मिपा कला संग्रहालय - ०. प्रस्तावना

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in मिपा कलादालन
8 Jul 2024 - 8:41 pm

रसिक मिपाकरहो,

आपले सर्वांचे लाडके आणि आदरणीय मिपाकर चित्रगुप्त अर्थात शरद सोवनी यांच्या सोबत झालेल्या कित्येक चर्चांमधुन मिपावर दर्जेदार कलाकृती, वास्तुकला इत्यादिंविषयी विविध लेखमाला सुरू कराव्यात अशी कल्पना सुचली .
ह्या संग्रहालयात वेळोवेळी रसिक मिपाकरांनी आपापली भर घालत राहून कलाविषयक संदर्भांचा एक मोठा खजिना निर्माण करावा, या हेतुने हा प्ररंभिक लेख सादर करत आहोत.

भुमिका :

नुकतेच आषाढ शुक्ल प्रतिपदेला आपण "कविकुलगुरु कालिदास दिन" साजरा केला. दरवर्षी ह्या निमित्ताने मनात विचार डोकाऊन जातो की आपल्या आयुष्यात साहित्य, संगीत आणि कला हे नसते तर आपले आयुष्य किती कृत्रीम आणि रटाळ होऊन गेले असते. एका सुभाषितात अतिषय सुंदर असे म्हणुन ठेवले आहे -

साहित्य-संगीत कलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः।
तृणं न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनाम् ।।

साहित्य संगीत कला विहीनः असा मनुष्य साक्षात् शिंगे आणि शेपटी नसलेल्या पशु समानच आहे, तो गवत खात नाही फक्त जीवन ढकलत आहे मात्र त्याचे भाग्य हे परम पशुप्रमाणेच आहे!

आता सर्वांच्याच अंगी काही कलागुण नसतात, पण बहुतांश सुसंस्कृत लोकं हे नक्कीच कलागुणांचे चाहते असतात. पण तरीही सर्वांनाच कलेचा परिपुर्ण आस्वाद घेता येतोच असे नाही. कित्येकदा आपण आपल्या नेहमीच्याच आयुष्यात इतके व्यस्त होऊन जातो की कला बघायला , समजुन घ्यायला वेळच होत नाही. किमान आपल्याला कलेची तोंड ओळख असावी , आपल्या आसपास जे कलाकार आहेत त्यांच्या अनुभवातुन, त्यांच्या नजरेतुन कलेची किमान तोंडओळख व्हावी म्हणुन हे मिपावरील संग्रहालय सुरु करावे अशी स्फुर्ती जाहली. अर्थात इंटरनेटवर स्क्रोल करत करत Creazione di Adamo चे चित्र पाहणे आणि सिस्टिन शॅपेल मध्ये त्या भव्य डोम खाली उभे राहुन जसे मायकल अँजेलोने उभे राहुन चित्र काढले असेल तसे त्याच्या नजरेने चित्र पाहणे ह्यात जमीन आस्मानचा फरक आहे. पण किमान कोठे तरी सुरुवात करु. आधी ते पहाण्याची मनात इच्छा तरी करु, पुढे योग येईलच प्रत्यक्षात पाहण्याचा !
शुभस्य शीघ्रम् !
_________________________________________________

ह्या लेखमालिकेत विविध धाग्यांसाठी साधारणतः खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल. प्रत्येक प्रकारासाठी स्वतंत्र लेख करता येईल. जसे -

१. पुराणकथांचे चित्रण : ग्रीक-रोमन पुराणकथा, उत्तर युरोपच्या पुराणकथा, कृष्णलीला, रामायण - महाभारत, आफ्रिकन, चिनी वगैरे प्राणकथांचे चित्रण.
२.निसर्गचित्रण : विविध भारतीय शैलीच्या चित्रात ते कसे केले आहे, युरोपात ते कसे विकसित झाले, चिनी-जपानी निसर्गचित्रे, बालचित्रकलेतील निसर्ग वगैरे.
३ .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण.
४. वरील तीन प्रकारात न बसणारे कलाप्रकार - लोककला, आदिम कला, अमूर्त वा केवल चित्रकला, अन्य काही वेगळे प्रयोग वगैरे. यातच मिपाकरांनी बघितलेल्या विविध प्रदर्शनांमधील वा संग्रहालयातील कलाकृती वगैरेंची माहिती, कलाकृती संग्रहित करता येती.
५. फक्त रेखाचित्रे आणि श्वेत-श्याम चित्रे - जगभरातील कुठलीही आणि केंव्हाचीही.
६. मूर्तीकला - प्राचीन आणि अर्वाचीन.
७. वास्तुकला : निरनिराळ्या संस्कृतींमधील उतमोत्तम वास्तूंचे फोटो, रेखाचित्रे, नकाशे वगैरे.
८. जुनी, आता दुर्मीळ झालेली दर्जेदार कॉमिक्स, चांदोबा वगैरेतली चित्रे. नव्याजुन्या पुस्तकांची मुखपृष्ठे,
९. आवडलेली शिल्पे. यात कोणत्याही काळातली, माध्यमातली शिल्पे देता येतील.
१०. मिपाकरांची स्वतःची कला. (प्रत्यक्ष आणि कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे निर्मिलेली) मिपाकरांनी या मालिकेतच स्वतः निर्मिलेल्या कलाकृती देणे अपेक्षित आहे.

कलाकृती देऊन त्याखाली कलाकृतीचे शीर्षक, कलावंताचे नाव (इंग्रजी स्पेलिंग) देश, निर्मिती वर्ष शिवाय वाटल्यास आणखी काही अनुषांगिक माहिती, जालावरील काही उपयुक्त दुवे वगैरे देता येतील.

काही सर्वसाधारण नियम :

१. कृपया राजकारण अथवा अन्य विषय इथे आणु नयेत, हे एक व्हर्च्युअल कला चित्र संगहालय आहे असे समजुन त्याची स्वच्छता, निगा राखावी.
२. विषयांतर टाळावे, एका विषयावरील धाग्यावर अन्य विषयातील चित्रे टाकु नयेत.
३. चित्रे शक्यतो ठराविक साइझ १०२४ * ७६८ असावीत, मोठ्ठ्या चित्राची लिंक उपलब्ध असल्यास जरुर द्यावी.
४. चित्राचे रसग्रहण करण्यास हरकत नाही मात्र उगाच गटणे शैलीतील पंचनामा करु नये. चर्चेचे स्वागत आहेच मात्र आपण कोणाचा रसभंग तर करत नाही ना ह्याची काळजी घ्यावी.
५. चित्राच्या वापरासंबंधात कॉपीराईटचे नियम असले तर ते उध्दृत करणे अत्यावष्यक आहे. बहुतांश वेळा अभिजात चित्रे विकिपेडीया कॉमन्स वर उपलब्ध असतात.
६. कृपया इन्स्टाग्रामवरील नवकलाकारांची चित्रे इथे देऊ नयेत. आपण कलाकाराच्या पेज ची लिंक देऊ शकता जेणे करुन त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल. सदरहु कलाकाराला मिपावर बोलवता आले तर उत्तमच!
७. हा प्रोजेक्ट स्वान्तःसुखाय आहे. स्वतः कला समजुन घेण्यासाठी आणि समविचारी मिपाकर कलारसिकांच्या आनंदासाठी, आनंद वाटुन घेण्यासाठी आहे. आपल्याला काही सुचना द्यायच्या असतील तर धागा लेखकाला व्यनि मधुन कळावावे.

इत्यलम !
_________________________________________________________

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Jul 2024 - 9:34 pm | मुक्त विहारि

मस्त...

चित्रगुप्त's picture

8 Jul 2024 - 9:59 pm | चित्रगुप्त

मिपा कलासंग्रहालयाचा प्रारंभ होतो आहे, ही खूपच आनंदाची बाब आहे. रसिक मिपाकरांनी यात वेळोवेळी भर घालत राहून हा संग्रह अधिकाधिक संपन्न करत रहावा ही विनंती.

कंजूस's picture

9 Jul 2024 - 4:37 am | कंजूस

मला रेखाचित्रे आवडतात. माथेरान,काश्मीर,अबू, रामेश्ववर वगैरे वर्तमानकाळातील . व्यक्ती चित्रे रंगीत आणि रेखाचित्रे दोन्ही असावी.

बिपीन सुरेश सांगळे's picture

9 Jul 2024 - 7:29 am | बिपीन सुरेश सांगळे

चित्रगुप्त
प्रसादजी

अवांत गार्द !

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2024 - 6:03 pm | चौथा कोनाडा

मस्त .. छान सुरूवात !

+१

प्राचीन कला, चित्रकला इतिहास इ बद्द्ल सुंदर मेजवानी सुरू होत आहे !