भागवत सर

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
6 Jul 2009 - 9:32 pm

(विनंती- सध्या कॉलेजची परिक्षा सुरु असलेने लेख जरा गडबडीत लिहिला आहे,समजुन घ्यावे ही विनंती.)

उद्या गुरुपौर्णिमा.गुरुला वंदन करायचा दिवस.
उद्या अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होतील, वंदन वगैरे केले जाईल्, आणि गुरुंचे गुणगान गाईले जाईल ,जे अतिशय योग्य असेल.
पण यावेळेस मी मात्र माझी गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहे. मागच्या वेळी मी गुरुपौर्णिमेला शिक्षकांवर एक लेख लिहिला होता.(अर्थात तो सकाळ मध्ये शिक्षक दिनाच्या वेळी प्रसिद्ध झाला हा भाग अलहिदा)पण यावेळी मी माझे जीवन बदलणार्‍या एका सरांबद्दल लिहिणार आहे. आणि ते म्हणजे आमच्या प्रायव्हेट हायस्कुल चे लाडके सर दिपक विनायक भागवत.

तर सांगायची गोष्ट अशी की काही शिक्षकांबद्दल आपल्याला एक अनाहुत आकर्षण किंवा कुतुहल असते ,आमचे भागवत सर हे त्यातलेच. शाळेत जायच्या आगोदर पासुनच त्यांच्याबद्दल चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे ऐकले होते. त्यामुळे हा माणूस आहे तरी कोण हे जाणुन घ्यायची इच्छा होतीच.तत्वनिष्ठ , कडक पण प्रेमळ , अगदी चुक केली म्हणून आपल्या सख्ख्या पुतण्याला शाळेसमोर मारणारे आणि शाईचे पेन वापरा अशी सक्ती करणारे असे बरेच किस्से आम्ही त्यांच्याबाबत ऐकुन होतो . आणि हे सर एकदा आम्हाला पाचवीला ऑफ पीरेडला आले. सहा फुट उंच ,धिप्पाड ध्येययष्टी ,त्यामुळे जरा टरकलोच.पण त्यांनी त्या अर्ध्या तासात जे विनोद केले त्यामुळे त्यांच्याबद्दलचे सगळे पुर्वग्रह गळुन पडले , त्यानंतर जवळ जवळ पुढची चार पाच वर्षे एकच शिरस्ता पडला होता.एखाद्या ऑफ तासाला सर येणार आणि आम्हाला वही, पुस्तक बंद करायला लावुन फक्त बिनधास्त हसवणार बास.....! या अभ्यासाचे पोराना फार लोड होते हे त्यांचे म्हणणे. ते इतराना पटो न पटो पण त्यांना पटले होते आणि त्यांनी त्यावर त्यांच्या परीने उपाय शोधला होता तो असा.

होता होता दहावीचे वर्ष आले. सगळा बागुलबुवा सुरु झाला , आणि शाळा सुरु झाल्यावर अचानक समजले की आमच्या एका शिक्षकांची बदली झाल्याने यावेळी एक नव्हे तर मराठी आणि ईंग्लीश अशा दोन विषयाना ते असल्याचे समजले . हळु हळु तास सुरु झाले ,आई शप्पथ सांगतो , मला फक्त त्यांच्या एकट्याचाच तास तेवढा कधीही संपु नये असा वाटायचा , कारण त्यांच्या शिकवण्याची स्टाइलच वेगळी होती ,ते उगाचच आले आणि पुस्तक काढुन वाचुन दाखवु लागले असे कधी करत नसत ,ते आम्हाला त्या धड्याच्या अनुषंगाने प्रचंड इतर माहिती सांगत ,त्यांचे अनुभव सांगत.त्यांच्याकडे पुस्तकांचा प्रचंड संग्रह आहे आणि त्यांचे खुप वाचन आहे .त्यामुळे कधी नव्हे ते मला मराठीची गोडी वाटु लागली ,आणि स्वतःची अशी एक वैचारीक बैठक तयार झाली .याशिवाय ते मुलांना मार्क मिळावेत यासाठीही प्रयत्नशील असत .त्यांनी स्वतः एक वही घालुन त्यात सर्व प्रश्नांचे मुद्दे लिहुन काढले होते,आणि ते आम्हाला ते लीहुन देत त्यामुळे तसा अभ्यासही चालु होताच .आणि हो त्याना सगळे घाबरायचे, त्यामुळे अख्ख्या वर्षात फक्त मीच नव्हे तर सगळ्यानी फक्त त्यांच्याच वह्या पुर्ण केल्या आणि त्याचा आम्हाला खुप फायदा झाला , आणि हो याबतीत त्यांच्याइतके कडक कोण नाही . त्यांनी तर एकाची दहावीची मुख्य तोंडी परिक्षाच घेतली नाही वही पुर्ण करेपर्यंत .......त्यांचा एकच मुद्दा असायचा ..मी कष्ट करतोय मग तुम्ही करायला काय हरकत आहे..ज्याचे उत्तर कोणाकडेही नव्हते..

पण खरे सर कळतात ते शाळेत होणार्‍या इतर उपक्रमातुन ...सर उत्तम कलाकार आहेत ..त्याबद्दल पुढच्या परिच्छेदात येईलच...पण याची खरी प्रचिती मला दहावीत आली. नाट्यवाचनाच्या शासकीय स्पर्धेत "नटसम्राट" बसवायचे ठरले होते .दहावी असल्याने व गेली ३ वर्षे संस्कृत मध्येच काम केल्याने मराठीत संधी मिळेल की नाही ही शंका होती पण सरांनी एका सोमवारी आम्हा दोघा तिघाना बोलावले आणि सांगीतले आज सोमवार आहे आणि शनिवारी स्पर्धा ... नंबर मिळवायचा आहे..बास ,चार दिवस त्यानी अशी काही तालीम घेतली कि निकाल लागला तेव्हा असे चित्र होते. प्रथम क्रंआंक- आमची शाळा..वैयक्तीक प्रथम - मी आणि एकुण त्या एकांकिकेला ५ बक्षीसे,तेव्हा खरा त्यांच्यातला कलाकार दिसला ,त्यांचे कलेवरचे प्रभुत्व दिसले ..तीच गोष्ट बालकवींच्या कार्यक्रमाबाबत .त्याच वर्षी बालकवींच्या श्रावणमासी या कवितेचे शताब्दी वर्ष चालु होते. कवितावाचनाचा कार्यक्रम ठरला ,पुन्हा एक आठवडा होता आणि पुन्हा तेच ..अवघ्या आठवड्यात नक्षंत्राचे देणे च्या तोडीचा कार्यक्रम आम्ही केला ..या सगळ्यातुन खरे सर समजले .सर कडक होते हे मान्य !पण स्वच्छ चारित्र्य आणि विचार स्पष्ट असल्याने त्यांनाच तो अधिकार होता आणि काळाप्रमाणे त्यानी त्यांचे मुद्दे शिथीलही केले होते .पण शेवटी काही का असेना भागवत सर ते भागवत सरच..

हे झाले भागवत सरांबाबत ..पण दिपक भागवत ही व्यक्ती त्याहुन भन्नाट आहे.त्यांची आज जवळ जवळ २५ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.त्यांचे अनेक विनोदाचे कार्यक्रम झालेले आहेत. त्यांनी अनेकांबरोबर अनेक नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. अगदी विजय केंकरे कोल्हापुरात आले की फक्त त्यांच्याकडेच उतरतात . आणि हो, ते प्रवचनेही देतात.अगदी साध्या माणसाच्या कपड्यात ते अगदी राम ते कृष्ण सर्वांवर आपले विचार प्रखरपणे मांडतात. बर्‍याचदा असे घडलेले आहे की एकाच गावात सकाळी त्यांचा विनोदाचा कार्यक्रम आहे आणि रात्री प्रवचन .आणि हो ते तत्वनिष्ट म्हणजेच Man of Principles असल्याने जरी त्यांचे काही शत्रु तयार झाले असले तरी त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. कोल्हापुरात ते ब्राम्हण सभा करवीर आणि गीता मंदीरचे सक्रीय सदस्य आहेत .त्यासाठी ते अविरत झटत असतात ..कोल्हापुरात तेंडुलकर व्याख्यानमाला असते त्याचे आयोजक तेच असतात.मला पर्री कर ते वीणा देव ऐकायला मिळाले ते त्यांच्यामुळेच आणि हा माणुस रुक्ष वगैरे नाही हा. कोल्हापुरात ज्या लोकांकडे सर्वात जास्त चित्रपट संग्रह असेल त्यात त्यांचा समावेश होतो . मध्यंतरी जेव्हा माझ्या संघाने खैके पान. वर नाच केला होता तेव्हा सर्वात पहिली प्रतिक्रिया त्यानीच दिली होती. काय आहे, काही माणसे अचाट असतात ..अशा अचाट माणसात ते मोडतात , निदान मला तरी ते तसे भासतात,आज मी इथे जे लिहितोय ते त्यांच्यामुळेच, नाहीतर मी फक्त मराठी जड जाणारा ,आणि त्यामुळे सलग दोन वर्षे पहिला क्रमांक गेलेला एक मुलगा होतो, एखाद्यात कळत नकळत हा बदल घडवणे हेच शिक्षकाचे खरे यश असते ना? म्हणूनच ते खरे शिक्षक आहेत आणि म्हणुनच त्यांच्याबद्दल लिहायला माझ्याकडे शब्द कमी आहेत.पण , सागायची गोष्ट अशी की याच ३१ जुलैला ते स्वेच्छा निवृती घेत आहेत,आणि स्वत:ला आता ते इतर व्यापात झोकुन देत आहेत,त्याना दिर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडुन असेच ज्ञान मला मिळो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना , आणि याच दिवशी माझ्यातर्फे माझ्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षकाना प्रणाम ,मी तुमचा सदैव रुणी राहीन.
तुमचा,
विनायक

वावरवाङ्मयसाहित्यिकप्रकटनसद्भावनाशुभेच्छालेख

प्रतिक्रिया

शितल's picture

6 Jul 2009 - 10:11 pm | शितल

विनायक,
भागवत सरांच्या विषयी लिहुन तु तर सरांच्या बद्दल असलेला अनेक आठवणी जाग्या केल्यास.
मी आठवीत असताना ते सर आमचे वर्ग शिक्षक होते, शिकविणे ही देखिल एक कला आहे हे त्याच्याकडे पाहुन कळते.
त्यांनी मला एक शाईचा पेन बक्षिस दिला होता, त्याच्या संबंधित अनेक आठवणी अगदी मनात जपुन आहेत. :)
माझा ही माझ्या लाडक्या सरांना प्रणाम !

तुझ्या भागवत सरांची ओळख आवडली.
लेख जरी गडबडीत लिहिलेला असलास तरी खूपच ढोबळ चुका राहून गेलेल्या आहेत ज्या रसभंग करतात. लक्ष देणे गरजेचे.
(खुद के साथ बातां : स्वेच्छानिवृत्तीनंतरही भागवत सरांना विनायकाच्या मराठीवर मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय रंगा! :? )

चतुरंग

प्राजु's picture

6 Jul 2009 - 10:41 pm | प्राजु

लेख आवडला.
भागवत सरांना मी ही खूप वेळा भेटले आहे.
नाटक नाट्यवाचन, वक्तृत्व अशा स्पर्धामंधून खूप वेळा भेटले आहे.
प्रत्यक्ष त्यांचा सहवास नसला लाभला तरी एक कलाकार म्हणून नेहमीच त्यांचा आदर वाटत आला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

6 Jul 2009 - 10:53 pm | अनामिक

सरांची चांगली ओळख!

-अनामिक

विनायक पाचलग's picture

6 Jul 2009 - 11:38 pm | विनायक पाचलग

आपणा सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार.
सध्या हा लेख सराना दाखवावा की नको या विचारात आहे
आणि हो
जमेल तशा चुका दुरुस्त करीन ,त्रासाबद्दल माफी असावी

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

नंदन's picture

7 Jul 2009 - 6:01 am | नंदन

भागवत सरांचा परिचय चांगला करून दिला आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

7 Jul 2009 - 6:40 am | धनंजय

ओळख चांगली झाली आहे.

*आणि हो - आईशप्पथ सांगतो हा -* पूर्वीची बाळपंडिती भाषा सोडून स्वतःची खरी अशी शैली शोधणार्‍या लेखकाचे कौतुक करावे तितके थोडके.

सहज's picture

7 Jul 2009 - 7:12 am | सहज

विनायक, तुझ्या भागवतसरांना जरुर दाखव.

दिपक's picture

7 Jul 2009 - 9:19 am | दिपक

भागवत सरांची छान ओळख आवडली :)

विनायक पाचलग's picture

7 Jul 2009 - 8:42 pm | विनायक पाचलग

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार
सराना लेख देणार आहे. बघु कधी देइन ते.
(धनंजय्,शैली बदलायचा प्रयत्न करतोय,पण ती आवडत आहे की नाही ते समजत नाही आहे.)

स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......

विनायक पाचलग

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jul 2009 - 9:40 pm | बिपिन कार्यकर्ते

विन्या, मस्तच लेख रे. तुझ्यातला बदल सुखावह दिशेने जात आहे. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूजनांना छान आदरांजली रे.

लिहित रहा.

बिपिन कार्यकर्ते

मिहिर's picture

7 Jul 2009 - 10:13 pm | मिहिर

लेख छानच झाला आहे. =D>
पण ५वीत तर भागवत सर आमच्या शाळेत होते (तवनाप्पा पाटणे हायस्कूल). तुमच्या वर्गात ते ऑफ लेक्चरला कसे आले? :?