'विचित्रगड' किल्ले रोहिडा

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in भटकंती
24 Jun 2022 - 8:06 pm

२६ मार्च २०२२

#रोहिडा
#विचित्रगड
#भोर
#vichitragad
#rohida
#bhor

उन्हाळ्याची जोरदार फलंदाजी एव्हाना सुरू झाली असल्याने आता अवघड किल्ल्यांना भिडणं आमच्यासारख्या सर्वसाधारण वकुबाच्या हायकर्ससाठी तितकंसं सहजसाध्य राहिलेलं नव्हतं, त्यामुळं, फेब्रुवारीतील राजगड मोहिमेआधीपासूनचं यादीत आणि चर्चेतही असलेला 'विचित्रगड' तथा "किल्ले रोहिडा" या तशा मध्यम-काठिण्य श्रेणीत मोडणाऱ्या पण अतिशय सुंदर अशा किल्ल्यावर स्वारीचा मुहुर्त ठरला, शनिवार, २६ मार्च २०२२ व त्यानुसार तयारी झाली. एकूण ६ मावळे या मोहिमेत सामील होणार होते.

Rohida

'विचित्रगड' तथा "किल्ले रोहिडा" हा पुणे जिल्ह्यातील भोर या निसर्गरम्य तालुक्यातील एक डोंगरी किल्ला. भोरपासून अगदीच जवळ म्हणजे साधारण दहा किलोमीटर अंतरावर वसलेला. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी, सकाळी लवकर पोहोचून चढाई सकाळच्या कोवळ्या उन्हात करणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी भल्या पहाटे निघणं ही तितकचं गरजेचं होतं. ठरल्यानुसार, सकाळी पावणे-पाचला सर्वजण एकत्र जमून, दोन गाड्यांमधून एकूण आम्ही 6 मित्र वडगावशेरी-हडपसर-दिवेघाट- नारायणपूर-कपूरहोळ-भोर मार्गे रोहिडा पायथ्याच्या बाजारवाडी गावात सकाळी 7 ला पोहोचलो. वाडीतील शाळेच्या मागच्या बाजूला, रस्त्याकडेला दोन्ही गाड्या पार्क केल्या, मध्ये भोर गावात, छत्रपतींच्या पुतळ्यापाशी एका छोट्या हॉटेलात चहा-पोहे असा नाश्ता झाला होता त्यामुळे गाडीतून उतरल्यावर लगोलग किल्ल्याची वाट धरली. वनखात्याच्या कुंपण व छोट्या इमारती (की नर्सरी ?? ) घातलेल्या काही जागाही इथे दिसतात. सर्व बाजुंनी छोट्यामोठ्या टेकड्यांनी वेढलेलं शांत-सुंदर-स्वच्छ गाव आहे बाजारवाडी, शाळेची इमारत ही सुरेख आहे, शाळेसमोरूनचं गडावर जाणारी प्रशस्त वाट आहे. बऱ्यापैकी रुंद व मध्यम चढणीचा हा मार्ग बाजारवाडी गावाच्या पाण्याच्या टाकीपासून पुढे वर जातो. साधारण १५-२० मिनिटे चालल्यावर वाट हळु-हळु खड्या चढणीची होऊ लागते. किल्ल्याच्या अवघड व निसरड्या टप्प्यांवर वनखात्याने रेलिंग्ज लावलेली आहेत. त्यांचा गरजेनुसार आधार घेता येतो. तसेचं गडाच्या वाटेवर जागोजागी बसण्यासाठी बाकंही पाहायला मिळतात. गडावर संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या व गडप्रेमी देणगीदारांच्या माध्यमातून ही बाकं बसवली गेलीत. गड चढून येणाऱ्या गडप्रेमींसाठी त्यांचा उत्तम उपयोग होतो.

किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०८३ मीटर असून पायथ्यापासून उंची ३४५ मीटर आहे. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीतील नीरा नदीच्या खोऱ्यात येतो. या भागाला रोहिड-खोरे असे नाव असून तो हिरडस मावळाचा एक भाग आहे.

Killa

जसे-जसे आपण किल्ल्याजवळ जातो तशी-तशी किल्ल्याची चढण खडी होत जाते व फरसबंद वाटेचे अवशेषही ठिकठिकाणी दिसतात. किल्ल्याला तीन मुख्य दरवाजे आणि एक चोर दरवाजा आहे. पहिला दरवाजा हा साधारण उत्तरपूर्व दिशेकडे तोंड करून आहे. त्यावर गणेशपट्टी असून त्याचे नाव ही गणेश दरवाजा असेचं आहे. दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे सध्या फक्त मोकळी जागा दिसते पण आधी इथे नक्कीच देवडी असावी परंतु त्यावरील छत कोसळून सध्याची अवस्था झाली असावी असे अवशेष पाहून वाटते. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर सुरुवातीला बांधलेल्या पायऱ्यांची आणि नंतर कातळात खोदलेल्या पायऱ्यांची एक वाट असून ती गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत जाते.

दुसरा दरवाजा पुर्वाभिमुख असून चांगल्या अवस्थेत आहे या दरवाजाच्या कमानीच्या एका बाजूला व्याघ्र दुसऱ्या बाजूला बहुदा शरभशिल्प आहे, बऱ्यापैकी झीज झाली असल्याने स्पष्ट कळून येत नाही. दरवाजा वक्राकृती पद्धतीने बांधलेला असून पायऱ्यांच्या मार्गांनी आल्यावर तो सहज दृष्टीस पडत नाही. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे देवडी असून त्याचेही छत कोसळलेले आहे. याच भागात उजवीकडे एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. सदर टाक्यात बारमाही पाणी असते. इथेच किल्ल्याचा पहिला लागणारा फत्ते बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर काही बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो. तिसरा दरवाजाही उत्तम स्थितीत असून या दरवाजाच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या लिपीतील शिलालेख आणि त्यावर गजमुख शिल्पे आहेत. दरवाजाकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या बाजूचा शिलालेख देवनागरी लिपीत कोरलेला वाटतो पण आमच्यासारख्या सर्वसामान्य गडप्रेमींचा व्यासंग तो वाचताना तोकडा पडतो व वाचन शक्य होत नाही.

Shilalekh

या दरवाजातून वर गेल्यावर आपण सदरेच्या बुरुजावर पोहोचतो. इथं जुन्या सदरचे अवशेष दिसून येतात. सदरेपासून डाव्या हाताला चढून गेल्यावर, गडदेवता रोहिडमल्लाचं जिर्णोद्धारीत मंदिर दिसते. मंदिरासमोर पाण्याचे एक छोटे टाके आहे. तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला थोड्या उंचावर एक प्रशस्त तलाव ही दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूला थोडं खाली, अनेक जुन्या घरांची जोती दिसतात. गडावर संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थेने तिथे सापडलेल्या पुरातन वस्तू ज्यात जाते, पाटा, दगडी खलबत्ता, खापरं अशा वस्तूंचा समावेश आहे ते गडप्रेमींना पाहण्यासाठी मांडून ठेवलेलं आहे.

Bhandi

मंदिराला वळसा घालून थोडं खाली उतरत आपण गडाच्या दक्षिणेला 'शिरवले' बुरुजावर पोहोचतो. भव्य व आकर्षक बांधणी व चढून जाण्यासाठी पायऱ्या असलेला हा बुरुज अजूनही भक्कम वाटतो. बुरुजावरून समोरचा रायरेश्वर परिसर दिसतो. जवळपास पुर्ण दक्षिण, दक्षिण-पुर्व पायथा परिसर इथून नजरेच्या टप्प्यात आहे. शिरवले बुरुजापासून उजव्या हाताला रेलिंग्जकडेने चालत जाताना पश्चिमेकडील तटबंदीजवळ चुन्याच्या दगडी घाण्याचे अवशेष आहेत. इथून थोडं पुढे गडाच्या 'पाटणे' आणि 'दामगुडे' बुरुजाच्या जवळ किल्ल्याच्या मधल्या उंच भागाच्या उतारावर पाण्याची एकमेकाला जोडलेली कोरीव टाक्यांची शृंखला आहे. त्यात साठणारे जास्तीचे पाणी काढून देण्याची सोयही केलेली दिसून येते. 'पाटणे' आणि 'दामगुडे' दोन्ही बुरुज आकाराने छोटेसे आणि तटबंदीतचं फारसे विशेष बांधकाम नसलेले असे साधे आहेत.

Ghane

गडाच्या उत्तर बाजूला असलेला 'वाघजाई' बुरूज हा ही अतिशय भव्य आणि उत्तम बांधणी असलेला आहे, शिरवले बुरुजाप्रमाणे यालाही वर चढून जायला पायऱ्या आहेत. बुरुजाच्या समोर खाली डोंगरावर वाघजाई देवीचे मंदिर आहे. बहुदा या मंदिरामुळेच बुरुजाला वाघजाई नाव पडले असावे. वाघजाई बुरुजासमोरच्या भागात बऱ्याच जुन्या बांधकामांचे अवशेष दिसतात, पूर्वी इथे बऱ्यापैकी वस्ती असावी असं वाटतं. उत्तर टोकावरील वाघजाई बुरुजाकडुन
उत्तरपूर्व भागातील 'सर्जा' बुरुजाकडे जाताना वाटेत डाव्या बाजूला चोर-दरवाजा असून याच वाटेच्या उजव्या बाजूला एक बांधीव टाकं आणि काही जोत्यांचे अवशेष आहेत. चोर दरवाजाखालील वाटेचा माग निदान आतातरी दिसून येत नाही.

Buruj

'सर्जा' बुरुजही कातळातून बांधून काढलेला भव्य व आकर्षक असा बुरुज आहे, याला ही चढून जायला पायऱ्या आहेत. बुरुजाच्या आतील बाजूस मधोमध गोलाकार खांबवजा चौथरा आहे. बुरुजावरून खालील मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. या बुरुजापासून उजव्या हाताला चालत येत आपण पुन्हा सदरेच्या बुरुजापाशी पोहोचतो व इथे आपली गडफेरी पूर्ण होते. या ठिकाणी गडफेरी आटोपुन आम्ही किल्ला उतरण्यास सुरुवात केली. उतरताना मागे वळून पाहताना, किल्ल्याचा बराच भाग सपाट असला, तरी मध्यवर्ती भाग थोडा उंच आहे हे दिसून आले. या भागात गडावरील पुर्वीची मुख्य वस्ती असावी असे वाटते.

काळजीपूर्वक उतरत आम्ही गडाची खडी चढण जिथे संपते तिथे ठेवलेल्या बाकांवर आरामासाठी बसलो. आम्ही बसल्यावर दोनच मिनिटात एक एकटेच गड चढणारे गडप्रेमीही तिथे येऊन बसले. कोण-कुठले चौकशी करता ते गडावर संवर्धनाचे कार्य करणाऱ्या 'श्री शिवदुर्ग संवर्धन' संस्थेचे अर्धंव्यू *श्री. दर्शन वाघ* हे आहेत असं समजलं. मग त्यांच्याकडून रोहिडा किल्ला संवर्धन कार्याचा, त्यात आलेल्या आव्हानं, अडी-अडचणी तथा यशस्वीपणे पुर्ण झालेल्या कामांचा अगदी २००९ सालापासूनचा इतिहास ऐकण्यास मिळाला. गडाला आजचं स्वरूप मिळवून देण्यात दर्शन सरांच्या "श्री शिवदुर्ग संवर्धन" व त्यांच्या पुढाकाराने इथं काम केलेल्या आणि करत असणाऱ्या इतर काही संस्था, गट यांचा मोलाचा वाटा आहे. गेली तब्बल एका तपाहुन अधिक काळापासून हे लोक चिकाटीने व छत्रपतींच्या प्रेरणेने हे काम आनंदाने करीत आहेत. दर्शन सर पुण्यातील पाषाण इथून अगदी प्रत्येक आठवड्याला रोहिडा किल्ल्यावर संवर्धन कामाचं नियोजन व गडफेरी यासाठी येतात. सलाम त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीला. त्यांच्या कार्याला यथाशक्ती मदत करण्याचं आश्वासन देऊन आम्ही जवळपास भारावलेल्या मनस्थितीतचं त्यांचा निरोप घेतला. या अवलियाबरोबर एक फोटो काढायचा मात्र राहून गेला, असो...पुढच्या गडफेरीत नक्कीच ती चूक सुधारू....

Excel

या टप्प्यावरून अगदी १५ मिनिटात आम्ही गड पुर्ण उतरून गाड्या पार्क केलेल्या जागी आलो. दुपार होत आली होती व भुक ही लागली होतीच पण जेवणासाठी पुन्हा खेड-शिवापुरचं 'जगदंब' गाठायचं होतं. लगेच गाड्या काढून मार्गस्थ झालो, मध्ये इंगवली फाट्यापाशी प्रसिद्ध नेकलेस पॉइंटला धावती भेट दिली व 'जगदंब' गाठलं. जेवणावर आडवा हात मारून घरचा रस्ता धरला, कात्रजच्या घाटातून पुण्यनगरीत प्रवेश केला व सिग्नल बंद पडल्यामुळे झालेल्या प्रचंड कोंडीतून वाट काढत-काढत संध्याकाळी घरी पोहोचलो.

'विचित्रगड' रोहिड्यासारख्या सुंदर किल्ल्याला भेट दिल्याचा आनंद नक्कीच वाहतूक कोंडी सारख्या क्षुल्लक त्रासापेक्षा 'अतिप्रचंड' मोठा होता.

*'विचित्रगड' रोहिडा किल्ल्याचा इतिहास - थोडक्यात..*

कातळात खोदलेल्या काही पायऱ्या व किल्ल्यावरील इतर काही पुरातन जागांची बांधणी पाहता किल्ला नक्कीच यादवकालीन काळापासून राबता आहे यात शंका नाही पण किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा आदिलशाही काळापासूनचा आहे. छत्रपतींनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेण्याआधी तो सुलतानी अंमलाखाली होता.

१६४७ नंतर छत्रपतींनी जे किल्ले आदिलशाहीकडून
जिंकून घेतले, त्यांपैकी एक रोहीडा होता. या किल्ल्यासाठी छत्रपतींना तेव्हा आदिलशहाचे मांडलिक वतनदार असणाऱ्या बांदल-देशमुखांशी संघर्ष करावा लागला होता. या लढाईनंतरच छत्रपतींच्या पन्हाळा वेढ्यातून सुटकेवेळी मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान स्वतःच्या रक्ताने लिहिणारे बांदल-देशमुख तथा त्यांचे पावनखिंडनायक वंशपरंपरागत कारभारी बाजीप्रभू देशपांडे ह्यांनी स्वराज्याचा भगवा खांद्यावर घेतला व तो शेवटपर्यंत प्राणपणाने फडकवत ठेवला.

पुढे, पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना देण्यात आला पण मराठ्यांनी तो पुन्हा घेतला व नंतर एखादं-दुसरा अपवाद वगळता मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. १७०० मध्ये भोरची वतनदारी शंकराजी नारायण सचिव यांना मिळाली आणि हा किल्ला त्यांच्या आधिपत्याखाली गेला. इंग्रज कालखंडात भोरच्या मनसबदारीचं संस्थानात रूपांतर झालं आणि पुढे संस्थानं विलीन होईपर्यंत किल्ला मराठ्यांकडेच होता. भोर संस्थान अस्तित्वात असताना किल्ल्यावर हवालदार, सरनौबत, शिपाई, चौगुला, गुरव असे संस्थानी नोकर तैनात होते.

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

25 Jun 2022 - 6:38 am | कर्नलतपस्वी

वर्णन आवडले,परिसराचे जास्त फोटो आसते तर आणखीनच छान पण वाचताना तुमच्याच बरोबर आहोत आसे वाटत होते.

चक्कर_बंडा's picture

27 Jun 2022 - 10:00 am | चक्कर_बंडा

धन्यवाद.....

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2022 - 6:14 am | अत्रुप्त आत्मा

@परिसराचे जास्त फोटो आसते तर आणखीनच छान >>>> +++111

कंजूस's picture

25 Jun 2022 - 6:53 am | कंजूस

तळाच्या गावचे ,वाटेचे दोन तीन फोटो टाका.

चक्कर_बंडा's picture

27 Jun 2022 - 10:07 am | चक्कर_बंडा

प्रयत्न करतो, आमच्यात सगळेच मोबाईल फोटोग्राफर्स त्यामुळे चांगल्या फोटोजची तशी वानवाचं असते.

चौथा कोनाडा's picture

25 Jun 2022 - 6:00 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी एक नंबर धागा !
सुरेख भटकंती वर्णन आणि प्रचि.
किल्ले रोहिडाला जाण्यापूर्वी हा धागा पाहणे मस्ट !

धन्यवाद, चक्कर_बंडा !

चक्कर_बंडा's picture

27 Jun 2022 - 10:01 am | चक्कर_बंडा

धन्यवाद.....

माहिती व मोजकेच फोटो दोन्हीही छान .

चक्कर_बंडा's picture

27 Jun 2022 - 10:05 am | चक्कर_बंडा

धन्यवाद.....

सुखी's picture

27 Jun 2022 - 7:38 am | सुखी

छान माहिती दिली आहे...

आमचा प्लॅन फसला होता या गडावर जायचा... सकाळी ७ ला पोहोचायच असं ठरवून ११ ला पोचलो... उन्हाचा ताव एवढा वाढला की अर्ध्यातून परत यावं लागलं.

बाजारवडीत जेवायची सोय चांगली आहे, ती पण वापरता आली असती

चक्कर_बंडा's picture

27 Jun 2022 - 10:05 am | चक्कर_बंडा

धन्यवाद.....

किल्ला मध्यम काठिण्य श्रेणीचा आहे, बाजारवाडी मार्गे तर सोपा म्हणावा असाचं आहे. उन्हाच्या त्रासाचा अनुभव बराच आहे, त्यामुळे आम्ही पहाटे निघणं हा नियमचं बनवलाय, अपवाद मुक्कामी ट्रेक्स चा....

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Jun 2022 - 2:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

घरी बसुन असे ट्रेकचे वर्णन वाचुन दुधाची तहान ताकावर भागवतोय.

बाकी उन्हाळ्यात शक्यतो ट्रेकिंग टाळतोच. आता एकदा पावसाचे बस्तान बसले की खरे भटकंतीचे दिवस सुरु होतील ते पार फेब्रुवारीपर्यंत. हा किल्ला लिस्ट्मध्ये टाकतो.

चक्कर_बंडा's picture

30 Jun 2022 - 1:14 pm | चक्कर_बंडा

धन्यवाद