जळगाव स्टाईल घोटलेली वांग्याची भाजी

Primary tabs

जेम्स वांड's picture
जेम्स वांड in पाककृती
2 Jul 2022 - 12:15 pm

शाकाहारी सिरीज मध्ये काहीतरी रांधायचे ठरत होते पण काय ते नक्की ठरत नव्हते, अश्यावेळी एकदम ही भाजी आठवली अन फक्कड बेत जमला एकदम.

तर नमनाला घडाभर तेल न घालता कृती पाहूया :-

प्रमाण माझ्या भुकेप्रमाणे एका माणसासाठी

साहित्य
१. २५० ग्राम वांगी, काटेरी हिरवी जळगावी असल्यास उत्तम नसल्यास आहेत ती, पण काटेरी, भरताची नाहीच.
२. एक इंच आले
३. १० लसूण पाकळ्या
४. ७ जहाल हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे अन स्टॅमिनाप्रमाणे कमीजास्त)
५. गोडलिंबाची पाने चार पाच
६. धणेपूड एक छोटा चमचा
७. हळद अर्धा छोटा चमचा (अतिशय केअरफुली नाहीतर भाजीचा रंग बदलेल)
८. अगदीच बिन मसाल्याची भाजी मानवत नसल्यास एक छोटा चमचा किचन किंग मसाला (मी वापरलेला नाही)
९. फोडणीसाठी जिरे मोहरी, एक एक छोटा चमचा
१०. तेल दीड पळी (वांग्याच्या भाजीस तेल जास्त लागते)
११. बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीत घालणे अन गर्निश करायला बचकाभर

कृती

प्रथम वांगी बारीक फोडी चिरून मिठाच्या पाण्यात भिजत घालाव्या (काळी न पडावी म्हणून).

आता आलं लसूण मिर्ची ह्यांचा सरबरीत ठेचा करून रेडी ठेवावा.

आता एका कढईत दीड पळी तेल गरम करावे, तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी घालून तडतडू द्यावी, मोहरी तडकली का जिरे घालावे,

जिरे तडतडले की त्यात गोडलिंबाची पाने घालावीत, त्यानंतर लगेच आलं लसूण मिर्ची ठेचा घालून त्याचा कचवट वास जाईपर्यंत साधारणतः २५ सेकंद तो परतून घ्यावा (ह्यावेळी जर घरभर ठसका पसरून कुटुंबीयांनी सटासट शिंका मारल्या तर तुम्ही मैदान मारलेले आहे)

आता गॅस हाय ठेऊन त्यात वांग्याच्या फोडी निथळून टाकाव्यात, आणि वांग्याला परतलेला ठेचा कोटिंग होईस्तोवर वांगी नीट परतून घ्यावी,

वांग्यांना चाहुबाजूने उत्तम मसाला लागला की त्यात हळद व धणेपूड घालावी व परत एकदा नीट मिक्स करून घ्यावे,

आता ह्याच्यात अडीच वाट्या गरम पाणी (स्वानुभव - गरम पाण्याने चव खुलून येते, काही लोक वांगी भिजवून ठेवलेले पाणी पण वापरतात, ते वापरायचे असल्यास मीठाचे प्रमाण ऍडजस्ट करावे कारण वांगी भिजवताना पाण्यात चमचाभर मीठ घातलेले असते)

तर, गरम पाणी घालून चवीनुसार मीठ वरती सांगितल्याप्रमाणे घालावे, हे सगळे प्रकरण एकदा नीट ढवळून गॅस मंद करून त्यावर झाकण टाकून वांगी जवळपास १५ ते २० मिनिटे (फोडींच्या आकाराप्रमाणे) शिजू द्यावीत.

१५ मिनिटांनी वांगी शिजलेली पळीने चेक करून त्यात चिरलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी घालावी अन उत्तम मिक्स करावे,

नंतर गॅस बंद करून कढई खाली उतरवून पळीने किंवा घरी असल्यास थेट पावभाजी मॅशरने भाजी एकजीव घोटून घ्यावी (कोथिंबीर, गोडलिंब, अन वांग्याची देठं मोडणार नाहीत ते चालेल)

घोटलेली भाजी पुन्हा गॅस वर चढवून झाकण घालून मंद आचेवर ५ मिनिटे (तेल सुटेपर्यंत) शिजवून घ्यावी, खाली उतरवून उरलेली चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करावी, खालील फोटोप्रमाणे कळण्याची भाकरी, तुरीचे साजूक तूप घातलेले साजूक वरण दाण्याची चटणी अन पानाला काहीतरी गोड हवे म्हणून भाकरीचेच तूप गूळ घालून केलेला चुरम्याचा लाडू ह्यांच्यासोबत मजबुत हाणावी.

.

टिप्स :-
१. मटन असो वा वांगी "मांसल भाज्या" करताना गरम पाणी घालावे ही आमची शिकवण आईनं दिलेली आहे

२. हळद जास्त झाल्यास भाजीचा रंग पिवळा होतो, तो हिरवा अपेक्षित आहे रंग बदलल्यास भाजीचे खान्देशी इसेन्स जाते ही आमचीच वैयक्तिक श्रद्धा

३. देठं अजिबात काढू नये, पूर्ण वांग्याची चव जाईल, देठांचा अर्क भाजीत उतरायला हवाच, नंतर खाताना देठं चोखून हाडे माश्याच्या काट्या प्रमाणे बाजूला काढून ठेवता येतील

पाककृती स्रोत - आमच्या कार्यालयातील सहकारी सौ. निशा सोनवणे

पाककृतीशाकाहारी

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Jul 2022 - 12:35 pm | कंजूस

वांगे सर्वप्रकारे आवडते.

आग्या१९९०'s picture

2 Jul 2022 - 12:40 pm | आग्या१९९०

छान पाकृ.
देठं अजिबात काढू नये, पूर्ण वांग्याची चव जाईल, देठांचा अर्क भाजीत उतरायला हवाच,
अगदी बरोबर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2022 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकृ आवडली.
बाकी, त्या जडगावच्या लोकांना तिखटाचा आणि तेलाचा भयंकर नाद.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

2 Jul 2022 - 1:18 pm | Bhakti

ताट एकदम छान सजलय.
वांगी हा वीक पाइंट !

जेम्स वांड's picture

2 Jul 2022 - 1:51 pm | जेम्स वांड

पहिले मीठ वाढलेले नाही बघितल्यास जंगम उद्धार होणारे आमचा लॉल

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 1:32 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त- :)

जेम्स वांड's picture

2 Jul 2022 - 1:52 pm | जेम्स वांड

सगळ्यांचे आभार

सरिता बांदेकर's picture

2 Jul 2022 - 2:06 pm | सरिता बांदेकर

पाककृती छान आहे.पण मला वांग्याची ॲलर्जी असल्याने नेत्रसुखावर भागवावं लागणार.
नाही तर नवीन कृती करून बघते नेहमी.
टीप पण मस्त आहेत.

जेम्स वांड's picture

2 Jul 2022 - 2:16 pm | जेम्स वांड

सेम रेसिपीने गिलकी उर्फ घोसावळ्यांची घोटलेली भाजी/ भरीत पण होऊ शकेल, ते शिजवायला टायमिंग वगैरे घोसावळे किती जाड आहे त्यानुसार वेळ लागेल, फक्त बिना बियांचे घोसावळे घ्यायचे.

गिलक्याचे भरीत म्हणतात त्याला. त्याची पण टेस्ट सेम नाही पण जवळपास जाणारी अन बेस्टच असणार

माबोवर टाकलीय भरली गिलके.

जेम्स वांड's picture

3 Jul 2022 - 6:11 am | जेम्स वांड

भरलेली अन भरीत केलेली गिलकी असा फरक कळत असल्यास मला वाटतं इथं ह्याचं काही खास प्रयोजन नव्हतं !

यश राज's picture

2 Jul 2022 - 5:42 pm | यश राज

जळगावचा असल्या कारणानं अगदी आवडती भाजी.
गावी बरेचदा ग्रामदेवतेच्या भंडाऱ्यात किंवा वार्षिक सहभोजनामध्ये दाल रोडगे( दाल बाटी) , घोटलेली वांगे भाजी , तसेच तेवढीच अप्रतिम अशी गंगाफळ अर्थात काशीफळाची भाजी व ठेचा
आठवणी ताज्या झाल्या .

जेम्स वांड's picture

2 Jul 2022 - 5:45 pm | जेम्स वांड

खुद्द जळगावकर माणसाने प्रतिक्रिया दिली हे बेस्टच झाले !

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2022 - 7:58 pm | कर्नलतपस्वी

एकदा बायरोड पुण्यात येताना जळगावात खाल्ले होते.पुण्यापर्यंत पाणी पित यावे लागले पण म्हणून लक्षात राहीले.
ज्वारीची भाकरी आणी वांगे,शेवेची भाजी ,मस्त

जेम्स वांड's picture

2 Jul 2022 - 8:10 pm | जेम्स वांड

एकंदरीत खानदेश अन विदर्भात तिखट जास्तच खातात हे मी पण अनुभवलेले आहे, त्यांच्यासंबंधी विचारपूस करता तिथे असणारी ४८ वगैरे रेंज मध्ये फिरणारी गर्मी कमी करायला आंबट अन तिखट पदार्थांची मदत होते, असे सांगण्यात आले होते, असेल काही स्थानिक पद्धत, त्यानं म्हणे घाम भरपूर येतो अन शरीर थंड राहतं असं काहीसं.

शेवटी काय कर्नल साहेब, एखाद प्रांतीची खाद्यसंस्कृती त्या मूलसंस्कृतीसोबतच हजारो वर्षे लावून उत्क्रांत होत आलेली असते नाही का ?

सहज जाता जाता एक टीप--------जयंती कठाळे यांनी t.v वर किचन कल्लाकार या कार्यक्रमांत सांगितलेली की वांग्यामधे कोणताही पौष्टीक गुणधर्म नसतो तर ती भाजी निसर्गाने केवळ 4 ते 500 माणसांना थोड्या भाजीत पुरवठ्याची भाजी करता यावी यासाठी फक्त आहे म्हणून निर्मिली आहे. बाकी पौष्टिकता ,चव ई० या भाजीत नाही

कर्नलतपस्वी's picture

3 Jul 2022 - 7:52 am | कर्नलतपस्वी

सगळ्याच गोष्टी शरीर सौष्ठव साठी नसतात.
वांग्याची भाजी,लसणाची चटणी,भाकरी आणी ताक आसे पोटभर जेवण मन आनंदी करते व त्यानंतरची वामकुक्षी त्याबद्दल कोणी बोलतच नाही.

बाकी भाजीची कृती बघून भाजी कराविशी वाटतेय व छान चविष्टही होईल असे नक्कीच वाटतेय.

बाकी भाजीची कृती बघून भाजी कराविशी वाटतेय व छान चविष्टही होईल असे नक्कीच वाटतेय.बाकी मसाल्याचे व आमचे खूपच वावडे मी व माझी मुलगी फक्त मटकी ऊसळ, गवार व भरल्या वांग्यातच मसाला तो पण गोडामसाला जास्त झणझणीत नसलेला वेगळीच चव, वास असलेला( खूप जणांना आवडत नाही विचित्र वास,चव असतो म्हणून इति नोकरीतला अनुभव) यातच वापरतो .क्वचित मलाच लहर येते जरा मसालेदार खाण्याची तेव्हा( hotel type) म्हणून मी गरम मसाला घालून फारतर कांदेलसूण घालून काबूली चणा
ऊसळ, मटकी ऊसळ व पावभाजीत , पावभाजी मसाला घालून इतपतच मसाल्याच्या भाज्या खातो म्हणून अशी मसाला न घालता भाजी रेसीपी चालेल नाही पळेल.

जेम्स वांड's picture

3 Jul 2022 - 6:16 am | जेम्स वांड

नूतनजी , कंजूसजी

सस्नेह's picture

4 Jul 2022 - 12:59 pm | सस्नेह

झटपट आणि चटपटीत पाकृ.
वांग्याची देठे म्हटली की मला सोनाबाई आठवते. कामवाली.
ती काय करायची, शिगजवल्यावर वांगी आम्हाला वाढायची आणि नुसती भाजीतली देठे मसाल्याबरोबर खायची. मग मीपण एकदा देठ खाऊन पाहिलं. तेव्हा पासून मी वांग्याच्या देठांची फॅन झाले आहे.

जेम्स वांड's picture

4 Jul 2022 - 2:34 pm | जेम्स वांड

ज्या आमच्या सहकारिणीकडून ही पाककृती मिळाली आहे, तिने पण मला गप्पांच्या ओघात सांगितले होते की, जळगावकडे हिवाळ्यात जेव्हा अश्या भरीत वगैरे पार्टीज होतात तेव्हा भरताच्या हिरव्या वांग्याचे मोठे देठ, थोडं मीठ लावून लहान पोरांना चघळायला दिले जातात (म्हणे)

श्वेता व्यास's picture

4 Jul 2022 - 3:09 pm | श्वेता व्यास

छान पाकृ आहे, कमी मिरच्या वापरून करून बघायला हरकत नाही, झणझणीत पदार्थ तसेच चांगले लागतात तरीपण...

जेम्स वांड's picture

5 Jul 2022 - 7:07 am | जेम्स वांड

पण एकंदरीत खानदेशी किंवा वैदर्भीय जेवणाची खासियतच जहालपणा असतो असे म्हणतात.

जबरदस्त पाकृ. कृती लिहिण्याची शैली लैच भारी.
मात्र वांगी आवडत नसल्याने वांग्यांऐवजी इतर कोणती भाजी यात वापरता येईल याचा विचार करतोय.

जेम्स वांड's picture

5 Jul 2022 - 1:24 pm | जेम्स वांड

कुठलीच नाही, प्लीज, वांगीच वापरायची असतात, तुमच्यासाठी दुसरी रेसीपी करतो नॉन वांगी येत्या रविवारी :D

जेम्स वांड's picture

5 Jul 2022 - 1:26 pm | जेम्स वांड

सेम रेसिपीने तुम्ही घोसावळे उर्फ गिलक्याची पण भाजी / भरीत करू शकता. चव वेगळी असते पण मसाला सेम प्रोसिजर सेम अन ती चव पण उत्तमच असते

प्रचेतस's picture

5 Jul 2022 - 1:33 pm | प्रचेतस

गिलके पण भाजी म्हणून आवडत नाही. पण गिलक्याची भजी म्हणजे स्वर्गसुख. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2022 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली

प्रचंड सहमत, पालक आणी गिलक्याची भजी म्हणजे खरोखर स्वर्गसुख.

मच्यासाठी दुसरी रेसीपी करतो नॉन वांगी येत्या रविवारी :

हे लैच भारी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2022 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वांगी आवडत नसल्याने वांग्यांऐवजी इतर कोणती भाजी यात वापरता येईल याचा विचार करतोय.

अंडी टाकून ट्राय करा. आणि पाकृ फ़ोटोसहीत तपशीलवार माहिती येऊ द्या. :/

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

6 Jul 2022 - 6:40 pm | प्रचेतस

क्षमस्व,
अंडी खात नसल्याने ही पाकृ करू शकत नाही, तुम्ही यात अंडे घालून पाकृ करून ती मिपावर प्रकाशित केल्यास उपकृत असेन :)

आपण वांगी, गिलकी यांची भाजी खात नाही, अंडे खात नाही, मग आपण काय खाता? आपल्याला लोकांनी पर्याय तरी किती द्यायचे? बटाटा तरी खाता का?

आपण भरली वांगी, वांग्याचे काप या अद्भुत चविष्ट प्रकारांना मुकता आहात असे नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

सरिता बांदेकर's picture

5 Jul 2022 - 2:12 pm | सरिता बांदेकर

मला वाग्याची ॲलर्जी आहे म्हणून तुम्ही सुचवलेली गिलकी नाही मिळाली. पण दुधी मिळाला छान कोवळा,अजिबात बिया नसलेला, मग दुधीची भाजी केली.
अर्थात त्याला वांग्याची चव नाही आली पण दुधाची तहान ताकावर भागवली.
वांग्याची ॲलर्जी पूर्वी नव्हती २० वर्षापासून आहे.

चामुंडराय's picture

6 Jul 2022 - 3:48 pm | चामुंडराय

काय वांगी, काय भाजी, काय ताट
समदं यकदम ओक्के मधी हाय...

वांग्याला "बिन तंगडीची कोंबडी" म्हणतात ते उगीच नाही !!

Bhakti's picture

6 Jul 2022 - 4:11 pm | Bhakti

हे हे :)

जेम्स वांड's picture

6 Jul 2022 - 4:20 pm | जेम्स वांड

महा लॉल,

करून बघा आवडल तुम्हाला !

विवेकपटाईत's picture

6 Jul 2022 - 4:52 pm | विवेकपटाईत

रेसिपी आवडली. भंडारा भागात सीमान्त पूजनच्या रात्रीच्या जेवणात भरपूर तेलात (शेंगदाणे तेल) लाल जहरी अशी वांग्याची भाजी असतेच. सौ. ही घरी चरमरीत वांग्याची भाजी करते. भरपूर तेल, तिखट, हिंग आणि गूळ घालून. मस्त स्वाद येतो.

जेम्स वांड's picture

7 Jul 2022 - 8:01 am | जेम्स वांड

भंडाऱ्यात अन लग्नाच्या पंगतीत बनवली जाणारी तर्रीबाज वांगे भाजी हा एक सेपरेट विषय आहे चर्चेचा अन चवीचा

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Jul 2022 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली

खान्देशी जेवन तिखटच असतं असं काही नाही. आवडीप्माणे तिखट कमी जास्त टाकतात. बाकी खान्देशा वांग्याच्या भरतात ठेचा नी कांद्याची पात नसेल तर ते खान्देशी भरीत कन्सीडर होत नाही.

जेम्स वांड's picture

7 Jul 2022 - 8:03 am | जेम्स वांड

काहीसे असेच आमचे समस्त खानदेश बंधू भगिनी सांगतात.

भरताला कांद्याची पात शेंगदाणे खोबरे तेलात तळून घेतलेले असतात अन त्यात कांद्याची पात काळी न पडता शिजेपर्यंत तेलात तळणे जेणेकरून तिचा हिरवाकच्च रंग अबाधित राहील असे बनवणे ही एक मास्टरी आहे स्वयंपाकातली.

वामन देशमुख's picture

7 Jul 2022 - 5:30 pm | वामन देशमुख

मस्त वाटतेय भाजी आणि पाकृ!

या विकांताला काटेरी वांगी आणून नक्की भाजी करीन.
---

तुमचं सदस्यनाम जेम्स वांड जेम्स वांगं तर नाही ना!

😜

जेम्स वांड's picture

8 Jul 2022 - 6:35 am | जेम्स वांड

बाकी

तुमचं सदस्यनाम जेम्स वांड जेम्स वांगं तर नाही ना!

हा कोटीक्रम वाचला अन आपण "अंड्याची रेसिपी टाकली नाही" ह्याबद्दल स्वतःला नशीबवान समजू लागलोय मी तरी लॉल

सस्नेह's picture

8 Jul 2022 - 4:21 pm | सस्नेह

=)) =))

वामन देशमुख's picture

16 Jul 2022 - 11:11 pm | वामन देशमुख

अंड्याची रेसिपी

हे हे हे ! क्या ब्बात है!

---

काल रेसिपी वाचून अहोंनी वांग्यांची भाजी केली होती.
मस्त जमली होती.

उत्तम रेसिपी. करुन खाणे आले.
वांगे म्हणजे प्रश्नच नाही. भरीत करा, काप करा, भरली करा, भजी करा, रस्सा भाजी करा, सांबारात घाला, मसालेभातात घाला, थाई करीत .. सर्वत्र उत्तम फिट होतात.

भरीत या प्रकारातही अनेक उपप्रकार आहेत. तिखटाचे, चिंचगुळाचे वगैरे. सर्वच आपापल्या जागी उत्तम.

जेम्स वांड's picture

8 Jul 2022 - 12:14 pm | जेम्स वांड

मिपा सह आयुक्त वांगी प्रकल्प असे आपणास पद द्यायचे मनात येते आहे.

वांगे गोत्री कोणीतरी भेटल्याचा अतीव आनंद झालेला आहे,

बोला

।।ओम कांदे वांगी।।

मुक्त विहारि's picture

16 Jul 2022 - 8:20 pm | मुक्त विहारि

10 नंबर सहमत

जेम्स वांड's picture

16 Jul 2022 - 9:08 pm | जेम्स वांड

धन्यवाद,

आभारी आहोत, नक्की करून पाहा.

चामुंडराय बाकी वांग्याच्या भाजीला बिनतंगडीची कोंबडी वगैरे म्हणून आम्हा शाकाहारींच्या भावना ई० दुखवूनका प्लीज. हलके घ्यावे.

गोरगावलेकर's picture

28 Jul 2022 - 11:26 am | गोरगावलेकर

जळगांव भागातील लेवा पाटील समाजात हा प्रकार खूपच आवडता.

जेम्स वांड's picture

28 Jul 2022 - 12:05 pm | जेम्स वांड

गोरगावलेकर ताई.