हिमालयाच्या कुशीत - चोप्ता- चन्द्रशिला ट्रेक

सावि's picture
सावि in भटकंती
14 Jul 2023 - 4:06 pm

"अबे चल ना बे, काही नाही होत... मस्त मजा करू" बस एवढ्याच खात्रीलायक आणि दमदार वाक्यानी राहुल नी मला पटवलं. तसं तर निखिल ने सुद्धा आधी विचारलं होतं की आपण ट्रेक ला जायचं का, पण पुण्यात राहून ट्रेक म्हणजे सह्याद्री आणि त्यातही सिंहगड ! पण या वेळी काहीतरी वेगळं शिजत होतं, ट्रेकिंग ला जायचं, ते पण हिमालयात ! तसं आमच्या पैकी ट्रेक करणे ही काही आवड किंवा छंद नाही कोणाचाच, पण "कुछ तुफानी करते है, और कुछ अलग करते है" याच तत्वावर हिमालय च्या कुशीत कुठेतरी जायचं ठरलं. अगदी थोडा म्हणजे १ वेळा सिंहगड चा ट्रेक आणि २-३ पावसाळी सह्याद्री चे ट्रेक, एवढीच अनुभवाची शिदोरी सोबत घेऊन हा भला मोठा प्लॅन तयार होत होता. तसं आम्ही ६-७ वर्षाआधी लेह ला बाईक ट्रिप केली होती, तेवढा हिमालय बघण्याचा अनुभव होता पण आमच्यासाठी ट्रेकिंग वेगळेच विश्व असणार होते, आणि असे ४ मित्र तयारीस लागलो.

मार्च मधेच निखिल ने बहुधा सगळंच आधी विचारून ठेवल्यामुळे, आमच्या साठी बऱ्यापैकी सोयीचे झाले होते. उत्तराखंड मधील देवरियाताल -चोपता-तुंगनाथ-चंद्रशिला ट्रेक साठी बुकिंग झाले. ३१ मार्च ला पुणे वरून दिल्ली आणि ८ एप्रिल ला परत असे बुकिंग झाले. ट्रेकिंग साठी खूप वेगवेगळे सामान लागणार होते, त्याची यादी तयार झाली, कॉन्फेरंस कॉल घेऊन बॅग कशी पॅक करावी याच्या यथेच्छ चर्चा झाल्या.

ट्रेक करवून घेणाऱ्या कंपनी ने तुमच्या फिटनेस साठी एक साधा नियम सांगितला होता, ३५ मिनिटात ४ किलोमीटर पूर्ण होत असेल तर तुम्ही या ट्रेक साठी फिट आहात असे समजावे. ट्रेक ला ३ आठवडे होते तर रोज चालणे सुरु केले, पहिल्या दिवशी ४ किलोमीटरला ५२ मिनिट लागले तेंव्हाच कळलं दिल्ली अभी दूर है. पण पुढच्या २ आठवड्यात, ४ किलोमीटर ३५ मिनिट मध्ये कमावल्या नंतर थोडा आत्मविश्वास वाढला. मग ४-५ दिवस १० मजले पायऱ्या चढणे उतरणे याची प्रॅक्टिस केली, शेवटच्या दिवस पर्यंत एका दमात ४० मजले चढू शकलो होतो. आता १ दिवस आराम करून दिल्ली साठी रवाना व्हायचे होते.

शुक्रवारी रात्री १ वाजता पुण्यावरून विमानाने निघून रात्री ३ वाजता दिल्ली ला पोचलो, विमानतळावर रिकामे बाक आणि खुर्च्या शोधून गरजेची १ तासाची झोप घेतली. तिथून मेट्रो ने दिल्ली स्टेशन ला जाऊन हरिद्वारच्या ट्रेन मध्ये बसलो. १२ वाजता हरिद्वार ला पोचलो, आम्हाला पुढे ऋषिकेश ला पोचायचे होते. हर की पोडी ला जाऊन फेमस मोहनजी पुरीवाले यांची पुरी सब्जी आणि खस्ता कचोरी वर ताव मारून, ऋषिकेश साठी निघालो. २ दिवस आधी पाऊस झाल्यामुळे तिथे गार वातावरण झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता जमण्याचे निर्देश असल्याने आणि काल पासून झोप न झाल्याने, आता ९ वाजताच लवकर झोपलो. पण हाय रे किस्मत - रात्री २ वाजता जाग आली, मी आणि निखिल गप्पा मारत बसलो.

ट्रेक द हिमालयाज - च्या ऑफिस समोर सकाळी ६:३० ला सगळी मंडळी जमली होती. ३ गाड्या त्यावर सामान चढवणे सुरु होते, आधीच भाड्याने बुक केलेल्या बूट, पॅन्ट, ट्रेकिंग साठी च्या स्टिक घेऊन, आम्ही आपल्या जागा घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये बसलो. ऋषिकेश ते सारी गाव, हा प्रवास अतिशय प्रेक्षणीय - रस्त्याच्या एका बाजूला गंगा आणि दुसऱ्या बाजूला हळू हळू आपली उंची वाढवत जाणारे हिमालयाचे पर्वत ! जातांना देव प्रयाग आणि रुद्र प्रयाग चे दर्शन घेतले. केदारनाथ करून येणारी मंदाकिनी आणि बद्रीनाथ कडून येणारी भागीरथी एक अवखळ आणि एक रौद्र रूपात रुद्रप्रयाग येथे भेटतात. इथून भागीरथी झालेली नदी पुढे देवप्रयाग ला अलकनंदा ला जाऊन भेटते आणि आपल्याला पहिल्यांदा "गंगा" दर्शन होते ते देवप्रयागला ! पुढचा प्रवास करत दुपारी सारी गावात पोचलो, आमचं स्वागत गरमागरम जेवणाने केलं. दुपारी कोणीही झोपू नका असा निर्देश असल्यामुळे आम्ही जेवण झाल्यावर सारी गावात फेरफटका मारला. ४-५ मोठ्या पर्वत शिखरांच्या मध्ये वसलेलं, मोहरी, गहू आणि भाज्या यांच्या शेती असलेला छोटंसं एक दूरस्थ टुमदार गाव. टाटा ट्रस्ट ने बांधून दिलेल्या सुदंर शाळेला भेट देऊन कौतुक वाटलं.

सारी गाव

संध्याकाळी चहा नंतर ट्रेक गाईड ने उद्या सुरु होणाऱ्या ट्रेक बद्दल माहिती दिली. अजूनही झोप पुरेशी झाली नसल्याने रात्री लवकर निजानीज झाली, सकाळी लवकर उठून बॅग पाठीवर घेऊन ट्रेक साठी सगळेच सज्ज झाले होते. "प्रवेशद्वार देवरियातल" या कमानी खालून आमचा प्रवास सुरु करून सारी गावाचा निरोप घेतला. सकाळी निघतांना खूप गारठा असल्याने जॅकेट्स टोपी घातलेले सगळे, काहीच अंतर चालल्यानंतर गर्मी होतेय म्हणून निघू लागले. पहिल्या दिवसाचा ट्रेक ६ किलोमीटर चा होता, १ तास वर चढाई केल्यानंतर सगळे थांबले, कौतुकाने विचारलं तर कळलं की, फक्त १ किलोमीटरच झाला आहे. प्रचंड उंच पर्वत आमची परीक्षा बघत होता, पण आम्हाला काय माहित हि फक्त चाचणी परीक्षाच आहे. आता जसे जसे वर जात होतो, सारी गाव हळू हळू छोटे होत होते. काही पायवाट दगडांने बांधलेल्या तर बऱ्याच नैसर्गिक होत्या. पर्वताच्या उंचीवर पोचल्यावर काही ठिकाणी अतिशय काठा काठाने जाणारी हि पायवाट खाली पाहून चालण्यास सांगत होती पण आतापर्यंत या विशाल पर्वताच्या मागे दडलेले हिमालयाचे उत्तुंग हिमशिखरे आणि रांगा दिसताच, त्यांच्या कडे कुतूहलाने बघण्यास उद्युक्त करत होती. आता दोन्ही कडे प्रचंड मोठा खोल प्रदेश आणि दूर पर्यंत दिसणारे दिसणारे शिखरे, एका दिशेस कमी उंचीचे पर्वतांची रांग त्यामुळे हिरवेगार झाडींने व्यापलेले तर दुसरी कडे केदार पर्वत रांग, चोखंबा , नीलकंठ, कलंग अशी एका पेक्षा एक सुंदर आणि संपूर्ण बर्फाची रजई पांघरून ऐटीत डोकावणारे पर्वत ! वर चढतांना निघालेले जॅकेट हळू हळू पुन्हा अंगावर आले, हिमालयात वातावरण कसे बदलते याचा अनुभव देणे सुरु केले. आम्ही जवळपास ६ किलोमीटर पार करून देवरियाताल च्या कॅम्प ला पोचलो आणि तंबू मध्ये थोडा आराम करत बसलो आणि गरमा गरम जेवण केले. वातावरण पूर्ण बदलून, पाऊस थंडी आणि गारपीट सुरु झाली. खूप वाट न बघता, ट्रेक गाईड ने रेनकोट घालून देवरियातील ला निघूया असे सांगितले. अर्धा तास चालून आम्ही एका नितांत सुंदर सरोवराजवळ पोचलो, वरून पडणारे अस्मानी हिमगोळे आणि आजूबाजूच्या वनराई ला चिंब करून टाकणारे तुषार यांनी पण विश्राम घेतला आणि काही क्षणात आकाश निरभ्र होऊ लागले.

हिरवळीवर थबकलेले पावसाचे थेम्ब, एका दिशेला पसरलेला गर्द झाडीचा प्रदेश, शांत आणि संपूर्ण परिसराचे प्रतिबिंब दाखवणारा तो देवरियाताल सरोवर ! अहाहा ! दिवसभराचा आमचा सगळा शीण आणि थकवा कसा निघून गेला कळलं च नाही, उलट सगळ्यांनी निसर्गाचा आस्वाद घेतल्या नंतर धावपळ करून काही मैदानी खेळांनी आपले मन रमविले. देवरियाताल म्हणजे पांडव ज्या वेळी हिमालयात फिरत होते आणि पाणी पिण्यासाठी तलाव शोधत होते. एक एक पांडव तलावाजवळ येऊन पाणी घेण्यासाठी आले पण यक्ष या तलावाचे रक्षण करत असल्यामुळे त्याने त्यांना बेशुद्ध केले. शेवटी युधिष्ठिर ने येऊन यक्षाच्या ५ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन आपल्या सगळ्या भावंडांना जागे केले. त्याच यक्षप्रश्नाची जागा म्हणजे देवरियाताल सरोवर !! सृष्टीसौन्दर्य, निरव शांतता, आरश्याला लाजवेल इतकं सुंदर प्रतिबिंब देणारे स्तिथप्रज्ञ पाणी, सगळं डोळ्यामध्ये आणि कॅमेरा मध्ये साठवायचा प्रयत्न करून आम्ही पुन्हा कॅम्प कडे निघालो. रात्री लवकर जेवण झाले, ३ दिवस झालेत झोप अजून शिल्लक च होती म्हणून ८ वाजताच सगळे झोपले. रात्री १० वाजता माझा फोन वाजल्यामुळे जाग आली आणि हाय रे किस्मत, पुन्हा झोप लागलीच नाही.

देवरियाताल सरोवर

सकाळी ४ वाजता सगळे उठून ५:३० पर्यंत तयार होऊन न्याहारी करायला आलो. तिथेच आम्ही सोबत आणलेले रिकामे जेवणाचे डबे दुपारच्या जेवणासाठी भरून दिले. आज ३ दिवसांच्या ट्रेक मधला सगळ्यात मोठा म्हणजे १६ किलोमीटर चा पल्ला होता. सकाळी ६:३० ला सगळे उत्साहात निघालो. आजच्या साठी स्पष्ट निर्देश होते, "अजून किती उरले आहे विचारायचं नाही !". ३ मोठे पर्वत चढणे उतारणे आणि त्या ३ पर्वतांच्या मध्ये जंगलातील वाटेतून जाणे, असा आजचा ढोबळमानाने आराखडा होता. हिमालयात १६ किलोमीटर किती असेल याचा अंदाज लावूच शकत नव्हतो. पहिला पर्वत सर करून खाली उतरलो आणि जंगलातील छोटे मोठे उतार चढाव सुरु झाले. कधी गर्द झाडीतून, कधी दोन्ही बाजूंच्या झाडांच्या फांद्यांनी बनलेल्या मांडवातून, कधी बुरांस या लाल चुटुक फुलांच्या पडलेल्या सड्यावरून, कधी हलकेच पाणी असलेल्या ओढ्यातून, कधी प्रचंड मोठे बुंधे असलेल्या वृक्षांच्या मधून, कधी आडव्या पडलेल्या झाडाखालून, कधी दिसणाऱ्या पाय वाटेवरून तर कधी अदृश्य चाकोरीबाहेरचा रस्त्यावरून, कधी पानगळ झालेल्या पानांवरुन तर कधी कधीही न बघितलेल्या एखाद्या सुंदर पक्ष्याच्या बाजूने, आमचा प्रवास चालूच होता. जवळपास ६ तास चालल्या नंतर रोहिणी बुगीयाल या ठिकाणी थांबलो. उंच हिमालयात अनेक सूचिपर्णी आणि प्रचंड मोठ्या वृक्षांच्या जंगलामध्ये अचानक भलेमोठे पठार होते जिथे एकसुद्धा झाड नाही, आहे ती फक्त नाजूक गवताच्या लवलवत्या पात्यांची हिरवीगार मखमली गालिचे ! या प्रकारच्या पठाराला इथे बुगीयाल म्हणतात. निर्देश आला इथेच आपण जेवून घेऊ. भराभर सगळ्यांचे डबे उघडले, पुरी आणि बटाट्याची सुखी भाजी बघून आनंद झाला. ६ तास वर खाली चालल्यानंतर भूक लागली असतांना, बसायला नैसर्गिक हिरवा गालिचा, थंड हवेचे झुळूक, बघायला समोर टीव्ही नाही तर विस्तीर्ण हिमालयाचे विहंगम दृश्य ! या पुरीभाजी ची मजा काही औरच होती ! थोडा आराम करून आम्ही पुढचा टप्पा गाठण्यास निघालो, इथून पुढे गेल्यावर एक अत्यंत तीक्ष्ण आणि मोठा उतार असलेला पर्वत होता, जवळपास १ किलोमीटर ची घसरगुंडी सदृश रस्ता कापल्यानंतर "आकाश कामिनी" या स्वच्छ झऱ्याजवळ पोचलो. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण किंवा भेसळ याची तसूभरही शक्यता नसलेले पाणी पिऊन आणि चेहरा धुवून तरतरी आली. थोडा आराम करणार तेवढ्यात हलका पाऊस सुरु झाला, म्हणून लगेच पुढे वाटचाल सुरु केली. आता जेवढी मोठी घसरगुंडी उतरलो होतो त्यापेक्षा मोठी घसरगुंडी आता चढायची होती, हा शेवटचा टप्पा होता पण थकवा आणि पाय हळू हळू आपले आपले डोके वर काढत होते. थांबत थांबत भरपूर वेळा विश्राम करत, थोडा पावसातून, गारपिटीतून हळू हळू पुढे जात होतो. ग्रुप मधले काही समोर गेले काही मागून येत होते. दुपारचे ३ वाजले आणि आम्हाला रस्ता दिसला, तिथेच आमची गाडी आम्हाला घ्यायला थांबली होती. आमचे आजचे १६ किलोमीटर पूर्ण झाले होते, एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंदाने गाडीत जाऊन बसलो. इथून चोपता या गावात पोचलो, गरमागरम मॅग्गी आणि फक्कड चहा पिऊन उरलेला थकवा घालवण्याचा प्रयत्न केला.

बुरांस फुल

४ दिवस झोप नव्हती झाली, म्हणून मी आज ७ वाजताच न जेवता झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सुद्धा ६ वाजता निघायचे होते आणि तो दिवस शेवटचा व शिखर गाठण्याचा दिवस होता. ८ वाजता कळले, फॉरेस्ट डिपार्टमेंट ने या मौसमात पहिल्यांदा रात्री ट्रेक करण्यास परवानगी दिली आणि आमच्या ट्रेक गाईड ने लगेच सगळ्यांना सांगितले सकाळी २ वाजता तयार रहा, जमल्यास सूर्योदय बघूया. हे प्लँनिंग चालू असतांना रात्री जोरदार पाऊस सुरु होता, असाच पाऊस सुरु राहिला तर उशिरा निघावं लागेल असे सुद्धा ठरले. आम्ही पुन्हा ९ वाजता झोपून १२:३० ला उठलो तयारी करून १:३० ला चहा आणि हलके खाल्ले आणि आम्ही २ वाजता निघालो.

रात्री २

तुंगनाथ मंदिराच्या पायथ्याशी

प्रवास सुरु

रात्री २:४५ ला तुंगनाथ मंदिराच्या पायथ्याशी पायथ्याशी पोचलो, इथून आमचा शिखराकडचा म्हणजे चंद्रशिला टोकाचा प्रवास सुरु होणार होता. तृतीय केदार - तुंगनाथ लिहिलेल्या कमानीतून आम्ही वर जाणे सुरु केले, हवामानात प्रचंड गारठा होता. पायऱ्या आणि दगडं गुळगुळीत झाले होते त्यावर जमलेल्या बर्फाच्या बारीक थरामुळे. आजूबाजूला जंगल होते पण सगळंच अंधार असल्यामुळे काही जाणवत नव्हते. टॉर्च च्या उजेडात हळू हळू पुढे जाणे सुरु होते. काही अंतरानंतर झाडी कमी झाली आणि संपूर्ण मोकळा प्रदेश दिसत होता. सगळीकडे पसरलेला शुभ्र बर्फ आणि त्यावर पडणारी पौर्णिमेच्या चंद्राचे किरणे त्याला अजूनच लक्ख करत होती. आकाशातील असंख्य तारे बघून आकाशातही गारपीट झालीय की काय असे वाटत होतं. आजूबाजूला दिसणारा बर्फ आता वाटेतही भरपूर पडला होता, आमच्या बुटांना बर्फावर चालण्यासाठी खिळ्यांच्या साखळ्या लावल्या. जवळपास १ तास झाल्यानंतर मला श्वासाचा त्रास होऊ लागला. थोडं चाललं की दम लागत होता, विरळ झालेला ऑक्सिजन आणि बहुधा पूर्ण न झालेली झोप हि सुद्धा याला कारणीभूत असू शकत होती . नितीन, राहुल, निखिल, तिघेही माझ्या सोबतीने समोर मागे थांबत वर चढत होते, मी जेंव्हा जेंव्हा थांबलो तेंव्हा हे सोबत होतेच. मोठे मोठे श्वास उरात भरत तुंगनाथ मंदिरापर्यंत पोचलो. हे ५ केदार पैकी एक मंदिर आहे, बांधकाम कलाकृती अगदी केदारनाथ सारखीच आहे. केदारनाथ यात्रा सुरु झाली की मंदिराचे द्वार उघडतात म्हणून आम्ही बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो. इथे "चंद्रशिला १ किलोमीटर" अशी पाटी लावली आहे आणि त्याच्या बाण आकाशाकडे केला आहे.

चंद्रशिला १ किलोमीटर

निखिल आणि राहुल थोडे समोर होते, ते मागे फिरले आणि आमची वाट बघत उभे राहिले. मागे का आले विचारलं तर त्यांनी ते चंद्रशिला टोक दाखवलं. पाटीवरचा बाण आकाशाकडे का होता हे त्या टोकाकडे पाहून समजत होतं. अगदी ४५ डिग्री च्या कोनात सरळ दूरवर एक छोटा सा झेंडा दिसत होता, दूर काही लोक बर्फातून काढलेल्या वाटेतून जातांना अगदी मुंग्यांसारखे दिसत होते. यावेळेस माझा धीर सुटतो का असं वाटत असतांना, निखिल ने विचारले - पुढे जायच आहे का ? नसेल जमत तर आपण थांबू. मी म्हंटल इथेपर्यंत आलो आहे तर जाऊ हळू हळू. ट्रेक गाईड एखाद्या सराईत प्रशिक्षकाप्रमाणे माझा आत्मविश्वास वाढवत होता. इथला ट्रेक अनेकांच्या मनात आपल्या क्षमते विषयी थोडी शंका नक्कीच जागृत करतो. आदल्या रात्री कॅम्प मध्ये जो पाऊस पडला तोच या ठिकाणी बर्फाच्या स्वरूपात पडला होता. जवळपास २-३ फूट खोल बर्फ जमा झाला होता. एखाद्या सॅन्डविच च्या कापलेल्या त्रिकोणावर कुठल्याही डाएटिंग ची तमा न बाळगता तो सॅन्डविच दिसणार नाही एवढं चीज किसून टाकावं तसं त्या पर्वतावर मनसोक्त बर्फाचे आच्छादन होते. आमच्या ग्रुप मुळेच तयार झालेले पायांचे ठसे हेच मागच्यांसाठी पायवाटेचा काम करणार होते. तीव्र उतार, उंचीमुळे कमी होणारे ऑक्सिजन, उणे ४ एवढी थंडी, बर्फात गार झालेले बूट, पायाची आणि हाताची दुखणारी बोटे, थंडीमुळे नाकातून गळणारे पाणी आणि सोबत " हां हां, हो जायेगा, बस थोडा हि बचा है" अशी ट्रेक गाईड ची आशादायी वाक्य ऐकत हळू हळू टोकाच्या जवळ पोचलो. नितीन, राहुल, निखिल ५ मिनिट आधी पोचले आणि वरून मला टाळ्या वाजवून उत्साह वाढवत होते. त्याच्या डोळ्यात शिखर सर केल्याचा आनंद दिसत होता. मी वर पोचलो आणि सगळयांनी आनंदानी मिठी मारली, आनंद द्विगुणीत होणे त्यांच्या डोळ्यात दिसत होते.

बर्फातील प्रवास

चंद्रशिला टॉप

उतरणीचा प्रवास

चंद्रशिला टॉप वर म्हणजे १२,१०० फूट उंची वर आम्ही पोचलो होतो. ३ दिवसात ३० किलोमीटर, ८ छोटी मोठी पर्वत, असंख्य हास्याचे फवारे, फुफुसांच्या भात्याला अविरत दिलेले अवघड काम आणि जवळपास ६,००० फूट चढाई करून आम्ही हे शिखर गाठले होते. अंगावर पहिल्यांदा ऊन आल्यामुळे थोडी उब येत होती. खालून छोटासा दिसणारा झेंडा म्हणजे छोटेसे गंगेचं मंदिर चे दर्शन झाले. काल पर्यंत अतिशय प्रतिकूल असलेला निसर्ग आज आमच्या सोबत होता. निरभ्र आकाशा मुळे कित्येक मैल दूर पर्यंत हिमालयाचे शिखरं दिसत होते आजूबाजूला नंदादेवी, बंदरपूछ, द्रोणागिरी, केदार शिखर, त्रिशूल, चोखम्बा अशी एक ना अनेक शिखरे स्पष्ट दिसत होती. थोडा वेळ आनंदोत्सव साजरा करून जमेल तेवढे क्षण कॅमेरा मध्ये काबीज करून उतरणीचा रस्ता धरला. पहिलाच पण, प्रत्येक क्षण हवाहवासा करणारा एक नितांत सुंदर अनुभव ! नशीबच लागतं असे रोमांचकारी अनुभव घ्यायला किंवा तुमच्या नशिबात असावे लागतात असे अनुभव घडवून आणणारे मित्र ! नवीन ट्रेक ची नांदी घेऊन आणि चैतन्याची बॅटरी फुल्ल चार्ज करून आम्ही पुण्याला परतलो.

प्रतिक्रिया

ट्रेकचे झकास वर्णन केले आहे.

अशा भन्नाट सफरींसाठी किमान ३ भाग आले पाहिजेत.. एक पूर्वतयारी + प्रवासाचा भाग आणि प्रत्यक्ष ट्रेकचे किमान २ भाग.

त्यामुळे याच ट्रेक बद्दल आणखी विस्ताराने लिहा.. वाचण्यास उत्सुक आहे.

फोटो दिसत नाहीयेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2023 - 5:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

अशा मोठया हिमालयीन ट्रेक साठी किमान २-३ भाग तरी पाहीजेतच. मस्त वर्णन केले आहे, पण फोटो पाहताना गणेशा झालाय. परत एकदा पब्लिक अ‍ॅक्सेस तपासुन बघा किवा संमं ना सांगा.

कंजूस's picture

14 Jul 2023 - 5:50 pm | कंजूस

हिमालयाच्या कुशीत ?हे हिमालयाच्या खांद्यावर आहे.
झटपट वर्णन आवडले. ट्रेकिंग आयोजकाबरोबर म्हणजे एवढे ठीक.

सावि's picture

14 Jul 2023 - 5:53 pm | सावि

धन्यवाद. पहिल्यांदाच लेख आणि त्यात फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे... फोटो का दिसत नाही हे अजून कळले नाही ...
लेख २-३ भागात करावा, अभिप्राय मान्य !

इथे पाहा.
गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.https://misalpav.com/node/47068

शशिकांत ओक's picture

14 Jul 2023 - 8:11 pm | शशिकांत ओक

मित्रांनो,
कदाचित माझे लिखाण या ट्रेकशी सुसंगत नसेल. पण हिमालय पर्वत राजी, छोटी छोटी गावे, वस्त्या, कडाक्याची थंडी, जानेवारी महिन्यातील बर्फाच्छादित रस्त्यावरील घसरडे आणि वाहतुकीस बंद रस्ते. हे सगळे अनुभवायला मिळाले ते चोप्ता हे खेडे शोधून काढायचा आदेश मिळाला होता म्हणून. तिथे काही गूढ लेखन वाट बघत आहे. पहा सापडतेय का? म्हणून तातडी होती ...!
कोणी विचारणा केली तर पुढचे लिहून पाहीन.

आनन्दा's picture

15 Jul 2023 - 10:46 pm | आनन्दा

काका लिहा की.
तुमच्या गूढ लेखांची मी नेहमी वाट पाहत असतो.

विवेकपटाईत's picture

15 Jul 2023 - 10:23 am | विवेकपटाईत

लेख आवडला

इपित्तर इतिहासकार's picture

15 Jul 2023 - 7:02 pm | इपित्तर इतिहासकार

पहिल्यांदा लेख टाकता आहात त्या मानाने लेखन अन् मांडणीची टापटीप उत्तम आहे. त्याबद्दल कौतुकच.

तुमचे लेखन झाकोळून टाकायला किंवा कमी लेखायला म्हणून नाही पण , एक लेखन परिपाठ म्हणून

मिसळपाव वर आधीच प्रकाशित झालेली ही ही चोपता चंद्रशिला तुंगनाथ भटकंती लेखमाला आवर्जून वाचा

सुदैवाने विषय अन् जागा एकच आहे त्यामुळे तुम्हाला लेखनाचा एक लयबद्ध आविष्कार शिकायला मिळेल अशी आशा आहे.

पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत,

शुभेच्छा

ई. ई.

कर्नलतपस्वी's picture

16 Jul 2023 - 6:32 pm | कर्नलतपस्वी

हिमालयातली ट्रेक एक वेगळाच अनुभव असतो. विषेशता हिवाळ्यात.

किल्लेदार's picture

17 Jul 2023 - 5:14 am | किल्लेदार

फोटो दिसत नाहीत. बरोब्बर दहा वर्षांपूर्वी (२०१३) चोप्ता, तुंगनाथ ला गेलो होतो. आठवणी ताज्या झाल्या. एकटाच असल्यामुळे चंद्रशिला ट्रेक केला नाही पण देवरिया ताल ला जाऊ शकलो.

वर्णन खूपच छान आणि 'साद घालती हिम शिखरे' असे लेखन छानच झालय.