श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
19 May 2021 - 1:31 am

आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें ।
नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥

जागृती , जागेपणा म्हणजे काय ? झोप नसणे म्हणजेच जागेपणा . निद्रेचा अभाव हीच जागृती ! कित्त्ती सोप्पं आहे हे समजायला . तसेच अज्ञानाचा अभाव हेच ज्ञान ! Absence of delusions is the enlightenment. आता आपण आरशात पहातो तेव्हा आपल्याला आपल्या मुखाचे प्रतिबिंब दिसत असते , मुख दिसत नसते , पण तरीही आपल्याला आपले मुख दिसल्याचा आनंद होत असतो. तसेच ज्ञानाने आपल्याला आपले स्वरुप कळते हे म्हणणे आहे. म्हणजे मुळात आपले स्वरुप इतके शुध्द आहे कि तिथे ज्ञान अज्ञान ही भानगडच नाही. जसे आगीने ठरवले की चला हा कापुर जाळुन नष्ट करु अन तसे केले तर त्या सोबत आगही नष्ट होते तसेच ज्ञाने अज्ञानाचे खंडन करु गेल्यास अज्ञान नाश पावते पण त्या सोबत ज्ञानही नष्ट होते !
तैसे अज्ञान आटोनियां | ज्ञान येतें उवाया | ज्ञानाज्ञान गिळोनिया | ज्ञानचि होये ||

ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे ।
ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥

माऊलींनी अनेक उत्तमोत्तम उपमा दिल्या आहेत अमृतानुभवात अन ज्ञानेश्वरीतही. त्यातली कदाचित ही माझी सर्वात आवडती उपमा आहे . कारण कोणत्या उपमेतुन कधी अन कोठे अर्थ क्लिक होईल ह्याचा काही नेम नाही.

a

ऑक्टॉबर/ नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा रविवार होता , कदाचित शनिवार असावा. घरात एकटेच बसुन कंटाळा आला होता, पिक्चर बघायची , नेटफ्लिक्स्वर बिंज वॉचिन्ग करायची, बियर प्यायची किंवा अगदी प्रौढ महानुभाव मनोरंजन क्लब मध्येही जायची इच्छा होत नव्हती. घरुन निघालो , पॉलास हूकला आलो, फलाफल अन पिटाब्रेड खात खात कोलगेट घड्याळाखाली येऊन बसलो. अगदी विंटर सुरु झाला नव्हता पण त्या मानाने बरीच थंडी असल्याने लोकांची वर्दळ अगदीच नगण्य होती.
शांत बसुन समोरची स्कायलाईन अन त्यमागुन होणारा चंद्रोदय पहाताना अचानक ही ओवी आठवली :

ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे ।
ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥

चंद्र आपल्याला प्रतिपदेपासुन हळुहळु मोठ्ठा होताना दिसतो अन पौर्णिमेला तो पुर्ण होतो, अन मग तेथुन परत माघारी जात जात अमावस्येला शुन्य होतो . बट वेट, चंद्राच्या ह्या अमावस्येपासुन ते पौर्णिमेपर्यंतच्या १६ कला ह्या आपला भास आहेत . चंद्र त्याच्याजागी आहे तसाच पुर्ण आहे . आपल्या भासांमुळे त्याचे अस्तित्व कमी जास्त होत नाही ! च्रंद्र कायमच पुर्ण आहे , हीच ती सतरावी कला आहे जी की नेहमीच आहे, फक्त आपल्याला आपल्या भासांच्या पलीकडे जाऊन पहाता आलं पाहिजे बाकी मग - Its always there ! बिंगो !

आपल्याला आपल्या बुबुळांनी अख्खं जग दिसतं पण एका बुबुळाने दुसरे बुबुळ दिसत नाही मग ते नाहीच असे म्हणतो का आपण ?

जे तेज आहे , त्याला अंधार म्हणजे काय माहीतच नाहीय मग त्याला "तेज म्हणजे काय" हे तरी कसे माहीत असेल, सुर्यावर कधीही रात्र होत नाही मग जर सुर्याला रात्र म्हणजे काय हेच माहीत नसेल तर दिवस होणे म्हणजे काय हे माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही . जर नसणे म्हणजे काय हे माहीत नाही मग असणे म्हणजे काय हे तरी कसे कळणार ? शुन्यसिध्दांतवादी ( म्हणजे बहुतेक बौध्दमत) म्हणतात की "ह्याचाच अर्थ - सर्वथा काहीच नाही" पण हे म्हणणारा हे अनुभवणारा कोणीतरी निर्माण झालाच की ! त्यामुळे आत्मस्वरुप शुन्य आहे अर्थात नाहीच हे केवळ अलिप्तपणे पाहणार्‍यांना वाटु शकेल ,इरव्ही ह्या बोलण्यात काही तथ्य नाही.

माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।
तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥
कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें ।
तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगू आभासे ।
सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥

दिवा विझवुन टाकला अन त्याच क्षणी दिवा विझवणाराही विझला तर दिवा नाही हे कोणाला कळणार ?
झोप आली अन नेमका त्याच क्षणी प्राण गेला तर झोप चांगली लागली की वाईट लागली हे कोणाला कळणार ?
समजा तुमच्याकडे एक मातीचा माठ आहे असा तुम्हाला भास झाला , अन अचानक तो माठ फुटला असे तुम्हाला वाटले तर आता सांगा की माठ आहे की नाही ?
तसेच मुळात अज्ञान हाच भास आहे , पण समजा तो ज्ञानाने नष्ट झाला तर काय अन कोण उरणार ?

जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।
आपुलाहि निमाला । आठउ तया ॥ ४-३३ ।

जो ह्या अशा निरंजन अर्थात कशाकशाचाही स्पर्ष होत नाही अशा स्थितीत झोपला आहे तो इतरांना झोपला आहे तो इतरांना दिसायचा प्रश्न येत नाही कारण त्याला खुद्द स्वतःलाच स्वतःचे विस्मरण झालेले असते !

म्हणुन आत्मस्वरुप आहे आणि आत्मस्वरुप नाही हे दोन्ही बोल व्यर्थ आहेत ! अगदी जसे की पौर्णिमा आहे अन अमावस्या आहे हे बोलणे व्यर्थ आहे तसे कारण चन्द्र चंद्राच्या जागी, सतराव्या कलेत कायम आहेच की !!
झोप उडाली की आपल्याला जाणवते की आपण जागे झालेलो आहोत पण काहीवेळाने ही जाणीवही आपोआप नष्ट होते , तेव्हा निद्रेचे नसणे आणि जागृतीचे असणे ह्या दोन्हीही स्थिती नसतात ! बस्स आपण असतो !

जमीनीवर कुंभ ठेवला तर त्या जमीनीला सकुंभ म्हणता येईल अन तो कुंभ नेला तर जमीनीला निष्कुंभ म्हणता येईल ! पण सकुंभता काय आणि निष्कुंभता काय , हे दोन्हीही जमीनीचे गुण नाहीतच , हे केवळ आपले भास आहेत . कुंभ असला काय अन नसला काय जमीन आपल्याजागी नित्य चोखपणे आहेच की !
जसं आपल्या लक्षात आलं की अमावस्या असणे आणि पौर्णिमा असणे हे आपले भास आहेत , चंद्राचे अस्तित्व काय सदा परिपुर्णच आहे !
तसेच स्वरुपाबाबत अज्ञान असणे अन ज्ञानाने त्याचे खंडन केल्यावर ज्ञान असणे ह्या दोन्ही गफ्फा वायफळ आहेत , अज्ञान असणे , ज्ञान असणे हे दोन्हीही भाग स्वरुपाला स्पर्शच करत नाहीत ! ते बस्स आहे त्याच्या जागी काय सर्वदा सदोदित संचलेले !

आता ह्या पुढे काय बोलणार ?

अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥१॥
साहय जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥
थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥
तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥

|| श्री कृष्णार्पणमस्तु ||

________________/\________________

संदर्भ :
१) अमृतानुभव - सत्संगधारा http://satsangdhara.net/dn/amrut.htm
२) अमृतानुभव - हभप.दत्तराज देशपांडे संपादित - https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti
३) अमृतानुभ - श्री. राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या सुमधुर आवाजात ध्वनीफित - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8
४) तुकाराम गाथा - https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A...
५) समान विषयावर असलेला समर्थांचा अप्रतिम ग्रंथ - आत्माराम - http://satsangdhara.net/db/atmaram.htm

___________________/\_____________________

(क्रमशः .... बहुतेक)

धर्मविचार

प्रतिक्रिया

आणी मुळ गोश्ट झाकुन ठेवतात अथव सुस्पश्ट करणे बाजुलाच ठेवल्याचा भास होतो. आणी जी बाब साधनेची सुरुवात असावी ती बाब साधनेची फलश्रूतीच भासु लागुन काहीतरी महान गवसल्याचा भ्रामक आनंद घेणेही सुरु होते.

ज्ञानाची व्याख्या काय ?
- अशी बाब ज्याचा माग कोणीही व्यक्ती पाच संवेदनातुन काढतो(स्पर्श, गंध, चव, द्रुश्य, आवाज). आणी त्याचे आकलना नंतर ते सत्य, असत्य, कल्पना, स्मृती या रुपात रुपांतरीत होते.

अज्ञानाची व्याख्या काय ?
- अज्ञान म्हणजे काय तर अशी बाब ज्याचा माग वरील पाच संवेदनातुन मिळवु शकत नाही.

मग ती गोश्ट कोणती उरली ज्याबाबत आपण पुर्ण अनभिज्ञ अथवा अज्ञानी आहोत ?
- अर्थातच स्वरुप. ती गोष्ट म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवकर्ता होय कारण हा अनुभवकर्ताच पाचही संवदना माझ्या आहेत असे म्हणू शकतो पण या पाचही प्रकारच्या संवेदना अथवा त्याचे ज्ञान देणारे अवयव या अनुभव कर्त्याचा माग काढु शकत नाहीत (कारण त्याना मर्यादीत कामे दिली आहेत आणी ती देखील बाहेरील संवेदना आत मधे न्हेणे या प्रकारची असल्याने ) म्हणून स्वरुपाबाबत पुर्ण अज्ञान आहे.

म्हणुनच हा हात माझा आहे पण हा हात म्हणजे मी न्हवे ही बाब वास्तव बनते... स्व स्वरुपाचे ज्ञान हे पाच संवेदनातुन मिळत नाही परीणामी हे रुप भौतीक जगाच्या पलीकडील ठरते, किंबहुना ज्याप्रमाणे वरील पाच ज्ञानेंद्रीये ही फक्त बाहेरील बाबी आत पोचवायला उपयोगी आहेत आणी फक्त तिच वापरायला आपण शिकलो आहोत, आतील संवेदनांचे ज्ञान हे फक्त आणी फक्त आत डोकावुनच होउ शकते.... तिथे पंचइंद्रीय उपयोगी नाही.

म्हणून पंचेद्रीयांनी अभुवास येणारे जग (अज्ञान)हे नष्ट वगैरे होत नसुन स्वरुपाचा जसा माग निघु लागतो तसे पंचेद्रीयांच्या संवेदनांचे प्रयोजन हे प्रलोभन उरत नाही इतकेच... आणी ही बाब समजणे साधनेची फलश्रुती नसुन प्रथम पायरी आहे. आणी त्यात आनंद मानणे म्हणजे मुक्तता नसुन काही काळाने नश्ट होउन जाणारी निव्वळ भावना आहे.

गॉडजिला's picture

19 May 2021 - 8:57 am | गॉडजिला

हे मी जे काही लिहले आहे आहे ते तुम्हाला पटले नसेल तर या मुद्यांवर चर्चा होउ शकते... ते सुध्दा तुमचा गट अथवा आडनाव माहीत करुन न घेता. याची नोंद घ्यावी अशी नम्र विनंती आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 May 2021 - 3:53 pm | प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ .

तुम्ही कशाला लोड घेता गॉडजिलाराव. तुम्ही गट क्र. २ मधील असल्याने चर्चा करायचा प्रश्नच येत नाही !

तुम्ही करताय त्यापेक्षा जास्त वाईट प्रकारे खंडन ऑलरेडीकरुन ठेवलं आहे महात्मा फुलें ह्यान्नी!
त्यांनी ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायाची व्यवस्थित चिरफाड केलेली आहे . पहा माहात्माफुले समग्र साहीत्य- धनंजय कीर पान क्र. ४९७ .
त्यात त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना " धूर्त देशस्थ आळंदीकर ज्ञानोबा" असे म्हणले आहे आणि आर्य ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीतील निराधार तर्कांचे खंडण केले आहे .
तुम्ही ते वाचा तुम्हाला ते आवडेल .

हे ज्ञानेश्वरी अमृतानुभव वगैरे सर्व धूर्त आर्यभट बामणांचे कसब आहे, ते सोडुन द्या त्यांच्यासाठी , तुम्ही कशाला उगाच वेळ वाया घालवता !

तुम्ही कशाला उगाच लोड घेता !
खुष राव्हा ना !

चीअर्स

=))))

गॉडजिला's picture

19 May 2021 - 5:12 pm | गॉडजिला

तुम्ही कशाला लोड घेता गॉडजिलाराव. तुम्ही गट क्र. २ मधील असल्याने चर्चा करायचा प्रश्नच येत नाही !
यालाच हॅविंग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात... आपणास ते पटतही आहे पण मान्य मात्र करायचे नाहीये, परीणामी लोड तुमच्यावर आहे माझ्यावर नाही.

तुम्ही करताय त्यापेक्षा जास्त वाईट प्रकारे खंडन ऑलरेडीकरुन ठेवलं आहे महात्मा फुलें ह्यान्नी!
जास्त वाईट प्रकारचे ते खंडन जर चुकीचे असेल तर चुक ठरवावेच लागेल योग्य, असेल तर उत्तम म्हणावेच लागेल. आपण अभ्यास करताय का त्याचा ? एक सरळ धागाच काढा की, तुमच्यामुळे आम्हालाही कळेल फुले काय काय म्हणतात ते...

सर्व धूर्त आर्यभट बामणांचे कसब आहे, ते सोडुन द्या त्यांच्यासाठी , तुम्ही कशाला उगाच वेळ वाया घालवता
तुमचे हे विधान सत्य असेल तर त्याच्या पृश्ठ्यर्थ क्रुपया सबळ पुरावा द्या , आपण वरील विधान का करत आहात याचा अभ्यास आवश्य्क आहे, त्याचा स्विकार करण्यापुर्वी अथवा धिक्कार करण्यापुर्वी. तेंव्हा आपल्या विधानाची कारणं मिमांसा सविस्तर लिहावी ही नम्र विनंती. अन्यथा त्याचा स्विकार मला करता येणार नाही हे नमुद करतो.

वाह माऊली वाह!
म्हणजे मुळात आपले स्वरुप इतके शुध्द आहे कि तिथे ज्ञान अज्ञान ही भानगडच नाही.
बालकासम ही अवस्था ज्ञान,अज्ञान प्राप्त करण्यापलीकडे आहे.सतरावी कला म्हणजे आपण_/\_