शाळा आणि "ती"

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
26 Aug 2021 - 5:45 pm

                  
नावसुद्धा माहीत नसलेली रानफुलं फुलायची
त्या माळरानावर, जिथं ती शाळा होती.
त्या फुलांच्या ताटव्यांमधून पायवाट काढीत ती
चालत यायची.
स्वप्नचं जणू तरंगत येतंय हवेतून असं वाटायचं.

सायकलवरून रोज घामाच्या धारा लागेपर्यंत,
नेटाने किल्ला लढवत रहायचो मी,
ती बसलेल्या वडापला गाठण्यासाठी....
ती मात्र खिडकीतून अनोळखी कुतुहलाने पहायची
नेहमीचं, सर्कशीतील विदूषकाकडे पाहावं तसं !!

कधीतरी ती वेणीत फुलं माळून यायची,
मग मी माळरानावरील फुलं गोळा करून
खिशात ठेवायचो.. !!!

चुकून गणिताच्या तासाला लक्ष गेलं की
ती विदुषीसारखी भासायची.
तिच्या चेहऱ्यावर जर गणितं असती त्रिकोणमितीची
तर मीच वर्गात पहिला असतो असं वाटतं आता.

कधी वर्गात जाता-येता चुकुन समोर आलीचं तर,
का कुणास ठाऊक, पण लाजायची ती असं वाटायचं.
मी विरघळून दारातचं सांडून रहायचो मग,
पुढचे कित्येक दिवस.....

शब्दांविना संवाद होता, एकतर्फीचं
तिच्या फक्त असण्यातचं धुंदी असायची
बेहोशी असायची मनभर....
एखाद्या दिवशी चुकुन नसलीचं वर्गात तर
निराशेचे मळभ दाटी करून यायचे काळीजभर....

एक दिवस शाळा संपली, संपणारचं होती कधीतरी,
एकदम वजाचं झाली ती आयुष्यातून,
अदृश्य सावली मात्र तिची, नेहमीचं चिकटून राहिली
माझ्या जाणिवांवर....

केवढा निष्पाप, तरल, हळुवार गुंता होता तो
पुन्हा कधी तेवढं निरागस होताचं आलं नाही
खूप भाबडी स्वप्न रेंगाळलीयंत तिच्याभोवती
राजपुत्राचा बेडूक व्हायच्या आधी पाहिलेली

काही दिवसांपुर्वी श्रीफळ वाढवून आलो
त्या शाळेच्या माळावर,
ती नसती तर वर्गात लक्षचं लागलं नसतं
बाकी काही नाही पण गणित सुटलं नसतं
म्हणुन कधी कधी वाटतं....
आजचं माझं आयुष्य जणू उपकारचं आहेत
तिचे माझ्यावर....अगदी तिच्याही नकळत..

ओझी आनंदाने वागवलीत मी आजपर्यंत
तिच्या आठवणींची.....
एकदा तिला हे सांगता आलं असतं तर
त्या ओझ्याचं मोरपीसं झालं असतं कदाचित....

पण "ती" आता हरवलीय.....कायमची......
आठवणींचं ओझंही वाढलंय कित्येक मणांनी...
बेडकाची पुन्हा राजपुत्र होण्याची इच्छासुद्धा
मेलीयं.....कायमची..... !!!

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

26 Aug 2021 - 9:19 pm | शानबा५१२

आने वाला पल जाने वाला है हो सके तो...................

गॉडजिला's picture

26 Aug 2021 - 10:28 pm | गॉडजिला

बेडकाची पुन्हा राजपुत्र होण्याची इच्छासुद्धा
मेलीयं.....कायमची..... !!!

ही ओळ वाचून जी ए कुलकर्णी यांची ऑफिलियस ची कथा उगाच आठवली...

मी ही कोवळ्या वयात प्रेमात पडलो, एकतर्फी प्रेमाची धुंदी, वेड मनापासून अनुभवलं आणि काळा सोबत त्यापासुन विलगही कसा झालो ते ही मला कळले नाही...

धन्य ते लोकं _/\_

छान लिहलंय...

रंगीला रतन's picture

27 Aug 2021 - 12:57 am | रंगीला रतन

छान!

प्रज्ञादीप's picture

27 Aug 2021 - 12:52 pm | प्रज्ञादीप

उत्तम मांडलय

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2021 - 9:56 am | प्राची अश्विनी

छान!

चक्कर_बंडा's picture

1 Sep 2021 - 5:53 pm | चक्कर_बंडा

सर्वांचे मनापासून आभार !!!

धनावडे's picture

1 Sep 2021 - 10:48 pm | धनावडे

छान