पुणे युनिर्व्हसिटी - अजब कारभार -सत्यघटना

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
14 Apr 2009 - 7:07 pm

(पुणे युनिर्व्हसिटीच्या अजब कारभाराची खालील घटना माझ्या सोबत घडलेली सत्यघटना. वाचा.)

माझ्या एका नातेवाईकाने पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी पुणे युनिर्व्हसिटी गेल्या जुन ०८ मध्ये सोडली. नातेवाईक नाशिक सोडुन दुसर्‍या गावी कॉलेजला निघुन गेला. जातांना त्याने पुणे युनिर्व्हसिटीतून मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी अर्ज करायला सांगीतला.

नियमाप्रमाणे मी मायग्रेशन साठी अर्ज नाशिक विभागीय कार्यालयातुन रु. २०/- ला विकत घेतला. तो एक्सर्टनला (बहीस्थ) होता म्हणुन त्याला टी.सी. साठी सुद्धा अर्ज करावा लागेल असे विभागीय कार्यालयातुन कळाल्याने तो अर्ज रु. २०/- ला घेतला. (रेगुलर विद्यार्थ्यांचा टी.सी. साठीचा अर्ज कॉलेजकडुन जातो व विद्यार्थ्यांला टी.सी. हातात मिळत नाही. फक्त मायग्रेशन सर्टीफिकीट नंतर अर्जदाराच्या घरी पुणे युनिर्व्हसिटी पोस्टाने २ महिन्यात पाठवते. )

दोन्ही अर्जांसोबत प्रत्येकी रु. १५०/- चे डि.डि. (२ वेगवेगळे डि.डि. पण एकूण रु. ३००/-)"रजिस्टार, पुणे युनिर्व्हसिटी " ह्या नावाने काढावे लागतील असे विभागीय कार्यालयातुन सांगण्यात आले.

मी ते दोन्ही अर्ज (मायग्रेशन सर्टीफिकीट व टी.सी. साठी) व्यवस्थीत भरले. (अर्जातील नियम तर विरोधाभासी आणि विनोदी होते.काहींचा अर्थ लागतच नव्हता. विस्तारभयास्तव येथे देत नाही.) दोन्ही अर्जांसोबत प्रत्येकी रु. १५०/- चे डि.डि. २ वेगवेगळे डि.डि. ,"रजिस्टार, पुणे युनिर्व्हसिटी " ह्या नावाने काढले.

मला पुणे युनिर्व्हसिटीच्या कारभाराची कल्पना असल्याने (मागील एक घटना) मी प्रत्येक गोष्टीत काळजी घेत होतो. डि.डि.ज च्या मागे नातेवाईकाचे नाव, PR No. (Permeant Registration No.), त्याचा पत्ता, फोन नं. लिहिले. त्यांच्या झेरॉक्स काढल्या व माझ्याकडे ठेवल्या. अगदी बँकेचे डि.डि. चे चलन पण जपून ठेवले.
प्रत्येक अर्जात मोकळ्या जागी, "मी मायग्रेशन सर्टीफिकीट व टी.सी. दोन्हीसाठी अर्ज करत आहे. मायग्रेशन सर्टीफिकीट सोबत रजीस्टर पोस्टाची तिकिटे लावलेल्या पाकीटात पाठवणे " असे पेन्सीलीने लिहीले. सोबत दोन रजीस्टर पोस्टाची तिकिटे लावलेल्या पाकीटे जोडली. (खरे ते एकच आवश्यक असते. विद्यार्थ्यांला टी.सी. हातात मिळत नाही. फक्त मायग्रेशन सर्टीफिकीट नंतर अर्जदाराच्या घरी पुणे युनिर्व्हसिटी पोस्टाने पाठवते. ) तरी पण मी २५ -३० रुपयांकडे पाहीले नाही.

जुलै, ऑगस्ट गेला. नातेवाईक मायग्रेशन सर्टीफिकीटासाठी विचारत होता. ते दुसर्‍या युनिर्व्हसिटीत वेळेत दिले नाही तर प्रवेश रद्द होतो. मी मिळेल असे सांगत होतो. सप्टेंबर महिन्यात मी पुणे युनिर्व्हसिटीच्या मायग्रेशन डिपार्टमेंटला फोन लावु लागलो. निट उत्तरे मिळत नव्हती. मी सर्व डिटेल्स देत होतो. पण काम कुठे रेंगाळत नव्हते तेच समजत नव्हते. शेवटी मी मायग्रेशन डिपार्टमेंट च्या हेड चे नाव विचारले. ते मोरे म्हणुन ग्रहस्थ होते. (नाव खरेच लिहीले आहे.) त्यांच्याकडून पण काही समजत नव्हते.

शेवटी मी तेथे स्वता: येवू का असे विचारले तर या म्हणाले. मी बाहेरगावाहून येणार तर किती वेळ लागेल ते सांगा? तर ते म्हणाले की लवकर काम होईल.

दोन दिवसांनी मी सकाळी ११:३० वाजता सगळी कागदपत्रे घेवुन मी पुणे युनिर्व्हसिटीच्या मायग्रेशन डिपार्टमेंटला ला पोहोचलो. अजुन मोरे यायचे होते. तो पर्यंत मी ईतरांकडे माझा अर्ज आला का? हे विचारत होतो. सगळे जण एकमेकांकडे बोटे दाखवत होते. इनवर्ड - आउटवर्ड रजीस्टर मेंटेन नव्हते. कामे करणारे सगळे तरूण पोरे- पोरी होत्या. अगदी १८-१९ वयाचे. अर्थातच ते शिकाउ होते हे मी जाणले. एक परमनंट बाई कॉम्पुटर वर सॉलीटेर खेळत होती. बाकी परमनंट लोक गप्पा मारत होते. शिकाऊ पोरे कॉम्पुटर वर गाणे वाजवत होते. एकमेकांना 'हे गाणे लाव, ते गाणे लाव' सांगत होते. आनंदी आनंद होता सगळा.

बेलेकर नावाच्या (नाव खरेच लिहीले आहे) कारकुनाकडे (संताप येतो आहे) पोस्टाने मायग्रेशन सर्टीफिकीट पाठवल्याची यादी आहे ते समजले. त्या यादीतपण नातेवाईकाचे नाव नव्हते. नाव कॉम्पुटर वरील प्रोग्राम मध्ये देखील शोधून सापडले नाही. (Permeant Registration No. असतांना देखील साला प्रोग्राम मराठी आडनावावर यादी सॉर्ट करत होता. (विचार करा डाटा एंट्री करणारे शिकाऊ पोरगा काय नावाने मराठी नावे ईंग्रजीत कन्व्हर्ट करत असेल? ) शिमगा सगळा.

तो पर्यंत माझ्यासारखीच लोकांची गर्दी वाढत होती. कमीत कमी ७५ अर्जदार लोक (बाई मुलगी असेल तर तिच्याबरोबर कमीतकमी १ माणुस तो वेगळा काउंट करा.) तेथे आलेले होते. सगळ्या टेबलांवर कचर्‍यासारखे अर्ज पडलेले होते. काल येथे येवून गेलेले सगळ्या टेबलांवर आपआपले अर्ज शोधत होते. त्यांचे पाहून मी पण माझा अर्ज शोधु लागलो. तेथे सगळ्या टेबलांवर कमीतकमी ४०-५० हजारांवर तरी अर्ज होते. त्या अर्जांमध्येच काही टि.सी. पण होते. आता प्रत्येक टेबलामधून अर्ज शोधणे म्हणजे गंजीतुन सुई शोधणे होते. तेवढ्यात मोरे आले. परत सगळी गर्दी तेथे जमली.

परत सकाळची कहाणी त्यांच्यापुढे झाली. त्यांनी शोधल्यासारखे केले. आणि दुपारी बघू सांगीतले. माझी खात्री झाली की येथे आपला अर्ज भेटणे शक्य नाही. मी एका परमनंट मुलीला भेटलो. (जुनी धेंडे काही कामाची नव्हती.) तीला ताई-बाई करून येथल्या कामाची माहीती करुन घेतली. मिळालेली माहीती धक्कादायक होती. तिने सांगीतले की गेल्या २ महिन्यापासुन येथे दररोज हाच सिन रिपीट होतो. लोक येतात काहींचे अर्ज सापडतात त्यांचेच मायग्रेशन तयार होते. दिवसभरात १५ ते १८ अर्ज सापडतात. आणि ते अर्ज स्वता: अर्जदारच शोधत होते. मायग्रेशन डिपार्टमेंट काहीच हालचाल करत नव्हते हे दिसत होते. त्या मुलीने सांगीतले की तुम्ही तुमचा टि.सी . येथे टि.सी . डिपार्टमेंटने पाठवला आहे का ? ते पाहुन यायला सांगीतले. च्यायला अशी प्रोसीजर होती तर. म्हणुनच मायग्रेशन अर्जांमध्ये मधुन मधुन काही टि.सी . दिसत होते तर.

मी तडक टि.सी . डिपार्टमेंटला गेलो. (उन्हात दुसरी इमारत शोधत शोधत) ते डिपार्टमेंट फारच ऍक्टीव्ह होते. ते म्हटले की, "आमच्याकडे काहीच पेंडींग नाही. हा पहा, या या क्रमांकाचा टि.सी . आम्ही या या तारखेला काढुन मायग्रेशन डिपार्टमेंट ला पाठवला आहे. मायग्रेशन डिपार्टमेंट काहीच कामे करत नाही. नुसता बाजार मांडला आहे त्यांनी. "

मी टि.सी . क्रमांक लिहुन घेतला. स्वारी परत मायग्रेशन डिपार्टमेंट ला आली. आता मी थोडे डोके लावले. पहिल्यांदा मी टि.सी . शोधण्याचा निर्णय घेतला.
मी गवताच्या गंजीतुन टि.सी . शोधु लागलो. कान मोरे, बेलेकर आणि इतर अर्जदारांकडे होते. कोणी मुंबई, कोल्हापूर, चंद्रपूर, मालेगाव, जळगाव येथून आले होते. पेठ तालुक्यातुन एकुण १५ जण आले होते. खुद्द पुण्याचे लोकांना "मायग्रेशन लवकरच घरी येईल तुम्ही जा" सांगत मोरे कटवत होते.

वाशी चा एकजण रडत होता. मायग्रेशन न मिळाल्याने त्याचे मागच्या वर्षीचे ऍडमीशन कॅन्सल झाले होते. त्याने १ वर्ष मुंबई विद्यापिठाला रोखुन धरले होते. मी फारच सावध झालो. पटापट माझा टि.सी . / मायग्रेशन अर्ज - जे काही सापडेल ते शोधू लागलो. तेवढ्यात एका गठ्यात मला माझ्या नातेवाईकाचा मायग्रेशन सापडला. मी लगेच तो घेवुन मोरे ला भेटलो.
त्याला सगळे कागदपत्रे दाखवले. डि. डि. च्या झेरॉक्स दाखवल्या. मिळालेले टि. सी. दाखवले. रजीस्टर पोस्टाची विद्यापिठाच्या शिक्क्याची एकनॉलेजमेंट दाखवली.

माझी अर्धी लढाई झाली होती. एका बाईकडे डि. डि. च्या झेरॉक्स नव्हत्या. ती बँकेच्या रिसीट दाखवु लागे. मोरे ते नाकारे. माझी बाजू आता वरचढ झाली होती. मी मोरेंना म्हटले, "माझे सगळी कागदपत्रे आहेत. डि. डि. , अर्ज, मार्कशीट, पाकीट तुम्ही शोधा. एवढ्या उकीरड्यात मी शोधत नाही. तुम्ही मला मायग्रेशन देउन टाका. "

माझा वार वर्मी लागला होती.

मोरे: "तु तुझा टी. सी. *** यांच्याकडे दे, मी सांगतो त्यांना मायग्रेशन तयार करायला."

त्यानी माझे नाव ईतर अर्ज सापडलेल्यांच्यबरोबर घ्यायला सांगीतले.

मी सावधगीरीने टी. सी. जमा केला नाही.

मी त्या *** ला (नाव विसरलो.) पुन्हा पुन्हा खात्रीसाठी विचारू लागलो. तो म्हणाला, "ए पांढरा शर्ट, डोके नको खाऊ, तु जेवण करुन ये, तुझे मायग्रेशन ४ वाजता भेटेल. " मी जेवण करायला कँपस मधल्या कँन्टीन कडे निघालो. खाली मी टी. सी. च्या २/३ झेरॉक्स काढल्या. मी आता निश्चींत झालो होतो. मी टि.सी. जमा केलेला नव्हता.

कँन्टीन मध्ये काहीतरी बकाबका खाल्ले आणि थम्स अप घेतले. परत मायग्रेशन डिपार्टमेंटला आलो. तिथे गर्दीत चाळा म्हणुन, मायग्रेशन अर्ज सापडला तर सापडला म्हणुन मी मायग्रेशन अर्ज शोधू लागलो. तेव्हा मोरे / बेलेकर मंडळी इतर अर्जदारांवर खेकसत होते, काम टाळत होते.

ते बघुन डोक्यात तिडीक गेली. आपण काय शोधतो ते डिपार्टमेंटवाले कोणीच बघत नव्हते. सगळा उदास कारभार होता. समोर अर्जदारांचे डि.डि. होते. त्यात काही नाशिकचे पण डि.डि. होते.
मायग्रेशन डिपार्टमेंट चा कारभार लक्षात आला होता. तो उघडकीला आणायची डोक्यात आयडीया आली. मेव्हणे पत्रकार होतेच. त्यासाठी डि.डि. ढापण्याची आयडीया आली. पण विचार केला एवढा निच विचार करू नये. ईतरांचे नुकसान करू नये. त्यातच एक जण नाशिकचा भेटला. त्याचेही माझ्यासारखे निम्मे काम झाले होते. मग आमची जोडी जमली. मी कमीतकमी पुरावा म्हणुन तिकीटे लावलेली ३ पाकीटे उचलली आणि बॅगेत टाकली.

माझे काम मायग्रेशन चे काम प्रगतीपथावर होते. *** ना परत परत विचारत होतो. ते म्हणत , "तु येथुन जा, डोके नको खाऊ." मी मजा घेत होतो.

ईतर लोक मात्र काम होत नाही म्हणुन भडकत होते. आम्ही दोघांनी पेठ च्या १५ जणांना "माहीतीचा अधीकार " येथे वापरण्यास सांगीतले. ईतरांना अर्ज शोधण्यासाठी मदत करू लागलो.

लोक आता जाम भडकले होते. आम्ही दोघे मग मेन रजिस्टार कडे काम होत नाही हे जावुन सांगीतले. त्यांनी मोरे ला त्यांच्या रुम मध्ये बोलावले. बहूतेक झापले असेल. पण मोरे आल्यानंतर त्याने बेलेकरला अर्ज शोधायला लावले. ते काम बेलेकराच्या बापानेपण झाले नसते. तो पेशवेपण उपभोगत होता. त्याने सरळ मोरे ला (डिपार्टमेंट हेड) सांगीतले की, "माझे काम आउटवर्ड चे आहे. तेच मी करणार. तुम्हाला काय करायचे ते करा. मी अर्ज शोधणार नाही. " आणि तो तयार न झालेले मायग्रेशन ची वाट बघत रिकामा बसला.

थोड्या वेळाने *** ने ५ /६ मायग्रेशन सर्टी. तयार केले. त्यात माझे मायग्रेशन सर्टी. पण होते याची खात्री केली. तो गठ्ठा एका साहेबाकडे सह्या करुन आला. तो गठ्ठा आता बेलेकर कडे आला डिसपॅचसाठी. बेलेकर बोलायला लागला, "मी हे मायग्रेशन सर्टी. कोणालाही हातात देणार नाही. मी पोस्टातच टाकेल. " माझे डोके सटकले. त्याला झापायचे ठरवले.

माझे मायग्रेशन सर्टी. तयार झाले होते. पण आउट करायचे बाकी होते. आणि बेलेकर पेशवेगीरी करत होता. आम्ही त्याला बाबा-पुता केले आणि त्याने मायग्रेशन सर्टी. हातात दिले.

माझे काम झाले होते. मायग्रेशन सर्टी. आणि टि.सी. (टि.सी. कुणालाच भेटत नाही. ) माझ्या हातात होते.

मी आणि नाशिकच्या मुलाने बेलेकरला डोस दिला. असे करणे शोभते का ? काम करत जा वैगेरे. पण तो गेंड्याच्या कातडीचा निघाला. मला परत निघायचे होते म्हणुन मी तेथुन बाहेर पडलो.

नंतर कामाच्या गडबडीत माझ्या या स्ट्रिंग ऑपरेशनबद्द्ल पत्रकार मेहूणे यांना सांगणे राहून गेले. आणि आपण सारे एका अनुभवाला मुकलो.

हे कधीचे लिहायचे होते पण राहुन जात होते. आज ते पुर्ण केले.

आपणास पुणे युनिर्व्हसिटीतुन मायग्रेशन सर्टीफिकेट काढायचे असेल तर २ दिवसांच्या तयारीने स्वता: जा आणि मायग्रेशन सर्टीफिकेट हातात घेवुनच बाहेर पडा.

समाजशिक्षणप्रकटनशिफारसअनुभवमाहितीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

शक्तिमान's picture

14 Apr 2009 - 7:18 pm | शक्तिमान

काही अपवाद वगळता सरकारी कार्यालयांचे काम असेच चालते.....

कुंदन's picture

14 Apr 2009 - 7:26 pm | कुंदन

माझे २ मित्र : अ आणि ब , एका मागोमाग परिक्षा क्रमांक होते.
आधीच्या वर्षी "अ" चे एटीकेटीच्या मर्यादेपेक्षा जास्त विषय राहिल्याने त्याने तात्पुरती वरच्या वर्गात ऍडमिशन घेउन काही विषय पुनः तपासाणी साठी टाकले होते.

वरच्या वर्गात ऍडमिशन घेतल्यावर एका विषयाच्या परिक्षे साठी "अ" अनुपस्थित राहिला, "ब" ने मात्र त्या विषयाचा पेपर दिला होता.

दरम्यानच्या काळात आधीच्या वर्षीचा एक विषय तो पुनः तपासाणी मध्ये उत्तीर्ण होउन "अ" ची तात्पुरती ऍडमिशन रेग्युलर झाली.

वरच्या वर्गातील ज्या पेपरच्या परिक्षे साठी "अ" अनुपस्थित राहिला , त्या विषयात ही त्याला ७० मार्क मिळाले.
त्याच वेळी "ब" ने पेपर दिला होता तरी तो नापास झाल्याचे दाखविले गेले.
पुढे "ब" ने तोच विषय पुनः तपासाणी साठी दिला , तेंव्हा "ब" ला देखील त्या विषयात ही त्याला ७० मार्क मिळाले.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2009 - 7:25 pm | परिकथेतील राजकुमार

पुणे युनिर्व्हसिटी ??
आपल्याला मंडई विद्यापीठ म्हणायचे आहे का ? :D

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

लिखाळ's picture

14 Apr 2009 - 7:32 pm | लिखाळ

पुणे विद्यापीठात एखादा विभाग कार्यक्षम तर त्याच वेळी दुसरा विभाग भोंगळ असे दिसते. तुम्ही दिलेला अनुभव संतापजनक आहे. मी सुद्धा विद्यापीठाच्या त्या इमारतींमध्ये अश्या लहानसहान कामांकरिता अनेक चकरा मारल्या आहेत.
त्यात अजून एक मजा म्हणजे लहानशी रक्कम भरण्यासाठी विद्यापीठाच्या आवारातल्या बँकेत जायला लागणे. तेथे रांगेत ताटकळत उभे राहणे. मग ज्या विभागातले काम असते त्याची वेळ संपते किंवा 'चहा'ची वेळ होते. मग पुन्हा थांबा. डीडी वगैरेसाठी आवारा बाहेरच्या बँकेत जा ! तेथे वेळ घालवा. तुमच्याकडे वाहन नसेल तर अजून पंचाईत...असो....

कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही,
शिंगरु मेले हेलपाट्यानी (आपल्या बद्दल),
अडला हरी गाढवाचे पाय धरी
इत्यादी म्हणींचा मासला अश्या कामांत मिळतो. :)
-- लिखाळ.

संदीप चित्रे's picture

14 Apr 2009 - 8:10 pm | संदीप चित्रे

हे उत्तम केले.... अनुभव सच्चा आहे असं दिसतंय..
मी युनिवर्सिटीत चकरा आणि गोते खाल्ले आहेत पण श्री. पंचवाघ (खरं नाव आहे) हे एक कार्यक्षम अधिकारी ओळखीचे होते म्हणून बराच त्रास वाचला होता.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Apr 2009 - 9:41 pm | प्रकाश घाटपांडे

हे वाचल्यावर आम्हाला आमच्या पोलिस बिनतारी विद्यापीठाची आठवण झाली. आमच्या विद्यापीठात रिझल्ट फिक्सींग झाले होते. आम्ही त्याचे बळी ठरलो. आम्ही ती केस वेगळ्याच मॆट मध्ये दाखल केली. इथे ती पहाता येईल.काळाच्या ओधात ती अस्पष्ट होईल आन इतिहासजमा होईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

फारएन्ड's picture

15 Apr 2009 - 12:54 am | फारएन्ड

पाषाणभेद, मला वाटते हा लेख कुलगुऊ नरेंद्र जाधवांकडे पाठव. बहुधा दखल घेतली जाईल. मधे त्यांनीच तसे म्हंटले होते, त्या ऍडमिशन च्या प्रकारानंतर (फेब्रु. मधे उघडकीस आलेल्या)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Apr 2009 - 10:53 am | परिकथेतील राजकुमार

एक सहज म्हणुन प्रश्न विचारायचा होता की हे कुलगुरु नरेंद्र जाधव नक्की कुलगुरु म्हणुन काय काम करतात आणी विद्यापिठासाठी किती वेळ देतात ?
रोज पेपर उघडावा तर ह्यांचे कमीत कमी २ फोटो. एक कोणाचा तरी सत्कार करताना आणी एक कोणाकडुन तरी सत्कार करुन घेताना. ह्यांचा पुर्ण दिवस जर ह्या सत्कार सोहळे, कोणाकोणाच्या जयंत्या मयंत्या, नाच, नाटके ह्यातच जात असेल तर ह्यांना त्या विद्यापिठाकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो कधी ? का अगदी पोलिसांनी केस दाखल करेपर्यंत अथवा कोणाच्या तरी तोंडाला काळे फासले जाईपर्यंत आरामात राहायचे ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्राजु's picture

15 Apr 2009 - 1:36 am | प्राजु

:(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मराठी_माणूस's picture

15 Apr 2009 - 6:42 am | मराठी_माणूस

नाशिकने ह्या भोंगळ विद्यापीठातुन आपली सुटका करुन घेउन दुसर्‍या चांगल्या विद्यापीठाशी सलग्न व्हावे.

दशानन's picture

15 Apr 2009 - 9:46 am | दशानन

:(

काय होणार युवकांच्या भविष्याचे ?

ती माणसे आहेत की डुकरे जी तेथे बसतात ?

अनंता's picture

15 Apr 2009 - 10:07 am | अनंता

गर्रीब बिच्चार्‍या डुकरांचा अपमान नका करु!

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

स्वाती दिनेश's picture

15 Apr 2009 - 1:44 pm | स्वाती दिनेश

अनुभव संतापजनक आहे ,
माझ्या मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवण्याच्या वेळची २००३ मधली यातायात आठवली.विद्यापीठ बदलले तरी फरक फारसा नाही..
स्वाती

क्रान्ति's picture

15 Apr 2009 - 7:13 pm | क्रान्ति

सगळीकडे असाच अनुभव असेल का, देव जाणे! मलाही मायग्रेशन सर्टिफिकेट घ्यायच होत, पण आता विचार बदलावा लागेल!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

अमृतांजन's picture

15 Apr 2009 - 9:38 pm | अमृतांजन

मायग्रेशन सर्टी. का लागते?
जेव्हढ्या लवकर ह्या देशात इ-गव्हर्नन्स सुरु होईल तेव्हढे चांगले.

मदनबाण's picture

15 Apr 2009 - 9:49 pm | मदनबाण

आपण योग्य लक्ष भेद केलात त्या बद्धल पाषाणराव आपले अभिनंदन. :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

उमा's picture

15 Apr 2009 - 9:56 pm | उमा

पुर्वेचे ऑक्स्फर्ड म्हणतात ना या विद्यापीठाला ? आणि ही परिस्थिती ?

खालील लिंक वर इमेल पत्ते आहेत. त्यान्ना ही मीपा ची लिंक पाठवली तर काही फरक पडेल का?
http://www.unipune.ernet.in/indexin.html

मराठी_माणूस's picture

16 Apr 2009 - 6:45 am | मराठी_माणूस

हे तिथलेच लोक म्हणतात

भाग्यश्री's picture

15 Apr 2009 - 11:26 pm | भाग्यश्री

खरं म्हणजे असे अनुभव मला नाही आले कधी पुणे युनिव्हर्सिटीचे.. (लकी मी!)
पण बाकी बर्‍याच ठीकाणी अशा टाईपचे नौभव येतच असतात.. वैताग येतो खरंच!
हे संबंधित अधिकार्‍यांना कळवून तर बघा.. काही चांगला फरक पडलाच तर सहीच! नाही पडला तर अपेक्षाच नव्हती तशी असं म्हणून सोडून द्या!