स्मशानाशेजारील घर

खटपट्या's picture
खटपट्या in जनातलं, मनातलं
13 Mar 2021 - 10:42 pm

स्मशानाशेजारील घर

बऱ्याच लोकांना स्मशान म्हटलं कि घाबरायला होतं. का ते माहित नाही.

जिथे कधीतरी जावंच लागणार आहे त्या जागेबद्दल इतका तिटकारा का? जावंच लागणार म्हणजे स्वतः लोकांच्या खांद्यावरवरून नव्हे, कोणाला तरी पोचवायला कधीतरी जावंच लागतं कि. पण हो, स्मशानात कोणाला कधी पोचवायला जायची वेळ येऊ नये असे प्रत्येकाला वाटते. म्हणजे तसा प्रसंग कधी कोणावर ओढवू नये. पण असे होणे जवळजवळ अशक्य आहे.

स्मशान म्हटलं कि जणू काही तिथे भुताखेतांच्या वावर असतो, कोणत्याही क्षणी एखादे प्रेत उठून आपल्याशी बोलायला लागेल, उगाच एक अतृप्त आत्मा आपला गळा धरेल, एखादी सफेद साडीतली बाई मेणबत्ती घेऊन उगाच इकडून तिकडे चालत जाईल, तिला हाक मारूनही ती आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाही, अशा काही भ्रामक समजुती लोकांमध्ये असतात.

आता म्हणाल हो कोण मोठा आम्हाला सांगणार कि असं काही नसतं वगैरे !!! तर मित्रहो , माझे बालपण, म्हणजे तिसरी पर्यंत चे बालपण स्मशानाच्या बाजूला गेले आहे. बाबा अग्निशमन दलात असल्यामुळे सक्तीने फायर क्वार्टर मध्ये राहावे लागले.
आमची जी पहिल्या माळ्यावरची सदनिका होती तिची खिडकी चक्क स्मशानात उघडायची. म्हणजे दिवसातून कमीत कमी २ ते ३ प्रेते आम्ही जळताना बघत असू. खिडकीतून दुसरं काही दिसायचेच नाही त्याला आम्ही काय करणार . उघडा खिडकी बघा स्मशान. घ्या शेकोटी. बरं खिडकी सदासर्वकाळ बंद हि ठेऊ शकत नाही. खरं तर प्रेत काही आपल्याला जळताना दिसत नाही. ते संपूर्ण लाकडांनी झाकायची जबाबदारी स्मशानातील माणूस घेतो. त्यामुळे काही बीभस्त असे काही बघितल्याचे आठवत नाही. प्रेताच्या ज्वाळा उंच असतात वर त्यातून निघणाऱ्या ठिणग्या हवेत उडून आमच्या खिडकीतून आतमध्ये येत असत. ज्याचे आम्हाला काहीच सोयर सुतक नसायचे.

रोज सकाळ संध्याकाळ लोक दिवा लावतात आणि नमस्कार करतात तसे आम्ही सकाळ संध्याकाळ चिता जळताना तिला मनोभावे नमस्कार करायचो. कोणता तरी अग्नी आहे ना? झालं तर मग. हाय कि नि नाय काय...

मला जेव्हा बोलता येऊ लागले आणि कळायला लागले तेव्हा माझे बालसुलभ प्रश्न सुरु झाले.
यांना इकडे का आणतात?
आणतात ते आणतात झोपवून का आणतात?
ती माणसे पण झोपून कशी राहातात? उठत का नाहीत?

कोणी ते मला आठवत नाही पण एका मोठ्या माणसाने मला सांगितले कि "अरे, त्यांचे लग्न करायचे असले कि त्यांना असे इकडे घेऊन येतात"
मला आठवतंय कि मी काही लोकांना विचारलेही होते कि "काय हो? तुमचे लग्न झाले आहे का? जणू काही आमच्या बाजूला लग्नाचा हॉलच होता आणि त्याची सर्व व्यवस्था मीच बघायचो. बहुतेक मला मार पडला म्हणून मी मग लोकांची लग्नाची चौकशी करायची थांबवली.

पण माझ्या मनावर पक्कं कोरलं गेलं कि लग्न म्हणजे असं झोपवून वरात काढायची.

नंतर नंतर मी आई बाबाना माहिती देऊ लागलो कि आज दोनच लग्न लागली काल चार लग्न लागली होती. आई बाबा गप्प होऊन दुर्लक्ष करायचे. जळणाऱ्या चितेत आत माणूस असतो हे मला खूप उशिरा कळले. तोपर्यंत तो असाच एखादा लग्नातील होमहवनाचा कार्यक्रम असावा असा माझा समज होता.

मला आठवते, वेगवेगळ्या प्रकारे अंतयात्रा यायच्या. काही अगदी शांत, काही भजनाच्या गजरात, काही घोषणा देत. कधी फक्त पुरुष असत, कधी स्त्रिया आणि पुरुष असत. काही लोक रडत असत. ते का रडतात ते माहीत नसायचे. आधीच मार खाल्ल्यामुळे परत विचारायची सोय नाही. लग्नात लोक रडत असावेत अशी मी आपली समजून करून घेतली.

स्मशानात होणाऱ्या सर्व विधींकडे मी असा तटस्थपणे पाहायला शिकलो. वयाच्या आठव्या वर्षी आम्हाला घर बदलावे लागले पण हि सर्व दृश्ये माझ्या मनावर कायमची कोरली गेली. एखादा क्रिकेट चा सामना बघावा तसा मी स्मशानातील विधी बघत असे. ती भावुक माणसे, त्यांचे मडके घेऊन प्रेताला चकरा मारणे. काही केल्या काही कळत नसे. समोर दिसतंय तर बघायचं. एखाद्या मोठ्या माणसाच्या लक्षात आले कि बघतोय को तो लगेच मला मागे खेचून खिडकी लावून घेत असे. जास्तीत जास्त खिडकी बंद ठेवण्याकडे घरातील लोकांचा कल असे. पण कधीतरी खिडकी उघडी राहायचीच. समोरच्या कॉमन बाल्कनीमधून अंतयात्रा दिसायच्याच. नंतर नंतर मला कोणीच अडवेनासे झाले.

हे कधी आपल्याला करावे लागेल याची सुतराम कल्पना तेव्हा नव्हती. बाबा गेल्यावर हे सर्व खर्र्कन माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले. आता माझी पाळी, मी आता मडके घेऊन चकरा मारणार. एखादा लहान मुलगा बाजूच्या इमारती मधून कुतूहलाने बघतोय असा मला भास झाला.

हे माझे आयुष्य चालू आहे त्याचा फुल्स्टोप स्मशानात होणार आहे हे मनावर बिंबवण्यासाठी देवाने ती सदनिका आम्हाला काही वर्षासाठी दिली नसेल?

स्मशानाच्या बाजूला निवासस्थान बांधण्याची कल्पना कोणत्या अभियंत्याच्या डोक्यात आली कोण जाणे. बरे इमारत बांधली ती बांधली आणि खिडकीतून चितादर्शनाची फुकट व्यवस्थाही केली. कमीतकमी ती सदनिका गोडाऊन किंवा अन्य कामासाठी देण्यास हरकत नव्हती. पण सरकारी कारभार. विशेष म्हणजे या इमारतीचे उदघाटन शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते झाले. पुढे ते यथावकाश भारताचे राष्ट्रपती झाले.

असो

आजही मला स्मशानात जाताना घरी जातोय असं वाटतं. कारण शाळेतून घरी जाचे म्हणजे स्मशानात जायचे! फरक काय ? स्मशान आणि घर एकच !!

यथावकाश बाबांची बदली दुसऱ्या अग्निशमन केंद्रात झाली आणि आम्ही त्या स्मशानातून सुटलो (?) सुटलो म्हणू शकतो? कारण आनंदही नव्हता आणि दुःख हि नव्हते . इयत्ता चवथी मध्ये मी दुसऱ्या अग्निशमन केंद्रात राहायला गेलो जे एक दफन भूमीवर बांधले होते :)

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

13 Mar 2021 - 10:59 pm | कानडाऊ योगेशु

लेख प्रचंड आवडला. पण आवरता घेतल्यासारखा वाटला.

आजही मला स्मशानात जाताना घरी जातोय असं वाटतं.

जबरदस्त पंच आहे ह्या वाक्यात.!

धन्यवाद, पुढच्या वेळेस काळजी घेईन

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Mar 2021 - 11:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वेगळ्याच धाटणीचा लेख आवडला. खूप वर्षापुर्वी स्मशान्भूमीच्या बाहेरचा फुलवाला माहितीतला होता."आज जास्त धंदा झाला नाही"हे वाक्य तो सहज बोलून जायचा.

उपयोजक's picture

13 Mar 2021 - 11:44 pm | उपयोजक

लेख आवडला. वेगळ‍ाच अनुभव!

सौंदाळा's picture

14 Mar 2021 - 12:12 am | सौंदाळा

वेगळाच लेख, आवडला.
लहानपणीच्या भावना छान लिहिल्या आहेत.
पुढच्या घराबद्दल पण जरूर लिहा.

शशिकांत ओक's picture

14 Mar 2021 - 8:01 am | शशिकांत ओक

कोरेगाव पार्क येथील आमचा फ्लॅट स्मशान भूमी जवळ होता. त्यामुळे ओशो जे नाव अगदी शेवटच्या काही वर्षांत पडले ते भगवान, आचार्य रजनीश यांच्या कम्युन मधील भक्त गण वारले की त्यांची शवयात्रा म्हणजे आनंद सोहळाच असे.
रामनाम सत्य आहे असे दबक्या आवाजात म्हणत हातात लोटका धरून चाललेल्या यात्रेत सहभागी होणारे लोक न दिसता, जणूकाही मृत्यूला आनंदाने स्विकार करायला मानसिक तयारी झालेले झाडून सारे ओशोप्रेमी वाजत गाजत नृत्य करताना दिसत असत. तेंव्हा तो रस्ता व स्मशान भूमी गर्दीने फुलून गेलेली असे. खुद्द ओशोंच्या अंत्यदर्शनासाठी त्या मानाने कमी गर्दी होती.
नंतर बरीच वर्षे लोटली. हवाईदलातील एक वरिष्ठ स्नेही एअर कमोडोर वळवडे यांची फ्युनरल त्याच नदीच्या काठावर पण विरुद्ध दिशेने येरवडा वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला नेली होती. त्यावेळी हवाईदलातील एयर वॉरियर्स उल्टा शस्त्र करून त्यांना सलामी देऊन झाल्यावर त्यांच्या मित्रांनी, आम्ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे कार्य, वैयक्तिक हृद्य आठवणी यांनी वातावरण सद्गदित झाले. त्यांच्या पत्नींनी त्यांना भडाग्नी दिला. आणि एका विद्वत्तापूर्ण, प्रेमळ, व्यक्तीला निरोप दिल्याचे जाणवले...!
खूप वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या अंतिम दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसमोर रस्त्यावरून जाताना माझ्या फ्लाईटने सलामी शस्त्र करून सलामी दिली होती...!

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 9:14 am | मुक्त विहारि

निरागस बालपण

खटपट्या सेठ अनुभव कथन आवडले ! तुमच्या लिखाणामुळे काही गोष्टी आठवल्या...
कामा निमित्त्याने शिफ्ट करावी लागे, शिफ्ट ची वेळ फार विचित्र होती, रामदास काकांच्या भाषेत सांगायच तर ग्रेव्हयार्ड शिफ्ट ! तर कंपनीची कार माझ्यासाठी घराखाली माझी वाट बघत असे, माझ्या शिवाय इतर कोणाचीही या वेळेत शिफ्ट नसल्याने मी आणि चालक दोघेच नेहमी प्रवास करायचो. तेव्हा निरनिराळे मार्ग निवडुन मी ऑफिसला पोहचत असे [ ज्या मार्गात काही कारणाने जाम लागला असेल तर दुसरा मार्ग निवडला जात असे ] या पैकी एका मार्गात स्मशान लागत असे, तसेच या स्मशानाच्या बाजुलाच एका नामांकित बिल्डर ने बिल्डिंग बांधली आहे. अगदी बाजुलाच असल्याने पेटलेल्या चीतेचा सगळा धुर या इमारतीत जाताना मी अनेकदा पाहिला होता. लोक अश्या ठिकाणी कसे राहतात किंवा जागा घेताना लोकांनी आजु-बाजुचा परिसर कसा पाहिला नाही ? असा मला अनेक वेळा प्रश्न पडत असे.

हे कधी आपल्याला करावे लागेल याची सुतराम कल्पना तेव्हा नव्हती. बाबा गेल्यावर हे सर्व खर्र्कन माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले. आता माझी पाळी, मी आता मडके घेऊन चकरा मारणार. एखादा लहान मुलगा बाजूच्या इमारती मधून कुतूहलाने बघतोय असा मला भास झाला.
संपूर्ण लेखातील सगळ्यात जास्त काळीज चिरणारे वाक्य !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I'm a Peaky Blinder ( Official Video )

खटपट्या's picture

14 Mar 2021 - 5:31 pm | खटपट्या

धन्यवाद मित्रा

एक विशिष्ट तुपकट म्हणा किंवा चरबी म्हणा किंवा अन्य सामग्री असेल, असा जळका वास प्रत्येक दहनाच्या वेळी आसमंतात पसरतो. कालांतराने त्याची सवय होत असेल. पण तो नेहमीचा साधा धूर नसतो इतकं नक्की. स्मशानाबाजूला असलेल्या इमारतींतही तो येत राहतो. विशेषत: वरचे मजले.

चौकस२१२'s picture

15 Mar 2021 - 1:08 pm | चौकस२१२

पण तो नेहमीचा साधा धूर नसतो इतकं नक्की
हो खरंच ...
हे असे राहणे खरंच अवघड असणार
एक वेगळ्याच अनुभववरील लेख ..

टवाळ कार्टा's picture

14 Mar 2021 - 3:34 pm | टवाळ कार्टा

मस्तय :)

उगाच एक अतृप्त आत्मा आपला गळा धरेल

काही कट्टे आठवले =))

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2021 - 10:11 pm | अत्रुप्त आत्मा

अरे टवाळा! =))

खटपट्या's picture

14 Mar 2021 - 5:33 pm | खटपट्या

सर्व प्रतिसदकांचे आभार्स

प्रचेतस's picture

15 Mar 2021 - 11:58 am | प्रचेतस

एका वेगळ्याच विषयावर फारच भारी लिहिलंय.

तसं बघायला गेलं तर स्मशानं अजिबात भयाण वाटत नाहीत. फारतर दोन तीन चितांची सोय असते. हल्ली तर विद्युत/डिझेल दाहिनी असल्याने चिता दिसणे पण जवळपास बंद झालंय. झाडी, हिरवळ निगुतीने राखलेली असते मात्र कबरस्तानं, सिमेट्री वगैरे मात्र रात्रीच्या वेळी भयाण दिसतात, एकतर विस्तार मोठा आणि त्यात असंख्य कबरी.

खटपट्या's picture

15 Mar 2021 - 12:12 pm | खटपट्या

धन्यवाद

... असा विचार बिल्डरचा असणार. म्हणजे हा एक युएसपी. लेक व्ह्यु अपार्टमेंट तसा लास्ट व्ह्यु.
मजेदार लेख.

सौन्दर्य's picture

15 Mar 2021 - 11:25 pm | सौन्दर्य

अनेक वर्षांपूर्वी बोरिवलीत घर घेण्यासाठी ब्रोकर्स बरोबर खूप भटकंती केली. त्यातल्याच एका ब्रोकरने बाभई स्मशानाच्या समोरच्या बिल्डिंगमधला एक फ्लॅट दाखवला. त्याची खिडकी उघडल्या बरोबर समोर स्मशानाचे स्ट्रक्चर दिसे. मी मूळ बोरिवलीचाच असल्याने मला लगेच ते स्मशान आहे हे कळले तरी मुद्दाम हा ब्रोकर काय सांगतो ते तरी पाहावे म्हणून विचारले असता ते सरकारी गोडाऊन आहे असे सांगायला लागला. त्यातून धूर का येतोय असे विचारल्यावर 'शायद वहाँ आग लगी होगी' असे थंडपणे म्हणाला.

टर्मीनेटर's picture

19 Mar 2021 - 9:25 pm | टर्मीनेटर

मजेशीर लेखन आवडले 👌

जेम्स वांड's picture

31 Mar 2021 - 4:08 pm | जेम्स वांड

मराठीत लिहितायत असा भास झाला, लेखन उत्तम निर्लेप वाटलं, पुलेशु.