ढाई अक्षर प्रेम के

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
27 May 2009 - 6:45 am

तुम्हाला नातेसंबंधांचा अभ्यास करायचा आहे का? असेल तर हा चित्रपट जरूर पाहा. कारण डीव्हीडी वरील माहितीनुसार "It's a study in relationships..."! त्याआधी स्त्री स्वातंत्र्याचे काही पैलू पाहूनच आपण थक्क होतो. मुलीला 'हायस्कूल' नंतर लग्नाच्या मागे लावणारे आधुनिक विचारांचे पुरूष तर नेहमीच असतात, पण येथे एक सोडून दोन स्वतंत्र विचारांच्या आणि स्वत:बद्दल आत्मविश्वास असलेल्या नायिका यात आहेत. एक स्वत:च्या आई वडिलांना आपले लग्न झाले आहे का नाही ते ठामपणे सांगू शकत नाही, दुसरी तर स्पष्टपणे 'हम लडकिया पेड के बेल की तरह होती है, हम को सहारे की जरूरत होती है, जो भी सहारा दे उसे थाम लेती है" वगैरे सांगते. समस्त स्त्री मुक्ती संघटनांना अध्यक्षा शोधायची गरजच नाही!

बडजात्या व चोप्रा लोकांनी एकत्र येऊन हा पिक्चर काढला आहे का असे वाटावे इतके साम्य आहे (दिग्द. राज कंवर): मुख्य कुटुंबाच्या घरी सदा पडिक असणारे नातेवाईक बडजात्याकडून तर रागीट बाप अमरीश पुरी, प्रेमळ आणि सगळे जिचा आदर करतात अशी 'बिजी' सुषमा सेठ आणि नुसते कोणी आपल्या घरी निघाला की लगेच बहरणारी ती पिवळ्या फुलांची शेते यश/आदित्य चोप्राकडून मागवलेली असावीत. प्रत्येक सीन मधे एवढे लोक की कोण कोणाचा कोण ते कधीच कळत नाही. परत नुसते घर नाही, एकदम "करोडों की जायदाद". त्यात ती एक 'यादे' मधली ती रशियन मुलीचा रोल केलेली पण आहे ('मोनिश्का' बहुतेक), ती तर त्या घरातील सून आहे की मुलगी हे शेवटपर्यंत कळत नाही. सून असेल तर ऐश्वर्या ने घातलेल्या कपड्यांबद्दल तसेच न घातलेल्या दागिन्यांबद्दल बोलताना हिचा अवतार कोणालाच दिसत नाही. जर मुलगी असेल तर "जायदाद" ची वारस एकदम ऐश्वर्या कशी?

तुम्ही "Walk In the Clouds" बघितला असेल तर पुढे काय होईल याची तुम्हाला कल्पना येईल पण ते कशा पद्धतीने होईल याची किंचितही आयडिया नसेल. शहरात कॉलेज मधे शिकायला आलेली असली तरी ही शेवटी 'चोप्रा-सर्टिफाईड' फ्यामिलीमधली 'बडजात्या-सर्टिफाईड' सुसंस्कृत मुलगी! तिच्या घरचे लग्न ठरवत असताना चुकून रागात 'मग तू काय ऑलरेडी लग्न केले आहेस काय?' या प्रश्नाला 'हो केले आहे' म्हणते आणि तिकडे स्फोट होतो. आता करोडोंकी जायदाद मधे पुन्हा फोन करून किंवा मुलीला प्रत्यक्षात भेटून शहानिशा करणे शक्य नसल्याने सगळे 'हमको कहीं का नही छोडा' छाप संवाद म्हणत राहतात. एवढ्या प्रेमळ वगैरे कुटुंबातील इतरांचे सोडा, तिच्या आई ला सुद्धा कुतूहल नाही की मुलीने लग्न केलेच आहे तर कोण आहे नवरा, काय करतो ते जरा बघून यावे.

आता अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडणे शक्य नसल्याने ती थेट आत्महत्या करायला निघते, पण आत्महत्या आपण जिवंत राहिलो तरच करता येईल हे माहीत असल्याने काही खूनी लोक तिच्या मागे लागतात तेव्हा मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पळते. तेथे तिला अभिषेक भेटतो. मग पुढे ते आपापल्या मार्गाने जातात, पण नंतर याची गाडी जेथे बंद पडते तेथेच बरोबर ती उभी असते जीव द्यायला एक चांगला धबधबा बघून. तिला वाचवायच्या प्रयत्नात दोघेही खाली पडतात. मग खाली पडून जेथे पाण्यातून बाहेर निघतात तेथे धबधब्यात पडायच्या आधी वरती यांच्या राहिलेल्या बॅगासुद्धा आपोआप आलेल्या असतात!

मग ते तिच्या घरी येतात. तेथे इतके दिवस राहून सुद्धा ऐश्वर्याला कोणालाही सांगता येत नाही की तिचे खरे लग्न झालेले नाही. आता प्रत्येक प्रसंगातच सगळे असले तर कसे सांगणार. इतक्या दिवसांनंतर आणि लग्न करून घरी आलेली मुलगी आपल्या आई किंवा वडिलांशी सविस्तर बोलू शकत नाही. कारण कोणालाही 'माझे लग्न झालेले नाही, तुमचा ऐकण्यात गोंधळ झालाय' असे धाडकन कसे सांगणार? मग त्यासंबंधी प्रस्तावना करणारी वाक्ये आधी टाकावी लागतात "उसका और मेरा रिश्ता ऐसा नही है", "आप जो समझ रहे है वैसा नही है" आणि मग ते वाक्य पुरे न करू देता त्यातून भलता अर्थ काढणारे नातेवाईक असले की केवढा मोठा प्रॉब्लेम! त्यामुळे करवा चौथ पासून ते "जावयाला कुटुंबात सामावून घेण्या आधी आणि इस्टेट चे कागदपत्र देण्या आधी" करतात ती पूजा (चोप्रा व बडजात्या यांच्याकडे अशी पूजा असावी) असे अनेक प्रसंग आले तरी ते खरे नवरा बायको असल्यासारखे पार पाडावे लागतात.

त्या जायदाद ची तर पुढच्या ४-५ पिढ्यांसाठी व्यवस्था आधीच लावली असावी. एकतर ती 'बिजी' आणि ऐश्वर्याचे आई वडील जिवंत असताना (आणि एक ती थोरली बहीण सुद्धा असताना) 'इकलौती वारिस' ऐश्वर्या हे जाहीर असते. तसेच यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट सुद्धा न बघता जावयाला सगळी इस्टेट देण्याची यांना खूपच घाई झालेली असते. बाकी पडीक लोक ही काही हरकत घेत नाहीत. पण एकूण ते जायदाद चे कागद दर १०-१५ मिनीटानी कोणीतरी कोणाच्यातरी नावाने करत असतात.

पण अभिषेक चे प्रेम अजून शाबूत असते, सोनाली बेन्द्रेवरचे. तो सोनाली कडे परत येतो, पण ती त्याला सरप्राईज काय देते तर त्यांच्या आणखी एका मित्राशी तिचे लग्न झालेले असते! कधीतरी अभिषेक येईल आणि त्याला सरप्राईज देऊ म्हणून ती लग्न झाल्यावर सुद्धा स्वत:च्याच घरात राहते आणि मंगळसूत्र, अंगठी वगैरे घालत नसते त्यामुळे तिला भेटल्यावर सुद्धा अभिषेक ला कळत नाही. मग जेव्हा सरप्राईज उघड होते तेव्हा त्याचा दु:खी चेहरा पाहून तिलाही कळते. पण त्यानंतर अर्ध्या सेकंदात ती त्याला म्हणते की "मला प्रॉमिस कर की पुन्हा कोणावर प्रेम बसले तर लगेच सांगशील". नशीब अभिषेक तिला म्हणत नाही की "आणि तू मला प्रॉमिस कर की पुन्हा लग्न करायच्या आधी तुझ्या सगळ्या 'फक्त-दोस्तां'कडे एकदा चेक करशील"

आता अभिषेक पुन्हा ऐश्वर्याकडे परत येतो. मधल्या काळात सर्व उघडकीला आलेले असते त्यामुळे अमरीश पुरी बंदूक घेऊन तयारच असतो. तो त्याला सांगतो की तिचे लग्न ठरले आहे. येथे मुंबईच्या कोणत्याही स्टेशन वर दोन्ही लोकल लागलेल्या असताना फास्ट लोकल ने लौकर जाऊ म्हणून तिकडे जाताना ती सुटली व पुन्हा जिना धावतपळत चढून उतरताना स्लो ही सुटली की होतो तसा चेहरा अभिषेक चा होतो.

मूळ चित्रपटात ती हीरॉइन प्रेग्नंट असते त्यामुळे हे नाटक करते. येथे संस्कृती बंबाळ चित्रपटात जेथे लग्नानंतर प्रेग्नंट व्हायची मारामार तेथे लग्नाआधी चान्सच नाही. येथे तसे काही नसले तरीही अमरीश पुरीने आक्रमक होणे व बाकीच्यांनी फक्त रागाने बघणे व एखाद्या अनुपम खेर ने समजून घेणे वगैरे रीतसर प्रकार घडतात. त्यात घर एवढे मोठे की अमरीश पुरीचे ओरडणे व दर वाक्यानंतर मारलेली चपराक, तसेच इतरांचे रागाने बोलणे आत असलेल्या ऐश्वर्याला ऐकू येत नाही. पण बाहेर अभिषेक आला आहे हे कोणी सांगितल्यावर मात्र ती नुसती मान वळवते तर तो तिला दिसतो. मग ती तिकडे जायला निघते तर एकदम मधे एक वाळवंट लागते. एक मिनीट मला वाटले की काही लोकांकडे आवारात स्विमिंग पूल असतात तसे यांच्याकडे स्वत:चे वाळवंट आहे की काय, पण ते एक मधेच उपटलेले आणि त्या प्रसंगाशी काहीही संबंध नसलेले गाणे निघाले.

शेवटी व्हिलन येतात, तिचा होउ घातलेला नवरा हाच आधी तिने पाहिलेला खूनी निघतो, मग त्यांचे लग्न जबरदस्तीने लावले जात असताना व अमरीश पुरी च्या फॅक्टरीला आग लावली असताना तो व अभिषेक एका थीम पार्क च्या वाटणार्‍या पाईप मधून खाली जातात (तो जाळ ही वरून खाली त्यांच्या मागे जातो) व सर्व काही ठीक करतात.

कलाकारही महान आहेत. अभिषेक चा माफ़क दाढी व मिशावाला 'इंटेन्स' लूक नसल्याने तो पूर्वी मासिकात बघितलेल्या अमिताभच्या कौटुंबिक फोटोतील अभिषेक प्रमाणे दिसतो. ऐश्वर्या चा चेहरा कायम प्रेमाने कष्टी झाल्यासारखा आहे. तर काही गाण्यात एवढे दागिने आहेत की पूर्वीच्या पिक्चर्स मधे भारतमाता दाखवायला कोणालातरी दिसेल तेथे दागिने घालून उभे करत तसे दिसते. सोनाली बेंद्रे चा तो सरप्राईज वाला महान शॉट सोडला तर इतर वेळी तिची ती पूर्वी थिएटर्स मधे दिसणारी निरमा का कसलीतरी जाहिरात दाखवली असती तरी चालले असते. ती 'बिजी' तर लहान मुले त्यावर घसरगुंडी खेळू शकतील एवढ्या मोठ्या उंच टाचेच्या चपला घलून घरात का फिरते कळत नाही. बाकी पूजा वगैरे चालू असताना सगळे घरात चपला घालून फिरत असतात. अनुपम खेर एवढा मनमिळावू की अभिषेक ऐश्वर्या ला सोडून जायला निघतो तेव्हा त्याला त्याचे तिच्यावर प्रेम आहे आणि तो दाखवत नाहीये याचीच काळजी. शक्ती कपूर चे बायकांचे ड्रेस घालून नाचणे, शारिरीक व्यंग असलेल्यांची नक्कल वगैरे दर्जेदार विनोद आहेत.

डायरेक्शन सुद्धा सर्वसामान्यपणे आपण ज्याला 'डायरेक्शन' म्हणतो अशा शॉट्स ने भरलेले आहे. म्हणजे 'मेरे सामने खुला आकाश था' असे ऐश्वर्या म्हणताना बॅकग्राउंड ला मोकळे आकाश, तर तिच्या मनात जरा वादळ उठू लागले की लगेच त्यांच्या जीप वर पाऊस व आजूबाजूने झाडांच्या फांद्या पडायला सुरूवात! आधीच्या त्या संवादात फक्त ते दोघेच असताना अभिषेक म्हणतो की 'मै पिंजडे मे बंद होना चाहता हू', लगेच एक पिंजर्‍यात काही पक्षी ठेवलेला माणूस त्यांच्या मागे येतो आणि दोन मिनीटांनी तेथून जातो, यांना पक्षी हवेत का वगैरे काही न विचारता. तो कोठून आला? माहीत नाही, कदाचित 'डायरेक्शन' मधे हे विचारायचे नसते!

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

27 May 2009 - 9:26 am | भडकमकर मास्तर

या सिनेमासाठी टंकायचे खूप कष्ट घेतलेत...
पण छान लेख आहे..
मज्जा आली...

विशेष्तः दिग्दर्शनाचे वर्णन बहारदार आहे... वादळ्,पिंजडा,आकाश वगैरे .. मस्तच...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

सुहास's picture

28 May 2009 - 6:48 am | सुहास

या सिनेमासाठी टंकायचे खूप कष्ट घेतलेत...

त्यापेक्षा जास्त कष्ट सिनेमा पूर्ण बघताना घेतले असतील... नंतर या सिनेमाचे दुष्परिणाम विसरण्यासाठी त्यापेक्षा जास्त कष्ट पडले असतील, नाही?

--सुहास

छोटा डॉन's picture

27 May 2009 - 9:34 am | छोटा डॉन

मजेशीर लेख आहे.
बरीच निरीक्षणे अचुक आहेत, आवडली. अनेक ठिकाणी चपखल कमेंट्समुले हसु फुटले.

येऊ द्या असेच अजुन, पुलेशु.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

सुबक ठेंगणी's picture

27 May 2009 - 10:01 am | सुबक ठेंगणी

'ढाई अक्षर प्रेम के' विषयी अतिशय अखोल (अचपळ म्हणजे खूप चपळ तसेच अखोल म्हणजे खूप खोल) अशा टीकेमुळे माझ्यासारख्या
रसिकतेचा अभाव (इथे अभाव म्हनजे खूप भाव नई काई :P )असलेल्यांची पिक्चर न पहाताच भारी करमणूक झाली.
म्हणून तुम्हाला प्रतिसादाची 'उ त्त म' ही साडेतीन अक्षरे बहाल करण्यात येत आहेत ;)

विशाल कुलकर्णी's picture

27 May 2009 - 11:45 am | विशाल कुलकर्णी

च्यायला. एवढा छान आहे हा पिक्चर बघायला पाहिजे पुन्हा. मागच्यावेळी मुर्खासारखा झोपुनच गेलो मी. >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री श्री केशवसुमारजी...)

परिकथेतील राजकुमार's picture

27 May 2009 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

मालक आपल्या व्यासंगाला सलाम ___/\___

हा चित्रपट फुकटात सुद्धा पाहवला नाही हो. ऐश्वर्याच्या मागे गुंड लागलेले बघितल्या बरूब्बर ऐश्वर्या पळाली नसेल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही थेटर बाहेर धाव घेतली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मुक्तसुनीत's picture

28 May 2009 - 7:55 am | मुक्तसुनीत

गाभ्रीचा पाऊस बद्दलचे उत्कृष्ट परीक्षण लिहिणारे तुम्हीच ना ? :-)

मला तुमचा हा लेख आवडलाच. पण हा चित्रपट सुमारे सव्वा मिनिट पाहिल्यानंतर तुम्हाला बंद का करावासा वाटला नाही, हा माझ्यामते मिलियन डॉलर प्रश्न आहे. असले चित्रपट मी बघण्याचा विचारच आधी करत नाही. पहायला सुरवात केल्यानंतर सुमारे दिड मिनिटात हे किती सडलेले असेल याची कल्पना येते. मग ते बंद करावे किंवा त्यातून उठून जावे. खेळ खल्लास :-)

भाग्यश्री's picture

28 May 2009 - 1:50 pm | भाग्यश्री

फारेंड इज फेमस फॉर रायटींग रिव्ह्युज ऑन (चिरफाडींग) सच मुव्हीज! :))

हा तुझा लेख म्हणजे माझा बेस्ट स्ट्रेसबस्टर असतो! नेहेमी काढून वाचते मी! :)
ओम जय जगदीशही येऊदे.. :)

www.bhagyashree.co.cc

क्रान्ति's picture

28 May 2009 - 8:04 am | क्रान्ति

मस्तच परीक्षण! बरं झालं, इतका महान चित्रपट पहायचे कष्ट घेतले नाहीत! तसेही बडजात्या, चोप्रा इ. इ. कंपनी आजकाल जाम डोक्यात जाते!
=)) ती 'बिजी' तर लहान मुले त्यावर घसरगुंडी खेळू शकतील एवढ्या मोठ्या उंच टाचेच्या चपला घलून घरात का फिरते कळत नाही. ही टिप्पणी वाचून मी आणि माझी लेक अजूनही हसत सुटलोय! =))
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

अनामिक's picture

28 May 2009 - 8:48 am | अनामिक

काय मस्तं लिहिलं आहे... मजा आली वाचून!
या चित्रपटाची कथा ऐश्वर्या रायच्या आईने लिहिली आहे म्हणे!

-अनामिक

मस्त कलंदर's picture

28 May 2009 - 1:21 pm | मस्त कलंदर

असंच कुणी "कभी अलविदा.." किंवा "नो स्मोकींग" वरती ही लिहा..
"कभी अलविदा.." एक मैत्रिणीच्या शाहरूख पंखेगिरीमुळे थेटरात जाऊन पाहिला..पहिल्या अर्ध्या तासातच काय रद्द्ड.. भिकार...आहे ते कळाले.. पण इलाज नव्हता.. शेवटच्या एका तासात सिनेमा संपला असं वाटलं.. उठलोही होतो(मोठठा नि:श्वास टकून).. पण तोवर पुन्हा पाटी आली.. "तीन साल बाद" नि तो छ्ळ पुन्हा लांबला.. :((

नो स्मोकींग मध्ये काय होते याचा थांगपता शेवट्पर्यंत नाही लागला... :T

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अवांतरः "९९" थोडा हटके आहे.. शेवट्पर्यंत कंटाळा नाही आला.. एकूण प्रकरण मूळ हिंदी वाटलं नाही.. पण कशाचा रिमेक आहे माहीत नाही..!!

निखिलचं शाईपेन's picture

29 May 2009 - 9:05 am | निखिलचं शाईपेन

--पण त्यानंतर अर्ध्या सेकंदात ती त्याला म्हणते की "मला प्रॉमिस कर की पुन्हा कोणावर प्रेम बसले तर लगेच सांगशील". नशीब अभिषेक तिला म्हणत नाही की "आणि तू मला प्रॉमिस कर की पुन्हा लग्न करायच्या आधी तुझ्या सगळ्या 'फक्त-दोस्तां'कडे एकदा चेक करशील"
--आता अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडणे शक्य नसल्याने ती थेट आत्महत्या करायला निघते, पण आत्महत्या आपण जिवंत राहिलो तरच करता येईल हे माहीत असल्याने काही खूनी लोक तिच्या मागे लागतात तेव्हा मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पळते.

आरे धिंगाणा घातलायस अक्षरशः ....
फारच छान..

-निखिल

केदार_जपान's picture

6 Jul 2009 - 7:22 am | केदार_जपान

पूर्वी मासिकात बघितलेल्या अमिताभच्या कौटुंबिक फोटोतील अभिषेक प्रमाणे दिसतो. >>>>>
=D> =D> =D>

सुहास..'s picture

1 Mar 2011 - 8:36 pm | सुहास..

हा हा हा हा !!

झकास मालक !! अजुन येऊ द्या त

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Mar 2011 - 9:31 pm | निनाद मुक्काम प...

मस्त

इंटरनेटस्नेही's picture

12 May 2011 - 4:48 am | इंटरनेटस्नेही

मस्त!

राजेश घासकडवी's picture

12 May 2011 - 5:42 am | राजेश घासकडवी

पण आत्महत्या आपण जिवंत राहिलो तरच करता येईल हे माहीत असल्याने काही खूनी लोक तिच्या मागे लागतात तेव्हा मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पळते.

मग खाली पडून जेथे पाण्यातून बाहेर निघतात तेथे धबधब्यात पडायच्या आधी वरती यांच्या राहिलेल्या बॅगासुद्धा आपोआप आलेल्या असतात!

अशा निरीक्षणांनी मजा आली...

तो सोनाली कडे परत येतो, पण ती त्याला सरप्राईज काय देते तर त्यांच्या आणखी एका मित्राशी तिचे लग्न झालेले असते!

हिंदी सिनेमे बहुतेक सेलफोन, फेसबुक, इंटरनेट, गूगल चॅट वगैरे गोष्टी नसल्यासारखे केले जातात हे एक वेळ समजू शकतो - त्या गोष्टींचा शोध नुकताच लागला आहे. पण सामान्य कुतुहल व कॉमन सेन्सचं काय? त्यांचा शोध बऱ्याच पूर्वी लागला होता असा माझा समज आहे...

नरेशकुमार's picture

12 May 2011 - 5:54 am | नरेशकुमार

हसुन हसुन पोट दुख्या.
कुठे मिळेल कुठे हा अल्टिमेट मुव्ही !
टोरंट लावला पायजे.

आत्मशून्य's picture

12 May 2011 - 9:55 am | आत्मशून्य

या आधी वाटलं न्हवत ढाई अक्षर प्रेम के वर एखादा लेख मी संपूर्ण वाचू शकेन ;)

बाकी "Walk In the Clouds" हा मीड नाईंटींज ते अर्ली ट्वेन्टीथ च्या दशकातील सर्व यशराज फील्म्स चा बाप आहे. फरक इतकाच की त्यांचा टेक्सास मधील शेतकर्‍याचा तडका यांनी पंजाबी ढंगात बदलला .. बाकी सगळ तेच.... एकत्र कूटूम्ब ... फॅमीली वॅल्यूज.. वढीलधार्‍यांचे मान पान व त्यातून तरूण पीढीची/स्त्रीयांची होणारी घूसमट (?).... अमेरीकेबद्दल थोडीशी आढी.... मूलांवर संस्कार... टीपीकल .. डीडीएल्जे स्टाइल प्रेम ..... वगैरे वगैरे वगैरे........ पण आजही कीनू रीवज आणी त्या हीरॉइन ची केमीस्ट्री बघायला आवडते....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 May 2011 - 10:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कहर आहे हे परिक्षणही! हे वाचायचं कसं काय राहिलं बुवा?

सोनाली बेंद्रे असलेला पिक्चरचा थोडा भाग मी पाहिला होता. तेव्हा ते काही न झेपल्यामुळे बंद केल्याचंही आठवत आहे. तुम्ही वेळेत का नाही हो अशी मापं काढत, असल्या पिच्चरांची! करमणूकही होईल.

रंगीला रतन's picture

13 Dec 2021 - 4:16 pm | रंगीला रतन

ती 'बिजी' तर लहान मुले त्यावर घसरगुंडी खेळू शकतील एवढ्या मोठ्या उंच टाचेच्या चपला घलून घरात का फिरते कळत नाही.
खल्लास :=)
बरं झालं हा पिक्चर बघितला नाही, मायला एवढा भंगार असेल वाटलं नव्हत.

आंबट गोड's picture

10 Jan 2022 - 11:38 am | आंबट गोड

खूपच मस्त! :-) हसुन हसून पोट दुखायचे बाकी आहे.
पण आत्महत्या आपण जिवंत राहिलो तरच करता येईल हे माहीत असल्याने काही खूनी लोक तिच्या मागे लागतात तेव्हा मात्र स्वत:ला वाचवण्यासाठी पळते.

मग खाली पडून जेथे पाण्यातून बाहेर निघतात तेथे धबधब्यात पडायच्या आधी वरती यांच्या राहिलेल्या बॅगासुद्धा आपोआप आलेल्या असतात!

अशा निरीक्षणांनी मजा आली...

तो सोनाली कडे परत येतो, पण ती त्याला सरप्राईज काय देते तर त्यांच्या आणखी एका मित्राशी तिचे लग्न झालेले असते! >>>१
खूपच भारी.
हल्ली असले सिनेमे नाही निघत का?