Skip to main content

कुणी सांगा ......सुख म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे. समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही . दररोज च्या जगण्यातील त्याच त्याचपणामुळे येणारा ताण .....या जगण्याचा येणारा प्रचंड उबग......सुखाच्या मोठ्या क्षणांची वाट पाहता पाहता होणारी आपली प्रचंड दमछाक ...या सर्वावर उपाय म्हणजे या रोज च्या जगण्यात सुद्धा जे अतिशय छोटे छोटे सुखाचे क्षण लपलेले आहेत ते डोळसपणे हेरण्याची ते शोधण्याची आणि ते उपभोगण्याची वृत्ती . कोणी म्हणेल रोजच्या जगण्यात कसलं आलंय सुख ? विचार करा .....घरी येतांना कधी आपल्या बायकोचा विचार मनात आणून एखादा गजरा ...एखादेच चाफ्याचे फुल वेगळाच आनंद देवून जाते का ? घरी येताना आपल्या मुलाला आवडणारा एखादा पदार्थ अगदी एकच पीस आणला तरी त्याच्या चेहेऱ्यावर काही वेगळे भाव येतात का ? कधी तरी सुट्टीच्या दिवशी आपण स्वयंपाकाची जबाबदारी घेवून आपल्या परतणार ला सरप्राईज देता येतं का ? आपण दोघांनी एकत्रपणे बनवलेला पदार्थ चवीला जास्त चांगला लागतो का ? नेहमीच्या हॉटेल संस्कृतीला चाट देवून कधीतरी गरम गरम मक्याचे कणीस घेतल्यावर त्याची वेगळीच चव लागते का ? चिंब पावसात रिक्षा पकडून घरी जाण्यापेक्षा कुटुंबा बरोबर भिजत भिजत चालत जायला जास्त मजा येते का ? नेहमीचा पोळी भाजी डाळ भात चौकडीचा बेत बदलून सुखी भेल झिंग आणते का ? कधीतरी " mall " मध्ये न जाता घावूक बाजारात मोठ्या पिशव्या घेवून महिन्याची खरेदी करण्यात काही मजा येते ? नेहमीच्या फिरायच्या जागा सोडून अनोळखी वाटांवरुन फिरण्यात काही वेगळी गम्मत येते का ? आठवड्याच्या बाजारात मिळणाऱ्या चित्र विचित्र वस्तू आकर्षित करतात का ? कधीतरी घरच्या जेवणाचा डबा घेवून जवळच्या बागेत किंवा तळ्याकाठी केलेल्या अंगत पंगत जेवणाची चव वेगळी लागेल का ? आपल्या मुलांच्या बरोबरीने माचीस ची कव्हरे , पोस्टाची तिकिटे , पोकीमॉन ची चित्रे जमवण्यात वेडेपणा वाटेल का ? कधी वेळात वेळ काढून आपल्या मुलांच्या मित्रांबरोबर क्रिकेट ,फुटबॉल खेळण्यात आणि खोटे खोटे हरण्यात खरच कमीपणा असेल का ? कधी वेळेच्या आधी मुलाला शाळेत स्कूलबसने न पाठवता स्वतः पोहोचवायला आवडेल का ? बायको चहा घेवून यायच्या आत अंथरुणे आवरून बेडरूम नीटनेटकी केल्यावर बायको रागावेल का ? कधी तिला न कळवता तिच्या ऑफीसच्या दारात ऑफीस सुटण्याच्या वेळेला तुम्हाला पाहून तीला गोड धक्का बसेल का ? आणि दोघे मिळून घरी परत येताना तीला आवडणारी कचोरी आवर्जून खायला घातल्यावर ती तृप्त होईल का ? तिच्या आवडत्या झाडाला एके दिवशी सकाळी तुम्ही जर पाणी घातले तर काय होईल ? सांग सांग भोलानाथ या सर्वामधून सुख मिळेल का ...... हो नक्की मिळेल , सुख काही कोठल्या " पपलू " चिडिया का नाम नाही हैं. सुख उपभोगणे हा विषय नसून ती वृत्ती आहे . मग काय आज पासून या संदर्भातील गोष्टींची " थिंग्स टू डू " ची लिस्ट बनवणार की नाही ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12311
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

सुख ..सुख म्हणजे नक्की काय असतं . अजुनही विचार केला तरी उत्तर नीटस मिळत नाही.मग खोल विचार केला कि वाटत हेच सुख शोधण्यासाठी माणूस जी वाट चालत असतो ,जीचं त्यानेच स्वतःच्या सोयीन जीवन ,आयुष्य अस नामकरण केलेलं असत , त्या वाटेवर मिळणार समाधान ...आनंद ,काही अपेक्षांची पूर्तता म्हणजे सुख असेल बहुतेक . कमाल आहे ना पहिल्यांदाच जाणवल ..कि एका शब्दाचा अर्थ त्या शब्दाशिवाय दुसरा काढताच येत नाहीय .किवा अस म्हणूया कि कितीही शब्द वापरा ' सुख ' ह्या शब्दातला गोडवा हा त्या शब्दाशिवाय कुठे मिळत नाहीय . सुख हे रोजच्या जगण्यातच दडलेलं असत ,फक्त ते दिसण्यासाठी ,त्या सुखाला समजून घेण्यासाठी आपली नजर सुखी हवी. काहींच सुख खाण्यापिण्यात दडलेलं असत ,तर काहींच फिरण मौजमजा करणं ,काहीजण आपल्यातच गुंग होवून जगण्याला सुखाच नाव देवून बसतात ...तर काही कुणाच्यातरी संगतीत ,सोबतीत आयुष्य घालवण्याला सुख म्हणतात .खरय तेही ..व्यक्ती तितक्या प्रवृत्ती .जस कोण कधी हसेल ,कोण कधी रडेल हे सांगता येत नाही ,अगदी तसच कोणाच सुख कशात लपलय हे सांगता यायचं नाही , आमच्या शेजारच्या गण्याला खाण्यात सुख आहे अस वाटत ,तो म्हणतो " ज्या दिवशी गुलाबजामून , कालाजामून खायला मिळतात ,तो माझ्यासाठी सुखी दिवस ,तर ह्याच ' खाण्यातल्या ' सुखाकडे पहायची दृष्टी एका गरीबाची कशी असेल? ..तर " आज सुकलेली ,शिळी का होईना पण पोटभर भाकरी मिळाली " माणसा माणसाची व्याख्या वेगळी .तसच अजून एक उदाहरण देता येईल . चित्रकाराला कोऱ्या कागदावर नुसत्याच रेगोटया मारण्यात आणि त्यातून चित्र निर्माण करण्यातही आनंद मिळतो ...त्यातूनच एखादी प्रतिमा नकळत तयार झालीच तर त्याच्या चेहेर्यावर उमटणार समाधान " किती सुखी आहे हा माणूस " बोलायला भाग पाडतं , तर हेच चित्र एखाद्या अरसिकाच्या डोक्यात जात .जी गोष्ट एकाच्या सुखाची व्याख्या बनते तीच गोष्ट दुसर्याच्या रागाची ,चिडण्याचीही कारण बनते . सगळ्यात सुंदर उदाहरण द्यायचं म्हटलं तर ते देता येईल 'तीच ' आणि ' त्याच ' सुख ... तिचं सुख ..ओफिस्वरून घरी आल्यावर त्याने प्रेमाने केसावरून हात फिरवून " थकलीस ? " एवढच म्हणन म्हणजे तिच्यासाठी ते सुख .. त्याचं सुख ...घरी आल्या आल्या तीच ताजतवान करणार स्मितहास्य पहाण ...म्हणजे .. त्याच्यालेखी ते सुख तिला आवडणारी गोष्ट लक्ष्यात ठेवून खास त्यान तिच्यासाठी मुद्दामहून आणण म्हणजे सुख ..तर त्याच्या आवडीची भाजी ,तीन कितीही उशीर झाला ,कितीही थकली असली तरी खास त्याच्यासाठी बनवण .....म्हणजे सुख .. मात्र त्या दोघांचही सुख दडलेलं असत ते एकमेकांच्या सहवासात .....त्याचं एकत्र असण हीच खरी सुखाची व्याख्या असते त्या दोघांसाठी . असो ..तर हे सुख , पैशात न मोजता जस मिळेल जिथे मिळेल तिथून उचलून आणून त्याला आपलस केलत तर ते सुख दुप्पट होत ...

In reply to by जेनी...

पूजा .. प्रतिक्रियक़ वाचून खूप बरं वाटलं. सुख हा शब्दच उच्चारला की वेगळी भावना मनात येते. प्रत्येक अनवट क्षणी आपल्याला हवी असणारी गोष्ट आपल्या आयुष्यात आली की मिळतं ते सुख. थंडीतील पहाटे शेकोटीच्या बाजूला बसून गरम गरम चहा पिताना मिळते सुख आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाची बोटे कुरवाळता मनात दाटते तेही सुखच. मात्र आपला मुल आणि दुसऱ्याचा मुल असा फरक आपलं मन करत असेल तर आपल्याला सुख शोधण्याची वणवण करावी लागेल याची नांदी असेल कारण अशी व्यक्ती सुख उपभोगणारी नसून फक्त सुखाचा शोध घेणारी असते. एकदा अशी छोटी छोटी सुख उपभोगण्याची सवय ...सवय हा शब्द नको.... वृत्ती अंगी बाणली ना की प्रत्येक दुखः साखरेचा थर चढवलेल्या औषधाच्या गोळी सारखे वाटू लागेल. आणि फक्त सुखाचीच अपेक्षा आपण करत असू तर मधून मधून अशी दुख्खाच्या औषधची गोळी हवीच नाही तर सुख उपभोगतच येणार नाही काही काळाने. एकदा सुख उपभोगण्याची वृत्ती जमली की मग त्यापुढे जावून आपण दुख्खा देखील छान एन्जोय करू शकू. !!!! यशोधन

In reply to by अन्या दातार

छे छे. चातक जशी पर्जन्याची वाट बघत असतो तशी आम्ही त्यांच्या लेखांची वाट बघण्याची इच्छा धरून आहोत पण ते तशी संधी आम्हास देत नाहीत.

ज्या समर्थांनी .. जगी सर्व सुखी असा कोण आहे ? हा प्रश्न विचारला आहे .. त्यांनीच त्याचे नि:संदिग्ध उत्तरही दिले आहे ! सांडून राम आनंदघन| ज्याचे मनीं विषयचिंतन | त्यासी कैंचें समाधान| लोलंगतासी ||६२|| जयास वाटे सुखचि असावें| तेणें रघुनाथभजनीं लागावें | स्वजन सकळही त्यागावे| दुःखमूळ जे ||६३|| जेथें वासना झोंबोन पडे| तेणेंचि अपायें दुःख जडे | म्हणौनि विषयवासना मोडे| तो येक सुखी ||६४|| विषयजनित जें जें सुख| तेथेंचि होतें परम दुःख | पूर्वीं गोड अंतीं शोक| नेमस्त आहे ||६५|| गळ गिळितां सुख वाटे| वोढून घेतां घसा फाटे | कां तें बापुडें मृग आपटे| चारा घेऊन पळतां ||६६|| तैसी विषयसुखाची गोडी| गोड वाटे परी ते कुडी | म्हणौनियां आवडी| रघुनाथीं धरावी| ६७||

जगी सर्व सुखी असा कोण आहे ? " विचारी मना, तूच ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जे विचारी मन आहे , ते सुखाच्या शोधात नसते तर ते स्वतः च सुखी असते. जगताना दोन प्रकारची दु: खे आपण अनुभवतो. कल्पनेने निर्माण केलेली व जाणीवेने निर्माण केलेली. जाणीव म्हणजे वेदना संवेदना यानी दिलेला दु: खाचा संदेश . उदा पोट दुखणे डोके दुखणे ई. यावर उपाय पेन किलर. कल्पनेने दिलेला दु: खाचा संदेश म्हणजे मनाने निर्माण केलेली दु: खे उदा अपमान, मत्सर, द्वेष न्यूनगंड, इ. यावर उपाय म्हणजे नेहमी साधक बाधक विचार करून उजळ बाजू जवळ करणे. उदा. एखाद्याने अपमान केला तर " तो मुर्ख आहे" म्हणून आपण बरोबर असतानाही त्याला आपला अपमान करावासा वाटला" असे आपल्या मनाला पटवून देणे.

In reply to by चौकटराजा

१. विचारी नाही तर विचारें मना तूंचि शोधूनि पाहे॥ २. एखाद्याच्या दृष्टीनं सुख म्हणजे काय त्यावर याचं उत्तर अवलंबून आहे. राघव

In reply to by सुहास..

नको तिथं आल्याने प्रकाटाआ...

घरी येतांना कधी आपल्या बायकोचा विचार मनात आणून एखादा गजरा.
हो केला की... पैल्यांदा विचित्र वाटलं... पण मग म्हटलं "xx-xx xx, x x xxx xx!" (भरा आता गाळलेल्या जागा, अन व्यनि करा मला)...

In reply to by वपाडाव

हा पोरगा बग बायको बद्दल लिहीतो आणी मग तुझ्या कडे नाव नोंदवतो .... हा काय बराबर पोरगा नाय असां माका वाटत असां ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

म्हणुन तर लिहिलं होतं ते... पण सर्वांना कुठं कळतंय मी काय लिहितो ते... बरं झालं नाही कळालं तेच... किचेनतै, अजुन निरागसतेच्या सप्ताहातच रममाण असाव्यात...

सुख म्हणजे सुख असतं, न बोचलेलं दुख: असतं, न बोचणारं दुखः म्हणजे, हवं थोडं असताना मिळालेलं खुप असतं, मिळतं खुप तेंव्हाच जेंव्हा पोटात नसते भुक, मिळतं खुप तेंव्हाच जेंव्हा पोटात नसते भुक, पोटात भुक असताना सुखाची अपेक्षा, करणंच चुक असतं, सुख म्हणजे सुख असतं, न बोचलेलं दुखः असतं.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अगदी बरोब्बर... लिहिण्यात जे सुख असतं ते वाचण्यात नसतं... @पुजा, हवं तर किचेनतै/पियुशा ह्यांना विचारुन बघा...

In reply to by वपाडाव

मी तर तुम्हा सर्वांच्या कळफलकातून बाहेर निघालेल्या स्तुतीसुमानांना घाबरून लिहायचेच थांबवले आहे. सुखाच्या प्रतीक्शेत आपली किचेन. सुखि संसाराची वाटचाल सोपि नाहि हो.

In reply to by किचेन

@मी तर तुम्हा सर्वांच्या कळफलकातून बाहेर निघालेल्या स्तुतीसुमानांना घाबरून लिहायचेच थांबवले आहे.>>> अचं नक्को कलु ना किच्चु तै,पुन्ना लीहायला लाग

In reply to by किचेन

लिहा हो तुम्ही. लोकांची मस्करी ऐकून लिहिणे कशाला थांबवायचे ? ती बाप आणि मुलगा गाढवाबरोबर जात असतात ती गोष्ट माहित आहे ना ??

सुख आणि आनंद म्हणजे सेम का? एखाद्या कलाकाराला त्याच्या कलेमधून 'आनंद' मिळतो की 'सुख'? मला वाटतं की आनंद आणि सुख यात थोडा फरक आहे. बहुतेक वेळेला 'सुख' मिळावं म्हणून आनंदाला मुकलं जातं. (घासून गुळगुळीत झालेलं वाक्य). पण आपल्यापैकी कितीजणं रोज ऑफिसमधे दहाबारा तास घालवून, चांगल्यापैकी पगार घेऊनही त्यांना ज्या गोष्टींची आवड आहे ती करून आनंदी होतात? दूरवरच्या 'सुखांचं' लक्ष्य गाठण्याच्या वेडापायी, आजूबाजूच्या आनंदाचे क्षण पायदळी तुडवतो? आजच माझ्या बॉसने सगळ्यांना एक बातमी दिली, जवळ जवळ बारा वर्ष आमच्या कंपनीत घालवल्यानंतर आज तो नोकरी सोडून स्वतःचं एक छोटं शेत घेऊन तिथे ऑर्गनिक शेती करणार आहे (हा भारतीयच माणूस आहे शिवाय त्याने हाच प्रकल्प त्याच्या गावी बंगलोरच्या जवळही केला आहे). ज्या कामात आनंद मिळतो ते काम करायला मिळणे हे 'सुख' !

In reply to by मराठे

सुख हे सहसा शरीराशी संबंधित असतं- भौतिक असतं तर आनंद हा मनाचा असतो. सुख हे अनुभवता येतं , आनंदाची अनुभुती यावी किंवा घ्यावी लागते. सुखाची ठरलेली परिभाषा आहे, आनंद तसा बांधलेला नसतो.

सत्यनारायणाचा प्रसाद खाणं हे सुख असतं ! साधुवाण्याची कथा ऐकणं हा आनंद असतो ! असं म्हणायचं का " फक्त ५०" आपल्याला ????

In reply to by प्रचेतस

@ चौकटराजा, छे छे, माझ्या मते, केळी / अननस घालुन केलेला शिरा खाणं हे सुख आहे, आणि कुणितरी तो आपल्यासाठीच केला आहे हे न बोलता समजण्यात आनंद आहे. मी सुख हे शरीराबरोबर जोडतो कारण सुखाला कशाच्या तरी स्वरुपात व्यक्त होण्याची गरज असते, आनंदाचं तसं नसतं आणि तो व्यक्त झाला तरी त्याचं बाह्य दृष्य रुप हे सुखाचंच असतं. अवांतर - उदा. श्री. सुड यांना बालुशाही, श्री. वपाडाव यांना प्लॉवरची भाजी, मा. पियुषातै यांना जिलेबी करता येणं यात आम्हाला आनंद आहे, पण या गोष्टी प्रत्यक्ष खायला मिळणं यात सुख आहे.

In reply to by ५० फक्त

@श्री. सुड यांना बालुशाही, श्री. वपाडाव यांना प्लॉवरची भाजी, मा. पियुषातै यांना जिलेबी करता येणं यात आम्हाला आनंद आहे, पण या गोष्टी प्रत्यक्ष खायला मिळणं यात सुख आहे.>>>