दिंडी (गूढकथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
18 Sep 2022 - 9:51 pm

दिंडी (गूढकथा)

दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.
                पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही. एव्हाना या वेळेपर्यंत आम्ही कोठेतरी थांबायला हवे होते. तंबू ठोकून तयार व्हायला हवे होते. पण आज आमच्यातील कोणीच थांबायचे नाव घेत नव्हते. जो तो आपल्याच ध्यानात तल्लीन होऊन पुढे पुढे जात होता. कोणी कोणाला बोलत नव्हते. कोणी कोणाकडे बघत नव्हते. जो तो आपल्या नामस्मरणात मग्न होऊन पुढे पाऊल रेटत होता. जणू प्रत्येक जण समाधीस्त झाल्यासारखा आपल्याच विश्वात मश्गूल होता. मी मात्र पुरता गोंधळून गेलो होतो. माझा हा दिंडीचा पहिलाच अनुभव असल्याने हे आजचे चित्र माझ्या डोक्यावरून जात होते. आज दिंडीचा नूर काहीसा वेगळाच जाणवत होता. गेल्या अनेक दिवसांपासून मी दिंडी सोबत होतो, पण दिंडीत एवढी शांतता आज प्रथमच मी बघत होतो. खरेतर टाळांचा, मृदंगांचा, हरिनामाचा ध्वनी क्षणोक्षणी घुमणाऱ्या आमच्या समूहात, आजची शांतता कमालीची विरोधी जाणवत होती. मी पुरता गोंधळून गेलो होतो.
             रात्र आता अधिक गडद जाणवायला लागली होती. मध्यरात्रीनंतर अंधार एवढा गडद असतो, हे मी प्रथमच अनुभवत होतो. याचेच मला आश्चर्य वाटत होते. आमच्या श्वासांच्या आणि पावलांच्या आवाजा व्यतिरिक्त कसलाच आवाज कानावर पडत नव्हता. सगळीकडे नुसती शांतताच जाणवत होती.
             आता एक सपाट माळरान लागले होते. आसपासचा सगळा परिसर मोकळा जाणवायला लागला होता. आता चंद्र एका मोठ्या काळया ढगाआडून बाहेर आल्याने, त्याचा कोवळा प्रकाश माळरानावर चहूबाजूंनी पसरला जात होता. थोड्या वेळा पूर्वीचा आजूबाजूला पसरलेला गडद अंधार आता काहीसा सौम्य झाल्यासारखा वाटू लागला. तेवढे तरी बरे झाले होते. आता आजूबाजूचा परिसर  काही प्रमाणात तरी नजरेस पडत होता. निव्वळ गडद अंधारात वाटचाल करण्यापेक्षा असा सौम्य प्रकाश केव्हाही चांगलाच ना?
             
       मी दिंडीच्या अगदी मध्यभागी होतो. संथगतीने आमच्या सगळ्यांचे पावले पुढे पडत होते. आजूबाजूच्या माळरानाचा अफाट प्रदेश पसरलेला दिसत होता. माझे राहून राहून लक्ष आजुबाजूस जात होते. हि आजूबाजूची शांतता मला कमालीची उदासवानी जाणवू लागली. मला एका गोष्टीचे मोठे अप्रूप वाटू लागले. मी सोडता आमच्यातला प्रत्येक जण कसा अगदी समोर बघत, आपल्याच तंद्रीत पुढे चालत होता. पण का कोण जाणे, मला ती तंद्री साधता येईना गेली. मी सारखा चुळबुळत होतो. इकडे तिकडे, आजूबाजूला बघत होतो. डोक्यात नुसता गोंधळ उडालेला होता. एकदम जोरात ओरडुन, ही भोवतालची, ही दिंडीची शांतता भंग करावी, असे वाटत होते. आता मनात नुसत्या उलथा पालथी घडत होत्या. हि आजूबाजूची शांतता, मनात अशांतता माजवित होती.
            काही गोष्टींचे ज्ञान येण्यापूर्वी, तुम्हाला त्या गोष्टींच्या अनुभूतीची आवश्यकता असते. कोणत्याही गोष्टीचे मर्म माणसाला तेव्हाच कळते, जेव्हा त्या मर्माभोवती फिरणाऱ्या घटनांचे, अनुभवांचे, बरे वाईट क्षण तुमच्या वाट्याला येत नाहीत. माझा अनुभव, माझे वय आमच्यात सगळ्यात लहान असावे, म्हणून तर आजच्या या परिस्थितीचा अर्थ मला कळत नव्हता. आजूबाजूच्या ,भोवतालच्या या शांततेची, आमच्या दिंडीतल्या या शांततेशी सांगड घालणे, त्यामुळे तर मला जमत नव्हते. माझे विचार मर्यादित होते. एका वर्तुळाकार कक्षेच्या आतच ते फिरणारे होते. त्यामुळे या कक्षेबाहेर घडणाऱ्या, अनेक उलथा पालथींचा मला बोध होत नव्हता. मी कितीही या आजूबाजूच्या घडामोडींचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न करत असलो तरी, मला ते काहीच जमत नव्हते. उलट मी त्यात फोल ठरत असल्याने, वैतागून जात होतो. मी थकत चाललो होतो. पण, एक गोष्ट मला कळत होती, माझ्या अंतर्मनात उमटत होती, आजचे आपल्या भोवतीचे वातावरण नेहमीसारखे नाही. ते अगदी वेगळे आहे. अगदी रोजच्या पेक्षा  विरोधी आहे. ते मला जाणवत होते. त्याचे संकेत माझ्या अंतर्मनात, माळरान लागल्यापासून उमटत होते. फक्त त्या संकेतामागची पार्श्वभूमी मला कळात नव्हती. त्याच्या पाठीमागील कारणमीमांसा मला अजुन उलगडली नव्हती.
                अशातच एकदम तो वास नाकात शिरला. आतापर्यंत गार वाऱ्याचे झोत अंगाला झोंबत पुढे जात होते. पण आता त्या वाऱ्याबरोबर एक वासही अवती भोवती पसरून गेला होता. तो वास चांगला की वाईट हे कळत नव्हते. पण गडदपणे तो वास नाकात शिरत होता. आता हा वास कशाचा असावा? कदाचित पुढे मागे एखादे फुलाचे झाड असेल, म्हणून मी आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करू लागलो. पण काहीच नजरेस पडत नव्हते. सगळा सपाट प्रदेश नजरेसमोर येत होता.
आणि अचानक आमच्या पासून, दहा - बारा फूट अंतरावर मला काहीतरी हालचाल दिसली. अगदी ओझरती, पण दिसली. मी एकदम चमकून पुन्हा त्या जागेवर पाहण्याचा प्रयत्न केला.
               आणि प्रथमच मला ते दिसले. आमच्या समांतर रस्त्याच्या कडेने ते चालत होते. चालत कसले, ते हवेत तरंगत होते. अगदी काळे काळे, काहीसे विरळ. मानवी आकारापेक्षा काहीसे उंच. आम्ही जसे जसे पुढे चालत होतो, तसे तसे ते पुढे चालत होते. आणि हे काय? मी आता पुन्हा टक लाऊन बाजूला बघितले. तर तशा अनेक आकृत्या आता आमच्या आजूबाजूला चालताना दिसू लागल्या. अगदी उंच असणाऱ्या. आम्ही एका रांगेत पुढे चालत होतो. अगदी आम्हाला समांतर त्या आकृत्या पुढे पुढे चालत होत्या. पण त्यांचे तोंड उलट दिशेला होती. पाठमोरी चालत ते पुढे पुढे जात होते. सरसर करत भीती माझ्या अंगभर पसरत गेली. आधीच्या अवतीभोवतीच्या शांततेने मी अंतर्मुख झालेली होतो. त्यात आता, हे असे काहीसे नजरेला पडेल याची साधी कल्पनाही मला नव्हती.
            मी थरथर कापू लागलो. त्या आकृत्या वाढत जात होत्या. त्यांचा घेर आमच्या भोवती पसरून जात होता. त्या आता ठळकपणे माझ्या दृष्टीस येत होत्या.
             मला आता हळू हळू या अशा भीषण शांततेचे कोडे उलगडू लागले. हि अवतीभोवतीची शांतता, उगाच पसरलेली नव्हती. ती शांतता कोणाच्या तरी आगमनाची पूर्वतयारी होती. सगळे सजीव म्हणून तर निपचित होऊन पडलेले होते. आमची दिंडी ही त्यामुळेच तर समाधिस्त झाली नसेल?
              मी एकदम चमकून दिंडितल्या प्रत्येक माणसावर नजर टाकली. प्रत्येकजण अजुन त्याच तंद्रीत होता. आपापल्या अंतर्मनात लुप्त. कोणालाच बाहेरच्या संकटाची चाहूल लागलेली दिसत नव्हती. बाहेर काहीतरी आले होते. अगदी समीप येऊन पोहोचले होते. मी अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत होतो. आता सगळीकडे मला त्याच काळया आकृत्या दिसू लागल्या. आता त्या मघापेक्षा जास्त उंच आणि स्पष्ट जाणवत होत्या.
              मी पुरता घाबरून गेलो. काय करावे, काही कळत नव्हते. आणि काही हालचाल केल्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. मला हे कोणाला तरी सांगणे गरजेचे होते. नाहीतर ते बाहेरचे संकट दिंडीत घुसले असते. आमच्या सगळ्या समूहाचा नाश झाला असता. माझी पावले अडखळू लागली. मला आता कोणाला तरी बोलावे लागणार होते. पण का कोण जाणे, आमच्या दिंडीतल्या लोकांची ती तंद्री, ती समाधिस्त अवस्था माझ्याच्याने भंग पावली जात नव्हती. माझ्याकडून त्यांना त्यातून जागे करणे होत नव्हते. माझे अंतर्मन त्यासाठी तयार होत नव्हते.
                पण मी जर काही हालचाल केली नाही, यांना या तंद्रीतून जागविले नाही तर, हे संकट आपल्यावर चालून येईल, त्याचे काय? माझ्या मनात द्वंद्व पेटले होते. काय करावे काहीच कळत नव्हते. एका गोष्टीचे मला बरे वाटत होते. कदाचित तो विचार स्वार्थीपणाचा असेल, पण तो डोक्यात येत होता. मी मध्यभागी होतो. त्यामुळे स्थिर तरी होतो. विचार तरी करू शकत होतो. हेच जर मी दिंडीच्या कडेला किंवा मग एकदम पाठीमागे असतो तर, एकदम भीतीची सनक मेंदूत घुसली. मी स्वतःचे अंग चोरत अजूनच मध्यभागी घेतले.

एका गोष्टींचे नवल वाटू लागले. त्या सगळ्या आकृत्या मलाच एकट्याला दिसत होत्या का? त्या बाकीच्यांना का दिसत नव्हत्या? बाकीचे सगळे जण आपल्या चालण्यात मग्न होते. त्यांना या संकटाची जाणीव होत नव्हती का? मला ठळकपणे दिसणाऱ्या या आकृत्या यांना खरंच दिसत नव्हत्या का?
              मी त्या आकृत्यांकडे पाहण्याचे मोठ्या प्रयासाने टाळू लागलो. कारण जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे बघत होतो, तेव्हा तेव्हा माझा विश्वास डळमळू लागला. त्या आकृत्यांचा परिणाम माझ्या मनावर होऊ लागला. मी मध्यभागी राहण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मी जेवढा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागलो, अगदी त्याच्या दुप्पट गतीने त्यांचे विचार माझ्या मनाचा कब्जा घेऊ लागले. ते माझ्याकडेच बघत असतील का? ते माझ्यावर हल्ला करतील का? ते फक्त मलाच दिसत होते म्हणजे मी त्यांचे भक्ष्य असेल का? असे कित्येक प्रश्न मनात डोकावून जात होते.
          मला राहवेना. हा एकाकीपणा सहनशक्तीच्या बाहेर जात होता. शेवटी मी डोके वार काढलेच. ते सगळे माझ्याकडे बघत होते. माझ्याच समांतर, पाठमोरे चालत होते. आता त्यांची संख्या कित्येक पटींनी वाढली होती. आणि हो! ते आता आम्ही चालत होतो, त्या पाऊलवाटेच्या अगदी नजिक आलेले होते. त्यांचे ते लांबलचक हात केव्हाही माझ्यापर्यंत पोहोचले असते. त्या सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच स्थिरावलेल्या असाव्यात. कारण त्यांच्या नजरेची ती नकारात्मक ऊर्जा, माझ्या अंतर्मनाला तीव्रतेने जाणवत होती.
मी माझी नजर खाली घेण्याचा कसोशीने प्रयत्न करत होतो, पण ते अजिबात जमत नव्हते. माझी नजर कदाचित त्यांची ताबेदार झाली असावी. मी आता त्यांच्या नियंत्रणात चाललो आहे, याची जाणीव मला होत होती. आता मला आजूबाजूचा परिसर विरळ दिसत होता. माझ्या सभोवतालच्या जाणिवा नष्ट पावत होत्या. मी कसोशीने इकडे तिकडे नजर फिरवू लागलो. पण आता मला दिंडी अस्पष्टशी दिसू लागली. आमचा समूह विरळ दिसू लागला. हळूहळू प्रत्येक दृश्य अदृश्य होत होते.
मी सर्वांच्या मध्यभागी असूनही माझी एकटेपणाची जाणीव तीव्र होत होती. आणि अखेर तो क्षण येऊन ठेपलाच. मी दिंडीत केवळ एकटाच उरलो होतो. माझ्या सभोवतालचा सगळा अवकाश खाली झाला होता. तिथे केवळ मीच उरलो होतो. आणि माझ्या अवतीभोवती त्या काळया आकृत्या. सगळा परिसर अदृश्य झाला होता. कुठेतरी अंतर्धान पावला होता. आता मला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळत होते.
              आज एवढ्या गडद रात्री सुद्धा दिंडी पुढे मार्गक्रमण का करत होती? दिंडीत एवढी शांतता का पसरलेली होती? मी सोडता प्रत्येकजण का समाधिस्त अवस्थेत पोहोचला होता. सगळ्यांचे ते समाधिस्त अवस्था हे संरक्षक कवच होते. फक्त मी सोडता. त्यामुळे दिंडितल्या कोणालाच त्या काळया आकृत्या दिसल्या नाहीत. त्यांचे ते पाठमोरी चालणे दिसले नाही. किंवा त्या आकृत्यांचा कुठलाच परिणाम त्यांच्यावर झाला नाही. अगदी आणीबाणीच्या प्रसंगाला सगळी दिंडी अंतर्धान पावली होती. फक्त मी सोडता. कदाचित माझ्या मनाच्या नास्तिकपणाचा तो परिणाम असेल. किंवा दिंडीपेक्षा माझ्या स्वतःवरच्या फाजील विश्वासामुळे असेल. त्यामुळे तर मला माझ्या समुहासारखी तंद्री लागली नसेल. ती समाधी साधता आली नसेल.
                आणि त्यामुळेच ते सगळे, यातून सहिसलामत सुटले होते. आणि मी मात्र या आकृत्यांच्या सापळ्यात अडकून पडलो होतो. पण आता या साऱ्या गोष्टींचा विचार करून काहीच फायदा नव्हता. वेळ फार पुढे निघून गेली होती, अगदी माझ्या हातूनही.माझ्यावर काळ ओढावला गेला होता. मला दिसू लागले, त्या काळया आकृत्या आता माझ्या एकदम समीप आलेल्या होत्या. चोहोबाजूंनी त्या जवळ जवळ येत आहेत. त्यांचे गोल रिंगण माझ्याभोवती घट्ट होत आहे. अगदी माझ्या डोळ्यांसमोर ते काळे चेहरे आले होते, आणि शेवटी ते सगळे चेहरे माझ्या शरीरात घुसले गेले.
             एकदम सुन्न करणारी अवस्था काही क्षण माझ्या वाट्याला आली. शरीर हलके हलके वाटायला लागले. शरीरातील सर्व अवयव, इंद्रिय सैल झाले होते. मनाचा उभार एकदम हलका झाला होता. आणि मी कुठल्यातरी बाहेरच्या मितीत पोहोचल्याचा एक संकेत मला मिळाला होता. कदाचित तोच माझा मृत्यू असावा.
         
     एकदम मला जाग आली. या अशा भयंकर स्वप्नाने आली, की दुसऱ्या कोणत्या कारणाने आली मला माहित नाही. पण मी एकदम हडबडून जागा झालो होतो. असे भयंकर स्वप्न का पडले असावे? हेच कळत नव्हते. मी आजूबाजूला पहिले. दिंडी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणीच होती. अवतीभोवती बरेच तंबू ठोकलेले दिसत होते. बरेच दिंडिकरी अजुन झोपलेलेच होते. कोवळी सकाळ झालेली असल्याने, आजूबाजूला सौम्य असा प्रकाश पसरलेला होता. मला हायसे वाटले. त्या स्वप्नातून मी बाहेर आलो होतो. कसले भयंकर स्वप्न होते ते. दिंडी अजुन त्या माळरानाच्या अलीकडेच होती. तरीही त्या माळरानाचे आपल्याला स्वप्न पडावे, मला काही कळत नव्हते.
            असे स्वप्न पडणे, हा काही संकेत होता का? किंवा काहीतरी विपरीत घडण्या आगोदरची पूर्वसूचना असावी का? कारण नेमक्या माळरान लागण्या आधीच हे स्वप्न पडावे. कारण पुढचा मार्ग त्या माळरानावरचाच होता. म्हणजे नक्कीच तो काहीतरी संकेत होता.
               दिंडी निघायला बराच अवकाश होता. त्यामुळे मी तेथून परत सहज येऊ शकलो असतो. फक्त थोडे वेगाने जावे लागेल. मी भराभर पाय उचलीत त्या माळरानाच्या दिशेने जात होतो. माळरानाचा विस्तीर्ण प्रदेश आता हळूहळू नजरेस पडत होता. खरेतर मी कशासाठी तेथे जात आहे, हे मलाच माहीत नव्हते. पण उगाच काहीतरी पहावे म्हणून मी तेथे जात नव्हतो. कदाचित मला पडलेल्या स्वप्नाची शहानिशा करावी, म्हणून माझे मन तिकडे जाण्याचा आग्रह करत असेल. उन्हे वर आले होते. आता माळरानाचा प्रदेश लागला होता. हिरवे - पिवळे माळरान कमालीचे भकास जाणवायला लागले होते.
              एवढ्या माळरानात नेमके स्वप्नांचे ठिकाण कसे सापडेल हाही प्रश्न होता. पण तरीही मी पुढेच जात होतो. आता मला ते ठिकाण पाहिल्याशिवाय चैन पडणार  नव्हती. सकाळच्या उन्हाचे सौम्य चटके बसत होते. खालची धूळ अंगावर उडत होती. घामाने सगळे अंग ओले ओले जाणवायला लागले होते. मला आता काहीसा थकवा जाणवायला लागला होता. मनात बेचैनी निर्माण होत होती. आजूबाजूला काहीशी शांतता जाणवायला लागली होती. वारा थांबला होता. सगळ्या सजीवांच्या हालचाली, जणू कोणीतरी रोखून धरल्या असाव्यात, असे तंग वातावरण झाले होते.
कसलातरी वास माझ्या नाकात शिरला. एकदम कसातरी. कदाचित कुठल्यातरी फुलांचा तो वास असावा. मी इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला. पण कुठेच झाड दिसत नव्हते. मग हा वास तरी कशाचा येत आहे. पण काही कळायला मार्गच नव्हता. आणि अचानक काही चेहरे माझ्या नजरेसमोर येऊ लागले. काहीसे रंगीबेरंगी कपडे डोळ्यांसमोर जाणवू लागले. आता अनेक शरीरे डोळ्यांसमोर दिसू लागले. ती शरीरे एका रांगेत पुढे मार्गक्रमण करत होते. काहींच्या हातात टाळ होते,  काहींच्या मृदंग, तर काहींच्या हातात भगवे पताके. आणि मी पाठमोरा होत त्यांच्या समांतर चालू लागलो. मी त्यांना भेडसावत होतो. त्यांच्या आजूबाजूला वेगाने हालचाल करत होतो. पण त्यांचे कोणाचेच माझ्याकडे लक्ष नव्हते. आता आम्ही  अनेकजण मिळून त्यांच्या सभोवती फेर धरू लागलो. त्यांच्या आसपास वेगाने हालचाली करू लागलो. तरी त्यांची तंद्रि भंग पावत नव्हती. ते त्यांच्याच नादात पुढे पुढे जात होते. आणि आम्ही पाठामोरे चालत त्यांच्यापासून दूर जात होतो... अगदी रिकाम्या हाताने.

*समाप्त.
वैभव नामदेव देशमुख.

कथाभाषाkathaaलेखभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

18 Sep 2022 - 10:32 pm | कर्नलतपस्वी

वातावरण निर्मीती,शब्दांकन,प्रवाह उत्तम जमलाय. घाईघाईत वाचल्याने शेवट लक्षात नाही आला. पण तो सुद्धा गुढच असणार आहे. उद्या परत एकदा निट लक्ष देऊन वाचणार आहे.

खुप आवडली.

vaibhav deshmukh's picture

18 Sep 2022 - 11:16 pm | vaibhav deshmukh

आभारी आहे.

अन्या बुद्धे's picture

20 Sep 2022 - 10:45 am | अन्या बुद्धे

वातावरण निर्मिती उत्तम! शेवट मात्र गोंधळात टाकणारा..

श्वेता व्यास's picture

20 Sep 2022 - 3:48 pm | श्वेता व्यास

अप्रतिम गूढ. कथा आवडूनसुद्धा समजली असं म्हणायला धजावत नाही.
आता आम्ही अनेकजण मिळून त्यांच्या सभोवती फेर धरू लागलो. त्यांच्या आसपास वेगाने हालचाली करू लागलो. तरी त्यांची तंद्रि भंग पावत नव्हती.
शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.

vaibhav deshmukh's picture

20 Sep 2022 - 4:35 pm | vaibhav deshmukh

शेवट योग्य पकडलात तुम्ही.
'शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.'
हे वाचकांवर सोडले आहे.

श्वेता व्यास's picture

20 Sep 2022 - 7:18 pm | श्वेता व्यास

हे वाचकांवर सोडले आहे.
हे छान केलंत, नाहीतर तीच ती वर्तुळवाली भयकथा झाली असती :)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

21 Sep 2022 - 9:35 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान कथा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Sep 2022 - 10:28 am | ज्ञानोबाचे पैजार

आता पुढच्या वेळी वारीला जायचे तर ही गोष्ट डोक्यात घोळवत जावे लागणार

दिंडीतले अस्सल वारकरी असेच देहभान हरपुन चालत असतात, त्यांच्या बरोबर नुसते चालणे हा देखिल अनुभव असतो.

त्यांच्या भोवती आमच्या सारख्या अनेक काळ्या आकृत्या चालत असतात.

पैजारबुवा,

vaibhav deshmukh's picture

21 Sep 2022 - 4:58 pm | vaibhav deshmukh

हाssss!
एका मित्राने वारीचा असा अनुभव सांगितला होता.
त्यालाच कथेत रूपांतरित केलं.
वारीमध्ये तन - मन हरवते हे मात्र खरे.

ती काळी आकृती म्हणजे पांडुरंग असावा असे वाटले होते

मग आध्यात्मिक कथा झाली असती ती.

रंगीला रतन's picture

21 Sep 2022 - 4:39 pm | रंगीला रतन

घोस्ट जम्या हैं \m/

स्वधर्म's picture

21 Sep 2022 - 8:03 pm | स्वधर्म

वैभवजी, तुमची शैली छान आहे. थोडी मोठी कथा क्रमश: वाचायला आवडेल. वाट पाहतो.

vaibhav deshmukh's picture

21 Sep 2022 - 9:22 pm | vaibhav deshmukh

नक्कीच तसा प्रयत्न करेल.

तर्कवादी's picture

21 Sep 2022 - 10:13 pm | तर्कवादी

गूढकथेतील भूतं ही शक्यतो एकट्या दुकट्याला गाठतात.. गर्दीतही दिसणार्‍या भुतांचे वर्णन आवडले.

ते त्यांच्यच नादात पुढे जात होते व आम्ही पाठमोरे त्यांच्यापासून दूर जात होतौ अगदी रिकाम्या हाताने. वैभवजी नेहमीप्रमाणे ही अजून एक आपली गूढ कथा. शेवट अर्थात कळला नाही. कधीकधी खूपच गूढ शेवट असतो. रिकाम्या हाताने म्हणजे ? ते कोण व काय देणार होते. इथे मला आरती प्रभूंची एक कविता व गाणेही चाल दिलेले आहे आशाताईने किंवा लता ताईने गायले असावे नक्की आठवत नाही ,"गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे"फारच गूढ कथा !!

vaibhav deshmukh's picture

22 Sep 2022 - 11:42 am | vaibhav deshmukh

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नायकाचा अर्थातच मृत्यू होतो.
शेवटी तोही त्या काळ्या आकृत्या बनतो.
आणि दिंडीतील एखाद्याला वश करण्याचा प्रयत्न करतो.
पण आता दिंडीत कोणीच वश होण्यासारखं नसतं.
सगळे आपापल्या नामस्मरणात असतात.आणि शेवटी त्याला रिकाम्या हाताने परत जावे लागते.

नचिकेत जवखेडकर's picture

22 Sep 2022 - 5:53 am | नचिकेत जवखेडकर

एकदम मस्त!! मला असं वाटतंय की, शेवटी जो कथेचा नायक आहे तो स्वतः ती काळी आकृती बनतो जी आपण भूत आहे असं म्हणू. म्हणजे त्याला जाग येते वगैरे हे सगळे त्या भुताच्या मनाचे खेळ आहेत किंवा नायकाचा मृत्यू होऊन देखील त्याचं मन हे मानायला तयार नाहीये की आपण त्या भुतांमधले एक झालोय(अतार्किक आहे पण भुताच्या गोष्टींमध्ये सगळं चालतं :D). आणि तोच नायक नंतर त्या भूतांबरोबर दिंडीमधल्या वारकऱ्यांना मारायला जातो पण सगळे त्या प्रसंगातून निभावून जातात.

@नागनिका: मला पण पहिल्यांदा तसंच वाटलं होतं. पण विचार केला की,पांडुरंग असता तर भीती नसती वाटली नायकाला!

एकदम बरोबर शेवट ओळखलात. थोडा तर्क लावला की कळतो लगेच शेवट.
मुद्दाम शेवट जरा गूढ आणि क्लिष्ट ठेवला.कथा जास्त गूढ वाटते.
मनापासून आभार आपले.