वाईन

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
28 Oct 2021 - 2:06 pm

(कधीही मद्य प्रकाराच्या वाटेला न गेलेल्या श्री व सौ मधील हा संवाद!)

सौ: मला एकदा वाईन घ्यायचीच आहे. आपण दोघे मिळून एकदा एखादी बाटली घेऊच. वाईन मुळे स्किन चांगली राहते असं वाचलं आहे मी.
श्री: वाईन? आणि आपण दोघे? काहीही. तुला इथे thums up घेताना चार वेळा ठसका लागतो. तू काय वाईन घेणार?
सौ: वाटलच होतं. नकारात्मकता पुरेपूर भरली आहे तुमच्यात. आणि मला तुम्ही नेहमी कमी समजता.
श्री: अगं, तसं नाही. आपल्याला अभ्यास करावा लागेल खूप. मद्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक पेयामधे अल्कोहोलचं प्रमाण वेगळं. प्रत्येकाची चव वेगळी. खूप अभ्यास करून निर्णय घेऊयात.
सौ: पण आपण एकाच वेळी घेऊ वाईन.
श्री: नको नको. जर खूप परिणाम झाला तर दोघेही शुध्दीवर नसू. त्यापेक्षा एक दिवस तू घे, मी दुसऱ्या दिवशी घेईल. त्यापेक्षा मला नकोच.
सौ: त्यात काय मज्जा राहणार? एकटं एकटं वाईन घेतात का कोणी? बरं, वाईन घेताना सोबत काही पदार्थ लागतील आपल्याला खायला, चणे फुटाणे. तुम्हाला निदान चणे फुटाणे तरी खावे लागतील माझ्यासोबत.
श्री: अगं, चणे फुटाणे नाही चकणा म्हणतात त्याला.
सौ: तुम्हाला कसं माहीत? चोरून लपून घेता की काय तुम्ही? मला कळू दिलं नाही एवढे वर्ष? वाटलच होतं मला, माणूस दिसतो एवढा सरळ नाही.
श्री: अगं, त्यात काय विशेष? मराठी भाषा आहे आणि चकणा शब्द बऱ्याच वेळा ऐकिवात आहे. तसही एकदा मी ऑफिस मधल्या एका सहकाऱ्याला सोबत म्हणून गेलो होतो. तेव्हा मी पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं. पाहिलं फक्त.
सौ: मला माहीतच आहे, तुम्ही एवढं धाडस करूच शकत नाही, मला विचारल्याशिवाय.
श्री: काहीही! आपलं लग्न व्हायच्या आधीची गोष्ट आहे ही.
सौ: म्हणजे लग्नापूर्वी काय काय दिवे लावले, काय माहीत. बरं ते जाऊद्या, पण आपण सर्वात महागडी वाईन घ्यायची बरं.
श्री: कशाला खर्च जास्त. असं करूयात माझा चुलत भाऊ आहे सैन्यात. त्यांना खूप कमी खर्चात मिळते असं ऐकलं होतं त्याच्याकडून. त्यालाच सांगतो. पैसे वाचतील.
सौ: कपाळ माझं! त्याला काय सांगणार? तुम्ही दररोज घेता म्हणून? म्हणजे उद्या सगळे नातेवाईक मला जाब विचारतील, नवरा कंटाळला त्रासाला.
श्री: तू कशाला काळजी करतेस, ते सोपं आहे, माझ्या ऑफिस मधल्या मित्राला पाहिजे असं सांगेल त्याला.
सौ: अशा गोष्टीत बरं तुमचं डोकं व्यवस्थित चालतं. खोटं बोलायचं असेल तर तुमच्या कडून शिकावं. चला एक काम तर झाल्यातच जमा आहे. पण आपण ग्लासेस नवीन घेऊयात. अगदी सिनेमातील बार मधे असतात तसे उंच, निमुळते.
श्री: एवढा कशाला खर्च? माझ्या ऑफिसने भेट म्हणून दिलेले कॉफिचे मग आहेत ना.
सौ: कॉफीच्या मगातून वाईन? किती ही निरसता. नवीन ग्लास घ्यायचे म्हणजे घ्यायचेच. आताच मी पाहते अमेझॉनवर.
श्री: अगं, आपण घेणार किती ५ ml फक्त, त्यासाठी एवढा उपद्याप आणि खर्च कशाला?
सौ: (हसून) काय म्हणालात? ५ ml? हाहाहा. ते काय औषध आहे का ५ ml घ्यायला.
श्री: तू तर औषधच म्हणतेस ना आपण वाईन शॉपच्या समोरून गाडीतून येत असतो तेव्हा. आतापर्यंत १०० वेळा मी ऐकलं असेल तुझ्या तोंडून.
सौ: ते शब्दशः घ्यायचं का? मी आपलं मुलाला कळू नये म्हणून कोडवर्ड वापरते.
श्री: धन्य आहे. मग किती ml घ्यायची असं तुला वाटतं?
सौ: सोपं आहे. अर्धी बाटली मी घेते, अर्धी तुम्ही.
श्री: (थोडा वेळ मोबाईल पाहून) अर्धी बाटली??? हे बघ, मी आता गूगल वर वाचलं आहे ७५० ml असते बाटलीची साइज. म्हणजे ३७५ ml एका वेळी घ्यायची?
सौ: मग विशेष काय त्यात? चहा तुम्ही चार वेळा घेता, सकाळी दोन तासात, तेही एका वेळी मगभरून.
श्री: माझ्या चहाचा इथे काय संबंध? नाहीतरी माझं चहाप्रेम डोळ्यात खूपतं तुझ्या. चहा आणि वाईनमधे फरक आहे की नाही?
(थोडा वेळ मोबाईल पाहून) आणि हे बघ १५० ml पेक्षा जास्त घेऊ नये वाईन, एका दिवसात.
सौ: (वैतागून) तुमचं गूगल वरचं ज्ञान पाजळू नका. फक्त एकदा थोडीशी वाईन घ्यायची म्हटली तर माझी पूर्ण संध्याकाळ वाया घालवली तुम्ही. कसलं ध्यान पदरी पडलंय! कशाला एवढी उठाठेव, नकोच ती वाईन-बीन.
श्री: (स्मितहास्य चेहऱ्यावर ठेऊन, अगदी हळू आवाजात..) सुंठेवाचून (वाईनवाचून?) खोकला गेला.
सौ: (कान टवकारून) काय म्हणालात?
श्री: काही नाही, म्हटलं तुझा खोकला कसा आहे, बरं वाटतंय का आता?
सौ: तुम्हाला कधीपासून माझी एवढी काळजी?
.....
.....
(हा सौ-संवाद आता काही संपायचा नाही! :-))

(मद्यतज्ञ/मद्यप्रेमी वाचकांसाठी: लेखातील तांत्रिक बाबी सोडून विनोदरुपी मद्याचा आस्वाद घ्यावा. अज्ञानात सुख असते, आणि विनोदही!)

विनोदलेख

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

28 Oct 2021 - 6:31 pm | अनन्त्_यात्री

हृद्य गद्य! :)

कॉमी's picture

28 Oct 2021 - 6:41 pm | कॉमी

एका उंच ग्लास मधून घोट घोट घेत श्री व सौ वाइन रिचवतात असा शेवट असला असता तर बहार आली असतो :)

छान आहे.

Nitin Palkar's picture

28 Oct 2021 - 7:19 pm | Nitin Palkar

छान लिहिलंय.

चौथा कोनाडा's picture

28 Oct 2021 - 9:08 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !
मस्तच ! खुसखुशीत !

🍷
मजा आली नवराबायकोची जुगलबंदी वाचताना !

सौंदाळा's picture

29 Oct 2021 - 1:10 pm | सौंदाळा

मस्तच लिहिलय
भाग २ पण आला पाहिजे

श्रीगणेशा's picture

29 Oct 2021 - 1:11 pm | श्रीगणेशा

धन्यवाद अनन्त्_यात्री, कॉमी, नितीन, चौको _/\_

श्रीगणेशा's picture

29 Oct 2021 - 1:17 pm | श्रीगणेशा

धन्यवाद सौंदाळा _/\_
भाग २ ची कल्पना आवडली.
मी विचार केला नव्हता, पण लिहिता येईल अजून बरच काही!
दर्दी वाचक असल्यावर लिहायलाही हुरूप येतो :-)

चौथा कोनाडा's picture

29 Oct 2021 - 3:18 pm | चौथा कोनाडा

दर्दी वाचक असल्यावर लिहायलाही हुरूप येतो :-)

अगदी ! आता पुढच्या भागाची वाट पाहायला हरकत नाही ! :-)

श्रीगणेशा's picture

29 Oct 2021 - 10:41 pm | श्रीगणेशा

नक्कीच! :-)

श्रीगणेशा's picture

12 Nov 2021 - 9:56 pm | श्रीगणेशा

भाग २ इथे आहे, उशीर झाला पण वाईन साठी एवढी तयारी तर हवी :-)
वाईन - भाग २

सोत्रि's picture

30 Oct 2021 - 5:30 pm | सोत्रि

वाटलच होतं मला, माणूस दिसतो एवढा सरळ नाही.
कसलं ध्यान पदरी पडलंय!
खोटं बोलायचं असेल तर तुमच्या कडून शिकावं

<गडबडा लोळणारी स्मायली/> <गडबडा लोळणारी स्मायली/> <गडबडा लोळणारी स्मायली/>
<गडबडा लोळणारी स्मायली/> <गडबडा लोळणारी स्मायली/> <गडबडा लोळणारी स्मायली/>

खुसखुशीत एकदम!

-(एकेकाळचा वाईनप्रेमी) सोकाजी