मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश(सीडी आवृत्ती) : एक अवलोकन

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
4 Oct 2009 - 1:28 am

गेल्या आठवड्यात लोकप्रभामध्ये मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाबद्दल(सीडी आवृत्ती) वाचले. लगेच दुपारी ठाण्यातील दुकानांत फोन फिरविले. पण कुठेही ते उपलब्ध असण्याची शक्यता दिसली नाही. मग माझ्या पुढच्या आशास्थानावर लक्ष्य केंद्रित केले. "दादर मधील आयडियल बुक डेपो". तिकडुन ह्याची सीडी घरी आणण्यात आली. खरंतर ह्या त्यांच्या संकेतस्थळावर ह्या सीडी शब्दकोशाची विस्तृत माहिती दिलेली आहेच. तरीही मला जसे दिसले ते मी येथे लिहीत आहे.सीडी टाकल्यावर त्यातील EXE फाईल सूरू होते. त्यामुळे काय कसे सुरू करावे ह्याची शोधाशोध करण्याची गरज नाही. उघडलेल्या प्रोग्रॅममध्ये पहिल्याच पानावर 'मोल्सवर्थ यांची प्रस्तावना', 'मोल्सवर्थविषयी थोडेसे', 'जॉन विल्सन यांच्या नोंदी', 'प्रकाशकाचे दोन शब्द', 'हा शब्दकोश कसा वापराल' व (सीडीचा मुख्य भाग) 'शब्दकोश प्रवेश' असे दुवे आहेत. ह्याबद्दल माहिती लोकप्रभात व त्यांच्या संकेतस्थळावर वाचलीच होती त्यामुळे थेट 'शब्दकोश प्रवेश' हा दुवा निवडला.
ह्यात पाहिजे ते अक्षर निवडून त्या अक्षरावरून सुरू होणरे शब्द ह्यांची यादी निवडता येतो.
तसेच त्या पानावर Find वर टिचकी मारून उघडलेल्या खिडकीत पाहिजे तो (त्या अक्षरावरून सुरू होणारा) शब्द शोधता येतो. सर्च(Find) अर्थात शोधण्याची सुविधा ही चांगली आहे. खरं तर त्याशिवाय शब्द शोधणे कठीणच जाईल. प्रकाशकांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या शब्दकोशात सुमारे ६०००० शब्द आहेत. आता मराठी भाषेची व्याप्ती शब्दांनुसार केवढी आहे त्याचा मला अंदाज नाही. परंतु ह्या शब्दकोशात असलेले भरपूर शब्द मला माहित नव्हते. (मी अजून पूर्ण अक्षरे नजरेखालून घातली नाहीत. त्यास भरपूर वेळ आहे) अर्थात मराठी शिकणार्‍यांकरीता हा खूप उपयोगाचा होईल तसेच मराठी येणार्‍यालाही एखाद्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात हे पाहण्यासही उपयोगाचा आहे. वरील जमेचे मुद्दे असूनही काही गोष्टींवर भर द्यावासा वाटतो. त्यांच्या सीडीच्या पुढील आवृत्तीत बहुधा ते हे बदल करतीलही.

  • काही शब्दांचे अर्थ ह्यात नसल्याचे आढळले. उदा. 'केवळ'. हा शब्द ’कांही’ ह्या शब्दाच्या अर्थात 'केवळ उपासी जाऊं नको कांही खा.' ह्या उदाहरणात वापरला आहे. पण 'केवळ' ह्या शब्दाचा अर्थ दिला नाही आहे.
  • शब्द शोधण्याच्या सुविधेत युनिकोड मध्ये टंकण्याकरीता एखाद्या वेगळ्या सॉफ्टवेयरची गरज असते त्याबद्दल माहिती देणे गरजेचे वाटले. तसेच त्यांनी युनिकोड फाँट कुठुन मिळेल ह्यासंबंधी संकेतस्थळांचे दुवे दिले आहेत. तरीही जर ते फाँट आणि टंकनाचे सॉफ्टवेयर त्यांनी ह्या सीडीतच दिले असते तरी चालले असते असे वाटले. (नाहीतरी ७०० पैकी ६०८ MB वापरल्याने उरलेल्या जवळपास ८०-८५ MB मध्ये ते येऊ शकते. त्या त्या संकेतस्थंळावर मी फाँट/सॉफ्टवेयर वाटण्याबद्दलची माहिती वाचली नाही आहे अजून. जर काही बंधने असतील तर मग ते वापरणार्‍यावर जबाबदारी देणेच योग्य)
  • शब्द फक्त त्याच अक्षराच्या पानावरील शब्द शोधता येतात. उदा ’अ’ च्या पानावर ’आवड’ हा शब्द सापडत नाही.
  • संगणक वापरणार्‍याला आजकाल शोध करण्याकरीता CTRL+F ची सवय झाली असते. (तो एक अविभाज्य भागच आहे म्हणा) त्याची सुविधा नाही आहे.

तरीही एकूण भरपूर शब्दांचे अर्थ, सीडी असल्याने त्याची जवळ बाळगण्यातील उपयुक्तता, अतिशय वाजवी दर (रू ७५ फक्त) आणि सर्वत्र चालत असलेल्या मराठीबद्दलच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा शब्दकोश आपल्या संग्रहात ठेवणे चांगलेच आहे.

भाषातंत्रशिक्षणमाध्यमवेधभाषांतर

प्रतिक्रिया

श्रीयुत संतोष जोशी's picture

4 Oct 2009 - 9:29 am | श्रीयुत संतोष जोशी

अरे वा. हे छान आहे .

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सहज's picture

4 Oct 2009 - 9:32 am | सहज

चांगली माहीती. धन्यु देवदत्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2009 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्ता, मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाची सीडीसाठीची नोंदणी करतो. पण, कुठे फ्री डाऊनलोड असते तर बरे झाले असते.

माहितीबद्दल आभारी....!

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

4 Oct 2009 - 10:14 am | प्रकाश घाटपांडे

आंतरजालावर http://dsal.uchicago.edu/dictionaries/ येथे सर्व भाषातील शब्द को्ष उपलब्ध आहे
मराठी साठी मोल्स्वर्थ व वझे उपलब्ध आहे.
त्या डिक्सनरी छावा या शब्दाचा अर्थ पहा
छावा (p. 300) [ chāvā ] m ( H) A young male elephant. 2 fig. Applied to a handsome man, child, colt, buffalo &c.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

देवदत्त's picture

4 Oct 2009 - 10:43 am | देवदत्त

सीडी ही त्याचीच आवृत्ती आहे.
ह्या शब्दाचा अर्थ मी आत्ता पाहिला.

दुव्याबद्दल धन्यवाद

अभिजा's picture

4 Oct 2009 - 4:59 pm | अभिजा

उपयुक्त माहिती सचित्र पुरवल्याबद्दल धन्यवाद.