कोडगं व्हायचं...
खुशाल कोडगं व्हायचं
कशाला मनाला लावून घ्यायचं
मनाला लावून घेण्याने परिस्थिती
थोडीच बदलणार आहे
अवतीभवतीची माणसं
थोडीच बदलणार आहेत
कशाला पाहिजे हळवं संवेदनशील मन
लहान सहान गोष्टींनी चरे पाडून घ्यायला
ओरखडे पडायला
काय सुख मिळतं संवेदनशील मनाने
चार ओळी लिहिता येतात
पानभर खरडता येते... एवढंच
सरळ निर्लज्ज व्हायचं
सुखी रहायचं
अर्ध्या हळकुंडात पिवळं व्हायचं
ज्याचं खायचं त्याच्यावरच ऊडायचं
रूबाब करायला कमी नाही पडायचं
येता जाता पिंका टाकायच्या
माणुसकीच्या बाता मारायच्या
कसला शब्द नी कसला वायदा
सगळ्यात महत्त्वाचा आपला फायदा
कसली लाज नी कसली चाड
हवेत कशाला फाजील लाड
कसलं पुण्य नी कसले पाप
हवेत कशाला नसते ताप
कसली नितिमत्ता नी कसले ऊसूल
सब फिजूल
वेळ सरली की पलटी मारायची
वार्याबरोबर पाठ फिरवायची
करणार्याला ठेवायची नावं
श्रेय घ्यायला व्हायचं पुढं
कमरेचं सोडून नागडं नाचायचं
लाज वाटेल तो डोळे मिटेल
आपण कशाला डरायचं
म्हणे चित्रगुप्त पाप पुण्याच्या नोंदी ठेवतो
पुराणकथा फाट्यावर मारायच्या
आपण आपल्या तुंबड्या भरायच्या
कुणी सांगितलंय नसत्या जबाबदार्या घ्यायला
सरळ हात वर करून मोकळंं व्हायचं
तो मी नव्हेच म्हणायचं
आपलं काम साधायचं
नी बाजूला व्हायचं
हिशेबाचं साधं सरळ गणित ठेवायचं
गरज पडली की शरण जायचं
तुमच्या कडे पैसा आहे ना ...बस्स
मान तुम्हालाच मिळणार
जग तुम्हालाच सलाम करणार
तुम्हाला नियम पाळायचे आहेत ना
पाळा ना मग
आमच्या का मागे लागाता
आम्ही धाब्यावर बसवू नाहीतर कोठेही बसवू
हजार तर्हेची माणसं ईथं
गोड बोलणारी, मतलब साधणारी, ढोंगी
शहाणे असाल तर वेड पांघरून रहा
नाहीतर लवकरच वेड्यात निघाल
निओ
खरंय. असंच वाटतं सद्ध्या.
छान झालीय .. आवडली आणि हिलय
बापरे!