कर्करोग आणि दुर्दैव !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. या वैज्ञानिक लेखात हे दैव वगैरे कुठून आले हा प्रश्न लगेच मनात येईल. पण घाबरू नका ! कर्करोगासंबंधात ‘दुर्दैव’ हा शब्द दोन वैज्ञानिकांनीच उपस्थित केलेला आहे. सामान्य माणूस ज्याला दुर्दैव म्हणतो त्याचा वैज्ञानिक पातळीवरील अर्थही त्यांनी सांगितलेला आहे. तो तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठीच मी हा लेख लिहीत आहे.
तर या सगळ्या प्रकरणाची सुरवात २०१५मध्ये झाली. Cristian Tomasetti (गणितज्ञ) आणि Bert Vogelstein (जनुकतज्ञ) या वैज्ञानिकांनी काही कर्करोगांचे मूळ कारण सांगणारी त्यांची “Bad Luck Theory” विज्ञान विश्वात सादर केली. ती जाणून घेण्यापूर्वी या विषयाचा पूर्वेतिहास थोडक्यात जाणून घेऊ.
कर्करोगाची कारणमीमांसा हा अनेक वर्षे सतत अभ्यास होत असलेला विषय आहे. त्यावर अफाट संशोधन होत आहे. त्यातून नवनवी गृहीतके पुढे येतात. मग त्यावर सखोल चर्चा होते आणि मतभेद झडत राहतात. या सगळ्यामागे वैज्ञानिकांचा हेतू एकच असतो. तो म्हणजे कर्करोगाच्या कारणाच्या सखोल मुळाशी पोचणे. एव्हाना या रोगाच्या बाबतीतली मध्यवर्ती कल्पना स्पष्ट झालेली आहे - मुळात कर्करोग होण्यास पेशींतील काही महत्वाच्या जनुकांचा बिघाड कारणीभूत असतो.
जनुकीय बिघाड(mutation) हा मुख्यतः दोन प्रकारे होतो:
१. वातावरणातील (environmental = E) कर्करोगकारक घटक : यात किरणोत्सर्ग, रसायने आणि काही विषाणूंचा समावेश होतो.
२. अनुवंशिकता (Heredity = H)
या दोन्ही प्रकारातील( E व H) कारणे प्रस्थापित झालेली आहेत. परंतु काही कर्करोगांच्या बाबतीत ती दोन्ही लागू होत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे संशोधकांना अन्य काही कारणांचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी पेशीतील DNAवर लक्ष केंद्रित झाले. जेव्हा एखाद्या मूळ पेशीचे विभाजन होते, तेव्हा त्यातील DNAचेही विभाजन (replication) होऊन त्याच्या प्रतिकृती तयार होतात. या प्रक्रियेत कधी ना कधी चुका (random errors) होतातच आणि त्या अटळ असतात. अशा काही चुकांतून जनुकीय बिघाड होतात. त्यातील काहींमुळे पुढे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे कर्करोगाच्या कारणमीमांसेतील हे तिसरे कारण स्पष्ट झाले आणि त्याला ‘R’ (Replication दरम्यानच्या चुका) असे संबोधले गेले.
वयानुसार जसे पेशींचे विभाजन वाढत्या प्रमाणात होते, त्याच प्रमाणात या चुकाही वाढत जातात. परिणामी कर्करोगाची शक्यता वाढती राहते. आता ‘R’ प्रकारच्या चुका का होतात? तर याला काही उत्तर नाही. काही व्यक्तींत त्या जास्त तर काहींत कमी होतात इतकेच. म्हणून या तत्वास अनुसरून या वैज्ञानिक द्वयीने या प्रकाराला ‘bad luck’ असे लाक्षणिक अर्थाने संबोधले. अन्य काहींनी या गृहितकाला ‘TV थिअरी’ असेही नाव दिले – यातील T व V ही त्या दोघांच्या आडनावाची अद्याक्षरे आहेत !
२०१५मध्ये हे गृहीतक प्रसिद्ध झाले खरे पण त्यात काही त्रुटी होत्या. अन्य कर्करोग संशोधकांनी त्यावर खालील आक्षेप घेतले:
१. समाजातील एकूण कर्करोगांपैकी नक्की किती टक्के हे ‘R’ चुकांमुळे होतात?
२. या अभ्यासात स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगांचा समावेश नव्हता आणि हे तर बऱ्याच प्रमाणात आढळतात. त्यामुळे अशा चुका आणि विशिष्ट अवयवाचा कर्करोग याची सांगड कशी घालायची?
३. हा अभ्यास फक्त अमेरिकी रुग्णांच्या माहितीवर आधारित होता. मग जगातील विविध वंशियांना याचे निष्कर्ष कसे लागू होतील?
त्यातून स्फूर्ती घेऊन या द्वयीने या विषयाचा व्यापक अभ्यास केला. आता त्यांनी संशोधनात जगातील ६९ देशांतील रुग्णांचा समावेश केला. त्याचबरोबर एकून ३२ प्रकारचे कर्करोग अभ्यासले आणि त्यात अर्थातच स्तन आणि प्रोस्टेटच्या कर्करोगांचाही समावेश होता. मग २०१७मध्ये त्यांनी पुढील निष्कर्ष जाहीर केले. त्यात विविध कर्करोग आणि त्यांच्या कारणांची साधारण टक्केवारी दिली. ती अशी होती:
६६% कर्करोग हे ‘R’ मुळे होतात.
२९% .......... हे ‘E’ मुळे, तर
५% ....... हे ‘H’ मुळे.
अर्थात ही सर्वसाधारण आकडेवारी होती. मग निरनिराळ्या अवयवांच्या रोगांचीही टक्केवारी काढली गेली. त्यातली काही प्रमुख अशी:
१. प्रोस्टेट, मेंदू आणि हाडांचे कर्करोग : ९५% ‘R’ मुळे
२. फुफ्फुस कर्करोग : ३५% ‘R’ मुळे (आणि ६५% ‘E’ मुळे).
यावरून एक लक्षात येईल. काही कर्करोगांच्या बाबतीत ‘R’ हे कारण अगदी योग्य आहे पण अन्य काहींच्या नाही. फुफ्फुसाचा कर्करोग होण्यास ‘E’ म्हणजेच धूम्रपान अधिक अंशी जबाबदार आहे. त्यामुळे दुर्दैवाचे गृहीतक प्रत्येक कर्करोगाला लागू होईलच असे नाही.
आता या गृहितकावर अधिकाधिक टीका होऊ लागली. काही गणितज्ञांनी याचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या मते या वैज्ञानिक द्वयीने त्यांच्या अभ्यासात संख्याशास्त्राची सूत्रे नीट वापरलेली नाहीत. त्यामुळे या विषयावरील गोंधळ अजून वाढला.
Tomasetti आणि Vogelstein यांनी त्यांच्या गृहीतकाच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडले. त्यांच्या मते ‘R’ कारण जर आपण रुग्णांना पटवून दिले तर त्यांच्या मनाला खूप बरे वाटते. विशेषतः खालील प्रकारच्या रुग्णांत याचा उपयोग होतो:
१. अजिबात धूम्रपान न करताही फुफ्फुसाचा कर्करोग झालेले रुग्ण.
२. काही जणांची आहारशैली अगदी आरोग्यपूर्ण असते तसेच ते वातावरणातील कर्करोगकारक जहाल घटकांच्या फारसे संपर्कात आलेले नसतात. तरीही त्यांना एखादा कर्करोग झालेला असतो.
३. लहान मुलांच्या कर्करोगात तर हे स्पष्टीकरण खूप कामी येते. त्यांचा रोग जर अनुवांशिक नसेल तर अशा वेळेस त्यांच्या पालकांना खूप अपराधी वाटते. मुलांत ‘E’ प्रकारची कारणे सहसा लागू नसतात. “मग माझ्याच मुलाच्या वाट्यास हे का आले?” असे ते उद्वेगाने म्हणतात. इथे ‘R’ चे स्पष्टीकरण चपखल बसते.
वरील तिन्ही प्रकारांत संबंधित रुग्ण “नशीब माझे” असेच स्वतःला दूषण देतो. त्याचेच शास्त्रीय स्पष्टीकरण म्हणजे ‘R’ थिअरी.
‘R’ गृहीतकाचे प्रवर्तक आणि टीकाकार यांच्या प्रदीर्घ विचारमंथनातून आता असा सुवर्णमध्य काढता येईल:
१. कर्करोगाची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. तो E, H व R यांतील निव्वळ एका घटकामुळे होत नाही, तर या तिघांच्या एकत्रित परिणामातून होतो.
२. जवळपास ४०% कर्करोगांचा प्रतिबंध आरोग्यपूर्ण जीवनशैलीतून करता येतो. त्यामुळे ‘E’ कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उदा. धूम्रपान व मद्यपानापासून अलिप्तता ही महत्वाची राहीलच. तसेच विविध किरणोत्सर्ग हेही याबाबतीत महत्वाचे आहेत.
३. कर्करोग्यांचे समुपदेशन करताना गरजेनुसार ‘R’ गृहीतकाचा वापर करता येईल.
४. काही कर्करोगांच्या बाबतीत E व H ही कारणे लागू नसतील तर ‘R’ हेच स्पष्टीकरण मानावे लागेल. अशा बाबतीत रोग टाळणे हे आपल्या हातात नसेल. पण कर्करोग जर अगदी लवकरच्या अवस्थेत कळून आला तर त्यावरील उपाय प्रभावी ठरतात. त्यादृष्टीने आयुष्याच्या योग्य त्या टप्प्यात विविध चाळणी चाचण्या करून घेणे हितावह ठरेल.
.....
आज समाजात विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८५ लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत. त्यादृष्टीने कर्करोगावरील संशोधन हे बहुमूल्य आहे. कोणत्याही रोगावरील प्रभावी उपचार शोधण्यासाठी त्याची कारणे सूक्ष्म पातळीवर समजणे गरजेचे असते. कर्करोगाच्या बाबतीत तर ते खूप गुंतागुंतीचे आहे. प्रस्तुत वैज्ञानिक द्वयीने मांडलेली ‘R’ थिअरी हे त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. जरी ती वादग्रस्त असली तरी ती या संशोधनाला एक वेगळे परिमाण देते हे निश्चित.
**************************
कर्करोग या विषयावरील माझे अन्य लेखन:
* रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर
(https://www.misalpav.com/node/41581)
* मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहीतक (https://www.misalpav.com/node/41353)
प्रतिक्रिया
R मधील चूक होण्याचा दर हा
शंकानिरसन
उत्तम लेख!
आजकाल कँन्सरचा प्रादुर्भाव
समीरसूर,
कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले
अनिंद्य, धन्यवाद.
खूप पूर्वी मनुष्य कशाने मेला
पूर्वी लोक मोठ्या प्रमाणावर
पूर्वी लोक मोठ्या प्रमाणावर
मला कर्करोग होणं हे मुलगा
गवि, म क, धन्यवाद
आमचे आजून थोडेसे
चौरा, झकास हो !
हाती पायी धड असताना वेळेत
खूपच छान लेख / माहिती.
काहीच सुरक्षित नाही.
धन्यवाद !
DNA chi दुरुस्ती
राजेश,
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख
डॉ. सुहास व शेखर,
धन्यवाद!
धन्यवाद !
७ एप्रिल...
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख.
टर्मिनेटर,
अंदाज ..
काहीच संशोधन झाले नाही तर
हृदय ....
अन्न व हवा ... ?
लाडके व दोडके .....
छान लेख..
खात्यात
सुधीर,