एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची (600 किमी) दिवस पहिला 18 डिसेंबर 2021

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
30 Dec 2021 - 8:51 am

400 ची BRM फारच उत्कृष्ट रित्या पार पडली होती. कोणालाही कोणताही त्रास झाला नाही. नाही म्हटलं तरी माझ्या पायाला मागच्या वेळी झालेली जखम सुखत चालली होती. पण जवळपास 24 तास पाय बुटात बंद असल्याने आणि घामाने जखम चिघळली थोडी. पायातला मोजा जखमेला थोडा चिकटला नि तो ओढून काढताना खपली निघाली. घरी येऊन परत डॉ कडे जाणं आलं.

आता 600 चे वेध लागले. 11 डिसेंबरला सुरू झालेली 400, 12 तारखेला संपली. 18 ला लगेच पुढची 600 लागलेली. एवढ्या लगेच पुढची करायची का? तर एकमताने हो अस उत्तर आलं. यासाठी 2 रूट डोळ्यासमोर होते. PCMC क्लब ची पुणे - सोलापूर - तुळजापूर नि परत पुणे असा एक ऑप्शन होता. तर मुंबई क्लब ची काशीमीरा जंक्शन - भरुच - काशीमीरा अशी होती. पुणे सोलापूर या रस्त्यावर आम्ही कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे त्याची काहीच कल्पना नव्हती.म्हणून क्लब च्या सिद्धू पाटीलला फोन केला जो श्रीनिवास चा मित्र आहे. त्याने सांगितलं, रस्ता एकदम छान मस्त हायवे आहे. काही ठिकाणी थोडा सुनसान आहे पण बराचसा चांगला आहे. शिवाय तिथे थंडी खूप असते. म्हणजे अगदी पुण्यात 20 डिग्री टेम्प्रेचर असेल तर तिकडे अजून 3/4 डिग्री कमीच. आणि हेडविन्ड्स सुद्धा बऱ्याचवेळा असतात. हे ऐकल्यावर हिरमुसलो. हेडविन्ड्स चा वाईट अनुभव आम्हाला मागच्या औरंगाबाद BRM ने दिला होता. सिद्धूने श्रीनिवासला स्पष्टच सांगितलं की बरोबर लेडी रायडर आणि मनोज दादा वय 52 वर्षे असेल तर जरा विचार कर. भरुच रूट पैकी निम्मा रस्ता आम्ही 400 च्या वेळी करून आलो होतो. म्हणजे अजून फक्त 100 किमी पुढे जायचं होतं. आणि या पुढच्या रस्त्यावर देखील घाट कुठेही नाहीत. त्यामुळे मग हाच पर्याय चांगला होता. आणि आम्ही तोच निवडला. दापोलीवाली जोडी सुद्धा यावेळी बरोबर होती. सगळ्यांनी 18 डिसेंबर साठी नावं दाखल केली. ही राईड जर यशस्वी झाली तर रत्नागिरी जिल्ह्यातील मी पहिली महिला SR ठरलें असते.आमच्या सायकलिंग ग्रुप वर याची माहिती होतीच. त्यांचे सगळयांचे मेसेज येत होते आणि दडपण वाढत होत. मी 400 वरून परत आल्यावर परत डॉ गाठला. परत तीच कॅसेट. जखमेला पाणी लागल्याने जखमेत पू झाला होता. परत एकदा त्याला रिक्वेस्ट , बाबा रे फक्त ही 600 पूर्ण होऊ दे मी सगळं करेन. मग काय, पुन्हा एकदा गोळ्या आणि मलम आणि सोबतीला थोडं बँडेज. एकीकडॆ 600 ची तयारी. पायाच्या जखमेमुळे थोडेथोडके जमतील तसे व्यायाम, प्रोटीन शेक सगळे नेहमीचे प्रकार त्याच उत्साहत चालू होते. 400 ला नेलेल्या सायकल फक्त गाडीतून काढून ठेवलेल्या.मध्ये तसा अजिबात वेळ नसल्याने एकही राईड झाली नाही. 400 हीच 600 ची प्रॅक्टिस राईड धरून आम्ही चाललो.

नेहमीप्रमाणे मनोज दादा धावून आला आणि स्टार्ट पॉईंट च्या अगदी 300 मीटर वर त्याच्या ओळखीने शासकीय विश्रांतीगृहात राहायची सोय झाली. याधीच्या तिन्ही राईड च्या वेळी मी, श्रीनिवास आमच्या गाडीतून आणि मनोज दादा त्याच्या गाडीतून असा प्रवास केला. पण यावेळी आमची गाडी नादुरुस्त झाल्याने आम्ही दादाची एर्टीगा घेतली. ही मोठी गाडी असल्याने यात तिन्ही सायकल आणि तीन माणसं सगळंच मावल. चला एक तरी ट्रिप एकत्र अस म्हणत प्रवास सुरु केला. ठाण्यात येऊन दाखल झालो. श्रीनिवासचे मित्र भेटायला आले होते. भेटीगाठी झाल्यावर सायकल जोडून ठेवल्या आणि नेहमीची तयारी करून झोपलो.

18 डिसेंबर ला पहाटे 4 ला उठलो.थोडं खाऊन पिऊन तयार झालो. स्टार्ट पॉईंटला पोहोचलो. बाईक चेक करून ब्रेव्हेट कार्ड ताब्यात घेतली. माझ्या मैत्रिणीचा कांचनचा नवरा सुरज आज आमच्याबरोबर 300 किमी ची BRM याच रूटवर करणार होता.तो ठाण्यातून येणार होता. 5.30 होऊन गेले तरी त्याचा पत्ता नव्हता. ग्रुप वर मेसेज आला की ट्रॅफिक मध्ये अडकलाय. दरम्यान CCC चा अभिजित पोहोचला. दापोलिकर पण पोहोचले. अंबरीश याहीवेळी इथे आम्हाला शुभेच्छा द्यायला हजर होता. शेवटी 5.55 ला सुरज कसाबसा पोहीचला. तो देखील बाईक चेक करून सज्ज झाला. बरोबर 6 ला राईड सुरू झाली. एरवी जेव्हा राईड सुरू होते तेव्हा साधारण सगळेजण एकत्र असतात. पण इथे सुरवातच इतक्या ट्रॅफिक ने झाली की आम्ही तिघे देखील थोड्या अंतरात विखुरले गेलो. मुंबईच ट्रॅफिक मला थोडं गोंधळात टाकत.त्यात हे सगळे ट्रक. मागच्या वेळी पडता पडता वाचल्याचा अनुभव ताजा होता. त्यामुळे मी फारच जपून चालवत होते. परिणामी मी मागे पडले. श्रीनिवास आणि मनोज दादा दोघे पुढे जाऊन थांबले. जर चांगला रस्ता मिळाला आणि मग आम्ही एकत्र निघालो. आज रस्त्यावर खूप धुकं होत. अगदि 10 फुटावरील पण दिसत नव्हतं. पण त्यामुळे सायकल चालवायला फायदा झाला. भराभर सायकल रेटता आली. मागच्या वेळच्या हॉटेल मध्येच नाश्ता केला. अजूनही दाट धुकं तसंच होत. त्याचा फायदा घ्यायला परत सायकल हाकायला सुरवात केली. अधे मध्ये फक्त एखाद दोन मिनिटांचा ब्रेक उभ्या उभ्या घेऊन पुढे जात राहिलो. पारडी शहरात 150 किमी ला पहिला चेक पॉईंट होता. साधारण दीड वाजायच्या दरम्यान आम्ही पारडीला पोहोचलो. इथे मात्र माझा भ्रमनिरास झाला. एका हॉटेल मध्ये आयोजक थांबले असतील अस सांगितलं होतं. साधारणपणे बऱ्यापैकी मोठ्या, जरा पटकन लक्षात येईल अस हॉटेल निवडतात. पण इथे हे इतकं साधं टपरी टाइप हॉटेल बघून माझी चिडचिड झाली. प्रश्न खाण्यापिण्याचा नव्हता. पण चेक पॉईंट आणि त्यांच्या तर्फे खाण्या ची सोय म्हटल्यावर थांबणे आलेच. एकदा थांबलो की हेल्मेट काढा, ग्लोव्हज काढा, गळ्यातला बंडाना काढा, हात तोंड धुवून जेवून घ्या, बाटल्या भरा अस सगळं करतो. या हॉटेल मध्ये साधं टॉयलेट नव्हतं. त्यामुळे आता परत कुठल्या तरी पेट्रोल पंपावर थांबायचं आणि हेच सगळं करायचं म्हणजे वेळ मोडतो. आणि इथे तर वेळेला पैशापेक्षा जास्त किंमत. माझी चिडचिड आवरती घेऊन दाल खिचडी, दही खाल्लं, थंडगार लस्सी प्यायली, पाणी भरून घेतलं आणि निघालो. हॉटेल टपरी टाइप असलं तरी जेवण मात्र चविष्ट होत. 300 BRM वाले सूरज आणि अभिजित इथून पाठी वळले आणि आम्ही पुढे भरुच च्या दिशेने निघालो.

आता उन्ह कलली होती. बऱ्यापैकी स्पीड ने चाललो होतो. 5 वाजयच्या दरम्यान जरा कंटाळा आला म्हणून एके ठिकाणी नारळपाणी प्यायलं. आणि पुन्हा एकदा सायकल एके सायकल. अंधार पडल्यावर आमचे लाईट, ब्लिनकर लागले. थोडच अंतर आणि मग अंकलेश्वरला वळायचं होत.

थोड्याच वेळात अंकलेश्वर फाटा आला.आत वळलो. थोडासा शहरी भाग पार करून नर्मदा नदीवरचा मोठा पूल आला. पूल मोठा आहे हे सांगितलं होतं पण किती मोठा आहे याची काहीच कल्पना नव्हती. मोठ्या फलकांनी गोल्डन ब्रिजवर स्वागत केलं. अजून अजून पुढे करत आम्ही अंतर पार करतोय तरी काही ब्रिज संपेना. फक्त नदीवरचा साधारण दीड किमी चा पूल आहे. पण सुरवात खूप आधीपासून होते आणि त्यामुळे जवळपास 3 ते 4 किमी अंतर वाटत. पूल पूर्ण केला आणि उजवीकडॆ चेक पॉईंट असलेलं हॉटेल श्री प्लाझा आलं. जीव भांड्यात पडला. आता सायकलवरून उतरायचं आणि थोडी विश्रांती घ्यायची या विचारानेच इतकं बरं वाटलं. सायकल बेसमेंटमध्ये पार्क केल्या, ब्रेव्हेट कार्ड वर स्टॅम्प मारून घेतले आणि तडक रूम गाठली. ड्रॉप बॅग मिळली होती. रूम मध्ये जाऊन आधी फोन, लाईट चार्जिंगला लावले. रिकव्हरी मिक्स प्यायलं. अंघोळी उरकून झोपलो.गादीवर पाठ टेकल्यावर सुख म्हणजे काय असत ते कळलं. आयोजकांनी इथे मात्र हॉटेल चांगलं बघितलं होत. साधारण नवीन जागी मला झोप पटकन लागत नाही. पण इथे एवढे दमलो होतो की केव्हा डोळा लागला कळलं देखील नाही.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

30 Dec 2021 - 11:09 am | गुल्लू दादा

छान. फक्त फोटो असते तर अजून मजा आली असती. धन्यवाद.

मालविका's picture

30 Dec 2021 - 9:01 pm | मालविका

पण फोटो चिकटवणे अजून जमले नाही.

तुषार काळभोर's picture

30 Dec 2021 - 11:43 am | तुषार काळभोर

६०० किमी म्हणजे लैच मोठ्ठा दौरा! तेपण ४०० किमी झाल्यावर दहा दिवसात!!
अभिनंदन..
(पुढे क्रमशः आहे का? परतीचा प्रवास?)

मालविका's picture

30 Dec 2021 - 9:01 pm | मालविका

हो आहे पुढचा भाग. हा पहिल्या दिवसाचा प्रवास होता. पुढचा भाग उद्या टाकते. आधीचे 200, 300, 400 प्रकाशित झाले आहेत.

मुक्त विहारि's picture

30 Dec 2021 - 6:55 pm | मुक्त विहारि

दंडवत

1993 नंतर, अद्याप तरी सायकल चालवली नाही