गाणी आणि आठवणी - भाग १

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
22 Jan 2009 - 5:21 pm

काल-परवा मित्रांसोबत गाणे, संगीत याविषयी ईमेलचर्चा सुरू होती. ही गहन चर्चा कार्यालयीन वेळेतच सुरू होती हे मी अजिबात कुणाला सांगणार नाहीये आणि कुणी विचारू देखील नका. :-) अर्थात आम्ही हिंदी-मराठी सहजगीतांविषयीच बोलत होतो. माझ्या मते सहजगीते म्हणजे मुख्यत्वेकरून चित्रपटांमध्ये असतात किंवा अगदी सहज कुठेही ऐकावयास मिळू शकतात अशी गीते. भावगीते, गझला, चित्रपटगीते, अल्बममधली गाणी इत्यादी गाण्यांचा सहजगीतांमध्ये समावेश करता येईल. जाणकार या व्याख्येशी सहमत असतीलच असे नाही. आणि या व्याख्येत अजून काही सुधारणा असल्यास मला ही त्या सुधारणा समजून घ्यायला नक्की आवडेल. किंबहुना सहजगीत असा कुठला गीतप्रकार असूच शकत नाही असेही जर मत जाणकारांचे असेल तरीही ते मत मी मानायला तयार आहे कारण सहजगीत ही व्याख्या मी आता या क्षणी शोधून काढली आहे. अशी काही व्याख्या वगैरे लिखाणाच्या सुरुवातीला टाकली की लिखाणात वजन येतं म्हणून मी ही व्याख्या टाकली असावी असं समस्त मिपाकरांना वाटण्याची दाट शक्यता आहे. त्यांचं तसं वाटणं कदाचित खरं असण्याची देखील दाट शक्यता आहे. ;)

शास्त्रीय संगीत ऐकायला आवडत असलं तरी त्यातले काही फारसे (तसं पाहिलं तर काहीच नाही) कळत नसल्याने अनावधानाने का असेना त्याकडे थोडं (म्हणजे अगदी खूप हे चाणाक्ष मिपाकरांच्या लक्षात आलं असेलच) दुर्लक्ष होतं. आणि लहानपणापासून फक्त आणि फक्त चित्रपटगीते कानावर पडल्यामुळे शास्त्रीय संगीताचा आणि माझा सवाई गंधर्वला कोणी हजेरी लावली किंवा कुणाला कुठला पुरस्कार मिळाला अशा बातम्या वाचण्यापुरताच संबंध आला. तरी आजकाल नाट्यगीते बर्‍यापैकी ऐकू यायला लागलीयेत. मराठी सारेगमप मुळे बरीच नाट्यगीते माहित झाली. त्यामुळे "बगळ्यांची माळफुले..." हे पं. वसंतराव देशपांडे यांनी गायिलेलं सुंदर गाणं आहे हे कळलं आणि राहुल देशपांडेंच्या आवाजात असलेलं त्याचं रेकॉर्डिंग बर्‍याच वेळा ऐकून झालं.

कुणाला कुठले गाणे आवडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझा विषय थोडा वेगळा आहे. जी गाणी आपण वारंवार ऐकतो किंवा जी गाणी वारंवार आपल्या कानावर आपसूकच पडतात त्या गाण्यांशी आपला गाण्यांचा पलिकडचा संबंध जोडला जातो असे मला वाटते. आपण ज्या परिस्थितीमध्ये ही गाणी ऐकतो त्या परिस्थितींशी आपली आठवणींच्या रुपाने नाळ जोडून ठेवण्याचं महत्त्वाचं काम ही गाणी करत असतात. परिस्थिती कुठलीही असू शकते. नोकरी मिळवण्यासाठी केलेल्या मेहनतीचा काळ किंवा एखाद्या प्रिय/अप्रिय व्यक्तीसोबत व्यतीत केलेला काळ किंवा पै अन पै चा हिशेब ठेवत घालवलेला पैशांच्या चणचणीचा काळ किंवा कॉलेजातले रम्य दिवस किंवा शाळेतल्या एखाद्या सुंदर पण नखरेल मुलीकडे चोरून-चोरून बघत तिच्या डोळ्यामध्ये स्वत:ला शोधण्याचा काळ...परिस्थितीऐवजी काळ हा शब्द योग्य वाटतो. त्या-त्या परिस्थितीमध्ये किंवा आयुष्याच्या बहुतेक सगळ्या वळणांवर किंवा त्या-त्या काळात आपण जी गाणी ऐकतो त्या गाण्यांचं आपल्या भूतकाळाशी किंबहुना त्या-त्या परिस्थितीशी किंवा काळाशी एक घट्ट नातं जोडलं जातं. वर्तमानातून या गाण्यांच्या सुरेल पुलावरून आपण अलगद आपल्या भूतकाळात शिरतो. थोडा वेळ फेरफटका मारला की पुन्हा वर्तमानात परत!! आहे की नाही गंमत? माझ्या बाबतीत सतत असचं घडत आलंय.

माझा अनुभव असाही आहे की हा खेळ खेळतांना गाण्यांचा दर्जा, काव्याचा दर्जा, संगीतातील माधुर्य किंवा एकूणच गाणं म्हणून त्या गाण्यांचे मूल्य या गोष्टी दुय्यम ठरतात आणि काही सुमार दर्जाची गाणी देखील आपल्याला काही क्षणांपुरता का असेना पण भूतकाळ जगण्याची संधी देतात आणि पर्यायाने थोडा आनंदही देतात कारण भूतकाळ चांगला असो किंवा वाईट, तो आठवायला आणि त्यात रममाण व्हायला सगळ्यांनाच आवडते. या सगळ्या प्रकारात 'निखळ गाणे आवडणे' कुठे बसते हे सांगणे मला जरा अवघड वाटतेय; कारण पुन्हा मी मघाशी म्हटलं त्याप्रमाणे गाणं हा वैयक्तिक आवडी-निवडीचा प्रश्न आहे. 'भावसरगम' ५-६ वेळा बघूनही माझी तहान भागत नाही तर दुकान चालविण्याची अफलातून हातोटी असणारा माझा मित्र पहिल्याच 'भावसरगम' ला एक साखरझोप काढतो आणि कदाचित साखरेचे भाव आणखी वाढले तर साठा करुन ठेवलेल्या साखरेचे सोने झाले आहे असे स्वप्नही पाहतो. एखादा "व्हेअर इज द पार्टी टूनाइट" ऐकल्याशिवाय झोपू शकत नाही तर माझ्यासारखा एखादा गुलाम अलीचे "कैसी चली हैं अब के हवा..." ऐकत विव्हळत बसतो. अशी भूतकाळाचा आनंद देणारी गीते आपल्याला आवडणारीच गीते असतात का? किंवा जी गीते आपल्याला आवडतात तीच गीते आपल्याला भूतकाळात घेऊन जाऊ शकतात का? माझ्यापुरते याचे उत्तर 'नाही' असे आहे. मला न आवडणारी काही गीते देखील मला अगदी प्रेमाने आणि हात धरून भूतकाळात घेऊन जातात आणि मग माझी आणि त्यांची दोस्ती होते. म्हणजेच ती गाणी मला आवडायला लागतात का? कदाचित हो किंवा कदाचित नाही. जी गाणी सुमार असतात पण खूप वेळा ऐकली जातात त्या गाण्यांमध्ये आपण काहीतरी असे शोधतो जे आपल्याला आवडते किंवा त्यात असे काहीतरी असतेच जे आपल्याला आवडू शकते आणि जी गाणी आपण स्वतःसाठी 'बाद' म्हणून घोषित करतो ती गाणी आपण ऐकतच नाही किंवा ऐकली तरी आपली मानसिक चौकट आपण अशी करून ठेवतो की त्यामुळे आपण त्या गाण्यांशी कुठल्याच आठवणी असोशिएट करत नाही. वारंवार ऐकून देखील काही गाणी आवडू शकतात. ए.आर. रहमानची गाणी बहुधा अशीच असतात. माझ्या मते जे गाणं पहिल्यांदा ऐकल्यानंतर तुम्हाला पुन्हा ऐकायची तीव्र इच्छा होते किंवा ज्याची चाल तुमच्या सहज लक्षात राहते ते गाणं तुम्हाला आवडलेलं आहे असं बिनदिक्कत समजावं. ओळखीचं गाणं म्हणजे माहित असलेलं गाणं आणि आवडणारं गाणं यात मात्र फरक आहेच. एखादं गाणं तुम्ही खूप वेळा ऐकलेलं असतं पण ते तुम्हाला रुचत नाही. काही गाणी अशी असतात की जी खूप वेळा ऐकली तर चक्क आवडायला लागतात. भूतकाळात घेऊन जाणारी बहुतेक सगळीच गाणी मात्र खास असतात. ती कशीही असली तरी ऐकायला, गुणगुणायला चांगली वाटतात. गाणं म्हणजे तरी शेवटी काय, भावभावनांना व्यक्त करण्यासाठी आणि भावनांचा अविष्कार घडविण्यासाठी निर्मिला गेलेला एक सुरेल संवादच ना? तो कधी स्वतःशी असतो तर कधी सुरांशी!

माझ्या लहानपणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे हिंदी चित्रपट संगीतवर राज्य होते. त्यांची जशी काही अप्रतिम गाणी आहेत तशीच सुमार गाण्यांची यादी देखील मोठी आहे. मी पाचवीत असतांना आम्ही मित्रांनी सार्वजनिक गणपती बसवला होता. सामजिक उपक्रम राबवणं वगैरे तेंव्हा एवढं प्रचलित नव्हतं आणि त्यासाठी लागतो तेवढा पैसा ही नसल्याने आम्ही लोकांना मोफत करमणूक देण्याचा उपक्रम राबवत असू. लोकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी आम्ही वर्गणीतल्या उरलेल्या पैशातून व्हिडीओ आणून रस्त्यात टेबलवर ठेवत असू आणि हिंदी चित्रपट दाखवत असू. मला ठळकपणे आठवणारा चित्रपट म्हणजे 'कर्मा'. लोकं रात्रीचं जेवण वगैरे आटोपून बसत असत. अजूनही "माही वे, ना जैय्यो परदेस..." हे गाणं किंवा "हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिये.." ही गाणी कुठे ऐकली की माझं मन लहान पाखरू होऊन माझ्या छोट्याश्या गावातल्या त्या अरुंद रस्त्यावरच्या आमच्या घराच्या छतावर जाऊन बसतं आणि निवांतपणे व्हिडीओवर सुरू असलेला तो 'कर्मा' क्षण दोन क्षण बघून पुन्हा पुण्यात येतं. खरं सांगतो, खूप छान वाटतं. त्यावेळी गाणी कुठेही ऐकू यायची. टपर्‍यांवर, कुणाच्या घरात, लग्नाच्या मंडपात, सिनेमाची जाहिरात करणार्‍या टांग्यात, रेडिओवर, टीव्हीवर, टेप दुरुस्तीच्या दुकानात...असं कुठेही लोकप्रिय गाणी सतत ऐकू यायची. अजूनही येतात आणि अजूनही हिरो, आशा, अर्पण, एक दुजे के लिये, अपनापन या चित्रपटातली लक्ष्मी-प्यारे ची गाणी लोकं ऐकतात. हिरोची ती बासरी अजूनही बर्‍याच लहान गावांमध्ये ऐकू येते. आता ती बहुधा मोबाईलची रिंगटोन म्हणून ऐकू येते.

तेजाबमधलं "कह दो के तुम हो मेरी वर्ना..." कुठे कानावर पडलं की पुन्हा मन वढाय वढाय भुर्रकन माझ्या गावातल्या दत्त टॉकीज मध्ये जाऊन बसतं आणि अनिल कपूरसारखं हात झटकून गाण्याचा ताल पकडण्याचा प्रयत्न करतं. त्यावेळेस उगीच असं वाटायचं की माधुरी सारखी सुंदर अशी प्रेयसी आपल्यालाही मिळेल आणि मग काय, आयुष्याची चांदी होईल. आताही काही आयुष्याची अगदीच माती नाही झालेली. ;) अजूनही "कितने सावन, कितने यौवन, कितने यौवन बीत गये..." असं ऋषि कपूर मोहम्मद अझीजच्या बसक्या आवाजात म्हणतो तेंव्हा मन लहान होऊन लहानपणाच्या अंगणात बागडायला लागतं. "बलमा तुम बलमा हो मेरे बस नाम के..." असं कविता नखरेल आवाजात 'नगीना' मध्ये म्हणते तेंव्हा या चित्रपटाने आमच्या गावात मोडलेले विक्रम आठवतात. जथ्थ्या-जथ्थ्याने लोकं प्रकाश टॉकीजकडे लगबगीने जातांना दिसतात, प्रकाश टॉकीजच्या बाहेर असलेलं गरम शेंगांचं दुकान आठवतं, चांदण्यांच्या प्रकाशात रंगात आलेला तो श्रीदेवीचा नाच आठवतो. ही गाणी जरी लोकप्रिय असली तरी दर्जेदार खचितच नव्हती पण तरीही मनात घर करून बसली आहेत हे नक्की. मला चांगलं आठवतं आमच्या घराचं बांधकाम सुरू होतं आणि आम्ही शेजारच्या एका खोलीमध्ये तात्पुरतं राहत होतो. ८३ चा तो काळ होता. अजूनही अनुराधा पौडवालच्या आवाजातलं "डिंग डाँग ओ बेबी सिंग अ साँग..." ऐकलं की मला आमच्या घराच्या बांधकामावरचे प्रेमळ आणि मृदू बोलणारे हनीफ मिस्तरी आठवतात; त्यांच्या डब्यात खाल्लेली भाकरी आठवते; त्यांचाच नातेवाईक असलेला कालू आठवतो; तो बांधकामावर पाणी मारायला येतांना एक छोटा टेप घेऊन यायचा आणि त्यावर 'हिरो' ची गाणी लावायचा हे आठवतं, मी आणि माझ्या या निर्मळ दोस्ताने बांधलेलं एक छोटसं मंदीर आठवतं आणि डोळ्याच्या पापण्या उघडझाप करायला लागतात. खूप प्रेम दिलं मला या लोकांनी. या प्रेमाची आठवण माझ्या मनात ताजी आहे कारण 'हिरो" च्या गाण्यांचा आल्हाददायक सडा त्या आठवणीवर अधून-मधून पडत असतो!!

--समीर

संगीतविचारअनुभव

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

22 Jan 2009 - 5:52 pm | योगी९००

जी गाणी आपण वारंवार ऐकतो किंवा जी गाणी वारंवार आपल्या कानावर आपसूकच पडतात त्या गाण्यांशी आपला गाण्यांचा पलिकडचा संबंध जोडला जातो असे मला वाटते. आपण ज्या परिस्थितीमध्ये ही गाणी ऐकतो त्या परिस्थितींशी आपली आठवणींच्या रुपाने नाळ जोडून ठेवण्याचं महत्त्वाचं काम ही गाणी करत असतात.
सहमत...लिहीलेले आवडले.

लक्ष्मी-प्यारेंचे बॉबी, पत्थर के सनम ची गाणी माझी आवडती आहेत.
तसेच मला खय्याम साहेब खुपच आवडते...त्यांची आवडती गाणी म्हणजे - ये मुलाकात एक बहाना है.., चांदनी रात मे एक बार तुम्हे देखा है, आणि बरीच गाणी.. अर्थात ही गाणी मला कधीच सुमार वाटली नाहीत.

खादाडमाऊ

चंबा मुतनाळ's picture

22 Jan 2009 - 6:00 pm | चंबा मुतनाळ

समीरसाहेब, छान लिहीले आहेत.
अजुन येउद्या.

पु.ले.शु.

मन्जिरि's picture

22 Jan 2009 - 6:09 pm | मन्जिरि

झकास लिहिल आहे

स्मिता श्रीपाद's picture

22 Jan 2009 - 6:59 pm | स्मिता श्रीपाद

'भावसरगम' ५-६ वेळा बघूनही माझी तहान भागत नाही तर दुकान चालविण्याची अफलातून हातोटी असणारा माझा मित्र पहिल्याच 'भावसरगम' ला एक साखरझोप काढतो आणि कदाचित साखरेचे भाव आणखी वाढले तर साठा करुन ठेवलेल्या साखरेचे सोने झाले आहे असे स्वप्नही पाहतो.
:-)
मस्त... :-)

पुढचा भाग लवकर येउदेत :-)

("भावसरगम" ची चाहती)स्मिता श्रीपाद

समीरसूर's picture

27 Jan 2009 - 11:32 am | समीरसूर

भावसरगम हा एक अनुभव आहे. पहिल्यांदा मी तो अनुभव माझ्या परममित्रासोबत म्हणजे श्रीपाद कुळकर्णी सोबत घेतला. माझे भावसरगमवर प्रेम जडण्याला कारणीभूत श्रीपाद आहे आणि त्याबद्दल मी त्याचा ऋणी आहे.

धन्यवाद, स्मिता!

--समीर

वृषाली's picture

22 Jan 2009 - 8:59 pm | वृषाली

छान सुरेल लेख.

शशिधर केळकर's picture

23 Jan 2009 - 1:07 am | शशिधर केळकर

सुरेखच उतरले आहे!
ऐकलेली गाणी कशी का असेनात, ती त्या त्या काळातल्या घटना, परिस्थिती यांच्या सोबत आपल्या मनात खोलवर जतन होतात हे अगदी खरे. गाण्यामुळे आपण त्या मूड मधे जातो.

मला लहानपणी ऐकलेली सकाळी ६ ते ६.३० दरम्यान मुंबई ब वर लागणारी मराठी भक्तिगीते आठवतात. भीमसेनांचे 'राम रंगि रंगले' आजही ऐकले की जो मूड तयार होतो, त्याची मुळे त्या काळात आहेत, ती तिथवर घेऊन जातात.

मस्त लेखन!

समीरसूर's picture

27 Jan 2009 - 11:06 am | समीरसूर

अजूनही सकाळी ६ वाजताच्या आकाशवाणी जळगांववरच्या 'आराधना' कार्यक्रमाची गोडी आठवते. सुरेल भक्तीसंगीतात न्हाऊन निघतांना हळू-हळू साखरझोपेतून बाहेर येण्याचा तो अनुभव अवर्णनीय असायचा. धन्यवाद!

--समीर

विसोबा खेचर's picture

23 Jan 2009 - 1:18 am | विसोबा खेचर

समीरराव,

अगदी मनापासून केलेले अतिशय सुरेख लेखन.. गाणी आणि त्याबद्दलच्या आपल्या आठवणी खूप छान आहेत, बोलक्या आहेत!

औरभी आने दो बॉस! :)

शास्त्रीय संगीत ऐकायला आवडत असलं तरी त्यातले काही फारसे (तसं पाहिलं तर काहीच नाही) कळत नसल्याने अनावधानाने का असेना त्याकडे थोडं (म्हणजे अगदी खूप हे चाणाक्ष मिपाकरांच्या लक्षात आलं असेलच) दुर्लक्ष होतं.

कळले नाही तरी ऐकायला आवडणे हेच महत्वाचे! सबब, ऐकणे सुरू ठेवा. आमची म्हातारी पुरणपोळी कशी करते हे आजतागायत मी तरी कुठे जाणून घेतले आहे? तरीही तिच्या हातची पुरणपोळी मला आवडतेच ना?! :)

भावगीते, चित्रपट गीते सुरेखच असतात हे अगदी निर्विवाद परंतु आमच्या अभिजात संगीतातही छान छान साजूक सुंदर गानमिठाईचे डबे भरून ठेवले आहेत त्याचाही आस्वाद घेणे सुरूच ठेवा..! :)

आपला,
(गानप्रेमी) तात्या.

समीरसूर's picture

27 Jan 2009 - 11:12 am | समीरसूर

धन्यवाद, तात्या.
गाण्यांचं जग थोडं अजबच असतं; मला दीदींचं 'बसेरा' मधलं "जहॉं पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं..." हे तरल गीत आवडतं पण कधी-कधी हिमेशचं "ऐ मेरी मेरी जोहरा जबीं..." हे पण आवडतं. :-) "बगळ्यांची माळ्फुले..." हे मी जितकं समरसून ऐकतो तितकंच समरसून मी "कोंबडी पळाली.." पण ऐकतो. बडी गंमत हैं साली!!! :-)

--समीर

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jan 2009 - 1:32 am | llपुण्याचे पेशवेll

अगदी खरे लिहीले आहे.
आता तम्मा तम्मा लोगे हे गाणे मला उगाचच माझ्या बालपणात घेऊन जाते. कारण शाळेत २री-३रीत असताना बाई वर्गाबाहेर पडल्या की आम्ही सर्व पोरं वर्गात जोरजोरात ओरडून गायचो. :) तसे 'रूप सुहाना लगता है', 'तू मिले दिल खिले',' काश कोई लडका मुझे प्यार करता ' इ. गाणी शाळेतल्या दिवसाची आठवण करून देतात कारण तेव्हा अर्थ कळत नसतानाही ही गाणी म्हणायचो.(आणि त्या 'रुप सुहाना लगता है' गाण्यात त्या हिरोने हिरोहिनच्या **मधे तलवारीचे टोक टेकवणे बघून तर गंमत वाटे)

७वीत असलेला 'बगळा' हा धडा आणि त्याच काळात विविधभारतीवर संध्याकाळच्या वेळेला ऐकलेले 'बगळ्यांची माळ फुले' हे गाणे कायमचे घर करून बसले. का काही माहीत नाही.
त्यामुळे तुमचा लेख पटला. :)

पुण्याचे पेशवे
Since 1984

समीरसूर's picture

27 Jan 2009 - 11:18 am | समीरसूर

तम्मा तम्मा लोगे हे गाणं मला देखील आवडायचं :-) माझ्या काकांनी (वय तम्माच्या वेळेस साधारण ५२) जेंव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते वेडे झाले आणि पहाटे ६ वाजता ते त्यांच्या म्युझिक सिस्टीम वर मोठ्या आवाजात कुणाचीही तमा न बाळगता तम्मा तम्मा लावायचे. त्यांना असच वेड 'कजरा रे...' च्या वेळेस लागल्याचे स्मरते. :-) धन्यवाद.

--समीर

आपला अभिजित's picture

23 Jan 2009 - 1:56 am | आपला अभिजित

हल्लीची गाणी आवडतात, पण कुठल्या काळाशी नाते सांगत नाहीत, असे वाटते.

आणि कविता क्रुष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सुरेश वाडकर, उदीत नारायण, गेला बाजार कुमार शानु, अशा गुणी गायकांना हल्लीच्या प्रीतम-रेशमिया मंडळींनी घरीच बसवले आहे.

अमितकुमारही मला प्रचंड आवडायचा. `बडे अच्छे लगते हैं' म्हणावं, तर त्यानंच! महंमद अझीजची आम्ही यथेच्छ टवाळी उडवायचो. पण तरीही त्याने गायलेल्या `तू मुझे कुबूल' ला सलामच आहे आपला!

बाकी, तुमच्यासारखे मळ्या-बिळ्यात व्हिडिओवर पिक्चर आम्हीपण बघितले आहेत.
गेला तो काळ!!

समीरसूर's picture

27 Jan 2009 - 11:25 am | समीरसूर

मलाही आवडायचा. "देखो देखा है ये मैने एक सपना..." खूप छान गायले होते त्याने. 'जीवा' मधलं "रोज रोज आँखों तले..." हे देखील खासच! मो. अझीज "तू मुझे कुबूल..." मध्ये तळपला होता. तसाच शब्बीर कुमार नावाचा बद्धकोष्ठी गायक 'बेताब' मध्ये तळपला होता. "बादल युं गरजता है..." असं ज्यावेळेस तो अगदी कळवळून म्हणायचा तेंव्हा और बहुत कुछ गरजता है की काय असं वाटून याने पटकन मोकळं व्हावं असं वाटायचं. :-) (विनोद तसा थोडा छपरी आणि थोडा बीभत्स आहे पण मोह आवरत नाहीये. क्षमस्व!) :-) धन्यवाद!

--समीर

नंदन's picture

23 Jan 2009 - 1:16 pm | नंदन

लेख छान उतरला आहे. 'स्वर आले दुरूनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी' म्हणजे काय ते यावरून थोडेफार उमजावे. मागे रामदास यांनी 'बगळ्यांची माळ फुले'वर एक अप्रतिम लेख लिहिला होता, त्याची पुन्हा आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

27 Jan 2009 - 10:21 am | सहज

थोडी गाणी इकडची तिकडे होतील पण बहुदा वेगळ्या वेगळ्या दशकातील संगीतावर वाढलेल्या प्रत्येकाचे हे मनोगत.

(सकाळपासुन रात्रीपर्यंत विविधभारतीच्या संगीतावर कान कोरलेला) सहज

समीरसूर's picture

27 Jan 2009 - 11:35 am | समीरसूर

सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल शतशः धन्यवाद!
लेख आपल्या सारख्या सुजाण आणि अभ्यासू मिपाकरांना आवडला हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.

--समीर