फाल्गुन व. ९ छत्रपति राजाराममहाराजांचे निधन

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 10:50 am

आज काय घडले...

राजाराम महाराज

शके १६२१ च्या फाल्गुन व. १ रोजी श्री शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव श्रीराजाराममहाराज यांचे निधन झाले.

राजारामांचा जन्म शके १६६२ मध्ये सोयराबाईच्या पोटी झाला. शिवाजी राजांनंतर अठराव्या दिवशीच यांनाच गादीवर बसविले होते; परंतु पुढे दोन महिन्यांनी संभाजी राजांनी यांना कैदेत टाकून सर्व कारभार स्वतःकडे घेतला. पुढे संभाजी राजांच्या मृत्युनंतर येसूबाईच्या सल्ल्याने शाहू राजे वयांत येईपर्यंत राजाराम राजांनीच कारभार पाहावा असे ठरून दि. ९।२।१६८९ रोजी राजारामांचं दुसरे मंचकारोहण झाले. या वेळी परिस्थिति मोठी चिकट होती. खजिना रिकामा असून सैन्यांत शिस्त नव्हती. तेव्हां रायगडावर स्थिर राहणे इष्ट नसल्यामुळे राजाराम राजांस सर्वत्र हिंडावे लागले. रायगडास झुल्फिकारखानाचा वेढा पडल्याबरोबर.राजाराम राजे तेथून बाहेर पडले व प्रल्हाद निराजी, धनाजी जाधव, संताजी घोरपडे आदि मंडळींसह वेषांतर करून ते जिंजीकडे जाण्यास निघाले. पुढे मोंगलांनी जिंजीसहि वेढा दिला. सात वर्षेपर्यंत खटपट करूनहि मोगलांस यश आले नाही. शत्रूच्या हातावर तुरी देऊन राजाराम राजे वेलाराहून विशाळगडास गेले. नंतर सैन्य जमवून व-हाड-खानदेशमध्ये चौथाई व सरदेशमुकी जमविण्यात यांनी सुरुवात केली. परंतु झुल्फिकारखानाने पाठलागा केल्यावर मोठ्या कष्टाने हे सिंहगडी येऊन पोचले.

"शिवाजीराजे -संभाजीराजांचा आवेश त्याच्या अंगी कधीच प्रगट झाला नाही. प्रवासांत थकवा आल्याने त्यांना उचलून घेऊन जाण्याचे प्रसंग वारंवार आले.... साताऱ्यापासून नगरपर्यंतच्या प्रवासांत राजाराम राजांस थकवा वाटे.... त्यास छातीचा विकार असावा. बरोबरचे सरदार साता-याचे बचावास धावले, तेव्हां राजाराम आश्रयार्थ स्वारीहून सिंहगडी आले. आणि तेथे अल्प काळ ज्वर येऊन आणि छातीच्या विकाराने रक्ताच्या गुळण्या होऊन त्याच आजारांत तो फाल्गुन व. ९ रोजी मरण पावले. स्त्री अंबिकाबाई सती गेली."

-२ मार्च १७००

इतिहास