लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
29 Jan 2009 - 4:09 pm

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

मराठीच्या या अभिमान गितासाठी एक प्रकल्प श्री कौशल श्री. इनामदार हाती घेत आहेत. या प्रकल्पाची माहिती सर्व मराठी लोकांना व्हावी एवढ्या साठी येथे देत आहे. या विषयी सविस्तर माहिती मराठी अस्मीता या संकेतस्थळावर आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नमस्कार.

२००५ सालच्या मुंबई फेस्टिव्हल साठी ६३ मुलांना घेऊन मी मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली “तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो” ही प्रार्थना सादर केली. याच प्रार्थनेने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. दुःखाची बाब अशी की पुढच्या ३ तासांच्या सोहळ्यामध्ये नाना पाटेकर यांनी केलेले उत्स्फूर्त भाषण सोडले, तर मराठीचे एकही अक्षर उच्चारले गेले नाही.

ही वस्तुस्थिती आज आपल्याला सर्वत्र पाहावयास मिळते. महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे दिसत नाही. मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियो वाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. आपल्या मातृभाषेत आपल्याला भाजीपाला विकत घेता येत नाही, आपल्या मातृभाषेत एका जागेवरून दुस-या जागी जाता येत नाही. आपल्याच राजधानीत मराठीला दुय्यम स्थान मिळतं ही खेदाची गोष्ट आहे.

प्रश्न फक्त मुंबईचाही नाही. मराठी लोकांमध्ये मराठीच्या बाबतीत एक औदासिन्य आहे की काय अशी शंका येत राहते. चळवळीच्या नावाखाली काही हिंसक घडामोडी, जाळपोळ आणि भयंकर अस्थिर वातावरण एवढंच मराठीच्या वाट्याला येतं. तुमच्या आमच्यासारखी माणसं या तथाकथित चळवळींचा हिस्सा होत नाहीत आणि याची कारणं स्पष्ट आहेत. पण म्हणून मराठीची अवहेलना होण्याचं थांबत नाही.

मला प्रामाणिकपणे वाटतं की एक चळवळ जनसामान्यांमधूनच जन्मली पाहिजे. मराठीसाठी आपण मराठी भाषिकांनी एकत्र यायची आज जितकी गरज आहे तितकी यापूर्वी कधीच नव्हती. अमराठी लोकांनी मराठीचा आदर बाळगण्याचा आग्रह धरण्याआधी मराठी लोकांमध्ये मराठीचा अभिमान रुजवायची गरज अधिक आहे.

मराठीला एका अभिमानगीताची गरज आहे.

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

सुरेश भटांच्या या शब्दांना मी संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे ३०० गायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्याचा माझा मानस आहे. मराठीतल्या सर्व गायक – वादकांचा यात सहभाग असावा अशी माझी इच्छा आहे.

या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला लागणारा खर्च खरं तर सहज एका प्रायोजकाकडून उपलब्ध होईल. पण तसं केलं तर ते एक व्यावसायिक ‘प्रॉडक्ट’ होईल जो मुळात या मागचा हेतू नाही. ही एक चळवळ आहे आणि त्याचं उगमस्थान जनसामान्यांतच असावं. दोन हजार लोकांनी ५०० रुपये दिले तर या ध्वनिमुद्रणाचा खर्च निघू शकेल.

यात तुमचा सहभाग असला तर मला आनंद होईल. हे काही नेहमीचं मदतीचं आवाहन नाही. हे आमंत्रण आहे – मराठीच्या चळवळीत तुम्ही सहभागी होण्याचं.

आपला,

कौशल श्रीकृष्ण इनामदार.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खुलास: मिपाचा या प्रकल्पाशी काहिही संबंध नाही. मराठी भाषेसाठी चालणार्‍या एका प्रयत्नाला मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यात मिपाचा एक व्यासपीठ एवढाच सहभाग आहे.
- नीलकांत

संस्कृतीकवितागझलसमाजप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

माझी दुनिया's picture

29 Jan 2009 - 4:37 pm | माझी दुनिया

धन्यवाद आणि आभारी. कौशल यांच्याशी यापूर्वीच संपर्क झाला असून त्यांना अपेक्षित असलेले सहकार्यही केले आहे. वास्तविक मलाही त्यांनी जितक्या जास्त माणसांपर्यंत ही बातमी पोहोचवता येईल तितकी पोहोचवायची विनंती केली होती. पण काही वैयक्तिक कारणांनी ते माझ्याकडून राहून गेलं. अर्थात मिपा वर ही बातमी आली म्हणजे समस्त नेटकरांना हे लवकरच कळेल. प्रत्येकाने जमेल तसे सहकार्य कराव. मराठी माणसांनी एकत्र यावे. एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानू नये. ;-)
माझी दुनिया

इनोबा म्हणे's picture

29 Jan 2009 - 4:52 pm | इनोबा म्हणे

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नीलकांत.
आमच्यापरिने शक्य तितकी मदत करु.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंदयात्री's picture

29 Jan 2009 - 5:10 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो.

अवलिया's picture

29 Jan 2009 - 11:14 pm | अवलिया

हेच बोलतो

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

शितल's picture

29 Jan 2009 - 9:13 pm | शितल

सहमत.

विकास's picture

29 Jan 2009 - 5:33 pm | विकास

या माहीतीबद्दल धन्यवाद तसेच प्रकल्पाला शुभेच्छा!

या वरून काही वर्षांपुर्वी मुंबईत मराठी साहीत्यसंमेलन झाले होते त्यात तत्कालीन महापौर, मला वाटते, दत्ताजी नलावडे यांनी त्यांच्या बोलण्यात केलेली प्रतिक्रीया एकदम आठवली, जी दुर्दैवाने वस्तुस्थिती आता अधिकच आहे...

माधव ज्युलीयनांच्या कवितेचा संदर्भ देत ते म्हणाले होते: मराठी असे आमची राजभाषा, जरी आज ती मायबोली नसे.

लिखाळ's picture

29 Jan 2009 - 5:48 pm | लिखाळ

माहितीबद्दल धन्यवाद आणि प्रकल्पाला शुभेच्छा !

तुम्ही दिलेल्या दुव्यावरुन संकेतस्थळाला भेट दिली. पण बहुधा तिथला लेआउट बरोबर नाहिये..किंवा माझ्या संगणकावरुन तो नीट दिसत नाहिये. पिवळी आणि केशरी अक्षरे फक्त दिसत आहेत. सिलेक्ट ऑल केल्यावर मात्र इतर मजकूर दिसला जो तुम्ही वर डकवला आहे.
-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2009 - 9:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल धन्यवाद आणि प्रकल्पाला शुभेच्छा !

एकंदरीतच या प्रकल्पाचा खर्च १० लाख रुपये आहे. याचा काहीतरी नक्कीच आणि निश्चितच लाभ होईलच.

त्यापेक्षाही मराठी शिक्षणासाठी प्रयत्न केला गेला तर २००० रु / एक विद्यार्थी असा विचार केला तर ५०० गरजु मुले शिक्षण एक वर्षभर घेऊ शकतात. एक मुलगा म्हणजे पुढील ६० वर्ष असा विचार केला तर मराठी टिकविण्याच्या ५०० शक्यता आपण निर्माण करत आहोत. याचाही विचार व्हावा.

प्राजु's picture

29 Jan 2009 - 11:51 pm | प्राजु

जमेल तशी मदत करेन मी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कौशल इनामदार यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाला मन:पुर्वक शुभेच्छा.
मायबोलीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन देणार्‍या या उपक्रमात सहभागी व्हायला व एक मराठी भाषिक म्हणुन खारीचा वाटा उचलायला अगदी मनापासुन आवडेल
मायबोलीचा यथार्थ अभिमान असलेली"
"अनामिका"

भास्कर केन्डे's picture

30 Jan 2009 - 2:05 am | भास्कर केन्डे

इनामदार साहेबांचा उपक्रम मन:पुर्वक आवडला. विषेशतः तो राबवण्याची पद्धत... सर्वांचा समावेश करुन.

खारीचा वाटा उचलायची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांत व मिपा चे आभार!

मी सहसा मास-मेल करत नाही. आज मात्र केले. संपर्कसूचीतील सर्व (२९४) मराठी लोकांना हा विषय पाठवला. आपण सर्वांनी असे केले तर किमान काही हजार उत्सुक लोकांना ही माहिती मिळेल.

आपला,
(१ मे ची वाट पाहत असलेला) भास्कर

ढ's picture

30 Jan 2009 - 10:47 am |

माझ्या परिचयातील सर्वांना याबद्दल माहिती देत आहे.

माहिती दिल्याबद्दल नीलकांत यांचे आभार.

मॅन्ड्रेक's picture

30 Jan 2009 - 5:43 pm | मॅन्ड्रेक

इनामदार साहेबांचा उपक्रम मन:पुर्वक आवडला. विषेशतः तो राबवण्याची पद्धत... सर्वांचा समावेश करुन.

खारीचा वाटा उचलायची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांत व मिपा चे आभार!

मी सहसा मास-मेल करत नाही. आज मात्र केले. संपर्कसूचीतील सर्व मराठी / अमराठी लोकांना हा विषय पाठवला. आपण सर्वांनी असे केले तर किमान काही हजार उत्सुक लोकांना ही माहिती मिळेल.

हेच सांगावयाचे होते.
Mandrake - the magician.

अनंत छंदी's picture

30 Jan 2009 - 6:15 pm | अनंत छंदी

माहितीबद्दल धन्यवाद आणि प्रकल्पाला शुभेच्छा !

कौशल's picture

10 Feb 2009 - 1:23 am | कौशल

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. तसंच जे सहभागी होत आहेत त्यांचं मनापासून या चळवळीत स्वागत. ही चळवळ जोर धरीत आहे. लोक एकत्र येत आहेत. वर कलंत्री साहेबांनी केलेली सूचना वाचली. त्याची नोंदही केली. कलंत्री साहेब, मुलांना शिकवणं गरजेचं आहे हे ही खरंच आहे... पण एक गीत, किंवा एखादी कलाकृती असं काही चैतन्य निर्माण करू शकते जे ५००० पालकांना आपल्या पाल्याला मराठी शिकवण्याची प्रेरणा देऊ शकते. आपण गीताचं सामर्थ्य कधीकधी डोळ्याआड करतो. वन्दे मातरम्‌ ने संपूर्ण ब्रिटिश राज्य खाली आणण्यात जे योगदान दिलं आहे हे आपण जाणताच. हे मी स्वानुभवावरून सांगत आहे. माझं संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून झालं आणि महाविद्यालयात असतांना शेवटच्या वर्षाला मी गो. नि. दांडेकर आणि चेतन दातार यांच्या ‘सावल्या’मुळे मराठीकडे खेचला गेलो आणि त्यामुळेच ‘अमृताचा वसा’ हा मराठी अभिजात काव्यावर आधारित कार्यक्रम करू शकलो. मी या गीतांचं आणि कलाकृतिंचं सामर्थ्य जवळून अनुभवलं आहे हे विनम्रपणे नमूद करतो. एक गीत लाखो लोकांवर आपला असर करू शकतं आणि त्यातून भाषा टिकवायच्या कोट्यावधी शक्यता निर्माण होऊ शकतात. कृपया याचाही विचार व्हावा.

मुक्ता's picture

10 Feb 2009 - 2:07 am | मुक्ता

आपल्या उपक्रमाला मन:पुर्वक शुभेच्छा.
मायबोलीची सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन देणार्‍या या उपक्रमात सहभागी व्हायला अगदी मनापासुन आवडेल

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले शब्द जणु..

../मुक्ता

कौशल's picture

10 Feb 2009 - 2:47 am | कौशल