आज काय घडले... फाल्गुन व. १३ चितोडचे सौभाग्य गेलें!

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 11:00 am

आज काय घडले...

फाल्गुन व. १३

चितोडचे सौभाग्य गेलें!

शके १४९० च्या फाल्गुन वद्य १३ रोजी सम्राट अकबर बादशहा याने रजपुतांचा प्रचंड पराभव करून चितोडगड आपल्या ताब्यांत आणला.

त्या वेळी चित्तोडच्या राज्यावर उदयसिंह राणा होता. अकबर बादशहाने वयांत आल्यावर साम्राज्य-विस्तारास सुरुवात केली होती. आपल्या बापास संकटकाळी ज्यांनी मदत केली नाही त्यांना अकबराने वठणीवर आणले. अनेक रजपूत राजे त्याचे मांडलिक बनले. पण चितोडगडावर जोपर्यंत केशरी आदित्यध्वज फडकत आहे तोपर्यंत अकबराला समाधान नव्हते. मेवाडचा राणा उदयसिंह अकबराचे स्वामित्व कबूल करीत नव्हता. तेव्हां अकबराने शके १४८९ मध्ये तीस हजार सेना व मोठा तोफरखाना यांच्यासह चितोडवर स्वारी केली. गडाचे दरवाजे फोडण्यास शेकडों हत्ती आणले होते. अकबराच्या सैन्याचा विस्तार पांच कोसपर्यंत होता. रजपुतांचे सैन्य आठ हजारांपर्यंत असून जयमल्ल हा कुशल सेनापति होता. अकबर आणि जयमल्ल यांची घनघोर लढाई झाली. त्या वेळी रजपूत स्त्रियांनीहि मोठा पराक्रम केला. चितोड किल्ल्यावरील सूर्यदरवाजावर सोळा वर्षांचा कोवळा पोर वीर पहा अभिमन्यूच्या शौर्याने लढला. हातांत तरवार घेऊन त्याची आई त्यास धीर देत होती "बाळा, चितोडच्या बचावासाठी आपला निर्वश झाला तरी चालेल; पण माघार मात्र नको." परंतु शत्रूचे सामर्थ्य अफाट होते. सहा महिनेपर्यंत रजपुतांनी तग धरला. शेवटी दाणागोटा व मनुष्यबळ संपले. पराजय पावण्यापेक्षा रणांगणावर प्राणार्पण करण्याचा निर्धार रजपूत वीरांनी केला शीलरक्षणार्थ शेकडों स्त्रियांचा जोहार झाल्यावर केशरी पोषाख करून सर्व वीर मोठ्य गर्जनेंत मोंगल सैन्यावर तुटून पडले. पाय तुटला असतांहि जयमल्ल लढत होता. वीर पठ्ठा व पराक्रमी जयमल्ल यांचे शौर्य पाहून अकबर विस्मित झाला. जयमल्लाला तो 'संग्राम' म्हणे आणि ज्या तोफेनें तो मारला गेला तिचे नांवहि पातशहाने 'संग्राम तोफ' असें ठेविलें. शेवटी रजपुतांचा मोड झाला. तीस हजार लोकांची अकबराने कत्तल केली.

२५ फेब्रुवारी १५६८
चितोड किल्ला

इतिहास

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2021 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार.

पुढे काय काय घडले त्या उत्सुकतेत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

Ashutosh badave's picture

13 Apr 2021 - 10:35 am | Ashutosh badave

धन्यवाद

थोडक्यात चांगली माहिती देत आहात. लेखांना अगदी कमी प्रतिसाद मिळत असले तरी हतोत्साहित न होता आपले कार्य करत रहावे. लगे रहो. उपयुक्त आणि रोचक लेखमाला आहे.