आई

Primary tabs

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
9 Oct 2021 - 10:04 pm

आज आई जाऊन ७ वर्ष झाली.
आठवणींच्या कालातीत लाटा मात्र निरंतर किनारा शोधत असतात.

आई-काका (वडिलांना मी काका नावाने संबोधतो) हैदराबादला पहिल्यांदा आल्यानंतर स्टेशनवर पहाटे साडेचार वाजता आमची वाट पाहत होते तो क्षण आठवतोय. माझ्या नोकरीतील पुढचं पाऊल, आमचं हैदराबादला राहायला येणं, आई-काकांना आनंदाने आणि अभिमानाने खूप काही सांगायची, दाखवायची उत्सुकता हे सर्व मनात घेऊन पत्नी आणि मी त्या दोघांना घेण्यासाठी पहाटे स्टेशनवर गेलो होतो.

आम्ही शहरात फिरायला गेल्यावर बागेतील एका झाडाखाली फोटो घेताना खूप आनंदी होते दोघं. आयुष्यात प्रथमच एवढा आनंद, आणि समाधान होतं त्यांच्या चेहऱ्यावर. त्यावेळी मला सहजच भीती वाटली होती की तो क्षण मी फक्त एक आठवणींची शिदोरी म्हणून तर साठवून ठेवत नाहीयेना?

समोरील तलावासमोर काढलेला फोटो मी घरात फ्रेम करून ठेवलेल्या मोजक्या काही आठवणींत निवडला. आई, काका आणि मी. अगदी निरागस आनंद, साधेपणा आणि सहजता होती आईच्या चेहऱ्यावर.

आईने स्वतःचं आयुष्य माझ्यासमोर आदर्श म्हणून ठेवलं. तिला वेगळं असं मला काही शिकवायची गरजच पडली नाही. मनातील आणि शब्दांतील शांतता, सहनशीलता, दुसऱ्यांसाठी स्वतःला विसरून कष्ट करण्याची, आयुष्य आहे तसं स्वीकारून, तक्रार न करता चालत राहण्याची, आपल्या माणसांना समजून घ्यायची, सोबत घ्यायची वृत्ती, हा मला आईकडून मिळालेला वारसा..आयुष्यात कमावलेल्या इतर कोणत्याही संपत्तीपेक्षा कितीतरी मूल्यवान.

नियतीने तिच्या वेदनांवर शेवटचा उपचार म्हणून तिचा श्वास हिरावून घेतला असावा असं वाटेल इतक्या यातना तिने सहन केल्या. त्याआधी दोन दिवस, व्हेंटिलेटरवर असताना, अगतिकतेने तिच्या डोळ्यांतून आलेलं पाणी, माझ्या मनात आजही तसचं साठून आहे. कदाचित मी शेवटचा निरोप घेताना त्याचे अश्रू व्हावेत म्हणून.

कथाविचार

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

9 Oct 2021 - 10:11 pm | चौथा कोनाडा

हृदयस्पर्शी लिहिलंय, अगदी मोजकं पण उत्कट !

आई बद्दल काय लिहिणार ? तिची थोरवी वर्णनायला कितीही भारी शब्द आणले तरी थिटे पडतील.
आमची आई जाऊन १० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली, आठवत असते कुठल्या कुठल्या आठवणी येत असताना.

आई खरंच काय असते ?
लेकराची माय असते वासराची गाय असते
दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही !'