पांढरं फरवालं स्वेटर

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
13 Jan 2022 - 12:02 am

पांढरं फरवालं स्वेटर
---------------------------
खूप थंडी होती . खूपच . नकोशी , बोचरी , गारठवणारी , हाडं फोडणारी थंडी !
रात्रीचे दहाच वाजले होते . एवढ्या लवकर रस्त्यावरची गर्दी थंडीने जुलमाने हाकलून लावली होती . रस्त्यावर तुरळक गाड्या अन माणसं .
नदीकाठच्या रस्त्यावर काही झोपड्या . त्यांना झोपड्या तरी कसं म्हणायचं ? नावापुरताच आडोसा . त्यात माणसं ... माणसंच की ती - परिस्थितीने फटकारलेली .
तान्ह्या पोरापासून वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत .
मोकळा , मोठा रस्ता . त्यात शेजाराला नदी. पाण्याने आणि गार वाऱ्याने थंडी तिथे अगदीच जोमात आलेली . रस्त्यावरचे दिवेही काही बंद काही चालू . त्यांचा प्रकाशही त्यांच्यापर्यंत नीटसा पोचत नव्हता . तो तरी काय अपवाद म्हणा , त्यांचं आयुष्य...
त्यात राणीही होती . आठ - नऊ वर्षांची . तिच्या अंगावर एक बिनबाह्यांचा फ्रॉक काय तो होता . खालून वरून वारं आत पोचवणारा . तिला खूप थंडी वाजत होती अन जीव नकोसा होत होता . पण करणार काय ? सांगणार कोणाला ?
आजीने शेकोटी पेटवलेली होती . पण तिची आच कमी अन धूरच जास्त होता ... डोळ्यांत पाणी आणणारा . आयुष्यासारखा ...
तिच्या शेजारी वंदी बसलेली होती . तिच्यापेक्षा थोडी मोठी .
तेवढ्यात एक गाडी येऊन थांबली . ते पाहताच वंदी पुढे पळाली . त्या माणसाने एक मोठी पिशवी तिच्या हातात दिली . त्यामध्ये उबदार कपडे होते . तऱ्हेतऱ्हेचे . कानटोपी , स्वेटर्स , जॅकेट्स अन काही काही . वंदीनं पिशवी उचकायची सुरुवात केली . राणीलाही त्या गंमतीत उत्सुकता वाटत होती ; पण तिला कुडकुडत असताना , पायांना मारलेली हातांची घट्ट मिठी सोडून जायचाही कंटाळा आला होता . तो माणूस गेला .
वंदीला एक स्वेटर सापडलं . पांढरंशुभ्र, फरवालं स्वेटर . तिनं ते घातलं अन ती आनंदाने नाचायला लागली.
अंधाराच्या पार्श्वभूमीवर, त्या स्वेटरमध्ये ती नाचणाऱ्या पांढऱ्या सशासारखी भासत होती .
नाचण्यामुळे अन स्वेटरमुळे तिला थंडी वाजत नव्हती आता .
राणी तिच्याकडे मजेने पाहत होती . अन असूयेने ! कारण लोक असं काही काही देतच असत . मग ते सगळ्यांना वाटून मिळतच असे . तिलाही ते स्वेटर आवडलं होतं . पण - आता हे स्वेटर वंदीनं आधी घेतल्यामुळे तिला मिळणार नव्हतं...
वंदी नाचत नाचत इकडे तिकडे पळू लागली . ती रस्त्यावर गेली .
एक बुलेटवाला जोरात येत होता . त्याला अंधारात ती दिसली नाही पटकन . ते पांढरं स्वेटर त्याच्या लक्षात यायच्या आत त्याने तिला उडवलं .
तो पळून गेला.
वंदी मात्र रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली . ते पांढरंशुभ्र फरवालं स्वेटर ,लालभडक रक्तात माखलं .
शेकोटी विझली . एकच गलका उठला .
विझलेल्या शेकोटीने की ते दृश्य पाहून , कोणास ठाऊक ; पण राणी आणखी थरथरा कापू लागली .

हे ठिकाण

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

13 Jan 2022 - 1:19 pm | चौथा कोनाडा

छान कथा !
शेवट वाचताना अंगावर काटा आला !

शॉर्टफिल्म काढण्यासारखे स्क्रिप्ट !

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jan 2022 - 1:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

कडाक्याच्या थंडीत वंदीला फरचा स्वेटर मिळाला हे वाचताना फार छान वाटत होते तोपर्यंत तो आनंद हिरावला गेला...
पैजारबुवा,

बिपीन सुरेश सांगळे's picture

13 Jan 2022 - 9:10 pm | बिपीन सुरेश सांगळे

| चौथा कोनाडा
पैजारबुवा
आभार