चिरकुट मुलगी--२

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
24 May 2022 - 4:41 pm

चिरकुट मुलगी--२
(चिरकुट मुलगी--१ https://www.misalpav.com/node/50273)

“अंकलकाका, लोणी कुठाय?” जोजोने विचारले. अंकलकाका बंद खिडकीतून दूरवर बघत होते. बंद खिडकीतून त्यांना काय दिसत होते ते त्यांचे त्यांनाच माहित. अंकलकाकांच्या विचित्र वागणुकीचा जोजोवर काही परिणाम होत नसे. अंकलकाकांनी आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळली आणि ते उद्गारले, “संपलं.”
“लोणी संपल? मग आता काय? निदान जाम तरी असेल? लोणी नाय तर नाय जाम बरोबर खाऊया.”
जोजो स्टुलावर चढून फडताळं तपासात म्हणाला.
“नाही.” अंकलकाका त्याच निरिच्छ आवाजात बोलले.
“जाम सुद्धा नाही? लोणी नाही, जाम नाही, केक नाही, जेली नाही, सफरचंद? तेही नाही. फक्त ब्रेड आहे. नशीब.
“संपल.” अंकलकाका दाढी कुरवाळत बोलले. त्यांनी खिडकी उघडली. कुठल्यातरी अनोळख्या स्पेस-टाईम मधे ते गुंगले होते.
जोजो बिचारा सुका ब्रेड खात बसला.
“आपल्या अंगणात फक्त ब्रेडचे झाड आहे. त्या झाडावर आता केवळ दोन ब्रेड उरले आहेत. ते पिकायला वेळ आहे, अंका, आपण गरीब का आहोत? ब्रेड आहे तर लोणी नाही. लोणी असेल तर जाम नाही. लोणी आणि जाम असेल तर ब्रेड नाही. आयुष्य अस पार्ट बाय पार्ट जगायचे असतं? ब्रेड, लोणी, जाम, सफरचंद असं एकत्र आपण शेवटचे केव्हा खाल्लं? आठवतेय?”
“नाही.”
“नाही ना. मी सांगतो.” जोजोने आठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याही आठवणी धूसर झाल्या होत्या.
जोजोच सगळी बडबड करायचा कारण अंकलकाका जSSरा कमीच बोलत असत. अंकलकाकांनी धीर गंभीर नजरेने आपल्या छोट्या पुतण्याकडे नजर टाकली. अंकलकाकांच्या नजरेत एकच भाव होता. तो म्हणजे धीर गंभीर! जोजोने त्यांना कधी हसलेल्रं किंवा रागावलेले बघितलं नव्हतं. त्याच्यात भर म्हणून कि काय ते अगदी जरुरी असेल तरच बोलत आणि ते देखील एखादा शब्द. जोजोला इतक्या दिवसाच्या सहवासाने अंकाच्या मनात काय आहे याच अंदाज त्या एका शब्दाने येत असे.
जोजोचं नाव जोजो कसं पडलं? लहानपणी (म्हणजे जोजोच्या लहानपणी) जोजो लहान होता. लहान असला तरी जोजोला रात्री लवकर झोप येत नसे. अंका त्याला काऊ चिऊच्या गोष्टी सांगत. पण जोजो झोपायच्या ऐवजी अंकाच गोष्टी ऐकत ऐकत झोपी जात! अंकांना स्वतःचे बालपण आठवल. त्यांची आई त्यांना अंगाई गीत गात असे. आहा. अंकांनी पण जोजोला अंगाई गीत “गाऊन” झोपवायचं ठरवलं.
“बाळा जो जो रे, बाळा जो जो रे
पापणिच्या पंखांत झोपु दे डोळ्यांची पाखरे
झोपी गेल्या चिमण्या राघू
चिमण्या राजा नकोस जागू
हिरव्या पानांवरी झोपली वेलींची लेकरे....”
हे गीत ऐकल्यावर जोजोच्या डोक्यात प्रकाश पडला. हे तर अंगाई गीत आहे. आता तर झोपायलाच पाहिजे. इलाज नाही. जोजोला गाढ झोप आली.
त्या दिवसापासून अंकलकाका जोजोला जोजो म्हणू लागले.
असो.
“अंका, सांगा मला. आपण एवढे गरीब का आहोत?” जोजोने पुन्हा विचारले.
“नाही.”
“नाही कसे? काय आहे आपल्याकडे?”
“घर.”
“घर? घराचे काय विशेष. विचित्र विश्वात प्रत्येकाचे स्वतःचे घर आहे. आणखी काय?”
“ब्रेड.”
“मी खातोय हा शेवटचा पिकलेला ब्रेडचा तुकडा आहे. ह्या अर्ध्याचा अर्धा मी तुमच्यासाठी टेबलावर ठेवला आहे. भूक लागेल तेव्हा खा. तो चतकोर संपला कि मग आपण काय खाणार? विवि मध्ये कोणी उपाशी राहत नाही. माहिती आहे. विवि मध्ये फळा फुलांची रेलचेल आहे. हे ही माहिती आहे. पण आपण जिथे राहतो तेथे नाही. जिथं सुबत्ता आहे तिथं आपल्याला जायला पाहिजे.”
“कुठं?”
“अंका, मी लहानपणापासून इथच राहिलो आहे. आपण विवि कडे प्रस्थान ठेवायला पाहिजे. दक्षिणेला तो डोंगर आहे तिथं हतोडे राहतात. ते कुणालाही तिकडून जाऊ देत नाहीत. उत्तरेचा डोंगर तर निर्मनुष्य आहे...”
“एक.”
“काय एक? हो खरच की. मी पण ऐकलं आहे कि तिकडं एक फॅमिली रहाते. तुम्ही वर्षापूर्वी मला सांगितलं होतं. जादुगार डॉक्टर अष्टावक्र आणि त्यांची बायको. बरोबर? पहा अंका, तुम्ही एका वर्षात जेव्हढी माहिती दिली तेव्हढी मी तुम्हाला एका मिनिटात दिली. ते दोघेजण त्या डोंगरावर रहातात. त्या डोंगराच्या पल्याड विविची सुबत्ता असताना आपण दोघेजण या भयाण अरण्यात का वस्ती करून राहिलोय?”
“खरय.”
“काका, चला तर आपण उद्याच तिकडे जायला निघू. तेच तेच बघून मला मरणाचा कंटाळा आला आहे. काहीतरी नव बघायला मिळेल. जिकडे आपले दाणा पाणी आहे तिकड आपण जायला पाहिजे. ते आपल्याकडे येत नाही तर आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. नाही का?”
अंकलनी उत्तर दिले नाही. त्यांचे मन दुसऱ्याच जगात विहार करत होते. अंकलनी बंद खिडकी घट्ट बंद केली. सूर्य मावळतीवर झुकला होता. संध्याछाया झाडांच्या शेंड्यांवर रेंगाळत होत्या. हवेत थोडा गारवा जाणवत होता.
जोजोने शेगडी पेटवली.
अंकल आणि जोजो आपल्या विचारात गुंग झाले होते.
बरीच रात्र झाली. जोजो अंकलकाकांना म्हणाला, “काका, उरलासुरला ब्रेडचा चतकोर खाऊन घ्या आणि आपण
झोपूया.”
“हं.”
पण अंकलनी ब्रेड खाल्ला नाही. छोटा जोजो केव्हाचा झोपी गेला. अंकल मात्र शेगडीच्या उबेत विचार करत करत केव्हा झोपेच्या आधीन झाले ते फक्त सळसळणार्या जंगलालाच माहित.

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
Frank Baum ह्यांच्या Patchwork Girl ह्या कथेचे स्वैर, मनसोक्त, मनःपूतम् मराठी रुपांतर.
(चित्र विचित्र कथांसाठी माझा ब्लॉग इथे आहे.)
(https://iammspd.blogspot.com)

कथाबालकथा