...आणि गावसकर पेटला!

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
29 Oct 2009 - 12:13 pm

आज हे आठवण्याचे कारण म्हणजे क्रिकइन्फो च्या एका सदरात प्रत्येक तारखेला आधीच्या काही वर्षात काय झाले याची अत्यंत वाचनीय माहिती येते - त्यात या सिरीज बद्दल वाचले आणि क्रिकेट (टीव्हीवर दाखवू लागले आणि) पाहू लागलो तेव्हा अगदी सुरूवातीला पाहिलेल्या या सिरीज बद्दल च्या बर्‍याच गोष्टी आठवल्या.

१९८३ च्या वर्ल्ड कप मधे भारताकडून वेस्ट इंडिज चा संघ हरला. लॉईड ने राजीनामा दिला होता, पण तो बहुधा स्वीकारला गेला नाही. हा संघ एकूणच प्रचंड डिवचला गेला होता. त्यात चार महिन्यांनतर त्यांचा भारत दौरा आला...

हा संघ तेव्हा क्रिकेट मधला तेव्हाचा (आणि कदाचित आत्तापर्यंतचा) सर्वात बलाढ्य संघ होता. रिचर्डस, ग्रीनीज सारखे आक्रमक फलंदाज तर होतेच पण मार्शल, होल्डिंग, रॉबर्ट्स, डॅनियल, डेव्हिस सारखे वेगवान गोलंदाज आणि लॉईड ची कॅप्टनशिप यांच्या जोरावर ते १२-१३ वर्षे कसोटी मालिका कोठेही हरलेले नव्हते. टाटा मोटर्स (पूर्वीचे टेल्को) च्या बाबतीत एक अंतर्गत विनोद (इन जोक) कायम सांगितला जातो - "एक माणूस एक ट्रक विकत घेतल्यावर काही दिवसांनी डीलर कडे जातो आणि बर्याच तक्रारी आहेत म्हणून सांगतो. मग मेकॅनिक ने नीट बघितल्यावर कळते की आत इंजिनच नाही. आता इतके दिवस ट्रक कसा चालला यावर त्या डीलर चे उत्तर असते 'रेप्युटेशन' वर!" तेव्हाच्या विंडीज चे बोलर्स एवढे भीतीदायक असायचे की मला वाटते या मालिकेत भारताच्या अर्ध्या विकेट्स केवळ यांच्या रेप्युटेशन वरच उडाल्या असतील. ही सिरीज मी पूर्ण पाहिलेली आहे आणि काही विकेट्स बघून खरोखरच तसे वाटायचे :)

या अशा लोकांना पहिल्याच टेस्ट मधे कानपूरला 'ग्रीन टॉप' देण्याची कल्पना कोणाच्या डोक्यातून आली असेल कोणास ठाउक! आधी ऐन भरात असलेला मार्शल आणि त्याचा नुसता वेगच नव्हे तर त्याबरोबर असलेली फलंदाजाच्या चुका ओळखून त्याप्रमाणे त्याला गोलंदाजी करण्याची प्रचंड हुशारी! स्टीव्ह वॉ नेच त्याच्या पुस्तकात लिहीले आहे की मार्शल १-२ ओव्हर्स मधेच फलंदाजाला 'वर्क आउट' करू शकत असे! दुसरा होल्डिंग - याला 'दुसरा' म्हणायचे एकच कारण म्हणजे त्याच्यापेक्षा मार्शल यावेळेस जास्त भरात होता. आणि होल्डिंग त्याच्या ८१ सालच्या इंग्लंड विरूद्धच्या फॉर्म पेक्षा किंचित उतरला असला तरी 'डॉन जख्मी है तो क्या, फिरभी डॉन है" अशीच अवस्था होती. आणि हे दोघे थकले तरी डॅनियल आणि डेव्हिस तर कधी रॉबर्ट्स, गार्नर (याच्या उंचीमुळे याने टाकलेला यॉर्कर दुसर्या मजल्यावरून आपल्या पायात आल्यासारखा वाटतो हे संदीप पाटील का कोणीतरी म्हंटला होता :) ) हे होतेच. नाहीतर आपल्याविरूद्ध खेळणार्‍यांना एकदा कपिल खेळून काढला की बाकीचे लोक केवळ स्पिनर्स येइपर्यंत बॉल ची चमक घालवण्याचे काम करत असल्यासारखे वाटत. विशेषतः भारतातील खेळपट्ट्यांवर.

यांच्याविरूद्ध खेळण्यासाठी भारताकडे प्रमुख फलंदाज होते - गावसकर, मोहिंदर अमरनाथ, वेंगसरकर, संदीप पाटील आणि शास्त्री (आणि कपिल). आधीच्या सीझन मधे विंडीज आणि पाकच्या तोफखान्याविरूद्ध त्यांच्याच देशात पाच शतके मारणारा आणि वर्ल्ड कप च्या उपांत्य व अंतिम सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' असलेला मोहिंदर घरच्या मैदानावर आणखी चांगला खेळेल असे वाटले होते. पण मोहिंदरच्या बाबतीत हे एक अगम्य कोडे म्हणजे घरच्या मैदानांवर तो अजिबात 'चालला' नाही. त्यामुळे फलंदाजी च्या बाबतीत गावसकर काय करेल यावर बरेच काही अवलंबून होते.

या सिरीज आधी पासून गावसकर च्या खेळाकडे सर्वांचेच लक्ष होते. तेव्हा भारत जिंकणे वगैरे शक्यता केव्हाही फारच कमी असल्याने वैयक्तिक उच्चांकांना खूप महत्त्व होते. या सुमारास शतकांच्या संख्येमध्ये सोबर्स, बॉयकॉट आणि इतर बरेच नावाजलेले इंग्लिश खेळाडू यांना मागे टाकून गावसकर ब्रॅडमन च्या २९ शतकांच्या (तेव्हा सर्वात जास्त) जवळ आला होता, तसेच एकूण धावांच्या संख्येतही सर्वात जास्त असलेल्या बॉयकॉट च्या जवळ आला होता. त्यामुळे त्याच्या प्रत्येक डावाला प्रचंड महत्त्व आले होते.

तर कानपूरला मार्शल ने खेळपट्टी आणि भारतीय फलंदाजांची वेगवान गोलंदाजी खेळण्याची एकूण क्षमता याचा भरपूर वापर करत दाणादाण उडवली. ही सिरीज म्हणजे विंडीज चा बदला आहे असे दिसू लागले होते.खुद्द गावसकर दुसर्‍याच बॉलवर आउट झाला. आणि पहिल्या किंवा दुसर्‍या (लक्षात नाही) डावात बॉलच्या वेगामुळे त्याची बॅट त्याच्या हातातून पडली. आणि बहुधा तेव्हापासून ही सिरीज म्हणजे विंडीज वि. भारत असे न होता विंडीज गोलंदाज वि. गावसकर अशी झाली. कदाचित आपले खेळाडू 'पेटायला' अशी काहीतरी व्यक्तिगत गोष्ट कारणीभूत ठरत असावी, आणि मग जेव्हा ते आपण काय करू शकतो ते दाखवतात तेव्हा कितीही तयारी केलेला प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या प्रतिभेपुढे काही करू शकत नाही.

सिरीज मधे ०-१ ने मागे, पूर्ण बॅटिंग मार्शल आणि इतरांपुढे कोसळलेली, स्वत:चे अपयश हे सगळे पचवून एरव्हीचा शांत आणि बचावात्मक बॅटिंग करणारा गावसकर दिल्लीच्या दुसर्‍या टेस्ट मधे उभा राहिला तो त्याच्या चाहत्यांनी कधीही न पाहिलेला आक्रमक पवित्रा घेउन! आणि मग विंडीज च्या सर्व बोलर्सची यथेच्छ धुलाई करून त्याने केवळ ९१ बॉल्स मधे शतक केले - कसोटी सामन्यात, आणि ते ही वेस्ट इंडिज विरूद्ध! कदाचित ब्रॅडमन च्या विक्रमाची बरोबरी करताना त्यानी त्याच्या सारखेच आक्रमक खेळावे असे ठरवले असेल! त्याने मार्शल च्या एका शॉर्ट बॉल वर हुक करून मारलेली सिक्स अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याचा बहुधा मार्शलवर जास्तच राग असावा, कारण पुढच्या अहमदाबाद च्या मॅच मधे सुद्धा त्याच्या पहिल्या तीन बॉल वर सलग तीन फोर मारून त्याने जबरदस्त सुरूवात करून दिली होती. तेव्हाही शतक झाले असते पण ९० वर तो बाद झाला. पुन्हा कलकत्त्याला पहिल्याच बॉल वर मार्शल ने 'काढल्यावर' मद्रास ला ०-२ ला चौथ्या क्रमांकावर येउन नाबाद २३६ रन्स काढून ३० वे शतक नोंदवत त्याने ब्रॅडमन चा विक्रम मोडला.

भारत ही सिरीज ०-३ हरला, पण ६ टेस्ट पैकी तीन मॅच मधे विंडीज वर चक्क 'लीड' घेतला होता हे मुळात विशेष होते. आणि गावसकर (५०० रन्स, त्यात दोन शतके) व कपिल (२९ विकेट्स) हे आमचे दोन्ही हीरो या सिरीज मधून तेवढेच चांगले - किंवा इतरांविरूद्ध खेळायचे त्यापेक्षा थोडे जास्तच चांगले- खेळले, हाच आनंद आम्हाला होता. तेव्हा भरात असलेले बोथम वगैरेंसारखे लोक विंडीज विरूद्ध कसे ढेपाळत ते पाहिल्यावर तर तो आणखीनच वाढला :)

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

29 Oct 2009 - 12:20 pm | विशाल कुलकर्णी

मस्त माहिती ! मजा आली वाचताना...

अवांतर : ती खुन्नस आजकाल राहीली नाही. नाही म्हणायला काल माहीने मैदान गाजवले म्हणा. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आंबोळी's picture

29 Oct 2009 - 12:25 pm | आंबोळी

मस्त माहिती ! मजा आली वाचताना...

असेच म्हणतो.

आंबोळी

मदनबाण's picture

29 Oct 2009 - 1:05 pm | मदनबाण

हेच म्हणतो...

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

Nile's picture

29 Oct 2009 - 12:33 pm | Nile

सुरेख किस्सा! न बघताही डोळ्यासमोर आला.

क्रि़केट बघायचा मजा काही औरच यार!

-सध्या पेट्न मॅनिंगचा फॅन.

प्रमोद देव's picture

29 Oct 2009 - 12:39 pm | प्रमोद देव

मार्शल आणि गावस्कर हे दोघेही छोट्या चणीचे खेळाडू होते. एक आघाडीचा गोलंदाज तर दुसरा आघाडीचा फलंदाज. एरवी फक्त ’पनामा’ कॅप घालून खेळणारा गावसकर मार्शलच्या आगमनानंतर त्या टोपीच्या आत कवटीच्या आकाराची एक लोखंडी वाटी घालत असे. कारण मार्शलचा भर हा फलंदाजाला बाद करण्याऐवजी त्याला क्रिकेट ह्या खेळातून ’बाद’ करण्याकडे होता म्हणून तो सहसा फलंदाजाच्या शरीराचा वेध घेऊन गोलंदाजी करत असे. त्याला उत्तर म्हणून गावसकरने ही युक्ती केली होती. त्यावेळी हेल्मेटचा जन्म नव्हता झाला. :)
गावसकर-मार्शलची अटीतटीची झुंज पाहिलेला...
प्रमोद देव.

अवांतर: गावसकरच्या पत्नीचे नाव ’मार्श(नी)ल’ असे आहे. ;)

=========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

जे.पी.मॉर्गन's picture

29 Oct 2009 - 12:49 pm | जे.पी.मॉर्गन

एकदम झकास लेख ! आम्हाला गावसकर बघायला नाही मिळाला... मला तर ८७च्या वर्ल्डकप उपांत्य सामन्यात फिल डिफ्रेटसनी त्याची उडवलेली दांडी फक्त आठवते. पण मार्शल गेल्यावर त्याच्यावर ईएसपीएन वर एक कार्यक्रम दाखवला होता... त्यात मुलाखतकाराने मार्शलला विचारलं की तू पाहिलेला सर्वांत आक्रमक फलंदाज कोण? तर दुसर्‍या क्षणाला तो म्हणाला 'सुनील गावसकर'.. कारण त्याची आक्रमकता त्याच्या डोक्यात होती "he was aggressive in his head".

सच्या 'साहेब' असेल तर सुनील गावसकर 'मोठे साहेब' होते ह्यात वादच नाही.

पांथस्थ's picture

29 Sep 2011 - 9:47 pm | पांथस्थ

सच्या 'साहेब' असेल तर सुनील गावसकर 'मोठे साहेब' होते ह्यात वादच नाही.

सहमत.

गणपा's picture

29 Oct 2009 - 12:54 pm | गणपा

मस्तच. जुन्या गोष्टींचा उजाळा. मी क्रिकेट पहायला लागलो तो गावस्करमुळेच.. तसे घरात सगळेच क्रिकेवेडे.
७० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा आख्ख्या बिल्डिंग मध्ये एकच टी. व्ही. होता तेव्हा आख्खी बिल्डिंग घरात गोळा व्हायची.
मग टी. व्ही. चा आवाज बंद करुन रेडियोवरची कॉमेंट्री लावली जायची . विरुद्ध पक्षाचा एखदी विकेट किंवा आपला एखादा फोर सिक्स लागली कि जो कल्ला व्हायचा की ज्याच नाव ते.

भडकमकर मास्तर's picture

29 Oct 2009 - 2:28 pm | भडकमकर मास्तर

ही सीरीज पाहिल्याचे आठवतेय.... पण लै लहान होतो तेव्हा...
कानपूरच्या त्या संध्याकाळी दोन आउट शून्य स्कोअर होता, तेवढे आठवतेय......
साले ते दूरदर्शनचे ते व्हिडिओ कुठे बघायला मिळत नाहीत आता...
यूट्यूबवर दुनियाभरचे काहीही सापडते पण जुने व्हिडिओ?
की डीडीने चुकून पुसून टाकले आहेत?

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भडकमकर मास्तर's picture

29 Sep 2011 - 8:44 pm | भडकमकर मास्तर

हेच उत्तर आपण लिहिलंय हे लक्षात नसल्याने खाली हेच टंकायला घेतले....हाहाहा

नेहमी आनंदी's picture

29 Oct 2009 - 3:02 pm | नेहमी आनंदी

क्रिकेट बघत बसायला आवडत नाही तरी माहीती वाचायला छान वाटले. तो अभुतपुर्व विश्वचषकाचा सामना असाच पुर्ण गल्ली आमच्या घरात येउन टीव्ही बघत असल्या मुळे नाईलाजाने बघितलेला सामना अतिशय छान वाटला होता. त्यातच मारले होते ना रवी शास्त्री ने ६ बोल वर ६ सिक्सर?

अज्ञानी मी....

गणपा's picture

29 Oct 2009 - 3:14 pm | गणपा

नाय हो शास्त्रांच्या रवीने बहुदा रणजी सामन्यात ६ बॉल वर ६ सिक्स मरल्य होत्या.

प्रमोद देव's picture

29 Oct 2009 - 3:21 pm | प्रमोद देव

गोलंदाजीवर शास्त्रीने ६चेंडूंवर सहा षटकार खेचले होते....मुंबई विरुद्ध बडोदा...रणजी सामन्यात.

=========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

नितिन थत्ते's picture

30 Sep 2011 - 7:40 am | नितिन थत्ते

मूळ प्रकाटाआ...

प्रमोद देव यांचे म्हणणे बरोबर आहे.

स्वाती२'s picture

29 Oct 2009 - 4:01 pm | स्वाती२

व्वा! सनी डेजच्या मस्त आठवणी.

अमोल केळकर's picture

29 Oct 2009 - 6:02 pm | अमोल केळकर

सनी इज ग्रेट

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

संदीप चित्रे's picture

29 Oct 2009 - 8:57 pm | संदीप चित्रे

लेखासाठी धन्स रे अमोल !
ती सगळी सिरीज आधाश्यासारखी टीव्हीवर पाहिलेली आठवतेय.
गावसकरची बॅट हातातून उडाल्याचेही आठवतेय आणि एकोणतीसावे शतक झाल्यानंतर आम्ही केलेला जल्लोषही आठवतोय :)
>> 'डॉन जख्मी है तो क्या, फिरभी डॉन है"
काय बोललायस मित्रा ! उगीच नाही होल्डिंच्या 'रन अप'ला रोल्स रॉइस गाडीची उपमा दिली गेलीय. होल्डिंग, कपिल, हॅडली, इम्रान वॉल्श, मॅकग्रा ह्यांनी रन अप सुरू केला नुसतं बघत राहवंसं वाटायचं !

(दोन वेळा गावसकरशी गप्पा करायचे भाग्य लाभलेला) संदीप :)

मुक्तसुनीत's picture

29 Oct 2009 - 11:19 pm | मुक्तसुनीत

फार एंड,
तुमचा हा लेख वाचतानाही त्यावेळच्या आठवणी येऊन मजा आली.
या १९८३ च्या दौर्‍याच्या अजून काही आठवणी :

माझ्यामते रिलायन्स हे नाव टिव्ही माध्यमावार सर्वात पहिल्यांदा या क्रिकेट मलिकेच्या निमित्ताने झाळकायला लागले. (चूभूदेघे) (अर्थात रिलायन्स कप १९८७ चा. तो नंतरच आला.)

या दौर्‍यावरची वन डे मालिका आपण ०-६ असे हरलो. यापैकी एक-दोन सामन्यात ग्रीनिज आणि हेन्स हे आउटच झाले नाहीत. (हग्या मार !)

१९७९ ला ऑल्विन कालिचरणबरोबर आलेला मार्शल नि १९८३ चा मार्शल यामधे जमीन अस्मानाचे अंतर होते. संदीपपाटील वगैरेनी १९७९ ला झोडपलेला मार्शल १९८३ मधे कर्दनकाळ ठरला.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Oct 2009 - 8:35 am | llपुण्याचे पेशवेll

खूप छान माहीती. :) धन्यवाद.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

अवलिया's picture

30 Oct 2009 - 8:46 am | अवलिया

मस्त माहिती ! मजा आली वाचताना...

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बट्ट्याबोळ's picture

30 Oct 2009 - 9:56 am | बट्ट्याबोळ

सुंदर लेख !!

गावसकर डोळ्यासमोर उभा रहिला !! वर्णन फार सुंदर केले आहे!!

विशाल कुलकर्णी's picture

30 Oct 2009 - 10:26 am | विशाल कुलकर्णी

मस्तच सुनीलचे ते आक्रमक रुप डोळ्यासमोर उभे राहीले...

गुगलवरुन साभार...

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

माझीही शॅम्पेन's picture

12 May 2011 - 6:05 am | माझीही शॅम्पेन

जवरदस्त लेख !

मिस्सिंग गावसकर इन action !

Truely first Man to taught to stand fearless !!!

अनिकेतपन्त's picture

29 Sep 2011 - 12:40 pm | अनिकेतपन्त

च्यायला....तेंडुलकर ची पुर्ण करीअर बघितली म्हणुन स्व्तःला धन्य मानणारे आम्ही... लइ क्वालिटी क्रिकेट मिस केलय राव आम्ही.. :(

ही मॅच मी टी व्ही वर पाहिलीय, भारतीय क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाची आठवण करून दिल्याबद्दल 'फारएंड' यांचे (आणि धागा वर आणल्याबद्दल 'माझीही शँपेन' यांचे) आभार!

या डावाची क्षणचित्रे The Masterpieces of a Master Blaster या व्हिडिओ मध्ये २.५० पासून पुढे दिसतात, गावस्करने मार्शल प्रभृतींचा सामना करत ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली तो क्षण ३.१० च्या सुमारास.