विलक्षण लढती..............कोल्हापुर --२

वेताळ's picture
वेताळ in जनातलं, मनातलं
21 Apr 2009 - 12:32 pm

कोल्हापुर जिल्ह्यातलाच दुसरा मतदार संघ हातकलंगणे हा होय. ह्या मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवार श्रीमती निवेदिता माने ह्या एकतर्फी विजय मिळवणार व तो किती मताधिक्क्याने हाच प्रथम चर्चेचा विषय होता.ह्या मतदार संघात कोल्हापुरातले ४ विधानसभा व सांगली जिल्ह्यातील २ विधानसभा मतदार संघ येतात. ह्याच मतदार संघात १२ साखर कारखाने व दोन दुधउत्पादक संघ आहेत.संपुर्ण मतदारसंघावर साखरसम्राटाची मजबुत पकड आहे. सर्वजण शरदपवारांचे निष्ठावान कार्यकर्ते त्यामुळे मानेबाई प्रचंड बहुमताने तिसर्यादा निवडुन येणार हे सर्वजण खात्रीने सांगत होते.
परंतु ह्याच मतदारसंघात राजु शेट्टी म्हणुन एक लढवय्या शेतकरी नेता गतविधानसभेला शिरोळ मतदार संघातुन आमदार झाला होता. त्यांची ऊसदरवाढ व दुधदरवाढ आंदोलनाची दखल देशपातळीवर घेतली गेली आहे. शेतकर्याना मिळणार्या ऊसदराबाबत केलेल्या आंदोलनामुळे संपुर्ण शेतकरी वर्ग त्याना खुप मान देतो.त्या राजु शेट्टींनी आपली उमेदवारी जाहिर करुन एक वेगळीच कलाटणी इथे दिली आहे.
राजु शेट्टी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला व शरद जोशी च्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणुन ओळखला जायचा. एका आंदोलना वेळी साखरसम्राटाच्या गुंडानी त्याना मरेपर्यत मारुन ,मेला समजुन एका शेतात फेकुन दिले. परंतु एका शेतकर्‍याने त्याना उचलुन दवाखान्यात भरती केले व त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर मात्र राजु शेट्टी ने मागे वळुन बघितले नाही . महाराष्ट्रात एक लढवय्या शेतकरी नेता म्हणुन नाव कमावले.पुढे शरद जोशींबरोबर मतभेद झालेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली व त्या मार्फत निवडणुक लढवुन शिरोळ मतदारसंघातुन ते आमदार झाले.त्या निवडणुकीच्या वेळी पैसे नसलेमुळे त्यानी "एक नोट ,एक वोट" हि कल्पना अमंलात आणली. मत देणार्याने मतासोबत पैशाची पण मदत करावी अशी ती योजना होती. ती योजना लोकांनी उचलुन धरत त्याना बहुमताने विजयी केले. निवडुन आलेवर त्यानी विधानसभेत शेतकर्याच्या विविध प्रश्नावर आवाज उठवला व ऊसासाठी ज्यादा किमानदर मिळवुन दिला.
आता ते राजु शेट्टी मानेबाईच्या विरोधात उभे असलेमुळे सगळे १२ साखरसम्राट त्याच्या विरोधात एकत्र आले आहेत. सर्व नेते एकत्र व कार्यकर्ते मात्र राजु शेट्टींच्या पाठिमागे असे चित्र इथे बघावयास मिळत आहे.इथे ही राजु शेट्टीने एकतर्फी वाटणार्र्‍या निवडणुकीत रंग भरले आहेत. राजु शेट्टीच्या प्रचाराची जबाबदारी इथे शेकापचे नेते मा. श्री . एन डी पाटिल ह्यानी उचलली आहे. " एक नोट ,एक वोट" ह्या संक्लपनेतुन आता पर्यत १८ लाख रुपये लोकानी शेट्टीच्या प्रचारासाठी जमा केले आहेत. सभा पार पडल्या नंतर एक डबा सभेतुन फिरवला जातो व त्यात हे पैसे जमा केले जातात.शेट्टीच्या प्रचारसभाला मिळणारा प्रतिसाद बघुन शरद पवारानी आपले दोन सेनापती प्रचारासाठी इथे पाठवुन दिले आहेत. एक म्हणजे माजी गृहमंत्री आबा पाटिल व दुसरे म्हणजे विद्यमान गृहमंत्री जंयत पाटिल.त्यानी आता ह्या मतदार संघात राजु शेट्टीची टर उडवण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.ऊसाला मिळालेला दर हा शेट्टीह्याच्या मुळे नसुन तो दर शरद पवारांच्या मुळे मिळाला आहे हे लोकाच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न चालु केला आहे.परंतु काही ठिकाणी तर लोकानी ह्याच्या सभाकडे चक्क पाठ फिरवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोट्यात चिंता वाढली आहे.शरद पवारांनी तर ह्या मतदार संघासाठी एक नव्हे तर तीन प्रचार दौरे काढले आहेत. जवळ जवळ ५ ते ६ प्रचारसभा त्यानी घेतल्या आहेत.तसे बघायला गेले तर मानेवहिनींबद्दल लोकाच्या मनात काही नाराजी नाही परंतु आता ही निवडणुक शेट्टी विरुध्द साखरसम्राट व शरद पवार अशी झाली आहे. त्यामुळे पारडे कधी इकडे तर कधी तिकडे असे झुकत आहे. मा. एन.डी. पाटल्याच्या सभेना देखिल लोकांचा खुप प्रतिसाद मिळत आहे.
आज प्रचाराच्या तोफा थंड होत आहेत. २३तारखेला मतदान होणार त्यामुळे ह्या निवडणुकीत विजयी कोण होणार शरद पवार की राजु शेट्टी व मंडलिक,ही उत्सुकता संपुर्ण जिल्ह्याला लागुन राहिली आहे.

मुक्तकसमीक्षा

प्रतिक्रिया

सँडी's picture

21 Apr 2009 - 12:48 pm | सँडी

राजू शेट्टींबद्दल ऐकुन होतो... आज माहिती मिळली.
जमलेच तर मंडलिक आणि मानेंबद्दल असेच विस्तारने लिहावे, म्हणजे त्यांचीही महिती मिळेल.

-(राजकारणी)सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

अनामिका's picture

21 Apr 2009 - 3:26 pm | अनामिका

श्री वेताळ !
अत्यंत मुद्देसुद लेखन व राजु शेट्टिंसारख्या नवोदित कार्यकर्त्याची ओळख करुन दिल्याबद्दल अभिनंदन .
राजु शेट्टी सारख्या तरुण ताज्या दमाच्या व प्रामाणि़क कार्यकर्त्यांची ओळख मतदारांना करुन द्यायची सोडुन प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे नको त्या नेत्यांची भलावण करुन आपली लोकप्रियता व खप वाढवण्याचा प्रयत्न करताना बघुन खरच लोकशाहीचा हा चौथा स्तंभ किती खिळखिळा झालाय याचा प्रत्यय येतो.
मागील आठवड्यात एनडिटीव्हीची इलेक्शन एक्सप्रेस बारामती मधे होती .............काही नटुनथटुन आलेल्या स्त्रीयांनी पवारांना "जाणता राजा " ची उपमा दिल्याचे बघुन कपाळावर हात मारुन घेण्यावाचुन पर्याय उरला नाही............
राजु शेट्टिंसारख्या तरुणांची महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या देशाला अतिशय प्रकर्षाने गरज आहे ...........एन डि पाटलांसारख्या अनुभवी व निष्कलंक नेत्याचा वरदहस्त राजु शेट्टिवर आहे याचा अर्थ त्यांचा विजय निश्चीत असे म्हणायला हरकत नाही.
सँडि प्रमाणेच मी देखिल आपण इतर उमेदवारांवर देखिल लिहावेत या मताची आहे.जमल्यास उदयनराजेंवर लिहु शकलात तर उत्तम.
"अनामिका"

भडकमकर मास्तर's picture

21 Apr 2009 - 4:45 pm | भडकमकर मास्तर

वेताळराव,
दोन्ही लेख वाचले.
..
मजा आली...
उत्तम माहिती मिळाली.
...
आता निकालांच्या वेळी दोन्ही मतदारसंघांच्या निकालावर लक्ष ठेवावे लागेल... :)

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वेताळ's picture

21 Apr 2009 - 5:06 pm | वेताळ

भारताचे राष्ट्रपती मा. अब्दुल कलाम याना राजु शेट्टी आमदारकीला निवडुन आल्याचे कळाले.त्याची ती एक नोट एक वोट ही कल्पना त्याना समजली त्यावेळी त्यानी बेळगाव मध्ये राजु शेट्टीचा बोलावुन घेवुन सत्कार केला. त्यावेळी ते म्हणाले कि हिच खरी भारतातील लोकशाहीची महानता आहे कि एक रस्त्या वरचा साधा माणुस देखिल चांगल्या कार्याच्या जोरावर इथे निवडणुका जिंकु शकतो.त्यासाठी पैशाची गरज लागत नाही.
बघु आता काय होते ते.
वेताळ

संदीप चित्रे's picture

21 Apr 2009 - 10:17 pm | संदीप चित्रे

मोजकं आणि मुद्देसूद लेखन, जे या विषयाला अपेक्षित आहे, ते केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
पक्षीय बलाबलाचे (है शाब्बास ! ;)) योग्य वर्णन केलंय असं जाणवतंय.
राजू शेट्टींना शुभेच्छा (आजवरच्या निष्कलंक कीर्तीमुळे)

रम्या's picture

23 Apr 2009 - 2:29 pm | रम्या

राजू शेट्टींची मालमत्ता आणी इतर माहीती.
कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असणारे इतर उमेदवार आणी राजू शेट्टी यांच्यात फरक आहे खास! पश्चिम महाराष्ट्रात राहून एका सामन्य शेतकर्‍याने साखर सम्राटांच्या विरोधात जाणं काही साधी गोष्ट नाही. बहाद्दर असलं पाहिजे यासाठी!!
http://myneta.info/candidate.php?candidate_id=3807

राजू शेट्टी यांना शुभेच्छा!!

आम्ही येथे पडीक असतो!

शितल's picture

23 Apr 2009 - 5:30 pm | शितल

कोल्हापूर येथील निवडणुकीचा आढावा आवडला.
दोन्ही भाग उत्तम लिहिले आहेत. :)

यशोधरा's picture

23 Apr 2009 - 7:27 pm | यशोधरा

चांगली माहिती, धन्यवाद.