शिवशाहीर.....

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
15 Nov 2021 - 4:41 pm

.
काळ: असाच साधारण नव्वदीच्या आसपासचा.
वय: असंच आडनिडं वडलांचा हात धरुन बाजारात फिरायचं.
अक्कल: अशीच पाठ्यपुस्तकात अन घरात मिळायची तितकी.
छंदः असाच गणिते टाळून घोड्यावरचे शिवाजीमहाराज काढायचा.
आईवडील: असेच मध्यमवर्गीय चारचौघांसारखे. पोराचं अन त्याच्या छंदाचं कौतुक असणारे.
परिस्थिती: तीही अशीच. जशी ह्या सर्व गोष्टीत असते तशी.
.
झालं असं की गावात एका बँकेच्या व्याख्यानमालेत तीन दिवस एक व्याख्यान चालणार होतं. बँक परिवाराची म्हणजे आपलीच. आमंत्रण होतंच पण घरटी दोन प्रवेश फक्त. मग चौघांच्या कुंटुंबात असं ठरलं की पहिल्यांदा आईसोबत मी जाईन. दुसरे दिवशी वडील माझ्या भावाला घेऊन जातील. पोरं गप ऐकतील असा विषय असल्याशिवाय आईवडील कुठे घेऊन जाणार नाहीत ह्याची अगदी खात्रीच आम्हा भावंडांना.
आईसोबत संध्याकाळी व्याख्यानास पोहोचलो. व्याख्यान म्हणजे काय हेही कदाचित तेंव्हा माहीत नसावे. समोरच्या स्टेजवर मोठा पडदा लावलेला. रोज पाहून ओळखीचा झालेला बँकेच्या चिन्हातील हंस तेथे बँकेच्या नावासहित झळकत होता. खाली शिवचरित्रावर व्याख्यान आणि व्याख्याते म्हणून शिवशाहीर बाबासाहेब उपाख्य मोरेश्वर बळवंत पुरंदरे असे नाव. प्रेक्षकांच्या आगमनाच्या गर्दी आणी गडबडीत स्टेजवर ओळख समारंभ पार पडत होता. इकडे तिकडे बघत असताना स्टेजवर नजर गेली तर साक्षात महाराज अवतरल्याप्रमाणे भास झाला. मोठे दरदरीत नाक. त्याच ओळखीच्या दाढी आणि मिशा. झब्बा आणि सुरवार. एका डौलदार मंदीलाची कमतरता होती पण संवत साल शके वंशावळ्या बिरुदे अन स्थानमाहात्म्य गर्जणारा तो कडाडता आवाज नुसते स्टेजकडे पाहात बसवत होता. पन्ह्याळ्याच्या त्या रोमहर्षक लढाईचं वर्णन नुसत्या भारदस्त आवाजात शाहीरी बाण्यात साकार होत होतं. प्रत्यक्ष साक्षात शिवाजीमहाराज रिकिबीत आपला चढावाचा पाय ठेवून घोड्यावर बसताना दिसत होते. एका टाचेच्या इशार्‍यावर चौखूर उधळणारं ते मावळ्यांचं अश्वपथक राजांच्या मागे ज्या श्रध्देने दौडत होत त्याच श्रध्देने सारा श्रोतृवर्ग शिवशाहीरांच्या मागून त्या मंतरलेल्या काळाची अन देवतुल्य राजाची कहाणी मन लावून ऐकत होतं. व्याख्यानाचा त्या दिवसाचा भाग संपत आला. शिवशाहीरांनी कहाणी, माणसे अन घटनेचे मर्म सांगत इतिहासकारांच्या नोंदींचा उल्लेख सांगितला. शाहीर अन भाटांनी पिढ्यानपिढ्या जोपासलेल्या कवनांचाचे ॠण मानत एक खंत व्यक्त केली. आपल्याकडे दस्तावेजीकरण करताना अक्षरात लिहिले गेलं, मुखोद्गत केले गेले तो इतिहास चित्रात मात्र फार कमी दिसतो. इतक्या रोमहर्षक घटनांची मांदीयाळी आहे की एकेका घटनेवर प्रदेशात एकेक चित्रपट निघाला असता. एकेक प्रसंगावर चित्रे रेखाटली गेली असती. शिवचरीत्र रेखाटणार्‍या कलायोगी दीनानाथ दलालांचे त्यांनी उदाहरण दिले. आजच्या व्याख्यानातून स्फूर्ती घेणारा एक जरी कलावंत निघाला तरी ते ह्या चित्रदर्शी व्याख्यानाचे यश मानता येईल असे नमूद करुन व्याख्यानाची त्या दिवसाची सांगता झाली.
अगदी टिपिकल कुटुम्बाप्रमाणे घरी चर्चा व्याख्यानाची झाली. वडील अचानक म्हणाले. " का रे. काढतो का तू चित्र त्या प्रसंगाचे?" डोक्यात तर तेच घोळत होते. चित्रकलेचे पाचवी च्या मुलाला असते तितकीच उमज मलाही होती पण वडिलांच्या कौतुकामुळे चार रंग आणी कागद नेहमी जास्त असायचे इतर मुलांपेक्षा. मलाही कळले नाही किती वेळ लागला ते चित्र काढून रंगवायला पण प्रसंग डोळ्यासमोरच दिसत होता आणि चित्र तयार झाले. दुसर्‍या दिवशी व्याख्यानास वडील आणि भाऊ जाणार होते पण संध्याकाळी उशीराच वडीलांनी सांगितले. "चल आपल्याला जायचंय सुलाखे वाड्यात" बार्शीतले ते एक व्यापारी आणि नगरशेठ. व्याख्यानमालेचे ते पुरस्कर्ते आणि बँकेचे संचालक. त्यांच्याच घरी शिवशाहीरांचा मुक्काम होता. वडील त्याच बँकेत असलेने परिचय होताच. वाडा जुन्या पध्दतीचा. जोते, ओसरी असणारा. झोपाळ्यावर बसलेले शिवशाहीर बघताच मी अंग चोरुन वडिलांच्या मागे लपू लागलो. त्यांनी जवळ बोलावले. लहान मुलांनाही अहोजाहो करणारा तो मार्दवी स्वर, या बाळराजे हे कधीही न ऐकलेले संबोधन ऐकून का कोण जाणे रडायलाच येऊ लागले. वडिलांनी पुढे जाऊन त्यांना ते चित्र दाखवले. चित्राची सगळी कहाणी ऐकवली. शिवशाहीरांनी जवळ बोलावले अन इतक्या मायेन डोक्यावर हात फिरवला अन काय बोलले ते माझ्या कळण्याच्या पलिकडचे होते. घरी परत आलो ते एका धुंदीत. वडील काय सांगत होते उद्याच्या कार्यक्रमाचे तेही लक्षात आले नाही.
दुसरे दिवशी व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प होते. वडिलांसोबत पुन्हा माझेच वर्णी लागली. कार्यक्रम सुरु होण्याआधीच शिवशाहीरांनी स्वतःजवळ ठेवलेले ते मी काढलेले चित्र लोकांना दाखवले. नंतरची काही मिनिटे नुसते अधांतरी वाटत होते. लहानसहान चित्रकला स्पर्धात मिळवलेली बक्षीसे स्वीकारणे मला माहीत होते पण हे काहीतरी नवे होते. मला आवडीचे आणि आनंद मिळवणारे काही केल्यानंतर होणारे कौतुक नवीन होते. आज आठवले की जाणवते काढलेले चित्र साधेच होते पण कौतुक करणारा माणूस अफाट होता. तमाम महाराष्ट्राला शिवचरित्राची गोडी लावून महाराजांवर, त्यांच्या गडकिल्ल्यावर अन इतिहासावर अफाट प्रेम करायला शिकवणारा शाहीर अफाट होता.
.
.
आमचं वय वाढत गेलं, बालाचे किशोर अन किशोरांचे तरुण होऊन कशाचीही प्रौढी मिरवायचा काळ सुध्दा आला पण त्या काळात लागलेली ती गोडी अन झालेले ते कौतुक आठवताना जाणवते की इतके दिवस, इतकी वर्षे एखादा कुणी कुणाच्या प्रेमात कसा अखंड बुडू शकतो. एका वेड्या शिवप्रेमीकडून कौतुक झालेली ती कला अंगी राहिली पण पोटार्थी झाली. चार तुकड्याच्या मोहात त्या कलेला कसेही वळवले. करीयर अन पैसा करत करत आज शिवशाहीरांची बातमी वाचतो तेंव्हा त्या भारावलेल्या वयात रेखाटलेल्या चार रेषा अन त्या कौतुकाच्या वर्षावात भिजलेले चार थेंब आयुष्याचा दागिना का वाटतात आम्हाला? कसे कुणी आयुष्यभर तेच करु शकतो?
.
.
शिवशाहीर, तुमच्या चार शब्दांचं इतकं वाटतंय आम्हा भणंगाना. तुम्ही तर साक्षात शिवरंगी रंगवलं आक्खं आयुष्य. मानाचा मुजरा तुम्हाला.
baba
चित्रसौजन्य: मंदार जगताप्/फ्लिकर

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Nov 2021 - 4:52 pm | ज्ञानोबाचे पैजार

समयोचीत मनोगत, आवडले.
जाणता राजाच्या एका प्रयोगाच्या वेळी त्यांचे जवळून दर्शन घेता आले होते.
काही लोक असे असतात ज्यांच्यावर आपोआप जीव जडतो. बाबासाहेब हे त्यातलेच एक आहेत.
भावपूर्ण श्रध्दांजली
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

15 Nov 2021 - 4:53 pm | प्राची अश्विनी

+11

तुम्ही तर साक्षात शिवरंगी रंगवलं आक्खं आयुष्य. मानाचा मुजरा तुम्हाला
असा हिरा पुन्हा घडणार नाही.जाणता राजाचा प्रयोग म्हणजे शहरात उत्सव असायचा.
नेमक्या शब्दात मांडले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
__/\__

अनेक आठवणी मनात राहतील, त्यांनी ठेवलेला महाराजांच्या कथेचा ठेवा सोबत करत राहील.

मुक्त विहारि's picture

15 Nov 2021 - 5:28 pm | मुक्त विहारि

मी फक्त एकदाच त्यांना ओझरते पाहिले आहे

ॠषीतूल्य माणूस होता ...

राघवेंद्र's picture

15 Nov 2021 - 5:32 pm | राघवेंद्र

छान आठवण लिहिलास रे अभ्या !!!

भावपुर्ण श्रद्धांजली!!!

शिवशाहीरांना प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही, मात्र त्यांची ओजस्वी वाणी आणि तेजस्वी लेखणीने त्यांना अनुभवत आलोय.

लखलखता हिरा निखळला आज.
शिवशाहीरांना आदरांजली.

झोपाळ्यावर बसलेले शिवशाहीर बघताच मी अंग चोरुन वडिलांच्या मागे लपू लागलो. त्यांनी जवळ बोलावले. लहान मुलांनाही अहोजाहो करणारा तो मार्दवी स्वर, या बाळराजे हे कधीही न ऐकलेले संबोधन ऐकून का कोण जाणे रडायलाच येऊ लागले. वडिलांनी पुढे जाऊन त्यांना ते चित्र दाखवले. चित्राची सगळी कहाणी ऐकवली. शिवशाहीरांनी जवळ बोलावले अन इतक्या मायेन डोक्यावर हात फिरवला अन काय बोलले ते माझ्या कळण्याच्या पलिकडचे होते. घरी परत आलो ते एका धुंदीत. वडील काय सांगत होते उद्याच्या कार्यक्रमाचे तेही लक्षात आले नाही.

दुसरे दिवशी व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प होते. वडिलांसोबत पुन्हा माझेच वर्णी लागली. कार्यक्रम सुरु होण्याआधीच शिवशाहीरांनी स्वतःजवळ ठेवलेले ते मी काढलेले चित्र लोकांना दाखवले. नंतरची काही मिनिटे नुसते अधांतरी वाटत होते. लहानसहान चित्रकला स्पर्धात मिळवलेली बक्षीसे स्वीकारणे मला माहीत होते पण हे काहीतरी नवे होते. मला आवडीचे आणि आनंद मिळवणारे काही केल्यानंतर होणारे कौतुक नवीन होते.

💖
साक्षात खरोखरीच्या थोर "जाणत्या राजाने" कौतुक करावे केवढी मोठी गोष्ट !
आयुष्यभर जपून कोंदणात जडवावा असा अमुल्य ठेवा !

शिवशाहिरांबद्दल काय बोलणार.
असा शिवशाहिर पुन्हा न होणे !
शिवशाहिरांना भावपूर्ण श्रध्दांजली

(अर्कचित्र जबरीच आहे, +१ आवडले

श्वेता व्यास's picture

15 Nov 2021 - 6:20 pm | श्वेता व्यास

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली! आपण खरोखर नशिबवान आहात.

सौंदाळा's picture

15 Nov 2021 - 6:22 pm | सौंदाळा

सुंदर आठवण
पिंपरीत एच. ए. मैदानावर आठ वर्षांपूर्वी जाणता राजाचा प्रयोग पाहिला होता. बाबासाहेब जरी नव्हते तरी हा प्रयोग त्यातले भावपूर्ण, जोषपूर्ण संवाद, खरे घोडे, उंट, शिवरायांचा जयजयकार, लढाईचे प्रसंग बघून रोमांचित झालो होतो. टाईम मशिनमधून साडे तीनशे वर्षे मागे जाऊन प्रत्यक्ष लढाई, राज्याभिषेकाला हजर आहे असे वाटत होते.
बाबासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली

असा शाहीर पुन्हा नाही. अखेरचा दंडवत !!!

राघव's picture

15 Nov 2021 - 6:58 pm | राघव

मनोगत आवडले.
कुणीतरी जवळचं सोडून गेल्यासारखं वाटतंय. भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_

मित्रहो's picture

15 Nov 2021 - 7:05 pm | मित्रहो
कंजूस's picture

15 Nov 2021 - 7:31 pm | कंजूस

शब्द नाहीत.

फेरफटका's picture

15 Nov 2021 - 8:01 pm | फेरफटका
फेरफटका's picture

15 Nov 2021 - 8:02 pm | फेरफटका
फेरफटका's picture

15 Nov 2021 - 8:02 pm | फेरफटका

वा अभ्या!! फार हृद्य आठवण सांगितलीत. सार्वजनिक जीवनात एखाद्याच्या निधानानं इतकं वैय्यक्तिक दु:ख वाटावं अशी माणसं विरळा!

माझी एक आठवण : पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये झालेल्या एका संस्थेच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. शिवाजी ह्या विषयावर एक शब्द हि न बोलता, कृष्ण-अर्जुनाच्या गुरु-शिष्य नात्यावर अप्रतिम बोलले होते. (ते शिवाजी महाराजांवर बोलतील हा माझा स्टिरीओटाइप होता)

त्या कार्यक्रमाची आणखीन एक गंमत म्हणजे कार्यक्रमानंतर कुणीतरी चुकून बाबासाहेबांच्या चपला घालून गेलं होतं. त्या कार्यक्रमानंतर वर्ष-दोन वर्षांनी बालगंधर्व रंगमंदिरात दुसऱ्या एका संस्थेच्या कार्यक्रमात मी त्यांच्या मानपत्राचं वाचन केलं होतं. कार्यक्रम संपल्यावर बालगंधर्व च्या बाहेर मी त्यांना भेटलो आणि म्हटलं कि आपली ह्या आधी भेट झालीये. संध्याकाळ झाली होती. अंधार होता (स्ट्रीट लाईट्स होते). मला म्हणाले कि तुम्ही सांगू नका (ते सगळ्यांनाच अहो जाहो करत हा त्यांचा मोठेपणा
होता). आणि एखादा मिनिट विचार करून त्यांनी 'मागे ज्ञान प्रबोधिनीत एका कार्यक्रमात आपण भेटलो होतो. तेव्हा तुम्ही सूत्रसंचालन केलं होतं ... कार्यक्रमानंतर माझ्या चपला कुणीतरी घालून गेलं होतं' अशी सगळी घटना सांगितली होती. जो कुणी बाबासाहेबांची चप्पल त्या दिवशी घालून गेला त्याचे मला जाहीर आभार मानायचे आहेत. त्याच्यामुळे (का होईना), त्यांना मी लक्षात राहिलो आणि आम्हाला संभाषणाला विषय मिळाला.

Bhakti's picture

15 Nov 2021 - 8:10 pm | Bhakti

मस्तच आठवण!

Bhakti's picture

15 Nov 2021 - 8:11 pm | Bhakti

मस्तच आठवण!

Bhakti's picture

15 Nov 2021 - 8:12 pm | Bhakti

मस्तच आठवण!

फारएन्ड's picture

15 Nov 2021 - 8:33 pm | फारएन्ड

'राजा शिवछत्रपती' कधीही उघडले तरी अजूनही तितकेच वाचनीय वाटते. इथे अमेरिकेत काही वर्षांपूर्वी ते आले होते तेव्हा त्यांच्या एका व्याख्यानाला जाता आले. तेव्हाही त्यांचे बोलणे अगदी गुंगवून टाकणारे होते. 'जाणता राजा' जेव्हा जोरात होते तेव्हा नेमके कधी जायला जमले नाही. पण इतरांच्या वर्णनातून त्याची भव्यता, शिस्त वगैरे लक्षात येते.

फेफ - तुझी आठवणही भारी!
सार्वजनिक जीवनात एखाद्याच्या निधानानं इतकं वैय्यक्तिक दु:ख वाटावं अशी माणसं विरळा! >>> १००%

फेरफटका's picture

15 Nov 2021 - 8:51 pm | फेरफटका

"पण इतरांच्या वर्णनातून त्याची भव्यता, शिस्त वगैरे लक्षात येते." - फा - 'शिस्त आणि भव्यता' - परफेक्ट!! जाणता राजा दोन-तीन वेळा बघण्याची संधी मिळाली. अगदी लहान असताना जाणवली ती त्याची भव्यता आणि त्यातून होणारा इंपॅक्ट. नंतर त्यात काम करणारे काहीजण ओळखीचे झाले, काहींबरोबर इतर नाटकांतून कामं केली आणि त्यांच्याकडून जाणता राजाच्या वेळच्या शिस्तीविषयी ऐकलं. इतका मोठा प्रॉजेक्ट शिस्तीशिवाय उभा रहाणं अशक्य आहे.

चौथा कोनाडा's picture

15 Nov 2021 - 9:01 pm | चौथा कोनाडा

मानपत्राचं वाचन केलं होतं.

रोमांचक आठवण.

काहींबरोबर इतर नाटकांतून कामं केली

या वर ही सवडीने एकदा लिहावे ही विनंती

अनन्त्_यात्री's picture

15 Nov 2021 - 10:28 pm | अनन्त्_यात्री

पुन्हा न होणे !

चित्रगुप्त's picture

15 Nov 2021 - 10:29 pm | चित्रगुप्त

वाहवा. खूप सुंदर लिहीले आहे. लेखाची सुरुवात - एकदम वेगळी आणि प्रांजळ - खासच. समयोचित लेखाबद्दल अनेक आभार.

कला अंगी राहिली पण पोटार्थी झाली. चार तुकड्याच्या मोहात त्या कलेला कसेही वळवले.

अस्सल कलावंताला ही खंत फार व्याकुळ करत असते.

आपल्याकडे दस्तावेजीकरण करताना अक्षरात लिहिले गेलं, मुखोद्गत केले गेले तो इतिहास चित्रात मात्र फार कमी दिसतो.

शिवशाहिरांनी आमचे वैगुण्य नेमके टिपले आहे. किमान 'शिवसेने'ने तरी हे काम अंगावर घेतले (पाहिजे होते) अजूनही घ्यावे.
शेवटले चित्र कुणी रेखाटले आहे ?

सुक्या's picture

16 Nov 2021 - 12:07 am | सुक्या

येणारा प्रत्येक जण कधी ना कधी जाणारच आहे हे माहीत असुनही काही लोकांच्या जाण्याने मनाला चुटपुट लागुन राहते. शिवशाहीर हे त्यातलेच एक. माझ्या गावात 'जाणाता राजा' चे प्रयोग एका मैदानावर झाले होते. त्याला काही नावही नव्हते .. नंतर मात्र ते मैदान आजपर्यंत "जाणता राजा मैदान" म्हणुन ओळखले जाते. एखाद्या गोष्टीची महिमा अशी असते . .

शिवशाहिरांना भावपूर्ण श्रध्दांजली

श्रीरंग_जोशी's picture

16 Nov 2021 - 1:02 am | श्रीरंग_जोशी

एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाकडून मिळालेल्या कौतुकाच्या थापेचे (पक्षी: पाठीवर मिळालेली थाप) एवढे चित्रदर्शी वर्णन वाचायला मिळाले त्यासाठी अभ्या यांस दंडवत.
एका पर्वाचा अस्त झाला. बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र श्रद्धांजली.

वीस वर्षांपूर्वी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्टेडियममधे जाणता राजाचा प्रयोग पाहिला होता. शेवती बाबासाहेबांचे थोडक्यात भाषण ऐकले होते त्याची आठवण या निमित्ताने झाली.

त्या चित्राची छायाप्रत काढली होती का? मंदार जगताप यांनी रेखाटलेले बाबासाहेबांचे स्केच आवडले.

श्रीरंग_जोशी's picture

16 Nov 2021 - 1:03 am | श्रीरंग_जोशी

शेवटी* बाबासाहेबांचे थोडक्यात भाषण ऐकले होते.

जुइ's picture

16 Nov 2021 - 5:21 am | जुइ

अभ्या भाऊ अगदी नेमक्या शब्दात मांडले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप अतिशय स्पृहणीय आहे.जाणता राजा पाहून अनेक वर्ष झाली पण अजूनही ते डोळ्यांसमोर अगदी जिवंत आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र श्रद्धांजली_/\_

बाबासाहेबांचे आयुष्य छत्रपतींच्या जीवनकथाकथनात गेले आणि घाणेरड्या जातीय राजकारणामुळे बिचाऱ्यांना सरकारी पुरस्कार सुद्धा उघड्पणे देता आला नाही नतद्रष्ट मराठी समाज .. आज त्यांच्या कर्तृत्वपेक्षा याचिंच आठवण होते आहे .. हे दुर्दैव

मुक्त विहारि's picture

16 Nov 2021 - 12:36 pm | मुक्त विहारि

हिंदू तितका मेळवावा, हे हिंदूंच्या जेंव्हा लक्षांत येईल, तो सुदिन ...

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2021 - 1:18 pm | चौथा कोनाडा

@चौकस२१२,

शिवशाहीरांच्या जाण्यामुळे सगळी कडून ज्या भावना व्यक्त झाल्यात त्या पाहता सरकारी पुरस्कारासाठी जी घाणेरडे जातीय राजकारण केले गेले ते किती क्षुद्र होते हे यावेळी अधोरेखीत होते !

मुक्त विहारि's picture

16 Nov 2021 - 7:06 pm | मुक्त विहारि

काय लिहिले आहे? हे न बघता, कुणी लिहिले आहे?

असेच शिकवणारा मॅकाॅले आणि अशीच गुलामगिरीची मानसिकता असलेले राजकारणी, त्यामुळे अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात

चौकस२१२'s picture

17 Nov 2021 - 4:11 am | चौकस२१२

अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात ....तेवढा संत पणा नाही आपल्यात... अशाच गोष्टी मनात रुतून बसतात आणि जळफळाट होतो खोटेपणाची चीड येते
- काही आठवड्यनपूर्वी शहरातील सार्वजनिक दिवाळी उत्सवाला गेलो होतो .. ऑस्ट्रेलियन ( अँग्लो सॅक्सन , बहुतेक ख्रिस्ती विधासभा सदस्य अगदी झब्बा सुरवर घालून आणि साड्या नेसून उत्सहात आले होते / होत्या आणि "फार्मर्स प्रोटेस्ट "नावाखाली काही माकड उड्या मारीत आली .. रंगाचा भंग .. केरळ पासून मणिपूरर पर्यंत च्या लोकांचे नाच गाणी होतती खरंच "भारत " म्हणजे काय याची झलक... फक्त पंजाब च्या सहभगायांनी "फार्मर्स" चा उल्लेख केला
बंगाल आणि मराठी लोकांनी नाही केला का? तिथे "फार्मर्स" नाहीत ?! म्हणजे आत या पुढे कोणत्याही हिंदू भारतीय सार्वजनिक कार्यक्रमात हि खलिस्तानी ब्याद असणारच का....
- काही वर्षांपूर्वी प्रथेप्रमाणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ला जाऊन पूजा करायाची असते त्यात मोडता घालण्यात आला .. का? मुख्यमंत्री कांबळे असो, पाटील असो अंतुले असो कि जोशी ती परंपरा आहे... जातीयवादी पीक उगवानारया बारामतीचं सुपीक जमिनीत जाऊन एक सकाळाचाच विधी करून यावा असे वाटले ... ह....... खोर
क्षमा मंडळी विषयांतर ... झाले

तुषार काळभोर's picture

16 Nov 2021 - 8:14 am | तुषार काळभोर

लई भाग्यवंत माणूस तू.
एकतर अंगी कला, त्यात अशा तपस्वी कडून प्रत्यक्ष कौतुक!!

जाणत्या राजाला खऱ्या अर्थाने जाणणाऱ्या बाबासाहेबांना आमचा मानाचा मुजरा !!

कुमार१'s picture

16 Nov 2021 - 8:35 am | कुमार१

आदरांजली !

उगा काहितरीच's picture

16 Nov 2021 - 10:12 am | उगा काहितरीच

+1

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2021 - 12:24 pm | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2021 - 12:24 pm | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2021 - 12:29 pm | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2021 - 1:17 pm | कर्नलतपस्वी
जेम्स वांड's picture

16 Nov 2021 - 1:46 pm | जेम्स वांड

अभ्या भावड्या,

माझ्या ग्रामीण खरडण्याबर तुझ्या भरभरून आलेल्या प्रतिक्रिया पाहूनच तू असा भरीव माणूस असशीलच असा कयास बांधला होता, तो पक्का झाला आज, तुला त्या वयात कळत नव्हतं पण एक वयोवृद्ध जाणकार वल्ली एका अडनिड्या वयाच्या वल्लीला त्यारोजी भेटली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.....

नुसतं नाव ऐकलं की असं वाटतं समशेरीवर मूठ पक्की झाली आहे, घोड्यावर मांड पक्की रुतली आहे अन शिंदेशाही पगडीच्या वर पटका करकचून आवळत आम्ही बारगिरीला बाहेर पडलो आहोत, महाराजांनी महाराष्ट्राला प्राण दिला, स्वराज्य दिलं अन उर्जितावस्था दिली, आम्हाला "आम्हीपण" दिलं अन शिवशाहीर ? त्यांनी कैक वर्षांनंतर महाराजांनी जे आम्हाला दिलं ते परत लख्ख घासूनपुसून आम्हाला दाखवलं, ह्या माणसाने उभं केलेलं "जाणता राजा" जितकं भव्य होतं त्याला तोड नाही,

"और मराठे कैसा हैं ?"

अशी टीम मेंबरनं मारलेली हाक आजही कण्यातून एक शिरशिरी सोडते कारण महाराज आम्हाला स्वातंत्र्य अन ताठ गर्दन देऊन गेले आणि बाबासाहेबांनी तेच आम्हाला परत परत शिकवले

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना भावपूर्ण श्रद्धांजली

(सातारी मावळा, शिवतत्वपूजक आणि शिवशाहीर प्रेमी) वांडो

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2021 - 2:03 pm | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2021 - 6:04 pm | कर्नलतपस्वी

लहानपणी वाचन हेच खेळा व्यतिरिक्त एकमेव साधन, एकुलते एक वाचनालय, प्रथम ह ना आपटे नंतर गो. नी. दांडेकर ,बाबासाहेब मग रणजीत देसाई यांची पुस्तके म्हणजे दिवाळीचा फराळ.इतीहासाची गोडी लागली.
बाबा साहेबांन बद्दल सुरेश भटांच्या खालील ओळी चपखल लागू पडतात.

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

भावपूर्ण श्रद्धांजली
शिवशाहीरांचे जीवन आणी साहित्य प्रेरणा स्त्रोत्र राहणार आहे.

असे व्यक्ती आपल्या आयुष्यात यायला, भेटायला भाग्य लागत ! अशी नररत्ने हल्ली फार दुर्मिळ !

मदनबाण.....

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Nov 2021 - 11:23 pm | बिपीन सुरेश सांगळे

अभ्या
खूप छान , समयोचित लेख / आठवण .

नशीबवान आहात .
आपण त्यांना प्रत्यक्ष भेटला आहात . त्यांनी आपले कौतुक केले आहे .

एक चालताबोलता कोष लयास गेला .
श्रद्धांजली !

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Nov 2021 - 11:25 pm | बिपीन सुरेश सांगळे

एक मित्र मोठा चित्रकार आहे . त्याचे बाबासाहेबांकडे जाणेयेणे , नेहमीचे . त्याने मला प्रॉमिस केलं होतं , त्यांची भेट घडविणे म्हणून . पण माझेच दुर्दैव नक्की . खूप वाईट वाटतंय ...

सिरुसेरि's picture

8 Dec 2021 - 8:12 pm | सिरुसेरि

सुंदर आठवणी. मा. शिवशाहीर यांच्या "राजा शिवछत्रपती" ग्रंथामधील श्री. दिनानाथ दलाल या महान चित्रकाराने रेखाटलेल्या घटनाचित्रांची आठवण झाली .