नव्वदच्या दशका पूर्वीचा आठवणीतील गणेश उत्सव आणि ल ब भोपटकर मार्गावरची अनंत चतुर्दशी ची गणपती मिरवणूक

kvponkshe's picture
kvponkshe in काथ्याकूट
19 Sep 2021 - 9:04 am
गाभा: 

आज जिथे मंडईचा गणपती बसतो तिथून पेरूगेट चौकी पर्यंत जो रस्ता आहे त्यास ल. ब. भोपटकर मार्ग म्हणत.
आज हा रस्ता खूप अरुंद वाटतो ना ? पण एके काळी या रस्त्या वरून अनंत चतुर्दशीच्या दिवशी किमान ४०- ५० मंडळांची विसर्जन मिरवणूक जायची हे आज तुम्हास सांगून पण खोटे वाटेल. १९९१ साली शेवटची मिरवणूक या रस्त्यावरून गेली.
हे भोपटकर पुण्यातील प्रसिद्ध वकील होते. पेरूगेट चौकी जवळ त्यांचा वाडा होता. याच रस्त्यावर पूर्वी जिथे रतन सायकल मार्ट होते त्याच्या समोर धोंडूमामा साठे वाडा होता. या साठे वाड्यात माझ्या आईचे माहेर होते. आजी , मामा, मामी, माझे मामे भाऊ असा खूप मोठा परिवार गणपतीसाठी या वाड्यात जमे. वाड्यात ४-५ कुटुंबे होती, पण खरतर आम्हा जमलेल्या सगळ्यांचे एकच कुटुंब बनून जात असे. मी आणि आई गौरी विसर्जनानंतर आजी कडे या वाड्यात राहायला जात असू.
याच रस्त्यावर ध्रुव ग्रंथालय होते, हल्ली ते दिसत नाही. पण या ग्रंथालयानेच मला वाचनाची आवड लावली. या ग्रंथालयामुळेच मी नारायण धारप कथांचा फॅन बनलो. सकाळी आम्ही मामे भावंडे वाड्याच्या अंगणात क्रिकेट आदी खेळ खेळत असू. या वाड्यात मधल्या मजल्यावर जिथे साठे आजी राहत, तिथे खूप मोठा हॉल होता. त्या हॉल मध्ये आम्ही काही नाटुकली पण सादर केलेली मला आठवतात. या हॉलची मला जरा भीतीच वाटे. सहसा एकट्याने मी या हॉल मध्ये जात नसे. (धारप कथांचा परिणाम असेल कदाचित.) रात्री ७ नंतर मी आणि आई गणपती पाहायला निघत असू. वाडा अगदी मध्य वस्तीत असल्याने फार पायपीट करावी लागत नसे. आम्ही ३ दिवस वेगवेगळ्या भागातील गणपती पाहत असू. पूर्वी एक पाण्यात चालणारी होडी मिळे. त्यात मेणबत्ती लावून ती पाण्यात गोल गोल फिरे. ती बोट सहसा गणपतीतच मिळे. दरवर्षी ती बोट मी घेत असे. एकावर्षी ती मात्र आम्हाला कुठेच मिळाली नाही. बहुदा १९८८ साल असावे. (साल इतके पक्के लक्षात राहण्याचे कारण , मी त्या साली ६वी ला होतो. आणि आम्हास
"मोहीम फत्ते " असा एक धडा होता. त्यात लेखकाने बोटीने केलेल्या अंटार्क्टिका मोहिमेची माहिती होती.मी आणि आईने लक्ष्मी रोड दोनदा पालथा घातला, पण तो बोट त्यावर्षी नाहीच मिळाली.)
आई बरोबर फिरताना मी आणि आई विश्राम बाग वाड्यासमोर डोसा , वडा असे काही खात असू. फेरीवाल्यांकडून उत्सवाची आठवण म्हणून मी काही ना काही घेतच असे. याच विश्राम बाग वाड्यात एका वर्षी गणपतीत खांदेरीचा रणसंग्राम नावाचे प्रकाशनाट्य दाखवले होते. मराठा नौदलाच्या माझ्या वाचनाच्या आवडीची मुहूर्त वेढ येथेच रोवली गेली !

रात्री ९-९:३० पर्यंत वाड्यात आम्ही परत येत असू. किंबहुना तसा दंडक च होता म्हणा ना ! वाड्याच्या दिंडी दरवाज्यास १० नंतर सहसा कुलूप लावत असत. वाड्यात शिरले की मला एकदम सुरक्षित वाटत असे. १९९३ च्या गणपतीच्या अनंतचतुर्दशीच्या रात्री किल्लारी भूकंप झाला. आम्ही तेव्हा या वाड्यातच होतो. पहाटे ४ ला आईने मला उठवले. वाडा एवढा भक्कम पण तरी पण हादरत होता. काही वेळाने सगळे शांत झाले. मला नंतर झोप लागलीच नाही. मी उठलो आणि सरळ लक्ष्मी रस्त्यावर जाऊन मिरवणूक पाहू लागलो. तिथल्या लोकांना भूकंपाची काहीच कल्पना नव्हती आणि मिरवणूक नेहमीच्या जोशात सुरु होती. भूकंपाचे गांभीर्य आणि झालेली जीवित हानी बाबत सगळ्यांना ९ नंतर समजले.

पुढे पुढे मोठा झाल्यावर मी मित्रांबरोबर गणपती पहायाला (खरेतर "गौरी पाहायला") जाऊ लागलो.
आजीला फिरून गणपती पाहण्यात किंवा मिरवणुकीत फार रस नसे. तीचा बिचारीचा आनंद वाड्यात जमलेल्या सर्वांसाठी भेळ इतर पदार्थ करणे, ते सगळ्यांना देणे , चहा करणे यातच होता. अगदी एखाद दुसरी चक्कर ती वरच्या गॅलरीत मारून ५ मिनिटे मिरवणूक बघून ती परत खाली जात असे.

अनंत चतुर्दशीच्या आदल्या रात्री दिवशी हा भोपटकर मार्ग जिथून सुरू होतो तिथं मला आठवतंय त्या प्रमाणे जुन्या जाईचा गणपती पहिले तिथं ट्रॅक्टर वर लागलेला असायचा त्याच्या मागे 2-3 मंडळ सोडून मग लोखंडे तालमीचा गणपती असायचा त्याच्या मागं श्रीकृष्ण हनुमान मंडळ त्याच्या विभाग विजय क्रिकेट क्लब आणि इतर मंडळ अशी ती रांग लागे. मी आणि माझा भाऊ अमोल, हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी संपूर्ण रांगेतल्या गणपतीची यादी बनवत असू. नातूबाग, खजिना विहीर, हत्ती गणपती हे सगळे लाईटचे गणपती असायचे तेही अनेक वेळा याच मार्गावरून जायचे. पण ते साधारण संध्याकाळी सात नंतर या मार्गावर यायचे. एका वर्षी मला आठवतंय, नातूबाग मंडळाने खूप सुंदर असा लायटिंगचा डोळा बनवला होता आणि त्याच्यात गणपती ठेवला होता आज जिथे श्री कृष्ण हनुमान मंडळाचा गणपती बसतो त्या चौकात आल्यावर त्या डोळ्याच्या लाइटिंग चे डेकोरेशन बाजूच्या इमारतींना अडकले. बराच वेळ तिथं गणपती अडकून पडला होता. नंतर मी झोपी गेलो. नातूबाग मंडळाला डेकोरेशन कापावे लागले आणि गणपती पुढे न्यावा लागला असे आईने मला दुसऱ्या दिवशी सांगितले. या श्रीकृष्ण हनुमान मंडळ गणपती वरून आठवले. या गणपतीचा मांडव अगदी मिरवणुकीचा रस्त्यात असायचा अनंत चतुर्दशीच्या आदल्या रात्री मंडळाचे कार्यकर्ते रातोरात तो मांडव हटवायचे. मी दरवर्षी ठरवायचो यावर्षी तरी हा मांडव हटवताना बघायचं पण तो योग कधीच आला नाही. मी फार फार तर बारा साडे बारा पर्यंत जागायचो आणि नंतर झोप अनावर होऊन झोपी जायचो. त्यानंतर कधीतरी श्रीकृष्ण हनुमान मंडळाचे कार्यकर्ते तो मांडव हटवायचे आणि विसर्जन मिरवणुकीचे रथ त्या रस्त्यावर लागायचे. त्याकाळी विसर्जन मिरवणूक बारा वाजता सुरू व्हायची. बारा वाजता मंडई येथे भोंगा व्हायचा. मंडईच्या टिळक पुतळ्याजवळ मानाच्या पाच गणपतींची पूजा व्हायची आणि मिरवणूक सुरू व्हायची . पुढे पुढे मिरवणूक सुरू व्हायची वेळ बारा वरून दहा वर आणि हल्ली नऊवर आणलेली आहे.
हल्ली जशी ढोल पथक असतात तशी पूर्वी नसायची. पुण्याजवळच्या गावांमधून ढोल लेझीम पथक मागवले जात. तशी त्यांना सुपारी देत असत. निंबाळकर तालीम बरोबर बोतरवाडी गावचा पथक असे. डीजे वगैरे प्रकार इतके लोकप्रिय नव्हते. रात्रीच्या वेळी डोक्यावर गॅस बत्ती घेऊन जाणाऱ्यांचे एक वेगळे पथक असे.
१९९० पर्यंत गणेश मंडळे ट्रक , उघडे टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉली वापरात असत. हल्ली फक्त ट्रॅक्टर ट्रॉली वापरतात आणि बाकी कामांसाठी ट्रक (बहुदा ४०७) वापरतात.
नव्वदच्या दशकात पुण्याच्या गणपती मंडळात गणपतीची उभी मूर्ती बहुदा लोखंडे तालीम आणि शिवाजी रोडवरच्या वनराज मित्र मंडळाची होती. बाकी सगळे बैठे गणपती. आताशा पुण्यातल्या मूर्तींचे रूप खूपच मोठे झाले आहे. पण पूर्वी पुण्यातल्या मंडळांच्या मूर्ती छोट्या असायच्या. पुण्या बाहेरची लोक यावरून पुण्याची अनेकदा खिल्ली उडवत. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात आधी मूर्तीचा आकार वाढवला तो तुळशीबाग मंडळाने. त्यानंतर छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मंडळाने वाढवला आणि मोठ्या आकाराच्या मूर्तींचे पुण्यात परंपराच सुरू झाली .
पुण्याच्या गणेश विसर्जनाचे अजून एक विशेष म्हणजे इथे मंडळाची मुख्य मूर्ती कधीच विसर्जन करत नाहीत. प्रत्येक मंडळ पूजेसाठी स्वतःचा एक छोटा गणपती आणते आणि त्याचीच प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन होते. गणेश विसर्जनासाठी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या , पाचव्या , सातव्या आणि शेवटच्या दिवशी धरणातून खास विसर्ग केला जातो.
1992 नंतर या रस्त्यावर ची मिरवणूक बाजीराव रोड ने शनिपार आवरून जिलब्या मारुती मंदिराच्या वरून टिळक पुतळ्याला वळसा घालून लक्ष्मी रोडला मिळवण्यात येउ लागली. यानंतर मिरवणूकीत अनेक बदल करण्यात आले. आणि आज आपण अनंत चतुर्दशी ची मिरवणूक बघतो या सर्व बदलांचे फलित आहे. मात्र माझ्या बालपणात या धोंडू मामा साठे वाड्यातल्या गॅलरीमधून 1991 पर्यंत दर वर्षी ही मिरवणूक मनसोक्त अनुभवली.
हल्ली पुण्यात गणपती मंडळांचे अमका राजा तमका राजा असे नामकरण सुरू आहे ते मला बिलकुल पसंत नाही पुण्याने पुण्याच्या वेगळेपण जपले पाहिजे असे माझे मत आहे. भोपटकर मार्गावरची मिरवणूक साधारणत पहाटे चारला संपत असे. आणि संपूर्ण मिरवणूक संपायला कधीकधी दुसऱ्या दिवशी चे बारा वाजत. मिरवणूक संपल्यानंतर रस्त्यावर गुलालाचा खच पडलेला असे. मिरवणूक संपल्या संपल्या सफाई कर्मचारी रस्त्यावर येऊन काही तासात रस्ता स्वछ करीत असत. मिरवुकीच्या दुसऱ्या दिवशी उत्सवाच चैतन्य संपून संपूर्ण पुण्यात एक प्रकारची उदासीनता दाटून येई. परगावाहून पुण्याचे गणपती बघायला आलेले लोक आपापल्या गावी परतत.
आणि पुणेकर नवरात्राच्या तयारीला लागत !

कौस्तुभ पोंक्षे

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 9:54 am | गॉडजिला

एकदम हरवुन अन हलवुन सोडलतं…

माहिती तंत्रज्ञानाची सुबत्ता पुण्यात येण्यापुर्वी पुणे खरोखर सांस्कृतीक केंद्र होते, सुसंस्कृत होते. मला राजकीय जाण नाही पण ही सांस्कृतीक सुबत्ता कलमाडी यांनी नक्किच जपली/ पोसली असेही म्हणता येइल. आता गणपती उत्सव म्हटले की बाहेरही फिरावेसे वाटत नाही. की विसर्जना नंतर हुरुहुर जाणवत नाही सणही यांत्रीक झालेत.

लोक पुण्यात फक्त पैशासाठी येउ लागली अन माती झाली पुर्वी लोक पुण्यात विद्या, समाधान, आनंद वैचारीक उर्मटपणा यास्तव जगत असतं. आता लोकांना स्वतःची प्रगती न्हवे फक्त फायदे ओरपणे इतकेच करावेसे वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2021 - 12:04 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
काळाची चक्रे थांबवता आली असती तर नव्वदचं दशक ऊलटूच दिलं नसतं. हो ना गाॅडजीला सर??

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 12:39 pm | गॉडजिला

जग प्रवाहीच असायला हवे. हा प्रवाह सकारात्मकतेचा असावा.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Sep 2021 - 12:59 pm | अमरेंद्र बाहुबली

सकारात्मकता नकारात्मकता हे मनाच्या प्रतिबिंबात ऊमटनार्या छटांवर लहरींचे परिणाम असतात, ते असे का होते हे मनाच्या एका कोपर्यातील भावनेच्या ऊगमाशी निगडीत असते.

गॉडजिला's picture

27 Sep 2021 - 1:57 pm | गॉडजिला

तुमची सिस्टम तुम्ही चांगली आभ्यासलेली दिसते... की ? अजून काय काय होत असते तुमच्या मेंदूत तेही अवश्य स्पष्ट करावे. हवे तर तुमच्या मेंदूच्या कार्यपद्धतीवर आपण एक स्वतंत्र लेखच का लिहीत नाही ?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Sep 2021 - 10:57 pm | अमरेंद्र बाहुबली

हे तुमच्या बद्दल होतं. तुमचा भोंदू आपलं मेंदू कोणत्या लहरींच्या परिणामात आहे हे मनपटलावरील तरंगाच्या सहाय्याने तुम्ही शोधू शकतात.

गॉडजिला's picture

30 Sep 2021 - 7:30 pm | गॉडजिला

न विचारता मला सल्ला दिल्या बद्दल आभारी आहे, आणि आपली ही प्रवृत्ती आपल्या मेंदूतील कोणत्या लहरींच्या परिणामात आहे हे आपल्या मन पटलावरील तरंगाच्या सहाय्याने तुम्ही शोधू शकलात तर ते ही मला अवश्य कळवावे.

काय आहे तुम्ही स्वताला जाणलत तरच इतरांना जाणायची शक्यता तयार होते.

अमरेंद्र बाहुबली, न विचारता सल्ला द्यायची आपली ही प्रवृत्ती आपल्या मेंदूतील कोणत्या लहरींच्या परिणामात आहे हे आपल्या मन पटलावरील तरंगाच्या सहाय्याने तुम्ही शोधू शकलात की नाही ?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Oct 2021 - 11:34 pm | अमरेंद्र बाहुबली

मेंदूतील काही भागावरील अनियंत्रणाचा मनावर विपरीत परिणाम होत आहे. हे तुमच्या लक्षात यायला काही काळ लागेल. ह्यातून तुम्ही स्थिर होण्यास प्राप्त परिस्थीतीला दोष देऊ नका. नभावर ज्या प्रमाणे पावसाच्या सरी कोसळल्यावर परिणाम होतो त्याच प्रमाणे तुमचा मेंदू हा परिणाम कुठल्याही तरंगाशीवाय प्रतिंबिंबीत करेल त्या साठी मन स्वच्छ ठेवा. वाईटाच्या आहारी जाऊ नका. १९७७ साली ओक्सफर्ड विद्यापिठातील प्रोफेसर ब्युमन रिसोर्ड ह्यांच्या द वर्ल्ड ईस मॅड ह्या नियतकालीकात आलेल्या लेखाचा सखोल अभ्यास करा.

गॉडजिला's picture

2 Oct 2021 - 11:48 pm | गॉडजिला

प्रोफेसर ब्युमन रिसोर्ड ह्यांच्या द वर्ल्ड ईस मॅड ह्या नियतकालीकात आलेल्या लेखाचा सखोल अभ्यास करा.

तुम्हाला न विचारता सल्ला द्यायची सवय का आहे हे जाणुन घ्यायला तुम्ही इतरांनी अभ्यास करा असे सुचवताय ? हम्म स्पर्धा परिक्षेच्या तयारीतुन वेळ मिळत नाही की काही दुसरंच दुख्ख आहे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Oct 2021 - 12:03 am | अमरेंद्र बाहुबली

सल्ला हा व्यक्तिकेंद्रीत असतो. भावनाहीन मनावर सल्ला हा फायदेशीर ठरतो. मेंदू हा भावनेचे ऊत्तमरित्या प्रक्षेपण करतो. भावनाहीपन मनाला जागृत करून मनपटल हे कार्यरत होते नी ज्याचा परिणाम हा भरती ओहोटी प्रमाणे मेंदूवर होत असतो. तरी आपण १९८८ सालचा वाॅशिंग्टन स्थित डाॅक्टर डेव्ह फर्ग्युसन ह्यांचा शोधनिबंध अभ्यासावा. त्यात त्यानी वरील बाबींचे सखोल चिंतन केलेय.

उगाच कोणीही काहीही केलेले चिंतन वाचून इतरांना फुकट सल्ले आपणं देता हे पटने फार अवघड वाटत आहे...

इतरांनी न विचारता म्हणजेच फुकट सल्ले द्यायची हौस/सवय/इच्छा तुम्हास असण्यामागे काहितरी दुसरी जटिल प्रक्रिया असावी असा संशय येत नाही ? आता शास्त्र खूपच सुधारलं आहे, एखाद्या डॉक्टर कडूनच प्रत्यक्ष तपासणी का करून घेत नाही आपणं?

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Oct 2021 - 12:13 am | अमरेंद्र बाहुबली

शास्त्राबाबत म्हणाल तर जग हे शास्त्रामुळेच चाललेय. शास्त्रोक्त माहीतीवीना काहीही केलेले फसते हे आपल्याला माहीत असेलच. तरी आपण वरील दोन शास्त्रद्न्यांव्यतीरीक्त मोरेक जोन्सन ह्या मुळच्या स्पॅनीश पण कॅनडास्थित शास्त्रद्न्याच्या कुठल्याही पुस्तकाचै अभ्यास करावा.

गॉडजिला's picture

3 Oct 2021 - 12:20 am | गॉडजिला

आपला अभ्यास पूर्ण झाला असतां तर इतरांना अभ्यास करायच्या विनंत्या करायची वेळ आली नसती हरकत नाही मी आपल्याला वेळ वाढवून देतो त्याचा वापर करून अभ्यास वाढवा व आपणास न विचारता मला सल्ला द्यायची बुध्दी का झाली ते स्पष्टपने स्पष्ट करा बघू

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Oct 2021 - 12:25 am | अमरेंद्र बाहुबली

अभ्यास हा कसलाही असू शकतो. तो करणे न करणे हे आपल्या मनावरील व बुध्दीवरील जोर देण्याच्या क्रियेवर अवलंबून असते. ही क्रीया सतत व्हावी म्हणून त्याचा सराव हा मेंदूला पर्यायाने बुध्दीला पुरक असतो. ह्यावरील शोधनिबंध प्रसिध्द आहे. फोक्सवॅगन मधील कर्मचारी विल्यम कर्चर ह्यांचा द नेशन ह्या वर्तमानपत्रातील शोधनिबंध अवश्य वाचा.

.

योगेश कोलेश्वर's picture

19 Sep 2021 - 11:23 am | योगेश कोलेश्वर

लेख आवडला ..

सर टोबी's picture

19 Sep 2021 - 12:09 pm | सर टोबी

हे प्रकरण माझ्या माहितीप्रमाणे लता मंगेशकर यांनी सुरू केले. खास लाल बागच्या राजाची आरती करून आणि तो नवसाला पावतो असे सांगून त्याची महती वाढवली. मग त्या नंतर काही मराठी तारका आणि सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेला क्रिकेटचा देव यांनी हातभार लावला.

कपिलमुनी's picture

19 Sep 2021 - 12:44 pm | कपिलमुनी

>>खरेतर "गौरी पाहायला"
हे टाळता आले असते.
धार्मिक भावना दुकावल्या आहेत

सतिश गावडे's picture

19 Sep 2021 - 12:51 pm | सतिश गावडे

छान माहिती दिली आहे पुण्यातील जुन्या गणेशोत्सवाची.
दोन वर्षे वगळता मला माहिती असलेला पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजात वाजणारे लाऊडस्पीकर.

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2021 - 1:01 pm | चौथा कोनाडा

सुंदर स्मरणरजंन ! लेख अर्थातच आवडला.
एकादे दशक बघता बघता "त्या वेळी" मध्ये जमा होते, आणि आपण काय काय हरवले त्याची जाणीव होत राहते. त्या "हरवल्याच्या" आठवणीत सुख भोगत राहतो,
याच सुमारास नातूबाग गणपती लाइटींग समोर बेधुंद होऊन नाचत राहिल्याच्या आठवणी मनाला तरतरी आणतात !
आता ....... आपण झपाट्याने जुने होत चाललो आहोत याची जाणीव होत राहते !

Bhakti's picture

19 Sep 2021 - 3:56 pm | Bhakti

छान लेख आहे.

भागो's picture

19 Sep 2021 - 7:07 pm | भागो

लेख आवडला.
जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली. रतन सायकल मार्ट इथे आम्ही मुलंं छोट्या सायकलींसाठी नंबर लावून वाट बघत उभे राहत असू. आणि मग मी मी तू तू . बाचाबाची. ध्रुव ग्रंथालय. इथे लॉंंड्री् पण होती. असंं अंधुकस आठवतंं आहे. बाजूला एका मारवाड्याचे दुकान होते. तिथे जगातली कुठलीही गोष्ट मिळणार असा माझा विश्वास होता.
समोर एक खणी कागद वह्यांचे एक दुकान होते. तो चक्क ब्राह्मण होता! त्याकडे गेलं की तो नेहमी ज्ञान द्य्यायचा. शिंदे आळीत ते रागात असत.
बस झालं. अस लिहित बसलो तर रात्र सरेल पण आठवणी संपणार नाहीत.

भागो's picture

19 Sep 2021 - 7:10 pm | भागो

शिंदे आळीत ते रहात असत.

बाजूला एका मारवाड्याचे दुकान होते. तिथे जगातली कुठलीही गोष्ट मिळणार असा माझा विश्वास होता.

ते दुकान 'पन्ना' जनरल स्टोअर्स तर नव्हे?

सिरुसेरि's picture

20 Sep 2021 - 10:41 pm | सिरुसेरि

मस्त आठवणी .

सुधीर कांदळकर's picture

21 Sep 2021 - 8:23 am | सुधीर कांदळकर

तर अप्रतिम. मला देखील ही अल्पमोली बहुगुणी होडी प्रिय. मी खेळलो आणि आमचा चि देखील खेळला.

मस्त लेख. आवडला. धन्यवाद.

सौंदाळा's picture

21 Sep 2021 - 3:01 pm | सौंदाळा

सुंदर लिहिलय.
३०-३५ वर्षांपुर्वीचा गणेशोत्सवाचा काळ उभा केलात.

श्रीगणेशा's picture

22 Sep 2021 - 1:07 am | श्रीगणेशा

छान आठवणी, लेख!

साधारण २००२ मधे मी, चुलत भाऊ आणि मित्रांसोबत टिळकरोड वर रात्रीच्या वेळी विसर्जन मिरवणूक पाहायला गेलो होतो हे आठवतंय. काही किलोमीटर पसरलेली मिरवणूक, प्रचंड गर्दी, मोठ्या आवाजातील गाणी, सुरेख सजावट, प्रकाशयोजना.

आणि रात्रभर फिरून पुण्यातील गणपती (आणि देखावे) पाहण्याची गंमत काही औरच.

एक वेगळंच विश्व होतं ते!

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Sep 2021 - 2:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

साधारण ९५-९६ पर्यंत कल्याणला सार्वजनिक गणपती एकादशीला विसर्जन करत आणि चतुर्दशीला पुण्याचे गणपती बघायला लोक येत. त्याही मिरवणुकीचे असेच वर्णन करता येईल. ही मिरवणुक शिवाजी चौक, बाजारपेठ,गांधी चौक्,दुधनाका,पारनाका,टिळक चौक असे करत आहिल्याबाई चौकातुन काळा तलावाकडे विसर्जनास जाई. वाटेत सुभेदार वाड्यामध्ये सगळ्या मंडळांना मानाचा नारळ मिळे. ठिकठिकाणी उत्साही नागरीक गर्दी करुन मिरवणुक बघायला जमत असत. महिलावर्ग गॅलर्‍यामधुन किवा दुकानाच्या पायर्‍या वगैरे सुरक्षित ठिकाणाहुन उत्सवाची मजा घेत. टि.व्ही. घरोघरी यायच्या आधी सुभेदार वाड्यातील रोज रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम हा ही एक जबरदस्त उत्सुकतेचा मामला होता. नाना पाटेकरांची मुलाखत, आशा खाडीलकरांचे गाणे ईथेच ऐकल्याचे आठवते.

पुढे पुढे काळा तलावाऐवजी खाडी(रेती बंदर) येथे गणेश घाट बांधला गेला आणि तिकडे विसर्जन सुरु झाले. त्यामुळे काळा तलाव वाचला आणि आधीच घाण असलेली खाडी अजुन प्रदुषित झाली. असो. मनाच्या एका कप्प्यात उत्सवाचे ते क्षण जपुन ठेवले आहेत, ते या लेखाने पुन्हा उसळुन वर आले हेच या लेखाचे यश.