुनही आपल्या अथवा इतरांच्या अभ्यासपुर्ण माहीती नंतरही कदाचीत जशाच्या तशाच असतील. जसं की महाभारत कोणीही लिहो कोणाच्याही फेवरमधे अथवा विरोधात लिहो पण जर त्यात श्रीकृष्णाने सांगीतलेल्या जशाच्या तशा "गीता" या ग्रंथाला/काव्याला कोणी "अनुभवांच्या वा विचारांच्या" पातळीवर सर्वोत्कृश्ट तत्वज्ञान अथवा जिवनाचे संपुर्ण सार मानायला तयार आहे काय ? याचे उत्तर हो असेल तर पुढील गोश्ट सुस्पश्ट होते की श्रीकृष्णाच्या प्रत्येक कृतीत "दम" आहे. थोडक्यात तो चुकणे अशक्य ठरते. म्हणुनच महाभारतातील कोणत्याही व्यक्तीरेखेचे आचरण काय आहे व त्या बद्दल कोणत्या महाभागाने काय लिहले आहे, मग ते लिखाण इथे मिपावर तुम्हा आम्हा पासुन झालेले लेखन असो की अगदी या महाकाव्याच्या प्रत्यक्श प्रसवदात्याकडुन घडलेले असो आणी त्याने हे लिखाण एखाद्या विशीष्ठ बाजुच्या फेवरमधे अथवा विरोधात मुद्दम केलेले असो. आज या घडीला केवळ चर्चा ही दोन्ही बाजुंकडुन अत्यंत हीरीहीरीने अनंतकाळ कोणत्याही निर्णयावर न येता होत राहु शकते. म्हणुनच प्रत्यक्शात दुशासन कोमल स्वभावाचा होता व अर्जुन नालायक होता वगैरे वगैरे तत्सम उचल खाणार्‍या मुद्यांची पडताळणी प्रत्यक्ष निश्कर्शाच्या द्रुश्टीकोनातुन कुचकामी ठरते. कारण प्रत्यक्ष तिथे काय घडलं यापेक्षा जो तो एखाद्या व्यक्तीरेखेबद्दल आपला निश्कर्श काय आहे यालाच चिक्टुन राहील व वाद चिघळत राहील. म्हणुनच या सावळ्या गोंधळात कोण सभ्य होतं? कोण चुक, बरोबर अथवा नैतीक होतं ? या शोधण्याला जी एकमेव महत्वाची गोश्ट प्रमाण उरते ती म्हणजे प्रत्येक कृतीत "दम" असणार्‍या अथवा कधीही न चुकणार्‍या अथवा अथांग जिवनाचेच न्हवे तर प्रत्येकाच्या अस्तीत्वाचे तत्वज्ञान मांडणार्‍या श्रीकृष्णाने साथ कोणाला दिली ? पण अर्थातच "गीता" या ग्रंथाला कोणी सार मानायला तयार नसेल व महाभारतातील व्यक्तिरेखांच्या वर्तनाबद्दल स्वतःचे निरीक्षणच अतिंम सत्य म्हणुन ग्राह्य धरत असेल तर मग सगळच पुन्हा "रिलेटीव्ह" बनतं, सामान्यांचा बराच गोंधळ वाढवतं, कारण या पध्दतीने आज सावंत पटतील तर उद्या एखाद्या महर्षीची बाजु योग्य वाटेल... म्हणुनच इथे महत्वाचा मुद्दा हा नाही की आपल्याला कोण पटतंय काय वाटतयं तरयापेक्शाही नक्कि खरचं योग्य कोणाला व का मानायचं ? मग भलेही ते सक्रुतदर्शनी न पटो पण विरोधाभासांच्या या प्रवाहात दोन्ही बाजुनां मान्य असणारी अशी एकही गोश्ट अस्तीत्वात नाही काय जीचा वापर तोडगा निघण्यास दोन्ही बाजुनां प्रमाण म्हणुन होऊ शकेल ? असो... विरोधाभासांची मजाही तीतकीच गोड असते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

या धाग्याचे भरीत झाले आहे

मृत्युन्जय
Sat, 03/31/2012 - 11:42 नवीन
या धाग्याचे भरीत झाले आहे म्हणुन इथे प्रतिसाद देत नाही. सविस्तर प्रतिसाद खवत देतो पण थोडक्यात सांगायचे झाले तर गीतेचे सार अमूल्य असे आहे. तत्वज्ञानात, व्यवहारात गीता अजोड आहे. गीत पुर्णपणे अंमलात आणली तर वेगळे कुठलेही तत्वज्ञान शिकण्याची गरज नाही. स्वतः कृष्ण (महाभारतातील वर्णनानुसार, त्यातील माहितीनुसार. घटनाक्रमानुसार आणि या सर्वाचा नीट सांगोपांग विचार करता) एक अतिशय महान तत्वज्ञ होता, अतिधुरंधर राजकारणी होता, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा जगाच्या कल्याणाची जास्त चिंता असणार होता, प्रचंड शूर होता तितकाच पराक्रमीदेखील पण त्याहुनही महत्वाचे म्हणजे युद्धशास्त्रात सर्वांना कोळुन प्यायला होता, अतिशय हरहुन्नरी होता, कमालीचा बुद्धिमान होता, जन्मजात नेता होता पण संपत्तीची / सत्तेची लालसा नसणारा होता, म्हटल्यास व्यवहारी म्हटल्यास कपटी होता, काळापेक्षा लाख पावले पुढे होता आणि याहुन सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक कमालीच्या दृढ आणी करिष्मेटिक व्यक्तिमत्वाचा माणूस होता. पण तरीही............ तो नेहमीच बरोबर होता किंवा अजेय होता किंवा दोषरहित होता हे मला मान्य नाही. असो. सविस्तर प्रतिसाद नंतर सवडीने खवत देइन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

>>> जज्ञ्मेंजयाला कथा सांगतोय

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 14:48 नवीन
>>> जज्ञ्मेंजयाला कथा सांगतोय म्हटल्यावर जे पात्र पांडवांबद्दल चांगले बोलले तेवढेच त्यात येणार की हो तुम्ही तर फारच खात्री ने सान्गत आहात हो :).......जसे काही तुम्ही जन्मेजयाला व्ययक्तीक रित्या ओळखता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुम्ही ज्या खात्रीने बोलता

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 14:55 नवीन
तुम्ही ज्या खात्रीने बोलता आहात ते बघता तुम्ही कृष्णाला ओळखत असावात बहुधा. धन्य झालो. देवाला भेटलेला एक तरी माणूस मिळाला म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

हा जळपट प्रतिसाद आहे. तुमची

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 15:12 नवीन
हा जळपट प्रतिसाद आहे..मुद्दाला धरुन नाही. तुमची चिड दिसतेय.......... जीवनात असेच काम करत राहलात तर रवरव नर्कात कदाचित नम्बर लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जीवनात असेच काम करत राहलात तर

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 15:15 नवीन
जीवनात असेच काम करत राहलात तर रवरव नर्कात कदाचित नम्बर लागेल वोक्के. मग वर भेटात तेव्हाच कडकड करा ना. उगा इथे कशाला माझ्या डोक्याची मंडई करताय? बादवे तुम्हाला रौरव नरकात असे म्हणायचे आहे काय? जे काही लिहायचे आहे ते नीट लिहा हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा