प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं!
त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं.