मौन

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जनातलं, मनातलं
1 May 2009 - 7:26 pm

अगदी "कृतान्‍तकटकामलध्वजजरा दिसो लागली" या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो नसलो तरी, पोस्ट रिटायरमेन्‍ट उपक्रमांचे संकल्प सोडून आणि मोडूनही वयाची साठी उलटून गेली तसा मी त्या वयाला साजेसे कांही उपप्रकार (किंवा थेरं) करू लागलो. म्हणजे ज्येष्ठ नागरीक संघाचा सदस्य होणे, हास्यक्लबाचा सदस्य होणे, योगासनाच्या वर्गाला जाणे, गुरुवारी संध्याकाळी दोन पेढे घेऊन दत्त मंदिरात आरतीला जाणे, सार्वजनिक वाचनालयात जाऊन वर्तमानपत्रे नामक चुरगाळलेली रद्दी वाचणे, इत्यादि इत्यादि. या सर्वांत सातत्य असलेच पाहिजे असा कांही दंडक नसल्याने नव्याचे नऊ दिवस हा माझा मूळ पिंड मी कसोशीने जपला. योगासन वर्गाला मी तिसर्‍याच दिवशी रामराम ठोकला. ती कपालभाती केली की मिसळी बरोबर चार चार पाव हाणावे लागायचे. तरीही प्रभात फेरी, ज्याला जनरली मॉर्निंग वॉक असे म्हणतात, त्याला मात्र मी इमाने इतबारे जाऊ लागलो. याला कारणे दोन. एक तर तिथेही चार मित्र मिळवून एका कट्ट्यावर बसून वयाला साजेशा किंवा न साजेशा टवाळक्या करायाला मिळतात आणि दुसरे म्हणजे मग शेवटी घरी परतण्या आधी टपरीवरचा गरमागरम चहा. (चहाला गरमागरम भजी, वडा किंवा तत्सम कांही पदार्थाचे अनुपान दिले नाही तर मला चहा बाधतो).

परवा सकाळी हा असा मी प्रभात फेरीला निघालो पण मूड कांही जमून आलेला नव्हता कारण दाढ दुखीने आधीची रात्र जागवली होती. तसे शोरूमचे दात सोडले तर मागच्या गोडाऊनमधल्या बहुतेक दाढा जायबंदी झाल्या आहेत. संक्रांतीचा सुमारास नातवंडाना ऊस दाताने फोडून कसा खावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा शूरपणा अंगाशी, खरं म्हणजे दाढेशी बेतला होता. तेंव्हा पासून ती दाढ हलायाला लागली होती. ती काढून टाकावी असा सल्ला समस्त सुहृदांनी आणि हितचिन्‍तकांनी दिला होता. पण दंतवैद्य नामक दैत्याची माझ्या मनात प्रचंड भीति बसलेली होती. त्याला कारणही तसेंच होती. पस्तीस चाळीस वर्षांपुर्वी केवळ अपघाताने तुटलेला दात काढतांना एका दंतवैद्याने मला दिलेल्या मरण यातनांची मनांत दहशत बसलेली होती. पण आता नाईलाज झाला होता. म्हणून मी नित्याच्या प्रभात फेरीनंतर, आमच्या चांडाळ चौकडीपैकी कोणी तरी एखादा चांगला, कमीत कमी वेदना देणारा दंतवैद्य सुचवावा असा प्रस्ताव मांडला.

" टूथ ट्रबल? ओह्‌ जीझस्‌ क्राईस्ट! " रम्या बागल्या (मूळ नांव रमेश बागूल) फुस्सकला. हा अमेरिकेतल्या जांवयाकडे जाऊन आल्यापासून असाच बोलतो. साधं "अरे देवा"’ म्हणाला असता तर याचे फोरफादर्स काय नरकात पडले असते कां? रम्या एकदाच अमेरिकेला जाऊन आला तर अंतर्बाह्य इतका कां बदलला याचं मला पडलेलं कोडं आहे. रम्या आता आमच्या बरोबर वडा भजी खात नाही, आणि चहाही घेत नाही. चहा ऐवजी तो काळी कॉफी घेतो. तरी बरं, हाच प्राणी एकेकाळी भजनी मंडळात "हर्रीऽ मुके म्हनाऽ, हर्री मुकेऽऽ म्हनाऽऽ, पुन्न्याची गनऽना कोऽऽन करीऽऽऽऽ" म्हणत टाळ बडवीत असे. हा याचा इतिहास आहे. काळाच्या ओघात माणूस बदलतो हा निसर्गक्रम असेलही. तो बदल इतका असावा?

"आय् टेल यू वडुल्या (माझ्या आडनावाच्या अनेक अपभ्रंशापैकी हे एक),यु नो, स्टेट मध्ये डेंटिस्ट म्हणजे, ओह् गॉश, दे लिक यू अ फॉर्च्यून."

मला या वाक्याचा कांही अर्थही लागला नाही आणि संदर्भही नाही. इथं मी दाढदुखीने बेजार झालो आहे आणि हा अमेरिका पुराण लावून बसतो आहे. मी विमनस्कपणे इतर दोघांकडे पाहिले तर, त्या दोघांनीही मिसळीच्या रश्श्यात पावाचे तुकडे बुडवून गिळण्याच्या कार्यक्रमात यत्किंचितही खंड न पाडता मी रमेश बागूल साहेब काय सांगतील ते मुकाट ऐकावे अशा अर्थाच्या खुणा केल्या.

" बट् डोन्ट वरी. आय् कॅन गेच्च्यू अ नाईस डेन्‍टो. माझी एक नीस इथल्या डेंटल कॉलेज मध्ये बीडीएस् करतेय. शी कुड बी अ गुड हेल्प टु यू. "

तर इत्यर्थ असा होता की रमेश बागूल साहेबांची कुणी कुमारी प्रीतिबाला बागूल नामे पुतणी शहराबाहेरील दंत महाविद्यालयात दंत वैद्यकशास्त्रातील शल्यचिकित्सा- स्नातक होऊ घातली होती. दंत महाविद्यालयात प्रत्यक्षिकासाठीं कांही दंतरुग्णही लागतात. त्यासाठीं एक शुश्रुषा कक्षही असतो आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी त्या कन्येची प्रात्यक्षिकासाठी बहिस्थ-रुग्ण-कक्षावर नेमणूक (ओपीडीवर ड्यूटी) होती. तिच्या वशिल्याने म्हणे, माझे दंतोत्पाटन चकटफू होऊ शकले असते.अशी मौलिक भर माझ्या ज्ञानांत पडली. आणि चक्क चकटफू दंतोत्पाटन! या एवढ्या मोठ्या लोभाला बळी मी बळी न पडता तरच नवल झाले असते. शिवाय एका होतकरू दंतचिकित्सकाला किंवा दंतचिकित्सिकेला ज्ञानार्जनात मदत करण्याचे पुण्यही मला मिळणार होते. मी तडक घरी जाऊन स्नानादि आन्हिके उरकून दंतमहाविद्यालयाकडे कोणतीही काचकूच न करता कूच करण्याचा निर्णय घेतला.

मी इप्सित स्थळी पोहोचलो तो तिथे एक गौरवर्णीय कृशांगी मला सन्मुख झाली. " आपण वडुलेकर काका ना?" त्या युवतीचे लावण्य पाहून अंतर्बाह्य दाटून आलेले माझे भांबावलेपण शक्य तितके लपवण्याचा प्रयत्न करीत मी उद्गारलो "हो". तेवढ्या श्रमानेदेखील माझा घसा कोरडा पडतो आहे असे मला वाटून गेले.

" मी प्रीतिबाला बागूल. काकांचा फोन आला होता. तुम्ही येणार आहात म्हणून." मी रम्याच्या तत्परतेला मनोमन सलाम केला. खरोखरच, रम्या अमेरिकेत राहून बदलला होता.

"या!"
या तिच्या पुढच्या उद्गारासरशी मी मंत्रचळ्यागत तिच्या मगोमाग जाऊ लागलो. ती मला ज्या कक्षात घेऊन गेली तिथे तो मोहकसा दिसणारा दंतशल्यचिकित्सामंच, वरती दिव्याचा चंबू, चकचकीत फवारके लावलेल्या नळ्या इत्यादि सरंजाम होताच. पण त्या सौंदर्यात भरच पडावी अशा शुभ्र गणवेशातल्या तरतरीत अशा आणखी चार युवती जणू माझीच वाट पहात असाव्या अशा आविर्भावात उपस्थित होत्या. त्या चार ज्यूनिअर्स आहेत आणि कुमारी प्रीतिबाला बागले या सिनियर आहेत आणि त्या दांत काढण्याचे प्रात्यक्षिक माझ्यावर करून दाखवणार आहेत अशी मौलिक माहिती मिळाली.

माझ्या मनातले दंतवैद्याचे चित्र अगदी निराळे होते. दंतवैद्यक हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र असून दंतवैद्य हा हातात चिमटे, पक्कडी घेऊन दंतरुग्णाच्या दाताचा खातमा करणारा कुणी दैत्यच असतो अशी कांहीशी माझी कल्पना होती. शिवाय तोपर्यंत मी दंतोत्पाटानाच्या इतक्या सुरस आणि चमत्कारिक हकीकती ऐकल्या होत्या की दंतवैद्य नामक राक्षसाने इथे हे मायावी स्त्री रूप धारण केलेले आहे, असे वाटून मी थोडासा घाबरलोही. पण काही लोक मुमुक्षु भिषग्‌ वर्गाला ज्ञानोपासनेसाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने मरणोपरांत देहदान करतात, तसे आपणही दंतदान करून थोडेसे पुण्य़ कमवयाला काय हरकत आहे असा एके उदात्त हेतू मनात आल्याने मी त्या दंतशल्यचिकित्सिकेने निर्देशित केल्या प्रमाणे दंतशल्यचिकित्सा मंचकावर स्थानापन्न झालो. माझा रक्तदाब तपासणे, मला मधुमेह आहे किंवा नाही याचा कबुलीजबाब घेणे, इत्यादि प्राथमिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर माझ्या जबड्यामध्ये जबडा बधीर करण्यासाठीं देतात ती टोचणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या प्रयत्नात केवल माझा डावा जबडाच नव्हे तर डावा गालही आतून बधीर करण्यात आला. त्या शिकाऊ दंतवैद्यिणींच्या सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर माझी आधीच हल्लख झालेली दाढ काढली गेली. झाऽऽलं एकदाचं! असा सुस्कारा सोडून मी त्या मंचकावरून पायउतार होणार इतक्यात, " काका, एक मिनिट हं! जरा तसेच बसून राहता कां प्लीज. आमचे सर तुम्हाला पहायला येताहेत." या कु. प्रीतिबालाच्या विनवणीला नकार देण्यासारखे कांहीच नव्हते म्हणून तसाच त्या मंचकावर पहुडलो.

ते तिचे सर येईपर्यंत डोळ्यावर येणारी पेंग मी कशीबशी थोपवून ठेवली. सुमारे अर्ध्या तासाने ते तिचे सर आले ते थेट माझा जबड्यात घुसले. म्हणजे येताक्षणीच माझा जबडा उघडून ते निरीक्षण करू लागले आणि निरिक्षणादरम्यान ते मला अगम्य अशा भाषेत कु. प्रीतिबालाला कांही सूचना करीत होते. त्यांचे निरीक्षण आणि सूचना संपल्या आणि ते तात्काळ निघून गेले. मी प्रीतिबालाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने दोन गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली म्हणजे मी माझ्या दातांची जराही काळजी न घेणारा अत्यंत अव्यवस्थित माणूस आहे असे त्यांचे मत आहे. आणि दुसरी म्हणजे, माझ्या तोंडातील उजव्या बाजूच्या खालच्या दंतपंक्तीतील आणखी एक दाढ ताबडतोब काढली पाहिजे. मी जरा घाबरलो. कारण नाही म्हटले तरी डावी बाजू आता जराशी दुखायला लागली होती.

पण मग विचार केला चकटफूच आहे तर घ्या काढून आणखी एक दाढ. म्हणून मी संमती दिली. आणखी एक सलग प्रॅक्टिकल करायला मिळणार म्हणून त्या चार ज्यूनिअर्स आणि एक सिनियर प्रीतिबाला अशा पंचकन्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहायला लागला. या प्रॅक्टिकलला वेळ मात्र बराच लागला. सुमारे दीड तास. आधीच तुटून छिन्नविछिन्न झालेल्या त्या दाढेचे गिरमिटाने अक्षरश: तुकडे तुकडे करून तिचा नायनाट करावा लागला.

मी कापसाचा बोळा दाबून धरलेले बधीर झालेले दोन जबडे आणि बधीर झालेले दोन्हीही गाल घेऊन तिथून सहीसलामत (?) दंत महाविद्यालयाच्या बाहेर पडलो तेंव्हा, मला कोणत्याही कारणासाठीं तोंड उघडणे शक्य नाही हे मला घरी जाण्यासाठी रस्त्यावरची रिक्षा थांबवली तेंव्हा समजले. तो मला माझे गंतव्य स्थान विचारीत होता आणि मी माझे तोंड तसूभरही उघडू शकत नव्हतो. अखेर मी खिशातून एक कागदाचे चिटोरे काढून त्यावर गंतव्य स्थानाचे नांव खरडले आणि त्याला दाखवले. त्यावर रिक्षावाल्याने माझ्याकडे करुणार्द्र नजरेने कां बघितले हे मला नंतर समजले.

रिक्षा निघाली आणि कांही अंतर कापल्यानंतर एका चौकाच्या अलिकडे थांबली. रिक्षाचालकाने मागे वळून मला कांही खाणाखुणा करायला सुरुवात केली. मला कांही समजेना. पुढे रहदारी ठप्प झाल्याचे दिसत होते. पण रिक्षाचालक खाणाखुणा करून काय सांगायचा प्रयत्न करतो आहे त्याचा कांही बोध होत नव्हता. अखेर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी ज्या पद्धतीने त्याला कुठे जायचे ते सांगितले होते त्यावरून मी मुका आहे हे त्याला वाटले होतेच, शिवाय मुकी माणसे बहिरी असतात हेही त्याला माहिती असावे. त्यामुळे तो जमेल तशी करपल्लवी करून कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर त्याला मीही खुणेने मला ऐकू येतंय् तू बोल, असे सुचवले तेंव्हा त्याने, पुढल्या चौकातून कसलीशी रॅली चाललेली आहे, अर्थातच् रहदारी ठप्प झाली आहे आणि आपल्याला पुन्हा मागे वळून दुसर्‍या मार्गाने जावे लागेल असा वाचिक बोध दिला. त्याप्रमाणे त्याने मला माझ्या घरापाशी सोडले. हे सगळे ठीकच झाले पण रिक्षा प्रवासात मी सध्या बोलू शकत नाही या जाणिवेने मी कमालीचा अस्वस्थ झालो.

सकाळी गडबडीत मी दात काढायला जातो आहे हेही घरात कुणाला सांगितले नव्हते. गडबडीत असं आपलं म्हणायचं पण, दात तर काढायला जातो आहे त्यात काय सांगायचंय असा वयाला साजेसा अहंकारही त्यात होताच. पण आता निदान कांही काळ तरी हे असे, मौनव्रत धारण करावे लागणार
आणि त्यातून काय काय प्रसंग उद्‌भवणार या शंकेने मनात काहूर माजले. पहिला सामना झाला तो नातवाबरोबर.

क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

1 May 2009 - 7:41 pm | प्रमोद देव

मौनीबुवा, मस्त लावलंय पुराण.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

1 May 2009 - 7:42 pm | परिकथेतील राजकुमार

'दंतकथा' भारीच आहे एकदम.
पुढचा भाग (सामना) येउ द्या लवकर.

डॉ.दाढेंच्या ओळखीतला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अजय भागवत's picture

1 May 2009 - 7:45 pm | अजय भागवत

छान लिहिले आहे. लिखाण शेवटपर्यंत गुंतवून ठेवते, मजा आली.

नितिन थत्ते's picture

1 May 2009 - 7:54 pm | नितिन थत्ते

छान लिहिले आहे.
स्वगतः माझे पण दोनतीन दात असेच ओपीडी तून चकटफू काढून घ्यावेत काय? पण तिथे ओपीडी ला दंतवैद्य आला तर काय उपयोग. मुलींचे वेगळे कॉलेज असते काय?

(मौनीबाबा) खराटा

टारझन's picture

1 May 2009 - 7:59 pm | टारझन

=)) =)) =))
ज ब रा !! मात्र काकासाहेब .. आमच्या एजंसी कडून विमा उतरवून घ्या एकदा .. वारंवार चकटफू मिळणार नाही ना ,, म्हणून .. =))

प्रो.प्रा. टारझन
कुबड्या खविस अस्थि-दंत विमा एजंसी

स्वाती दिनेश's picture

1 May 2009 - 8:14 pm | स्वाती दिनेश

दंतकथेत आता पुढे काय? ची उत्सुकता ठेवून क्रमशः चा बोर्ड लावलात की हो तुम्ही सुध्दा हरुन शेट..
लवकर लिवा पुढचा भाग..
स्वाती

क्रान्ति's picture

1 May 2009 - 8:29 pm | क्रान्ति

दंतपुराण एकदम मस्त उतरले आहे. पुढे? मौनव्रत कधी संपले?
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

चन्द्रशेखर गोखले's picture

1 May 2009 - 8:30 pm | चन्द्रशेखर गोखले

खूप मजा आली ..अखेर पर्यंत वाचावसं वाटत राहिलं !! लेखनाची हतोटी छान आहे!

घाटावरचे भट's picture

1 May 2009 - 9:10 pm | घाटावरचे भट

भारी लिहिलंय...

पिवळा डांबिस's picture

1 May 2009 - 10:10 pm | पिवळा डांबिस

अरूणदादा,
तुमचा अनुभव खूपच आवडला. तुमची शैलीही मस्त आहे....

हा अमेरिकेतल्या जांवयाकडे जाऊन आल्यापासून असाच बोलतो. साधं "अरे देवा"’ म्हणाला असता तर याचे फोरफादर्स काय नरकात पडले असते कां?
हाणायचा ना सरळ! सॉरी, तुमचा मित्र आहे नाही का! जाऊद्या मग!!
पण ही लोकं त्या शिंच्या अमेरिकेत जाऊन आल्यावर अशी वागतात आणि मग अमेरिकेला इथे मिपावर शिव्या खाव्या लागतात!!:)
आणि पुन्हा "गौरवर्णी, कृशांगी लावण्यवतीचा" काका आहे नाही का? त्यामुळे तसंही त्याला माफ करूयात!!!:)

पहिली म्हणजे मी माझ्या दातांची जराही काळजी न घेणारा अत्यंत अव्यवस्थित माणूस आहे असे त्यांचे मत आहे.
त्यांचं मनावर घेऊ नका! आपण अगदी फिनाईलने चूळ भरून जरी गेलो ना, तरी दंतवैद्यांचं हेच मत असतं. तेंव्हा कानांनी ऐकायचं आणि दातांच्या फटीतून सोडून द्यायचं!!

दंतवैद्यक हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र असून दंतवैद्य हा हातात चिमटे, पक्कडी घेऊन दंतरुग्णाच्या दाताचा खातमा करणारा कुणी दैत्यच असतो
हे तर मस्तच आहे!!:)
इथे मिपावरच असले दोन-दोन दंतासुर आहेत. त्यांची याविषयीची प्रतिक्रिया जाणून घेण्यास अतिशय उत्सुक आहे!!! ;)

दुसरा भाग लवकर येऊद्या...
वाट पहात आहे....

(स्वगतः गौरवर्णी, कृशांगी, लावण्यवतीचा काका! काय नशीब असतं बुवा काही काही लोकांचं!! नायतर तिच्यायला आम्ही!!! नशीबच फुटकं!!!:))

विसोबा खेचर's picture

2 May 2009 - 2:20 am | विसोबा खेचर

अरूणदादा,
तुमचा अनुभव खूपच आवडला. तुमची शैलीही मस्त आहे....

हेच बोल्तो...

तात्या.

प्राची's picture

1 May 2009 - 10:10 pm | प्राची

दंतपुराण एकदम झक्कास झाले आहे. :)
पण दात काढलेल्यांची एका बाबतीत मजा असते बुवा २ दिवस,भूक लागली की खावा आईसक्रीम(कारण बाकी काही खाता येत नाही). B)

प्राजु's picture

2 May 2009 - 12:04 am | प्राजु

मस्तच...!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

2 May 2009 - 1:21 am | यशोधरा

मौनीकाका, पटपट लिहा पुढचा भाग :)

बेसनलाडू's picture

2 May 2009 - 1:39 am | बेसनलाडू

रंजक अनुभवकथन. पुढे वाचण्यास उत्सुक!
(उत्सुक)बेसनलाडू

प्रदीप's picture

2 May 2009 - 8:00 am | प्रदीप

देरसे आये पर बहुत ही दुरूस्त आये!! मझा आला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 May 2009 - 9:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दंतकथेची स्टोरी आणि लिहिण्याची शैली लै भारी !

दंतशल्यचिकित्सामंच शब्द आवडला ! :)

-दिलीप बिरुटे

लवंगी's picture

2 May 2009 - 4:33 pm | लवंगी

"हर्रीऽ मुके म्हनाऽ, हर्री मुकेऽऽ म्हनाऽऽ, पुन्न्याची गनऽना कोऽऽन करीऽऽऽऽ" म्हणत टाळ बडवीत असे. ..

=)) =)) =)) =)) =))

हसुन हसुन पोटात दुखतय..