गाभ्रीचा पाऊस - परीक्षण

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
5 May 2009 - 11:32 am

गाभ्रीचा पाऊस हे नाव थोडेफार ऐकले होते. कोणत्यातरी महोत्सवात दाखवला होता आणि कदाचित पारितोषिक ही मिळाले म्हणून. पुण्यात होतो तेव्हा लागला नव्हता आणि कोठे परीक्षण ही वाचले नाही.
मग येथे अमेरिकेत लॉस एन्जेलिस आणि नंतर बे एरियात याचे शो झाले. त्याबरोबर निर्माते प्रशांत पेठे ('वळू' सुद्धा यांचाच) आणि लेखक्-दिग्दर्शक सतीश मन्वार (उच्चार नीट माहीत नाही) हे ही आले होते. मी बे एरियात सॅन होजे ला दाखवला येथील 'कला' या संस्थेने, तेव्हा बघितला.

चांगला चित्रपट आहे, बघण्यासारखा. कथेचा मुख्य भाग हा की आजूबाजूला शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आपल्याला ही असलेल्या कर्जामुळे आपला नवरा (गिरीश कुलकर्णी) ही तसे करेल या भीतीने सोनाली कुलकर्णी ते रोखायचा शक्य तो प्रयत्न करते. हे दाखवताना तेथील शेतकर्‍याच्या दैनंदिन जीवनात येणार्‍या अडचणींचे चित्रण आहे. अमरावती जवळ 'जळू' या गावात याचे चित्रीकरण झाले आहे. बाकी भाग तुम्ही बघावा म्हणून जास्त लिहीत नाही.

कामे सगळ्यांचीच मस्त झाली आहेत, पण मला त्या वीणा जामकर चे सगळ्यात आवडले. अगदी अस्सल वाटते ती. वळू मधे पण तिचे काम आवडले होते ("तानी"). गिरीश कुलकर्णी चा यातील रोल वळू मधील जीवन पेक्षा पार दुसर्‍या टोकाचा आहे. सोनाली कुलकर्णी आणि ज्योती सुभाष यांचे पण काम चांगले आहे. त्या मुलाच्या कामाचे कौतुक प्रेक्षकांनी ही केले पण मला असे वाटले की त्याला काही करून दाखवता येइल असे शॉट्सच नाहीत (जसे 'टिंग्या' त आहेत). पटकथा लिहीताना त्या परिसरातील भाषा वापरली असली तरी संदर्भावरून कोणालाही सहज समजतील असे संवाद आहेत. आणि मुळात क्लिष्ट भाषा टाळलेली आहे. वातावरण ही फार गंभीर किंवा सतत दु:खी ठेवलेले नाही. विनोद हलकेफुलके आणि कोणत्याही प्रसंगात त्यातील लोकांच्या नैसर्गिक वागण्याने आपोआप निर्माण होणारे, पण मूळ समस्येची जाणीव बघणार्‍याच्या डोक्यातून न जाउ देणारे (पुन्हा याच निर्मात्याचा 'वळू' सारखा आठवतो. त्यातही असे नैसर्गिक रीत्या आलेले विनोद बरेच होते, पण ते इतर पाचकळ विनोदात लपून गेले असे मला वाटले).

अमेरिकेत अजून एवढ्यात याचे शो नाहीत पण कोणत्या स्थानिक मराठी संस्थेने आणला तर जरूर बघा. भारतात अजून प्रदर्शित झाला नाही. (निर्मात्याकडून कळालेले) कारण - कोणत्याही वितरकाला हा चित्रपट नफा मिळवून देइल असे वाटत नाही. कदाचित त्या परिसरातील वितरकांना सुद्धा!

चित्रपटा आधी आणि नंतर प्रशांत पेठे आणि सतिश मन्वार यांच्या बोलण्यातून असे जाणवले की त्यांचा आग्रह लोकांनी याकडे प्रथम एक कलाकृती म्हणून बघावे असा आहे. म्हणजे मूळ समस्या गंभीर आहे आणि तीच दाखवण्यासाठी चित्रपट काढलेला आहे, पण यांचे काम प्रामुख्याने चित्रपटासंबंधी असल्याने (प्रेक्षक नंतर विचारत असलेल्या) बर्‍याच प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे लगेच तयार नाहीत. म्हणजे कोणती संस्था अशा शेतकर्‍यांना मदत करते काय वगैरे. कदाचित हा चित्रपट या गोष्टी घडवायला मदत करेल.

पण आता एकदा हा चित्रपट काढल्यावर आणि त्याच्या बरोबर अशा मुलाखती दिल्यावर या दोघांवर आपोआपच जबाबदारी येते - या पीडित लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची. त्या बाबतीत मात्र या दोघांनी अजून बरीच तयारी करणे आवश्यक आहे असे वाटले -प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकून तसा समज होतो. म्हणजे 'दोन भारत आहेत', किंवा 'यावरचे उपाय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा हाताबाहेरचे आहेत' वगैरे. अशा प्रश्नांची अपेक्षा करून त्यावर स्वतःचे ठाम विचार असणे आणि ते नीट सांगता येणे या गोष्टी जमल्या तर ते चित्रपटाच्याच नाही तर या पीडित लोकांच्या सुद्धा कदाचित फायद्याचे होईल.

पण फक्त चित्रपट म्हणून पाहायचे झाले तर एका गोष्टीत निराशा झाली ती म्हणजे आपण सर्वसाधारण माहितीवर हा चित्रपट बघायला जातो - शेतकर्‍यांची परिस्थिती वाईट आहे, कर्ज वाढत चालले आहे आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे (किंवा सतत काही ना काही कारणामुळे त्यात वापरला जाणारा पैसा, वेळ आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचा मेळ न जमल्याने) त्यातून मार्ग निघत नाही म्हणून काही शेतकरी आत्महत्या करत आहेत - पण चित्रपट बघितल्या नंतर फार काही नवीन माहिती मिळाली असे वाटत नाही. इतक्या वाईट गोष्टी इतके दिवस चालू दिल्या जातात कारण त्यात कोणाचा तरी फायदा होत असतो (सावकार, राजकारणी) किंवा त्या बंद होण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्यात कोणाचा वैयक्तिक किंवा राजकीय फायदा नसतो. कोणत्याही अन्यायामागे ती परिस्थिती सुधारू नये म्हणून प्रयत्न करणारी एक सिस्टीम असते याचे चित्रण बघायला मिळत नाही. त्याच परिसरात वाढलेल्या लेखक्-दिग्दर्शकाकडून ती अपेक्षा होती.

आणि दुसरे म्हणजे अशा समस्यांचे अनेक बाजूने एखादा चित्रपट चित्रण करतो तेव्हा आधी केवळ बातमी ऐकल्यावर तुटपुंज्या माहितीवर आपली अफाट मते वा उपाय त्यावर चालतील असे मानणार्‍या लोकांना 'आपण समजतो तेवढे हे सोपे नाही' हे जाणवते. तसे सर्व बाजूनी ती समस्या हा चित्रपट उलगडून दाखवतो असे वाटत नाही. पण मराठीत आधी असे चित्रपट फारसे निघत नाहीत, त्यातून कोणी प्रयत्न केलाच तर एकदम तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचे समाधान करणारा असावा अशी अपेक्षा चूक आहे, हे ही मान्य.

बाकी किरकोळ प्रश्न आहेत - म्हणजे अमरावती हून पार नागपूर पर्यंत बियाणे आणायला कशाला जावे लागते, तेथे जवळच मिळत नाही का वगैरे. एक दोनच शॉट शहरातील आहेत - एक चक्क पुण्यातील नळस्टॉप चा आहे बहुधा. पण या क्षुल्लक गोष्टी आहेत.

एकूण फार प्रचंड अपेक्षेने जाउ नका, पण जरूर बघा. इतर काही नाही तरी आपल्याच महाराष्ट्रात आणि आपल्याच लोकांना भेडसावत असलेल्या एवढ्या मोठ्या समस्येबद्दल तास दोन तास विचार करण्यासाठी आणि तो तसा केला तर पुढेमागे आपल्याकडून काही मदत होउ शकेल यासाठीतरी.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

5 May 2009 - 5:52 pm | मुक्तसुनीत

फारएंड ,
तुमचे परीक्षण मनापासून आवडले. प्रस्तुत चित्रपटच नव्हे , तर एकंदरच मराठी चित्रपट, कुठलीही मराठी कलाकृती, कुठलीही कलाकृती ... या सार्‍याकडे पहाण्याचा एक नितळ , समतोल , सम्यक् असा दृष्टीकोन तुमच्या लिखाणात जाणवला. तुमचे हे परीक्षण मन्वर यांनीच नव्हे , तर ज्याला चांगले काम करायचे आहे अशा कुठल्याही व्यक्तीने वाचावे असे झालेले आहे. चित्रपटाच्या कथानकाचा मोघमच उल्लेख, एकंदर चित्रकृतीच्या अनुभवाचा लेखाजोखा, बारीक तपशील टिपण्याची वृत्ती परंतु त्यातील त्रुटींना अवास्तव महत्त्व न देण्याची मॅचुरिटी... चांगल्या चित्रपटांना दाद देताना त्यांच्या अंगभूत आणि अपरिहार्य मर्यादांची ठेवलेली जाणीव.... कितीतरी मुद्दे असे आहेत या लेखात की ज्याला दाद द्यावी.

तुमचे हे परीक्षण पहिल्या प्रतीचे झालेले आहे. ते मी "कला"च्या निर्मात्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्राजु's picture

5 May 2009 - 8:18 pm | प्राजु

परिपूरण परिक्षण आहे हे. खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

5 May 2009 - 6:06 pm | यशोधरा

अमोल, सुरेख लिहिलेस. आवडले.

श्रावण मोडक's picture

5 May 2009 - 6:08 pm | श्रावण मोडक

अमरावतीहून बियाणे आणायला नागपूरपर्यंत जावे लागतेच असे नाही हे नक्की. पण तशाही वेळा येतात. पार सांगलीहून पुण्यालाही लोक येतात बियाणे घेण्यासाठी हे पाहिलंय.
सतीश मन्वर असा उच्चार आहे. चु.भू.दे.घे.

अनामिक's picture

5 May 2009 - 6:16 pm | अनामिक

परिक्षण मस्तं झालंय... मिळाला तर नक्की बघणार चित्रपट.

-अनामिक

संदीप चित्रे's picture

5 May 2009 - 6:59 pm | संदीप चित्रे

अमोल...
अगदी संतुलीत लिहिले आहेस असं दिसतंय.
परवाच मला कुणीतरी हा सिनेमा बघायला सांगितलं.
माझ्या माहितीप्रमाणे बीएमएमला चित्रपट महोत्सवात बहुतेक हा चित्रपट असेल.
(अवांतरः कधीपासून बीएमएमबद्दल लिहायचं राहतंच आहे !)

यन्ना _रास्कला's picture

5 May 2009 - 8:34 pm | यन्ना _रास्कला

जरूर बघा.

त पाहु. पन खर त आपन मराठी पिक्चर पाहात नाय. साला बर्रा नाय निंगाला त पेशे फुकट.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

भाग्यश्री's picture

5 May 2009 - 11:05 pm | भाग्यश्री

सही लिहीलंयस फारेंड.. पाहीन पिक्चर नक्की!
(आणि वळू इतक्या अपेक्षेने नाही पाहणार! :) )

www.bhagyashree.co.cc

मेघना भुस्कुटे's picture

6 May 2009 - 3:29 pm | मेघना भुस्कुटे

खरंच वर सगळ्यांनी म्हंटलंय तसं अगदी समतोल राखून वगैरे नेमकं आणि छोटेखानी परीक्षण. मला नेहमी एक प्रश्न पडतो - कलाकृतीकडे बघताना सर्वंकष आशयाला महत्त्व द्यायचे की दोहोंना? की यांच्या समतोलाला? या परीक्षणात कसलाही आव न आणता दोन्हीचा ताळेबंद अचूक मांडला आहे. धन्यवाद.

शलाका's picture

8 May 2009 - 7:51 am | शलाका

असेच म्हणते. छान परिक्षण..

अवांतर : इतक्या छान परिक्षणाला इतके कमी प्रतिसाद आणि गोळी कोन्ची खावी किंवा छपरी समुपदेशन ह्यांना इतके प्रतिसाद? मिपा थोडे जास्त थिल्लर होते आहे का?

-शलाका

फारएन्ड's picture

6 May 2009 - 10:46 pm | फारएन्ड

धन्यवाद लोकहो. येथे मला वाटले हा चित्रपट मूळ समस्येपासून वेगळा करून तसा विचार करणे अवघड आहे, म्हणून असे लिहीले.

साधकबाधक विचार करणारे परीक्षण आवडले. जमल्यास हा चित्रपट बघीन.

धन्यवाद, आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

नंदन's picture

8 May 2009 - 12:03 pm | नंदन

परीक्षण.

आणि दुसरे म्हणजे अशा समस्यांचे अनेक बाजूने एखादा चित्रपट चित्रण करतो तेव्हा आधी केवळ बातमी ऐकल्यावर तुटपुंज्या माहितीवर आपली अफाट मते वा उपाय त्यावर चालतील असे मानणार्‍या लोकांना 'आपण समजतो तेवढे हे सोपे नाही' हे जाणवते. तसे सर्व बाजूनी ती समस्या हा चित्रपट उलगडून दाखवतो असे वाटत नाही. पण मराठीत आधी असे चित्रपट फारसे निघत नाहीत, त्यातून कोणी प्रयत्न केलाच तर एकदम तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचे समाधान करणारा असावा अशी अपेक्षा चूक आहे, हे ही मान्य.
- सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

8 May 2009 - 3:02 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय उत्तम आणि चपखल परिक्षण. मला जे वाटले ते वर मुसुने बरेचसे लिहिलेच आहे. परिक्षणात मॅच्युरिटी / प्रगल्भता जाणवली.

आणि दुसरे म्हणजे अशा समस्यांचे अनेक बाजूने एखादा चित्रपट चित्रण करतो तेव्हा आधी केवळ बातमी ऐकल्यावर तुटपुंज्या माहितीवर आपली अफाट मते वा उपाय त्यावर चालतील असे मानणार्‍या लोकांना 'आपण समजतो तेवढे हे सोपे नाही' हे जाणवते. तसे सर्व बाजूनी ती समस्या हा चित्रपट उलगडून दाखवतो असे वाटत नाही.

सहमत. योग्य शब्दात मांडले आहे.

पण मराठीत आधी असे चित्रपट फारसे निघत नाहीत, त्यातून कोणी प्रयत्न केलाच तर एकदम तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वांचे समाधान करणारा असावा अशी अपेक्षा चूक आहे, हे ही मान्य.

क्वांटिटी ब्रीड्स क्वालिटी हे खरेच आहे. मात्र सर्वश्रेष्ठ असावा अशी किमान माझी तरी अपेक्षा राहिलच. अपेक्षाच नाही ठेवली तर प्रगती कशी होणार? अर्थात ती पूर्ण नाही झाली तरी मी निराश नाही होणार. आणि त्यात जे काही चांगले आहे त्याकडे दुर्लक्षपण नाही करणार.

बिपिन कार्यकर्ते

गणेशा's picture

9 Feb 2011 - 8:25 pm | गणेशा

मस्त लिहिले आहे