माईलस्टोन....

भम्पक's picture
भम्पक in जनातलं, मनातलं
19 Aug 2024 - 4:22 pm

खरं तर दहावीलाच लक्षात आलेलं त्याच्या.परंतु कोणावरही उगीच दडपण आणून काही करायला लावणे हे त्याला पटण्यासारखे नव्हते.म्हणजे स्वतःच्या मुलाबाबत सुद्धा.तरी त्याचे जवळचे मित्र सांगायचे बरका त्याला की पोरांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नाही चालत.अधून मधून टोकलं पाहिजे,रिव्ह्यू घेतला पाहिजे.तोही ठरवायचा पण पुन्हा तेच.होतंच नसे त्याच्याकडून.त्याला त्यावेळी त्याचा काळ आठवायचा की दादांनी कधीही त्याला टोकलं नाही की विचारले नाही.उलट त्याच्या कोणत्याही निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले असायचे.अन त्यांचा विश्वास ही होता त्याच्यावर.तो सेम थिअरी लावीत होता स्वतःच्या पोराला.खरं तर त्याचं पोरगही खूप सिंसिअर. त्याला त्याच्यात तो दिसायचा.कारण त्याच्याच आवडी पोरात उतरलेल्या.चित्रं काढणं,कथा कविता करणं इ इ.या गोष्टीमुळे त्याने त्याला विचारणेच सोडून दिले,म्हणजे हा आपल्याप्रमाणेच असेल असे.तसे ते पोर पण होतं हुषार. पण जसा हा कामानिमित्त दुसऱ्या गावी गेला अन पोरगं दहावीत गेलेलं.तसा हा निर्धास्त होता कारण त्याची थिअरी.पण दहावीच्या परीक्षेच्या आधीच्या परीक्षांचे निकाल त्याला कोड्यात टाकणारे होते.अन त्यामुळे तो थोडासा भेदरला होता.
गणित त्याचा आवडीचा विषय. दहावीला त्याला पैकीच्या पैकी गुण मिळालेले.त्यामुळे पोराच्या गणिताच्या पेपरच्या आधी सुटी टाकून तो घरी आला अन उजळणी करून घेतली.निकाल लागला तेव्हा पोराने इतर विषयात बरे गुण मिळवले परंतु गणितात 92 मिळवले.हा तेवढ्याच गोष्टीने खुश.पण काय कुणास ठाऊक मनात शंकेची पाल चुकचुकली.
त्याच्या ज्या मित्रांची मुलं दहावीत होती त्यांनी दहावीनंतर पोरांना डिप्लोमा ला टाकले.पण हा त्याच्या भयंकर विरोधात होता.भले तुम्ही नंतर दहावीनंतर चा कोर्स करा परंतु मुलांना 11वी अन बारावी चे कॉलेज दिवस अनुभवू द्यायचे हे त्याचे मत होते.कारण कॉलेजची ही दोन वर्षे म्हणजे मुलांच्या तारुण्याच्या सुरुवातीची एक हळुवार पहाट आहे असे वाटायचे त्याला.कारण दहावीपर्यंत मुलं शाळेच्या शिस्तीत अन लगेच त्यांना डिप्लोमा वगैरे प्रोफेशनल शिक्षणाला टाकून त्यांच्यातली तारुण्याची कळी खुलण्याआधीच त्यांना करियर वगैरेची चिंता लावून देणे म्हणजे अमानवी वाटायचे त्याला.तडक प्रोफेशनल शिक्षणाला प्रवेश घेण्याआधी मुलांनी थोडे कॉलेज लाईफ अनुभवले पाहिजे.थोडी मजा घेतली पाहिजे.तणाव विरहित थोडे हुंदडले पाहिजे असे त्याचे स्पष्ट मत.त्यामुळे त्याने पोराला कॉलेजला टाकले,शास्त्र शाखेत.अन ते साहजिक होतं. परंतु पोराने हद्द केली,अकरावीत अक्षरशः काठावर पास झालं. हा प्रचंड विचलित झाला.पालक होणे ही काय चीझ आहे त्याला चांगलीच कळली.कधी नव्हे ते पहिल्यांदा तो पोराच्या काळजीने हादरला.आतापर्यंत तो जे वागला,जे विचार केले त्यालाच पोराने छेद दिला होता.आपण जे वागलो ते चुकीचे होते या विचारानेच तो पार कोलमडून गेला.सुरुवातीपासून मित्रांच्या सांगण्याप्रमाणे वागायला हवं होतं असं वाटू लागलं.पण एक मन मानत नव्हतं,पोरगं थोडं भरकटल असेल,झाला असेल निष्काळजी पणा.परंतु बारावीतही तेच.नापास होता होता पोरगं वाचलं.असेही नाही की त्याला क्लासेस लावले नव्हते.असं का होतंय त्याला काही समजेना.अन पोराने बॉम्ब टाकला की त्याला आर्टस् करायचे.बापरे!आता हे काय नवीन ? तसे आर्टस् बद्दल त्याचे वाईट मत आजिबात नव्हते.परंतु आर्टस् च्या मुलांची परिस्थिती तो पहात होता.पण तरीही त्याने पोराचे आर्टस् चे ऍडमिशन केले.अगदी शेवटच्या क्षणाला.पण एक मन खट्टू होतं.
पोराचं चाललं की त्याला आर्टस् मूळ भरपूर वेळ मिळेल अन त्याला स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देता येईल.तसे हा युक्तिवाद रास्त होता.परंतु स्पर्धा परीक्षा आजकाल कुठं नियमित होतायत.त्यात वेळ गेला अन समजा काही झाले नाही तर पुढे काय? आर्टस् ने असे काय होणार ? त्याच्यातला बाप आणि सद्य परिस्थितीची जाण असलेला लॉजिकल माणूस यात भयंकर द्वंद्व चालू झालं. अन पोरगं सिंसिअर असलं तरी त्याच्या निर्णयावर ठाम होतं. आता ही गाठ कशी सोडवायची?त्यासाठी त्याने त्याच्या शहरातल्या एका नामांकित संस्थेत पोराची ऍपटीट्युड टेस्ट घेतली.तिचा निकाल येणं बाकी होतं. अन त्याचा आज नेमका शेवटचा दिवस,उद्या कामावर परतायचं होत.ही कोंडी त्याच्या मित्राच्या फोनने अचानक फोडली.हा जेव्हा बाहेरून घरी गेला त्यावेळी पोरगं चिडलेलं होतं, कारण मित्राने चांगलाच क्लास घेतला होता त्याचा.आता याने स्वतःकडे सगळी सूत्रं घेतली.पोराला हळुवार समजावून सांगितलं.तसे याचे समजावणे खूप परिणाम कारक. त्याच्या बोलण्याने पोरगं एकदम उर्जित झालं.अन त्यात विशेष त्या ऍपटीट्युड टेस्ट चा निकाल आला,त्यात त्याला चांगले गुण मिळाले.अन त्या मॅडम नेही पोराला झापलं की एवढे पोटेनशियल असतांना त्याने फक्त आळस केलेला होता.आळसानेच त्याचा घात केलेला होता.पोराच्या डोळ्यात त्यामुळे चांगले अंजन गेले.
अन विशेष म्हणजे हा सर्वात समाधानी होता कारण त्याच्यातली अपराधी पणाची जाणीव आपोआप गळून पडली होती.नवीन आशा पल्लवित झाल्या होत्या.एक बिनकामाच्या कुशंकेचे जे मळभ त्याच्या मनात दाटले होते ते विरून गेले होते.अन विशेष म्हणजे पोरगं ही जे मरगळ लेलं होत त्यालाही उभारी आलेली होती.त्याच्या आईने स्वतःहून फोन करून सांगितलं कि आजकाल त्याच्या वागण्या बोलण्यात खूप सकारात्मक बदल झालेला होता.त्यामुळे हा सुखावला होता.पोरानं स्वतःहून जाऊन आर्टस् चे ऍडमिशन रद्द करून इंजिनियरिंग ला ऍडमिशन घेतले होते.अन फोन करून सांगितलं की आता चिंता करू नका,मी करीन.
जरी भविष्यात काय होणार माहीत नाही तरी तो या स्टेज च्या आशादायी माईलस्टोन ने खूप खुश होता.

जीवनमानप्रकटन