पाताळ लोक!

Primary tabs

लई भारी's picture
लई भारी in जनातलं, मनातलं
23 May 2020 - 9:28 am

बऱ्याच दिवसांनी सलग एक सिरीज बघता आली. लॉकडाऊन सुरु झाल्यावर कामातून वेळ मिळाल्यावर काही मराठी, हिंदी सिरीज बघून इंग्रजीच बघायच्या असं ठरवलं होत. मग अलीकडे या प्राईम वरच्या सिरीज ची जाहिरात बघितली आणि सुरुवातीची परीक्षणं पण चांगली असल्यामुळे बघायचं ठरवलं.
२-३ दिवसात मिळून ९ भाग संपवले(प्रत्येकी ४० मिनिट साधारण).

विशेष म्हणजे बॉलिवूड मानसिकता असल्याने अधांतरी शेवट आपल्याला आवडत नाही आणि वेब सिरीज म्हटलं कि पुढच्या भागाची सोय म्हणून एकदम अर्ध्यातच सोडून देतात तो प्रकार इथे नाही आहे. आणि प्रश्नांची‘उत्तर’ तर लागतात आपल्याला; थोडं फार ओपन एंडेड ठीक आहे पण अगदीच डोक्याला शॉट नको होतो. शेवट तर सुखांत हवाच :-)
अशी सगळी भट्टी जमून आली आहे त्यामुळे आवडली.

स्वर्ग, धरती आणि पाताळ यामध्ये लोक कसे वागत असतात या मुख्य सूत्राभोवती कथा गुंफली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक पात्राची गोष्ट किंवा एक छोटा तुकडा दाखवला आहे कधी फ्लॅशबॅक तर कधी आताच्या घडीला. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी मुख्य कथा सूत्राशी खूप चांगल्या प्रकारे जोडल्या गेल्या आहेत. अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा पुढे कुठेतरी सांगड घालून दिल्या आहेत.
कथा विशेष काही सांगता येणार नाही स्पॉयलर दिल्याशिवाय; पण एका पत्रकाराच्या हत्येचा कट उलगडला जातो आणि त्या निमित्ताने देशातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर केलेलं भाष्य आणि शेवटी उलगडलेल्या काही अनपेक्षित गोष्टी.

पहिल्या भागापासूनच एकदम पकड घेते आणि सातव्या आठव्या भागात थोडा वेग कमी होतो आणि शंका येते पण परत शेवटी जुळवून आणलय हे विशेष. कुठे कंटाळवाणी नाही वाटली आणि सगळ्या पात्रांमध्ये आपण गुंततो!
फ्लॅशबॅक मधून जवळपास सगळ्या मुख्य पात्रांच्या पूर्वायुष्यात डोकावून बघितलं आहे आणि बऱ्याच सामाजिक बाबींवर भाष्य केलंय.
अगदी उच्चभ्रू वर्तुळात चालणारी अनाकलनीय उलथापालथ, कारस्थाने, काही ठिकाणी किरकोळ कारणावरून पाडले जाणारे मुडदे, समाजातल्या काही लोकांवर चुकीच्या गोष्टींचा असलेला पगडा नोकरशाहीतील राजकारण, खेचाखेची, शाळकरी मुलांच्यात असणार peer pressure, रस्त्यावर/रेल्वे स्टेशनवर राहणार्‍या लहान मुलांच विश्व, त्यांच्यावर होणारे अत्याचार, जाती व्यवस्थे मध्ये होणारे अत्याचार आणि हतबलता, मॉब लिंचिंग अशा खूप गोष्टींवर नेमकं बोट ठेवल आहे.

अभिनय भारी केलाय; विशेषतः मुख्य पात्र इन्स्पेक्टर हाथिराम चौधरी(जयदीप अहलावत - राजी मध्ये आलिया भट ला RAW चे ट्रेनिंग देणारा अधिकारी), त्याचा सहकारी, पत्रकार संजीव मेहराच्या भूमिकेत नीरज काबी(सेक्रेड गेम मधला 'पारुलकर', तलवार) आणि इतर सर्वच कलाकारांनी. मुख्य मारेकरी(!) असणारा त्यागी २-४ वाक्यांपेक्षा जास्त संवाद नाहीत पण देहबोली आणि डोळे एकदम भारी! तसेच हाथिरामचा मुलगा, किंवा संजीव मेहराची डिप्रेशन मध्ये असणारी बायको आणि त्याची सहकारी.
अगदी छोटी पात्र सुद्धा लक्षात राहतात; स्टेशन वर राहणारा एका आरोपीचा मित्र, चित्रकूट चा पत्रकार, छोटेखानी पण महत्वाच्या भूमिकेत छाप पडणारा राजेश शर्मा!

एक जाणवणारी गोष्ट म्हणजे सगळ्या सिरीज मध्ये कुत्र्याचा उल्लेख खूप महत्वाचा केला आहे, थीम सारखा आणि शेवटी पण त्याचा एका महत्वाच्या गोष्टीशी संबंध येतोय.

मला यातले संवाद खूप आवडले.
संजीव मेहरा ची बायको त्याला सांगते की ती घराबाहेर असणार्‍या भटक्या कुत्र्याला पाळायचे ठरवते आहे. त्यावेळी तो म्हणतो, "ती 'भटकी' कुत्री आहे तिला तुझी गरज नाही". तर ती उत्तर देते की "माहीत आहे मला, पण तिची गरज 'मला' आहे!" त्यांच्या नातेसंबंध आणि तिची मानसिक स्थिती यावर अगदी नेमकेपणाने भाष्य केलंय.
असाच एक संवाद म्हणजे एक बाप आपल्या मुलाबद्दल म्हणतो "साहेब, आम्ही त्याला मुसलमान पण नाही बनू दिल आणि तुम्ही तर त्याला थेट दहशतवादी बनवले! "
किंवा, "पोलिसांपासून चोरच पळतात अस नाही, कधी कधी खर बोलणार्‍याला पण पळावे लागते"
तर एक ऑफिसर सांगतो की "लांबून बघताना ही व्यवस्था(पोलीस, राजकारणी, नोकरशहा) म्हणजे एकदम गचाळ वाटू शकते. पण प्रत्यक्षात ही अगदी व्यवस्थित तेलपाणी केलेल्या मशिन सारखी आहे. त्यातल्या प्रत्येक छोट्या भागाला नेमून दिलेले काम कराव लागत आणि तो भाग नीट काम करेना झाला की त्याला बदलले जाते. बाकी व्यवस्था अगदी तशीच चालू राहते "
एकंदरीत पूर्ण सीरिजच किंबहुना आपल्या व्यवस्थेच सार आहे हे!

दिल्ली, चित्रकूट, हरियाणा, पंजाब इकडच बहुतांश चित्रण आणि भाषा पण तिकडची आहे. वेगवेगळे ट्रॅक असल्यामुळे सतत हिंसक गोष्टी वगैरेचा भडीमार होत नाही जे अशा काही सीरिज मध्ये जाणवले होते.
शिव्या खूप आहेत, Raw आहे, हिंसा आहे पण अगदी खूप अंगावर येणारी नाही(२-३ दृश्य अगदी थेट नाहीत पण जरा disturbing आहेत खरी). खूप अश्लील दृश्ये नाहीत विनाकारण.

बाकी गुल पनागला खूप वाव नाही आहे पण एका दृश्यात जबरदस्त भाव खाऊन गेलीय, टिपिकल बायको. सांगत नाही काय प्रसंग आहे ते :-)

आपल्या पुराण, संत साहित्य यांचे दाखले मध्ये मध्ये दिले आहेत. अगदी शीर्षक किंवा स्वर्गाच्या दारापर्यंत युधिष्ठिर सोबत जाणाऱ्या कुत्र्याची कथा हे अगदी चपखल नाही बसत पण ठीक आहे.

शेवटी येणार 'सकल हंस में राम बिराजे' हे कबीराचे भजन तर अगदी आवडल.
बर्‍याच दिवसानी एखादी सीरिज बघून चांगलं वाटल. सुरुवातीला म्हटल्या प्रमाणे (थोडा) सुखांत आणि अधांतरी नसल्यामुळे आपण खुश!
जरूर बघा.

कलामाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 9:42 am | कुमाऊचा नरभक्षक

काबीवरचा होणारा हल्ला उधळून लावला गेला आहे बघूया काय होतंय ते सुरुवात तर रोचक वाटली

कुमार१'s picture

23 May 2020 - 10:05 am | कुमार१

छान परिचय. आवडला.

चौथा कोनाडा's picture

23 May 2020 - 12:30 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त रसग्रहण !
बघायला पाहिजे पातल लोक !

कानडाऊ योगेशु's picture

23 May 2020 - 2:34 pm | कानडाऊ योगेशु

सिरिज परवाच पाहिली. मला अन्सारीची भूमिका करणारा इश्वाक सिंग आवडला. एकाच वेळी प्रॉस्पेक्टींग आय.पी.एस व मुस्लीम तरुण वाटतो तो.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

23 May 2020 - 3:37 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

छान आहे सीरिज . मी एका बैठकीत संपवले 9 भाग

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

23 May 2020 - 3:54 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

अब क्या रोटी खाके जायेगा के.... वाला सिन लैच भारी.
सिरिज मध्ये बर्‍यापैकी भाग अपेक्षित होते. सिक्रेड गेम्स, मिर्झापुर मुळे बहुतेक अ‍ॅजे ऑडीयेन्स म्हनुन आपली पण बैठक जमलीये बहुतेक त्यामुळ असावं :)
प्लॉट रेग्युलर वाटला पण त्यावर कलाकार भारी पडले, भट्टी जमली त्यामुळ. खास करुन
हाथिराम चौधरी-जयदीप अहलावत जबरदस्त काम केलय या माणसाने. विद्युत जाम्वालच्या कमांडो मध्ये पण भारी वाटला होता, विद्युतच्या कायच्या काय अ‍ॅक्शन मुळ्ं जरा बाजुला पडल्यागत वाटला. भारी कलाकारे.
विशाल त्यागी- अभिषेक बॅनर्जी, अजुन एक उभरता कलाकार. काही संवाद नसताना भाव खाउन जातो.
संजीव मेहरा- नीरज काबी, एवढा चील अभिनय बरेच दिवस बघितला न्हवता. सिक्रेड गेम्स मधला 'पारुलकर' पण असाच थन्ड डोक्याचा होता. भारी.
गुल पनाग - उगं घुसवल्यासारखी वाटली. हाथिरामला कानाखाली भारी मारली पण :)
चिनीची श्टोरी पण अन्गावर येते.
राजेश शर्माचा ग्वाला गुज्जर २/३ सिन मध्ये करामत करुन जातो.

कुमाऊचा नरभक्षक's picture

23 May 2020 - 9:49 pm | कुमाऊचा नरभक्षक

कामे मस्त आहेत... ढकलत ढकलत बघून घेतली एकदाची.

लई भारी's picture

24 May 2020 - 8:17 am | लई भारी

सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार!

पाताल लोक पर एक और विवाद, बीजेपी विधायक की शिकायत- अनुष्का शर्मा पर लगे रासुका
गाजियाबाद के लोनी से बीजेपी विधायक नंदकिशोर गुर्जर ने पाताल लोक पर आपत्ति जताई है. नंदकिशोर गुर्जर ने लोनी थाने में अनुष्का शर्मा के खिलाफ केस दर्ज करने के लिए शिकायत दी है. गुर्जर ने इस वेब सीरीज पर कई गंभीर आरोप लगाए हैं.

झम्प्या दामले's picture

25 May 2020 - 10:39 am | झम्प्या दामले

परिचय आवडला.

mrcoolguynice's picture

27 May 2020 - 7:26 am | mrcoolguynice

BJP Leader Wants Virat Kohli To Divorce Anushka Sharma Because She Produced ‘Pataal Lok’
17 hours ago · 84.7K Shares

Take a deep breath and prepare to be stunned at the priorities of our elected officials, because one of them, has taken out the time during a pandemic, to file an FIR against Anushka Sharma.

लई भारी's picture

27 May 2020 - 9:56 am | लई भारी

लोकांना काय काय करायला वेळ मिळतो कळत नाही :-)