ह्र्दय आणि चकवा

शेर भाई's picture
शेर भाई in काथ्याकूट
13 Dec 2021 - 4:23 pm
गाभा: 

आपण बऱ्याचदा सिनेमामध्ये पहातो कि रुग्ण चालता चालता अचानक कोसळतो, हॉस्पिटलमध्ये तिथला स्टाफ आपले सारे कौशल्य पणाला लावून प्रसंगी वि‍जेचे झटके देऊन रुग्णाला परत सचेतन करतो. एखादी व्यक्ती कोसळते तेव्हा सुरुवातीची काही मिनिटे खूप महत्त्वाची असतात अस ऐकून आहे, पण हे सार फक्त सिनेमातच असत असा अनुभव आजवर दोनदा घेतला आहे.

प्रसंग १:
आमच्या मातोश्री (वय वर्ष ६८) दोन दिवस gas सारखा त्रास होतो आहे अस सांगत असल्याने त्या अनुषंगाने घरगुती उपाय चालू होते. दोन दिवसात काही फरक पडेना तेव्हा डॉक्टरांकडे बोलावणे धाडले, त्यांनी ब्लड प्रेशर तपासले, ते नॉर्मल होते. मग रक्तातील साखर तपासली ती पण नॉर्मल होती, म्हणाले कि हॉस्पिटलमध्ये नेऊन संपूर्ण तपासणी करूया. त्याप्रमाणे त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो जिथे तिचे उपचार चालू होते, जाताना आई स्वतःच्या पायाने चालत गाडीत बसली पण हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर ती म्हणाली कि गुडघे भरून आले आहेत, व्हील-चेअर आण मग तिला व्हील-चेअरवर बसवून आत नेले. थोड्यावेळाने तिथले डॉक्टर आले म्हणाले यांची पल्स लागत नाही आहे बहुतेक या गेल्या आहेत. आता काय करावे सुचेना, त्यांना म्हटले कि अहो आता आमच्याशी बोलत आत आली आणि तुम्ही म्हणताय गेली, तुम्ही जरा ते वि‍जेचे झटके देऊन पहा ना, तर म्हणे थोडीशी पल्स असती तर झटके दिले असते, पण त्या आता गेल्या आहेत, तुम्ही पाहिजे तर डेथ सर्टिफिकेट घ्या नाहीतर दुसरीकडे घेऊन जा. आणि जर इथून असेच घेऊन गेलात तर आम्ही डेथ सर्टिफिकेट देणार नाहि.

प्रसंग २:
आमचे वडील (वय वर्ष ७९) आमच्या बरोबर गावाच्या जत्रेला जाऊन आले होते. आल्यानंतर थोडा थकवा जाणवतो आहे अस म्हणत होते. आम्ही देखील प्रवासाच्या दगदगीचा त्रास असेल या निकषाला ग्राह्य मानून शांत होतो. दुसर्‍या दिवशी ते बसल्या जागे वरून उठेना म्हणून डॉक्टरांकडे बोलावणे धाडले, त्यांनी ब्लड प्रेशर तपासले, ते नॉर्मल होते. मग रक्तातील साखर तपासली ती पण नॉर्मल होती, या वेळेस देखील म्हणाले कि हॉस्पिटलमध्ये नेऊन संपूर्ण तपासणी करूया. या वेळी गाडीत आमच्याशी बोलता बोलता बाबा अचानक घोरायला लागले, पण आम्ही आवाज दिला कि सावध होत होते, पण हॉस्पिटलमध्ये पोहचता पोहचता ते गाडीत आडवे झाले. आम्ही गाडी आपत्कालीन सुविधाच्या दरवाज्यात घुसवली, भाऊ धावत गेला आणि म्हणाला कि emergency आहे, तर तिथला स्टाफ हलत डुलत ५ मिनिटांनी स्ट्रेचर घेऊन आला, आणि परत आमचे खाजगी वाहन असल्यामुळे स्ट्रेचरवर चढवायला पुढची १० मिनिट घालवली. आत गेल्यावर पुन्हा तेच यांची पल्स लागत नाही आहे बहुतेक हे गेले आहेत. बाकी सगळी प्रश्नोत्तरे वरील प्रमाणेच.

आता सगळे म्हणतात कि Sudden Cardiac Attack मुळे दोघेही गेलेत, खरं खोट देवास ठाऊक.

मला फक्त इथल्या जाणकारांना एकच प्रश्न विचारायचा आहे कि Sudden Cardiac Attack ची लक्षणे मुळात कशी ओळखावी ?? आणि आपल्याकडे आशा व्यक्तीला वाचवायचा वेळ किती असतो किंवा असतो का??
कारण दोनही प्रसंगात दोघांच सार काही नॉर्मल होत, तरीही आज आम्ही पोरके झालो आहोत.

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

13 Dec 2021 - 6:05 pm | कुमार१

इतक्या महत्त्वाच्या व गंभीर आजारामध्ये लेखात जेवढे लिहिले आहे त्यावरून कुठलेही ठाम मत देणे बरोबर नाही. ज्या डॉक्टरांनी प्रत्यक्ष रुग्ण पाहिलेला असतो तेच याबाबतीत सुयोग्य व्यक्ती ठरतात.

मी फक्त ‘सडन कार्डियाक डेथ' या प्रकाराबद्दल काही उपयुक्त माहिती देतो :

१. अशा व्यक्तीमध्ये छातीत दुखणे, प्रचंड थकवा, धडधड होणे किंवा कसेतरीच होणे अशी लक्षणे दिसू शकतात, किंवा काही वेळेस कोणतेच लक्षण वरकरणी दिसत नाही.
२. लक्षणे जाणवल्यानंतर साधारण एक तासाच्या आत मृत्यू होतो.

३. अशा व्यक्तीत पूर्वीचा हृदयविकार असू किंवा नसू शकतो.
४. जगभरात दरवर्षी याप्रकारे सुमारे 70 लाख व्यक्ती मरण पावतात.

लक्षणे जाणवल्यानंतर साधारण एक तासाच्या आत मृत्यू होतो.

पण असा मृत्यू टा़ळता येवू शकतो का ? मला वाटतं धागालेखकाचाही हाच प्रश्न असावा

कुमार१'s picture

13 Dec 2021 - 6:35 pm | कुमार१

पण असा मृत्यू टा़ळता येवू शकतो का ?

>>
याचे सरसकट एकच उत्तर असणार नाही; ते रुग्णसापेक्ष असेल. रुग्णाची आरोग्य पूर्वावस्था, वय आणि आताच्या प्रसंगात अद्ययावत त्वरित उपचार उपलब्ध झाले किंवा नाही, अशा अनेक गोष्टींवर ते अवलंबून असेल.

( हा विषय अतिविशिष्ट तज्ञांच्या अखत्यारीतील असल्यामुळे याहून अधिक भाष्य मी करणार नाही).

सदर माता-पित्यांना माझी आदरांजली.

पाषाणभेद's picture

15 Dec 2021 - 12:42 am | पाषाणभेद

डॉक्टर सरांशी सहमत.
माता पिता जाण्याचे दु:ख खूप मोठे असते. न भरून येणारे ते एकप्रकारचे नुकसानच असते. जे दैवाच्या हातात होते ते घडले. आपण केवळ कठपुतळे आहोत. या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आहे. आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.

आमच्या आईचे निधन अशाच प्रकारे अचानक झाले आणि ते ही हृदयाच्या स्पेशालिटी रुग्णालयात घरी सोडण्यासाठी तयारी करत असताना, त्यामुळे तुमची वेदना समजू शकतो. मला मिळालेली उत्तरे ह्याच धर्तीची होती (ह्रदय काय कधीपण बंद पडू शकते वगरे) त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असले तरी ज्यांच्या जवळचे लोक जातात त्यांच्या दृष्टीने अत्यंत बेजबाबदार आणि त्यांच्या भावनांची कदर न करणारी अशी ही उत्तरे आहेत.

तुमच्याप्रमाणे मीसुद्धा या गोष्टीचा तपशीलवार तपास केला, आणि मला बरीचशी माहिती, उत्तरे कालांतराने मिळाली. ही माहिती इंटरनेटवर आहे , तसेच माझ्या डॉक्टर मित्राशी चर्चा करून, या विषयीचे पेपर वाचून मला समाधानकारक उत्तरे मिळाली.

असा झटका अचानक वाटला तरी बऱ्याचदा याची लक्षणे पूर्वीपासून दिसत असतात, आपण ती ओळखत नाही, किंवा त्यांना महत्व देत नाही. माझ्या बाबतीत बोलायचे तर आईचे पाय सुजणे, जिना चढताना दम लागणे, अचानक घाम येणे अशी काही लक्षणे हृदयाच्या कमी झालेल्या क्षमतेकडे इशारा करतच होती, पण आम्हाला याचे महत्व वेळीच कळले नाही.

जेम्स वांड's picture

15 Dec 2021 - 7:20 am | जेम्स वांड

जवळचे लोक जातात त्यांच्या दृष्टीने अत्यंत बेजबाबदार आणि त्यांच्या भावनांची कदर न करणारी अशी ही उत्तरे आहेत.

तुमच्या भावनिक स्थितीशी सहमत आहे मी पण एक किंचित असहमतीची छटा आहे, कारण ही विधाने बेजबाबदार नाही किंवा कदर न करणारी नाहीत. कारण मुळात एक डॉक्टर खूप "थिन लाईन" वर चालत असतो. एकीकडे पेशंटचे शोकाकुल आप्तस्वकीय अन दुसरीकडे कर्तव्य अन कायद्याने बांधलेला डॉक्टर ज्याला तुमचे जिवलग का आणि कश्याने गेले हे सांगायचे अवघड काम करायचे असते, प्रिटी मच इकडे आड तिकडे विहीर पोजिशन असते.

मेडिकल क्षेत्रात आजकाल तुफान कट प्रॅक्टिस बोकाळली आहे हे जरी सत्य मानले तरी वरील मत पडते आहे बघा.

वांडोबा, तुम्हाला मुद्दा समजला नाही. किमान एकदा १० मिनिटे तरी नातेवाईकांचे शंकानिरसन करणे हे डॉक्टरच्या कामाचा भाग नाही का? त्यांना मृत्यूबद्दल दोष देण्याचा हेतू नाही. पण त्यांनी काय घडले ते व्यवस्थित सांगणे एवढे तरी निश्चितच अपेक्षित आहे. त्यांनी जर टाळाटाळ आणि लपवाछपवी केली तर त्यांच्याकडून योग्य प्रयत्न झाले की नाही हे बाकीच्यांना कसे समजणार? आज एका डॉक्टरमागे शेकडो रुग्णांचा गराडा पडलेला असतो, ह्या पद्धतीने प्रत्येक रुग्णाकडे लक्ष कितपत देणे शक्य होते? त्यामुळे आपला नातेवाईक अथवा मित्र जर डॉक्टर असेल तर योग्य माहिती आणि उपचार मिळतात असा अनुभव आहे, तो सर्वांना का मिळू नये?

जेम्स वांड's picture

15 Dec 2021 - 12:15 pm | जेम्स वांड

मनोबुआ

आता मला स्पष्ट कळले काय म्हणताय ते, आणि हो मी त्या बाबतीत तुमच्याशी सहमत आहे. किमान काय केलं अन काय झालं हे डॉक्टरने सांगायला हवे ते पण सुलभ भाषेत.

जेम्स वांड's picture

15 Dec 2021 - 7:22 am | जेम्स वांड

आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत.

&#128542 &#128591

झटका अचानक वाटला तरी तो आपला येण्याचा इशारा सतत वेगवेगळ्या मार्गाने देत असतो हे पूर्णपणे मान्य आहे. कुमार सरांनी सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तीमध्ये छातीत दुखणे, प्रचंड थकवा, धडधड होणे किंवा कसेतरीच होणे अशी लक्षणे बहुतेक वेळा दिसतात, पण त्याचे आकलन आपण वेगळ्याच प्रकारे करत असतो. उदाहरणार्थ आईच्या वेळेला ती gas मुळे अस्वस्थ वाटत आहे असे सांगत राहिली, तर बाबांच्या वेळेला प्रवासाचा ताण. दोन्हीही प्रकारात आमचा कात्रजचा घाट झाला. आपल्या बरोबर बोलणारी व्यक्ती अचानक जाते आणि आपण काहीच करू शकत नाही याचे वैषम्य फार आहे.

बाबांच्या वेळेला आपत्काल सेवा भाव अजिबात जाणवला नाही, प्रयत्न तर नाहीच नाही. आमच सांगण फक्त एव्हढच होत कि तुम्ही फक्त नाकात सुत घालून ते गेले आहेत हे का सांगत आहात, तर म्हणे विजेचा झटका आम्ही देणार नाही कारण त्याची गरज आम्हाला वाटत नाही.

झटका येतो तेव्हा कुठल्या बाबी ध्यानात घेतल्या पाहिजेत? कारण आम्ही आपले रक्त दाब आणि शुगर या दोनच बाबी लक्षात घेऊन चाललो होतो.

सुबोध खरे's picture

15 Dec 2021 - 12:31 pm | सुबोध खरे

gas मुळे अस्वस्थ वाटत आहे हि तक्रार बऱ्याच वरिष्ठ नागरिकांची असते.

या वेळेस इ सी जी काढून पाहावा लागतो.

१०० पैकी ९० वेळेस इ सी जी नॉर्मल येतो तेंव्हा कट साठी डॉक्टरांनी अनावश्यक चाचण्या करायला लावल्या हा किटाळ बहुसंख्य डॉक्टरांच्या पदरी येतो.

उरलेल्या १० % लोकांमध्ये वेळेस इ सी जी काढला म्हणून हृदयरोगाचे निदान होते आणि वेळेत उपचार होतात.

दुर्दैवाने आपण या १० % मध्ये आहात कि ९० % मध्ये आहात हे सांगायला डॉक्टर ज्योतिषी नाहीत.

बाकी आपले नशीब.

आग्या१९९०'s picture

15 Dec 2021 - 1:02 pm | आग्या१९९०

कुठलीही आरोग्य चाचणी नॉर्मल आली की डॉक्टरांवर कट प्रॅक्टिसचा आरोप होतो.

कंजूस's picture

15 Dec 2021 - 12:18 pm | कंजूस

आता माझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही पण खात्रीशीर उपाय आहेत आणि मी ते केले आहेत.
१. वृद्ध लोक असे थंड पडतात.
२. ते आपलेच आइवडील, आजोबाआजी असल्यास हा प्रयोग करू शकतो। दुसरे कुणी असल्यास - शेजारी वगैरे तर त्यांच्या घरच्यांच्या मतानुसार डॅाक्टरकडे नेणे मदत करावी. प्रयोग करायला जाऊ नये कारण first aidवर त्यांचा विश्वास नसतो.

तर्कवादी's picture

15 Dec 2021 - 1:26 pm | तर्कवादी

खात्रीशीर उपाय आहेत आणि मी ते केले आहेत.

कोणता उपाय / प्रयोग ? सविस्तर सांगू शकाल काय ?

कंजूस's picture

15 Dec 2021 - 7:13 pm | कंजूस

निपचितपणा आला, थंड पडू लागले शरीर तर -
वृद्धास उशीस टेकवून बसवा.
ओवा शेकून पुरचुंडी बांधून हुंगवा.
हात,पायांना आणि छातीच्या खाली पोटावर आल्याचा रस चोळावा. हे पाच दहा मिनिटे सुरू ठेवा. धुगधुगी येते. ( सामान्य माणसास रस चोळल्यास आग होते पण शरीर थंड पडू लागणाऱ्या रुग्णास काही त्रास होत नाही.)
ह्दय थंड पडू लागले तर रक्तप्रवाह सुरू होऊन पुन्हा नॉर्मल होते.

हा उपचार करण्याचा अर्धा तास वेळ असतो तेव्हाच पळापळ करून दवाखान्यात नेण्यात वेळ वाया जातो.

वय वाढत जाते तसतसे पोटातला 'अग्नी' मंद पडू लागतो. काहीही पचवायची शक्ती क्षीण होत असते. ग्यासेस होऊ लागतात. हे ह़्रदयास आणि रक्तप्रवाहास अडथळे आणतात.

अगदी ऐनवेळी आल्याचा रस न मिळाल्यास अमृतांजन अधिक पेट्रोलियम जेली वापरता येईल.

सर्वच ठिकाणी सर्वच वेळा डॉक्टर जवळ असतोच असे नाही. दूर गावांत,रात्री काय होत असेल कल्पना करा. शहरांतले वातावरण वेगळे, गावांतले वेगळे.

सौन्दर्य's picture

15 Dec 2021 - 11:58 pm | सौन्दर्य

कंजूस साहेब,

ओव्याच्या उपयोगाविषयी आणि उपयुक्ततेविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. दोन मुठी ओवा तव्यावर शेकून त्याची पातळ कापडात पुरचुंडी करून आजाऱ्याला हुंगवल्यास तसेच कपाळ, छाती, पाठ ह्यावर शेकल्याने लगेचच बरे वाटते हा माझा अनुभव आहे. ओव्याच्या वाफा श्वासावाटे फुफ्फुसात गेल्याने सर्दी मोकळी होते, श्वास घ्यायला मदत होते व शरीरात ऊर्जा निर्माण होते.

गम्मत म्हणजे ओव्याची वाफ प्राण्यांना देखील उपयोगी पडते हे मी अनुभवले आहे. आमच्या घरच्या कुत्र्याला (जो गेल्यातच जमा होता) ओव्याच्या धुराने नवजीवन दिले तसेच मांजर मलूल होऊन पडली होती ती दहा मिनिटाच्या वाफेने उठून बसली व मी जास्त शेक द्यायला गेलो तर फिस्कारून पळून गेली.

आल्याचा रस पोटात गेल्याने अंगात उष्णता निर्माण झाल्यासारखे वाटते हे अगदी खरे आहे, अंगाला चोळल्याने काय होते ते अजून पाहिले नाही, पण प्रयोग करून बघायला हरकत नाही.

कंजूस's picture

16 Dec 2021 - 10:50 am | कंजूस

कुणीतरी धीराने तो उपचार करावा लागतो. प्रत्येक वेळीच काळ आलेला नसतो आणि गुण येतो.

शेर भाई's picture

3 Jan 2022 - 12:00 am | शेर भाई

साधारणपणे अशाप्रकारच्या घटनेत सगळ्यात आधी Pulse बंद होते. वर नमूद केल्याप्रमाणे उपचारांनी ती परत देखील येत असावी, पण एक प्रश्न असा पडला आहे कि, ज्याप्रमाणे गाडीला बंद पडल्यावर धक्का मारून Start करतो त्याप्रमाणे गेलेली Pulse परत आणण्यासाठी उपचार सुरु करण्यासाठी आपल्याकडे साधारणपणे किती वेळ असतो ज्यात Pulse परत येण्याची शक्यता अधिक असते??

त्यात अडथळे येतात. तर ते थोडेफार लगेच दूर केले ( बहुतेक अर्ध्या तासात) तर जीव वाचतो.

[ ज्याप्रमाणे गाडीला बंद पडल्यावर धक्का मारून Start करतो म्हणजे आपण fuel tube मधला air lock काढतो/पुढे सरकवतो बहुतेक. पण ती गोष्ट थोड्या वेळानेही करता येते. कारण गाडीचे एंजिन बंद पडून गाडी रस्त्यावर सेफ उभी असते. परंतू विमान आकाशात अधांतरी असते त्याचे एंजिन बंद पडून चालत नाही. ]

शेर भाई's picture

3 Jan 2022 - 5:10 pm | शेर भाई

ह्या बाबतीत Golden Minuts हा प्रकार ऐकून आहे, पण तो कालावधी नक्की किती असतो?? तसेच "विद्युत झटका" देताना ह्या कालावधीचा विचार होतो का?

शेर भाई's picture

15 Dec 2021 - 2:25 pm | शेर भाई

या उपायांबाबत मी देखील ऐकून आहे, पण ते काय आहेत ह्या बाबत माहिती हवी आहे. मिळेल का ??

रंगीला रतन's picture

15 Dec 2021 - 1:00 pm | रंगीला रतन

आपल्या दुःखात सहभागी आहे.

श्रीगणेशा's picture

15 Dec 2021 - 2:00 pm | श्रीगणेशा

१० वर्षांपूर्वी ह्रदयातील दोन झडपा बदलण्यासाठी successful ऑपरेशन.
नियमित औषधे आणि वेळेवर चाचण्या.
दोन आठवड्यापासून छातीत दुखण्याची तक्रार.

५ वर्षांपासून नियमित तपासणी करणाऱ्या कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांनी स्वतःहून सोनोग्राफी करून औषधांनी एक आठवड्यात बरे व्हाल असा दिलेला सल्ला.

त्यानंतर पाचव्या दिवशी वेदना असह्य झाल्याने दुसऱ्या cardiologist डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्डिओ आयसीयुत admit. हृदयाच्या बदललेल्या दोन झडपांपैकी एका झडपेशेजारी रक्ताची गुठळी झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं. आणि हळू हळू thrombolysis (रक्त पातळ करण्याची प्रक्रिया) करून गुठळी निघून जाऊन झडप व्यवस्थित काम करेल अशी अपेक्षा, आणि तेवढाच एक उपाय असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं.

सातव्या दिवशी cardiac arrest.
आठव्या दिवशी दुसऱ्या cardiac arrest मधे माझ्या बहिणीचा वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी मृत्यू.

---------

यात ५ वर्षांपासून नियमित तपासणी करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांनी, सोनोग्राफी करूनही, लक्षणं दिसूनही, पेशंटला admit न होण्याचा सल्ला देणं हे समजण्यापलीकडे आहे.

मातृ-पितृ वियोगाने आपणास जे दु:ख झाले ते कमी व्हावे म्हणुन प्रार्थना करतो. _/\_
बाकी मृत्यू बद्धल काय बोलावे ? जितके श्वास घेण्यासाठी जन्म झाला आहे, ते संपले की मृत्यू अटळ !
कोणती आणि कितीही प्रगती केली तरी, पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा...

मदनबाण.....

कर्नलतपस्वी's picture

17 Dec 2021 - 11:30 am | कर्नलतपस्वी

आपल्या दिवंगत माता पित्याला सादर श्रद्धांजली.

१९९५ साली बहिणीच्या अपघाती मृत्युमुळे अचानक छातीत कळ आली व चक्कर आणी श्वासोच्छ्वास त्रास होऊ लागला. वैद्यकीय क्षेत्रात आसल्यामुळे धोक्याची सुचना मीळाली पण परीस्थिती मुळे अँस्परीन फक्त उपलब्ध होती. दोर बळकट होता थोडक्यात निभावले.
तपासणी अंती निदान झाले. त्या दिवसापासून शिस्तबद्ध वागल्याने अजूनपर्यंत गाडी विना सर्व्हिस ची व्यवस्थित चालू आहे.

शाकाहार
नियमीत व्यायाम,
वेळेचे पालन (जेवणाची, झोपण्याची ,वैद्यकीय तपासणीची ).
इदंम् न मम म्हणत मानसिक संतुलन कायम ठेवण्याचा प्रयत्न विनाकारण ताण तणावा कडे दुर्लक्ष

कय टाळले

धूम्रपान,
मद्य पान,
अभक्ष भक्षण,
तेलकट, तुपकट, गोड पदार्थ

अर्थात घटा घटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे.....

आधी लक्षणे दिसली तपासण्या केल्या तरी प्रत्येक गोष्टी साठी लगेच दवाखाना गाठला जात नाही , थोड्या दिवसा पूर्वी आमचा येथे साधारण ३० वर्षाचा माणूस काही आजार नसताना दु चाकी वर्रून जाताना अचानक झटका येवून गेलाही , नशीब गर्दी मुळे वेग जवळपास शून्य होता , इतर कुण्याच्या अंगावर गाडी गेली नाही .

सरिता बांदेकर's picture

23 Dec 2021 - 2:15 pm | सरिता बांदेकर

माझे वडिल अचानक गेले. त्यावेळी त्यांचं वय होतं ४५. शुगर ,बीपी काही नाही.सगळ्यांशी छान गप्पा मारत होते आणि वाक्यं अर्धवट राहिलं म्हणून बघितलं तर बोलायला आ वासला होता.हात लावल्यावर एक साईडला कलंडले. मग डॅा. बोलावलं त्यांनी सांगितलं गेले. काही त्रास नाही.
दुसरे नातेवाईक असेच चाळीशीत होते. ते रोज भरपूर चालायचे आणि एकदम ॲक्टीव्ह. ते पण तसेच बोलता बोलता गेले.
दोघांनाही कसलंही व्यसन नाही. आरोग्याची काळजी घ्यायचे.
डॅा.नी सांगितलं कधी कधी आपल्या रक्तात गुठळी होते ती फिरत असते पण ता हृदयाजवळ गेली की हृदय बंद पडतं.
अशा वेळी जोरात बुक्कया मारायच्या छातीवर. पण त्यावेळी ते सुचत नाही आपण त्यांना हलवत आणि हाक मारत रहातो.तोंडावर पाणी मारत रहातो.
त्यामुळे काय बोलावं माहित नाही.

मित्रहो's picture

26 Dec 2021 - 8:32 pm | मित्रहो

तुमच्या आईवडीलांना श्रद्धांजली
ह्रदय बंद पडण्याआधी ह्रदयविकाराचा त्रास असतो असे वर डॉक्टरांनी सांगितले आहे. बऱ्याचदा लक्षणे दिसत असली तरी तो ह्रदयविकारच आहे असे वाटत नाही म्हणून कदाचित दुर्लक्ष होत असावे. ह्रदय अचानक बंद पडल्यानंतर पल्स जातपर्यंत काही उपयोग आहे का ते सांगणे कठीण आहे. बऱ्याचदा व्हेंटिलेटर लावतात त्याचा काही उपयोग होतो का. तसेच पेशंटची पल्स बंद पडल्यानंतर दवाखान्यात आल्यास डॉक्टरांना पुढे उपचार करत नाहीत का की तसे करुन काही फायदा नसतो.

छातीत दुखले म्हणजे गॅस आहे असे वाटून डॉक्टरांकडे न जाणे ही खूप कॉमन समस्या आहे. तसेच डावा खांदा दुखणे, पाठीत दुखणे ही लक्षणे ह्रदयविकाराची आहे असे वाटत नाही मग गोंधळ होतो. ECG काढायला हवा. तरुणांना जर त्रास झाला तर बऱ्याचदा दुर्लक्ष केल्या जाते. ह्रदयविकाराचा त्रास असो वा नसो एकदा डॉ अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी ह्रदयरोग पुस्तक वाचायला हवे. जीवनशैलीत काय बदल करावे ते छान सांगितले आहे.

मला अठरा वर्षांपूर्वी पुण्यातील डॉक्टरांचा चांगला अनुभव आला होता.

स्वधर्म's picture

27 Dec 2021 - 3:48 pm | स्वधर्म

शेर भाई आपल्या दु:खात सहभागी आहे. आपणांस ते सहन करण्याची शक्ती लाभो.
२०१८ साली माझ्या आईच्या बाबतीत असेच काहीसे घडले. सकाळी चहा करून भावाला दिला आणि स्वत:ही घेतला. त्यानंतर प्राणायाम करत असताना तिच्या घशातून घोरल्याप्रमाणे आवाज आला आणि छातीत दुखते आहे असे तिने सांगितले. हातपाय थंड पडत चालले. रूग्णवाहिका बोलावली व दवाखान्यात नेले असता त्यांनी ती गेली आहे असेच सांगितले. आधी आठवडाभर तिची पाठ दुखत होती व किरकोळ घरगुती उपचार केले होते. साखर व रक्तदाबाच्या गोळ्या सुरू होत्या, पण अचानक असे काही होईल अशी काडीमात्र कल्पना आली नाही. कोणी काहीही करू शकले नाही. असे चालते बोलते माणूस अचानक गेल्यावर काय धक्का बसतो ते माहिती आहे.
अशा वेळी दिलासा देणार विचार म्हणजे तिला कुणाकडूनही काही करुन घ्यायला आवडत नसे आणि चालता फिरताच मला मरण यावे असे ती नेहमी म्हणत असे. शेवटी अगदी काम करत करत ती गेली. हे असं व्हायला नक्कीच पुण्य लागंत असलं पाहिजे. तिचे सोने झाले असे आंम्ही मानतो. हे मुद्दाम आपल्यासाठी लिहित आहे.
आजच एका आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटलो व गॅसेस झाल्यावर श्वसनाला त्रास होतो का हे विचारले. त्यांच्या मते गॅसेस झाले की डायफ्रॅमवर प्रेशर आल्यामुळे आधीच सर्दी असेल, नाक चोंदले असेल तर खूप त्रास होऊ शकतो व अगदी हृदयविकाराच्या झटका येतो की काय असे वाटते.

शेर भाई's picture

3 Jan 2022 - 5:10 pm | शेर भाई

आता एक विचार असा ही येतो कि आईच्या वेळेस, जर हा विषय मांडला असता तर प्राथमिक उपचारासाठी आम्ही थोडे बहुत तयार झालो असतो.
एकाच बॉलर कडून त्याच त्याच प्रकारे दोनदा आपले मोलाचे गडी गमावण्यासारखी दुसरी नामुष्की नाही.
अर्थात जर तर ला कधीच काहीच अर्थ नसतो हे देखील मान्यच आहे.
या चर्चेमुळे अशा प्रसंगात एखाद्याचे प्रबोधन होऊन जर कोणी कोणाची वेळ टाळू शकले तर त्यासारखे साध्य नाही.