हातभार लावावा !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
19 Oct 2021 - 12:50 pm


गंमती वाक्प्रचारांच्या : भाग १

नमस्कार !
एक गमतीदार भाषिक प्रयोग सादर करतो आहे. ‘हात’ हा शब्द असलेले सुमारे ३० वाक्प्रचार एका गोष्टीत एकत्र गुंफले आहेत. गोष्ट बाळबोध आहे हे सांगणे न लगे.
हाताचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी. प्रतिसादात नुसते वाक्प्रचार न लिहिता ते गोष्टीच्या कुठल्याही परिच्छेदात घालून गोष्ट पुढे सुसंगत होईल असे पहावे.
……….

ok

हातकणंगलेमध्ये राहणारा विजय हातवळणे हातावर पोट भरत असे. मजुरांच्या व्यथांची त्याला जाण होती. त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायातून तो पेटून उठे. मग तो हातवारे करून भाषणे देई. व्यवस्थेशी संघर्ष करताना वेळप्रसंगी हातावर शीर घेऊन लढायला त्याची तयारी असे. त्याची मिळकत बेताची असल्याने हात राखून खर्च करायची त्याला सवय होती. त्यामुळे त्याच्यावर कधी कोणापुढे हात पसरायची वेळ आली नाही. यथावकाश तो मोठा झाल्यावर त्याच्या दोन हातांचे चार हात झाले. अर्थात त्याच्या संसारासाठी काही परिचितांनी हात लावले.

आता विजयने ठरवले की वाटेल तितके कष्ट करून बायकोला सुखात ठेवायचे. आपले स्वतःचे घर घेण्याच्या निर्धाराने त्याने हाती कंकण बांधले. त्याच्या वस्तीतील आजूबाजूचे पुरुष त्यांच्या बायकांवर येता-जाता हात टाकत. हे त्याला पाहावत नसे. म्हणून त्या वस्तीतून बाहेर पडायचा त्याने निर्धार केला. तो जोमाने कष्ट करू लागला. लवकरच त्याचा हात चालू लागला. बचतीचे महत्त्व तो जाणून होता. त्यामुळे कुठल्याही चैनीसाठी तो हात आखडता घेई. त्याचे आई-वडील हेच त्याचे दैवत होते. ते वगळता अन्य कोणापुढे त्याने हात जोडले नाहीत. त्याचे मित्र त्याला वारंवार व्यसनाकडे ओढू पाहात. पण तत्परतेने तो हात झाडी. आपले घर बांधणे हेच त्याचे स्वप्न होते आणि फक्त त्या स्वप्नाच्याच मागे तो हात धुऊन पाठीस लागला होता !

काही वर्षातच त्याचे स्वप्न साकार झाले व त्याचे हात पोचले. मात्र त्याचे पूर्वीचे सहकारी आळशी व व्यसनाधीन असल्याने गरिबीतून बाहेर पडू शकले नाहीत. उन्नतीसाठी प्रयत्न न करता निव्वळ कपाळावर हात मारणे हाच त्यांचा उद्योग होता. अडचणी आल्या असता हातावर हात ठेवून बसण्यापलिकडे ते काही करू शकत नव्हते. विजय त्यांना वारंवार सांगे की हात-पाय गाळू नका, उठा, अधिक कष्ट करा.

कालांतराने विजयने चाकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यासाठी त्याने 2 नोकर हाती धरले. पण ते दोघेही नीट काम करीत नसल्याचे त्याच्या लवकरच लक्षात आले. अळमटळम करणे व नको तिथे हात घालणे हाच त्यांचा दिनक्रम होता. विजयच्या हाताला हात लावण्याचे नाटक मात्र ते छान करीत. तसेच विजयकडून हातउसने पैसे घेण्यात त्यांचा हातखंडा होता ! त्यातील एक जण बरेच उसने पैसे घेतल्यानंतर विजयच्या हातावर तुरी देऊन गेला. आता जरी तो विजयला हातोहात फसवून पळालेला असला तरी पुढेमागे जर तो कधी विजयच्या हाती लागलाच तर प्रकरण नक्की हातघाईवर येईल.

विजय मात्र एक हाती लढतच राहिला. स्वतः अधिक कामे करुन तो त्याचा विकास घडवी. आता त्याला बरीच कंत्राटे मिळू लागली. योग्य मुदतीत काम करून देण्यासाठी तो वचनबद्ध असे. कंत्राटदारांना जणू तो आपला हात कापून देई. त्याच्या गुणांवरच त्याला नवी कंत्राटे मिळत. ती मिळवण्यासाठी कुणाचे हात चेपायची त्याला गरज पडली नाही. यथावकाश त्याला व्यावसायिक स्पर्धक निर्माण झाले. त्यांनी त्याचे खच्चीकरण करण्याचे अतोनात प्रयत्न केले. परंतु विजय काही कच्चा बच्चा नव्हता. त्याने त्या सर्वांना चांगलाच हात दाखवला. अशा तऱ्हेने त्याच्या विरोधकांनी केलेली हातमिळवणी असफल ठरली.

विजय आता आर्थिक सुस्थितीत होता पण त्याची जीवनशैली मात्र अजूनही पूर्वीसारखीच साधी होती. चंगळ वगैरे अजिबात नाही. दोन वेळच्या जेवणानंतर हातावर पाणी पडले की तो तृप्त असे. आयुष्यात कुठलेही काम करण्यासाठीच त्याने आपले हात वाहिले होते. कित्येक तांत्रिक कामे सफाईने करणे हा त्याच्या डाव्या हातचा मळ होता. त्या कामात त्याच्या बरोबरीच्या लोकांना त्याचा हात धरणे अवघड होते.

........
गोष्ट हातावेगळी झाली आहे असे समजू नये !
पुढे चालू ठेवावी...

वाक्प्रचारआस्वाद

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

19 Oct 2021 - 1:06 pm | कपिलमुनी

हा वाक्प्रचार नसल्याने गोष्ट हाताबाहेर गेली आहे

सौंदाळा's picture

19 Oct 2021 - 2:15 pm | सौंदाळा

मुनीवर तुम्ही पण ना :)
हातच्या कंकणाला आरसा कशाला, हातभट्टी, हातचलाखी, हत्ता पध्दतीने भाव ठरवणे, हाताची पाचही बोटे सारखी नसतात वगैरे वगैरे

तर्कवादी's picture

25 Oct 2021 - 8:04 pm | तर्कवादी

यथावकाश तो मोठा झाल्यावर त्याच्या दोन हातांचे चार हात झाले. पण तत्पुर्वी मित्रांनी त्याला आपला हात जगन्नाथवरुन कितीही चिडवले तरी त्याने कधी बाहेरच्या सवयी लागू दिल्या नव्हत्या. त्यामुळेच त्याची बचतही झाली आणि बायकोही चांगली मिळाली.

श्वेता व्यास's picture

19 Oct 2021 - 1:58 pm | श्वेता व्यास

कालांतराने विजयने चाकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यासाठी त्याने 2 नोकर हाती धरले. सुरुवातीला दोघांनी हातात हात घालून काम केले, पण ते दोघेही नीट काम करीत नसल्याचे त्याच्या लवकरच लक्षात आले.

त्यातील एक जण बरेच उसने पैसे घेतल्यानंतर विजयच्या हातावर तुरी देऊन गेला. आणि दुसऱ्यास त्याच्याबद्दल विचारले असता त्याने कानावर हात ठेवले.

कंत्राटदारांना जणू तो आपला हात कापून देई. हातच्या कंकणाला आरसा कशाला? त्याच्या गुणांवरच त्याला नवी कंत्राटे मिळत.

स्वधर्म's picture

19 Oct 2021 - 2:01 pm | स्वधर्म

आता यावर काही बोलायचं म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेण्यासारखंच.

कुमार१'s picture

19 Oct 2021 - 2:45 pm | कुमार१

छान भर घातली आहे सर्वांनी !

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Oct 2021 - 3:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक नोकर पळुन गेल्यावर विजय हात चोळत बसला नाही. त्याने हातावर पोट असणार्‍या पण हातात हुनर असलेल्या लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. हाती असलेली कामे काहीही करुन यशस्वीपणे हातावेगळी करणे ह्यात त्याचा हातखंडा होता. त्यामुळे त्याला पुढच्या कामासाठी कधीही हात पसरावे लागत नसत.

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2021 - 5:17 pm | चौथा कोनाडा

सुंदर मैत्रीणीचा फोन येत असताना तो न घेता मी हा लेख वाचत राहिला तेव्हा "हातचं सोडून पळत्याच्या पाठी" अशी माझी अवस्था झाली !
😃

हातावर कमवावे आणि पानावर खावे या वृत्तीमुळे विजयचे हात गगनाला पोहचले.
कसलं भारी !माझी माय मराठी :)

कुमार१'s picture

19 Oct 2021 - 6:16 pm | कुमार१

छान अनुरूप भर घातली आहे सर्वांनी !

आधीच्या पिढीने सतत हाताला साथ दिली म्हणून हे असले दिवस वाट्याला आले या निष्कर्षाप्रत तो आला. नाव विजय असूनही हताश व्हायची पाळी आली. आता त्या पक्षाचे लोक दिसले तर त्यांना हात करू असे त्याने ठरवून टाकले.
:)

(हात करणे= हाकलून लावणे.. उदा. हात रे काऊ!)

प्रसाद गोडबोले's picture

19 Oct 2021 - 6:56 pm | प्रसाद गोडबोले

"हातगुण येणे" नावाचा एक वाक्प्रचार आहे पण त्याचा इथे वाक्यात उपयोग करुन दाखवल्यास इतका मौलिक प्रतिसाद हातचा जाईल ;)

हाताशी दोन पैसे आल्यावर काही राजकीय पक्ष त्याला हाताला धरून आपल्या पक्षात खेचू लागले, पण त्याने हात झिडकारून कमळ हाती धरले. या हातमिळवणीमुळे त्याची पत हातोहात वाढली.

सुक्या's picture

20 Oct 2021 - 12:20 am | सुक्या

काहीही म्हणा कुमार१ .. पण हाताला गुण आहे तुमच्या :-)

विजय कितीही चांगला असला तरी हात लावीन तिथे गुदगुल्या करायची वाईट सवय त्याला होती. त्यामुळे बर्‍याच जणी त्याचा हात धरायला तयार होत्या. विजय ने कितीही हात झाडले तरी शेवटी एकीपुढे त्याने हात टेकले आणी तिला घरी घेउन आला. आता विजय च्या घरी दोघीं हातपायी वर येत असतात आणी विजय मात्र डोक्याला हात लाउन बसलेला दिसतो. दोन लग्ने केल्यामुळे आता पोलिस पण विजयच्या हात धुवुन मागे लागले आहेत.

चामुंडराय's picture

20 Oct 2021 - 2:05 am | चामुंडराय

डॉ. साहेब कथा अगदी हातोहात लिहून काढली की! तुमचे हस्तलाघव चांगले आहे.

आता पायल पायगुडेच्या पायगुणाची गोष्ट ही हातावेगळी करा. :)

सौन्दर्य's picture

20 Oct 2021 - 6:35 am | सौन्दर्य

विजयने आपल्या गुणांनी मित्र तर कमावलेच पण त्याचबरोबर हाती करून शत्रू देखील जमले.

(हाती करून - स्व:ताहून ओढवून घेणे)

कुमार१'s picture

20 Oct 2021 - 8:20 am | कुमार१

आपण सर्वांनी आपापले हस्तकौशल्य छान प्रदर्शित केल्यामुळे धाग्याला रंगत आली आहे.

पायल पायगुडेच्या पायगुणाची गोष्ट

>>>
नोंद घेतली आहे.
लोभ असावा !

सुधीर कांदळकर's picture

23 Oct 2021 - 6:09 am | सुधीर कांदळकर

रहिवासी बहुधा आपला सत्कार करतील.

वाचायला मजा आली. धन्यवाद.

आत्ताच वाचून धागा हातावेगळा केला 😀
मजा आली!

राघवेंद्र's picture

23 Oct 2021 - 5:10 pm | राघवेंद्र

हाती बळ असल्याने विजय ला कोणाचे हात ओले करावे लागले नाहीत.वहात उसनवारी करावीं लागली नाही.

कुमार१'s picture

23 Oct 2021 - 5:22 pm | कुमार१

छान अनुरूप भर घातली आहे सर्वांनी !
सर्वांचे आभार.

(* हात आटोपणे हा वाक्प्रचार गोष्टीत सुसंगत न वाटल्याने घातला नाही.

* हात साफ करणे हा वाक्प्रचार वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सक लोक बऱ्याचदा वापरतात.
म्हणजे एखादी शस्त्रक्रिया वारंवार करून त्यात तरबेज होणे).

चांदणे संदीप's picture

23 Oct 2021 - 6:06 pm | चांदणे संदीप

इतके वाक्प्रचार आले आणि माझ्या 'हातात' काहीच राहिले नाही.

सं - दी - प