भटकंती गावाकडची २०२२-भाग १ : चांदवडची काही मंदिरे

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
21 Mar 2022 - 10:08 am

लग्नानंतर गेल्या ३६ वर्षात दरवर्षी काही ना काही कामानिमित्त किंवा भेटीगाठींसाठी मुंबईहून गावी जाणे होतच असते. सुरुवातीच्या दहा वर्षांत बसने किंवा रेल्वेने होणारा प्रवास नंतर चारचाकीने होऊ लागला. पहाटे नव्या मुंबईतून निघालो की नाशिक-चांदवड-मालेगाव-धुळे मार्गे संध्याकाळपर्यंत जळगांव भागात पोहचायचे. आमची पहिली गाडी होती प्रीमिअर 'पद्मिनी". सेकंड हॅन्ड . इंजिनमध्ये दुरुस्तीचे काही काम करायची आवश्यकता असावी. दर १००-१५० किमीला रेडिएटरमध्ये पाणी टाकावे लागायचे. नाशिकच्या पुढे गेले की ऊन तापायला सुरुवात व्हायची. गाडीला वातानुकूल यंत्रणा नसल्याने खूप उकाडा व्हायचा. त्यातच गावाकडच्या रस्त्यांची स्थिती दयनीय. यामुळे वेळ तर लागायचाच पण थकवाही जाणवायचा.
आमची "पद्मिनी". माझ्याकडे असलेल्या एकदोनच फोटोंपैकी एक फोटो . गाडीने खूप चांगली सेवा दिली. आम्ही जवळपास दहा वर्षे ही गाडी वापरली.

त्यानंतर आली नवी कोरी Let's Go मारुतीची 'अल्टो' आणि पहिल्याच पावसाळ्यात २६ जुलै च्या धुंवाधार पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात पूर्णपणे बुडाली. इंजिनमध्ये काही बिघाड झाला नाही पण काही इलेक्ट्रॉनिक सुटे भाग खराब झाले. लाखभर खर्च आला. पण विमा कंपनीकडून संपूर्ण भरपाई मिळाली.
यानंतर ही गाडीही दहा वर्षे वापरली.

नंतर कंपनीला अल्टो परत देऊन मुलीने आताची 'स्विफ्ट डिझायर' घेतली. या गाडीनेही आतापर्यंत बरीच भटकंती केली आहे.
भंडारदरा परिसरातील एक फोटो

पूर्वीपेक्षा आता परिस्थिती बरीचशी बदलली आहे. मुंबई -आग्रा महामार्ग खूप सुधारला आहे. कसारा घाटात जाण्या येण्याचा मार्ग वेगवेगळा झाल्याने सहसा वाहतूक कोंडी होत नाही. गावाकडच्या रस्त्यांमध्येही गेल्या दोन वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. त्यामुळे हल्ली गावचा प्रवास पूर्वीच्या मानाने कमी वेळात आणि बराचसा सुखकर होतो.

यावेळी सहज म्हणून माहेरी फेरी मारायची होती. सकाळी सहाला नवी मुंबई सोडली आणि कळवा मार्गे मुंबई-आग्रा महामार्गाला लागलो. शहापूरच्या आसपास 'श्री दत्त स्नॅक' ला नाश्ता करून पुढे निघालो. कसारा घाटात विशेष गर्दी नव्हती. नाशिकमधेही आता सहसा गर्दीचा त्रास होत नाही. शहर सुरु व्हायच्या आधी उड्डाणपुलावर चढलो की आपण शहर संपल्यावरच बाहेर पडतो. ओझर, पिंपळगाव(बसवंत) पार झाले.
चांदवडच्या डोंगर रांगा दिसायला लागल्या.

चांदवडचा घाट सुरु झाला. नवीन रस्त्याला विशेष असा चढ नाहीच. गावी लवकर पोहचण्याची घाई नव्हती. अजून साडे अकराच वाजले होते त्यामळे थोडे थांबून महामार्गालगतची दोन चार मंदिरे पाहून पुढे जायचे ठरवले.

१. रेणुका माता मंदिर
घाट चढून आलो की महामार्गाला लागूनच जुना रस्ता आहे. येथे गाडी पार्क करून मंदिरात जाता येते. तांबकडा डोंगराच्या कुशीत हे मंदिर असून मंदिरासाठी खाली उतरण्याकरिता पायऱ्या तसेच उतरता रस्ताही आहे. दुसरा एक रस्ता चांदवड गावाकडून येतो. काही पायऱ्या चढल्यावर मुख्य दगडी दरवाजा आहे. सन १७४० च्या आसपास महाराणी आहिल्याबाई होळकरांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे कळते. आहिल्याबाई रेणुकामातेच्या उपासक होत्या व त्या चांदवडमधील महालातून भुयारी मार्गे मंदिरात जात असत असे सांगितल्या जाते.

दगडी दरवाजा.

दरवाज्याच्या दोन्ही बाजूस देव्हड्या आहेत.

दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूस सुंदर दीपमाळा आहेत. दगडी फरशीचे आवार पार केल्यावर मंदिरात प्रवेश होतो.

मंदिरात प्रवेश करताच दिसणारी पितळी घंटा व सुंदर घुमट

दर्शनासाठी चहुबाजूने असणाऱ्या पडवीतून जावे लागते.

रेणुका मातेचे दर्शन

२. प्राचीन गणेश मंदिर (इच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती )
रेणुका मंदिराजवळच मुंबईहून येताना महामार्गाच्या डावीकडे वडबारे गावाकडे जाण्याच्या वाटेवर हे मंदिर आहे.मंदिराची स्थापणा होळकर काळात झाल्याचे कळते. मंदिराचा जीर्णोद्धार १९७१-७२ मध्ये करण्यात आला आहे.
जालावर मिळालेली माहिती : बीडचे मूळ रहीवासी बाबा पाटील यांना होळकरांनी आपल्या पदरी १७३० मध्ये ठेवले. तेव्हा त्यांनी वडबारे गावाची स्थापना व होळकरांची सेवा ही दोन कामे सुरु केली. असाच एकदा डोंगरात फेरफटका मारतांना त्यांना बारीत स्वयंभू गणेशमुर्ति प्राप्त झाली. त्यांनी मुर्तीची स्थापना केली' त्यामुळे या गणपतीला बारीतील गणपती व बारीला गणेशबारी असे म्हटले जाते.

महामार्गापासून मंदिराकडे जाणारा रस्ता

मंदिराचे प्रवेशद्वार

मंदिर

गणेश दर्शन

भक्त निवास

३. शनी मंदिर
वेळ झाला होता म्हणून हे मंदिर आम्ही परतीच्या प्रवासात पहिले. मालेगावकडून येताना राहुड घाट चढून आल्यावर डावीकडे वरदडी या गावाजवळ हे मंदिर आहे.चांदवडच्या अलीकडे साधारण दहा किमी.

मंदिराबद्दलची आख्यायिका सांगणारा माहिती फलक

सभामंडपातील हनुमान

मुख्य मंदिरातील राहू, केतू, शनेश्वर व गणेश मूर्ती

मंदिरासमोरील शनीचा दगड

राजा विक्रमादित्य यांचा अश्वारूढ पुतळा

नवीन मंदिर

४. चंद्रेश्वर महादेव मंदिर
रेणुका मातेच्या मंदिराजवळच असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. मंदिर उंचावर असून आता सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता झाल्याने थेट मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकते.

मुख्य मंदिर

मंदिराच्या सभामंडपात सुरेख नंदी आहे.

गर्भगृहात सुबक शिवलिंग आहे.

मंदिराचा इतिहास सांगणारा फलक

मंदिर परिसरात मूर्तींचे अथवा मंदिराच्या बांधकामातील अनेक भग्न अवशेष दिसतात.

येथून आजूबाजूचा परिसर व डोंगर माथ्यांचे नयनरम्य दर्शन होते.

दोन तास मस्त भटकल्यावर पुढच्या प्रवासाला निघालो. मालेगावच्या आसपास जेवण करून धुळे,अमळनेर, चोपडा मार्गे माझे माहेर 'गोरगावले' येथे सायंकाळी पोहचलो.

क्रमश:

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

21 Mar 2022 - 11:16 am | कर्नलतपस्वी

ओघवते वर्णन ओघात वाहून घेवून जाते

कंजूस's picture

21 Mar 2022 - 11:36 am | कंजूस

संपादन करून जुने नवे फोटो आणि वर्णन यातून एक छान लेख तयार करता ते आवडले.
चंद्रेश्वरावर जैन बस्तीची छाप आहे. आवडलं.

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2022 - 8:12 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर लेख आणि आणि तेवढेच सुंदर प्रचि.
नविन मंदिराची माहिती मिळाली. लेखन ओघवते असल्याने तुमच्या सोबतच प्रवास करत आहे असे वाटले.

तिकडे गेली तर ही मंदिरे नक्की पाहणार

विंजिनेर's picture

22 Mar 2022 - 4:17 am | विंजिनेर

जुने फोटो आणि आठवणींच्या उल्लेखामुळे सरधोपट प्रवास वर्णनापेक्षा मजा आली

निनाद's picture

22 Mar 2022 - 8:45 am | निनाद

छायाचित्रे खूप छान!

जुनी प्रिमियर पद्मिनी!
लेख ऐन रंगात असतांना शेवट अगदीच त्रोटक झाला असे वाटले.

गोरगावलेकर's picture

22 Mar 2022 - 9:41 am | गोरगावलेकर

@कर्नलतपस्वी. लेख आवडल्याबद्दल धन्यवाद
@कंजूस. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. असल्या उत्साहवर्धक प्रतिसादांमुळेच लिहिण्याचा प्रयत्न केला जात आहे.
@चौथा कोनाडा. पावसाळ्यात गेल्यास चंद्रेश्वरच्या मंदिराजवळून दिसणारा नजारा काही औरच असेल. जमल्यास अवश्य भेट द्या

कर्नलतपस्वी's picture

22 Mar 2022 - 9:52 am | कर्नलतपस्वी

ची मजा आणी शान काही वेगळीच होती. १९६३ साली आमच्या छोट्या गावात पहिलीच अ‍ॅम्बेसिडर आली.वाट वाकडी करून बघायला जायचो.

गोरगावलेकर's picture

23 Mar 2022 - 2:41 pm | गोरगावलेकर

शान होती त्यातच गाडीचा VIP नंबर. गाडी काढून टाकण्याचा विचार नव्हता. पण जुन्या गाडीची देखभाल दुरुस्ती, पार्किंगचा प्रश्न यामुळे गाडी सांभाळणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखेच होते

तुमची भटकंती खासच. Photo तर अप्रतिम. तुम्ही Photo इथे post करताना साइझ काय देता.

गोरगावलेकर's picture

22 Mar 2022 - 1:48 pm | गोरगावलेकर

मी फोटो साईझ देतच नाही
लांबी रुंदी दोन्ही खाते रिकामेच ठेवते

ते सम्राट विक्रमादित्य यांचे अश्वारूढ शिल्प नेमके या ठिकाणी काय कारणाने उभे केले आहे त्यावर जरा प्रकाश टाकाल काय?

विक्रमादित्य त्याला लागलेल्या शनीच्या साडेसातीपासून मुक्त व्हायला शनीचे दर्शन घ्यायला आला होता अशी दंतकथा आहे.

गोरगावलेकर's picture

23 Mar 2022 - 2:33 pm | गोरगावलेकर

शनिदेवाच्या शापामुळे राजा विक्रमादित्याला साडे साती सुरु झाली व या स्थानावर ती संपली त्याबद्दलची कथा आहे . वरदडी स्थानाचा महिमा वर्णिलेला फोटो आहे तो झूम केल्यास दंत कथा वाचता येईल

प्रचेतस's picture

23 Mar 2022 - 1:59 pm | प्रचेतस

छान लिहिताय

चांदवडच्या डोंगर रांगा दिसायला लागल्या.

ह्यात उजवीकडचा मोठा डोंगर म्हणजे राजदेहेरचा किल्ला तर त्याच्या डावीकडचे शिखर म्हणजे कोळदेहेर किल्ला.
रस्त्याने खिंडीकडे येताना किंवा जाताना अजंठा सातमाळ रांगेचे अप्रतिम दृश्य सतत दिसत असते.

बाकी वर्णन आणि मंदिरे पण फार आवडली. भग्न शिल्पांमध्ये उद्धस्त वीरगळ दिसत आहेत.

हा भाग मात्र पावसाळ्याचे मोजके दिवस सोडता कधीच हिरवागार नसतो. एकदम राकट, रखरखीत वैराण आहे मात्र निसर्गाने नटलेला.

या रस्त्याने नेहमी जाणे येणे होते पण डोंगर रांगांबद्दल विशेष माहिती नव्हती. त्याबद्दल आणि विशेषकरून मंदिर परिसरातील भग्न मूर्तींबद्दल आपल्याकडून प्रतिसाद मिळेल असा अंदाज होताच.
माहितीबद्दल धन्यवाद.