प्रवास (भाग 9) (खरा शेवट....)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
27 Feb 2021 - 2:53 am

प्रवास

भाग 9 (खरा शेवट)

पवारने भिकुला गाडीत बसवलं आणि गाडी वाड्याकडे वळवली.

भिकू गाडीतून उतरत असताना पवार म्हणाला;"बाकी सगळे सुटणार भिकू.... तुझं तू बघ. कारण जोपर्यंत तू अडकला आहेस; तोपर्यंत ते चौघे सेफ आहेत."

पवारने गाडी वळवली आणि निघून गेला.

वाड्याच्या दिशेने पाऊल उचलत भिकू म्हणाला;"धाकटे मालक.... तुम्ही आणि मी!!!!! आलो मी......"

जाता जाता पवारने भिकू जे बोलला ते ऐकलं होतं. 'येड लागलं बहुतेक या राक्षसाला....' पवारच्या मनात आलं.

***

भिकू शांतपणे चालत होता वाड्याच्या दिशेने. पण त्याचे कान दूर जाणाऱ्या गाडीचा मागोवा घेत होते. गाडी नक्की निघून गेली याची भिकुला खात्री झाली. तो झपझप पावलं उचलत मधल्या दाराने वाड्यात शिरला आणि थेट वरच्या मजल्याच्या दिशेने निघाला. तो वर चढणारच होता इतक्यात...........

.....................आनंद जिन्यावरून खाली आला. आनंदला बघताच भिकुची नजर जमिनीकडे गेली आणि तिथेच खिळली. एकदा त्याच्याकडे करडा कटाक्ष टाकून आनंद दिवाणावर जाऊन बसला. भिकू काहीसं अंतर राखत त्याच्या समोर जाऊन बसला. बराच वेळ दोघे फक्त बसून होते. भिकुची नजर वर उचलली जाणं शक्यच नव्हतं. आनंदची नजर मात्र भिकुवरून तसूभरही ढळली नव्हती. वेळ जात होता आणि हळूहळू भिकू चुळबुळायला लागला. आनंदची नजर त्याला सहन होईनाशी झाली. त्याचं अस्वस्थ होणं आनंदने ओळखलं आणि तो गालातल्या गालात हसला.

आनंद : हम्म... बोल....

भिकू : अगदी तुम्ही सांगितलं होतं तसं बोललो तिथे.

आनंद : हम्म.... पुढे?

भिकू : त्यांना मी वेडा वाटलो.

आनंद : नवीन काहीतरी सांग भिकू. तू जसा आहेस तसाच वाटणार न कोणालाही.

भिकू : पण मालक मी वेडा नाही.

आनंद : मग तू जे काही केलंस ते ठरवून का?

भिकू : मालक, ताबा राहिला नाही हो. माझ्या मनात देखील नव्हतं तसं काही करण्याचं.

आनंद : भिकू, तुझ्या मनात काय आहे त्याच्याशी मला कर्तव्य नाही. तिथे काय झालं तेवढं बोल.

भिकू : मालक, मी त्यांची खात्री पटवून दिली की तुमच्याकडे काहीतरी शक्ती आहे; त्यामुळेच तुम्ही हळूहळू मकरंद सारखे दिसायला लागलात. मकरंद तुम्हाला घाबरायला लागला. तुमच्या शक्तीने तुम्ही त्याला ताब्यात घेतलंत. झोपडीत तुम्हीच होतात....

आनंद : कोणालाही काहीही संशय...??

भिकू : नाही मालक नाही. मी जे जे सांगितलं ते ते खरं वाटलं त्यांना.

आनंद : मी झोपडीत कसा मेलो ते नाही विचारलं त्यांनी?

भिकू : सांगितलं न मालक! मी वेडा आहे याची त्यांना खात्री पटली. त्यामुळे तुम्ही कसे मेलात ते मी काय सांगणार? त्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणत होते की झोपडीत जो गेला तो कोण ते कळणं आता शक्य नाही.

आनंद : असं का वाटलं त्यांना?

भिकूने थोडावेळ विचार केला आणि म्हणाला;"माहीत नाही. पण म्हणाले झोपडीत कोण होतं आणि गाडीत कोण होतं कळायला मार्ग नाही.

आनंद : हम्म....

भिकू जमिनीवर बसल्या बसल्या जमीन टोकरत होता. त्याच्या हालचाली तो मनातून खूप अस्वस्थ असलेला सांगत होत्या. वेळ जात होता... भिकू अस्वस्थ व्हायला लागला आणि त्याने हलकेच अगदी थोडी... थोडी... मान वर केली आणि पुटपुटल्या सारखा म्हणाला;"मी निघू?"

त्याच्याकडे एकटक बघणाऱ्या आनंदने विचारलं;"कुठे जाणार तू निघून भिकू? तुला माहीत आहे न तू काय केलं आहेस? तुला कुठे थारा मिळणार?

भिकू : मी मुद्दाम नाही केलं ते. प्रसंग तसा होता मालक. तुम्ही देखील जाणता.

भिकूच्या या बोलण्यावर आनंद खळखळून हसला आणि म्हणाला;"भिकू... मी काय जाणतो त्याचा तुला काही उपयोग नाही. कारण आता मी पोलीस रेकॉर्डवर पण मेलो आहे." असं म्हणून आनंद परत एकदा खदखदून हसायला लागला.

भिकूच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. मनातल्या मनात रडत तो तसाच बसून राहिला. त्याच्या मालकाच्या आदेशाची वाट बघत.

काही वेळाने हसू आवरून आनंदने भिकुकडे बघितलं आणि म्हणाला;"तो नक्की मेला होता ना भिकू?"

मान अजूनच खाली घालत भिकूने अगदी बारीक आवाजात 'हो' म्हंटलं.

आनंदने एक सुटकेचा श्वास सोडला आणि म्हणाला;"म्हणजे मकरंद मारला गेला अपघातात. खरं तर तो मुंबईत पोहोचणार त्यावेळी मी या पाच जणांना मारून त्याच्यावर आळ टाकणार होतो. त्या हमशकलला म्हणून तर विष दिलं होतं. एकीकडे ती पाच जणं मेली असती त्याचा आळ मुंबईत पोहोचणाऱ्या मकरंदवर. त्याने कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं असतं की खून त्याने नाही मी केले तरी कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार होतं? एकदा तो गजाआड गेला असता की मग सगळी प्रॉपर्टी विकून मी निघून जाणार होतो परदेशात. पण आयत्यावेळी तो साला अपघातात मेला. एकदम कमजोर मनाचा निघाला साला. तो गाडी चालवायला बसला त्यावेळी मी गाडीत मागच्या सीटच्या खाली लपून बसलो होतो. तो ज्या प्रकारे गाडीत वागत होता त्यावरून त्याला वेड लागलं असावं असं वाटत होतं. गाडी जरा कुठे हळू झाल्यावर बाहेर उडी मारायची असं ठरवलं होतं मी. तसंही गाडीचं दार उघडलं गेलं असतं तरी त्या मूर्खाने घाबरून त्याकडे दुर्लक्ष केलं असतं याची मला खात्री आहे.

त्याच्या अपघाताने माझे सगळे प्लॅन्स बरबाद झाले. तुला इथे झोपडीत सोडलं होतं त्या पाच जणांबरोबर. आतल्या खोलीत तो हमशकल मरायला टेकलेला. पुढे काय करायचं त्याचा विचार करेपर्यंत साला तो इन्स्पेक्टर पोहोचला आणि मला झुडपांमध्ये गायब व्हावं लागलं.

तुला आणि त्या पाच जणांना इन्स्पेक्टरने न्यायचं ठरवलं तेव्हा मला वाटलं होतं आतल्या खोलीत ते जाणार नाहीत. पण तो इन्स्पेक्टर जास्त शहाणा निघाला. तो आत गेला. नशीब तोपर्यंत तो हमशकल मेला होता. नाहीतर सगळंच फसलं असतं.

म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की मकरंद मेला आहे. ज्याला सगळे आनंद म्हणून ओळखतात. हमशकल मेला आहे; ज्याला ते पाच जण आणि इथले पोलीस मकरंद समजतात. भिकू नावाचा एक वेडा आहे; ज्याच्या बोलण्यावर कोणाचाही विश्वास नाही. चला हे ही चालेल.

तसही मुंबईमधले फ्लॅट्स मी कधीच विकून त्याचे पैसे माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करून टाकले होते. सोनं नाणं देखील विकलं. हा आता हा वाडा आहे. पण कोण येणार इथे? भूतिया वाडा म्हणून ओळखतात या जागेला. त्यामुळे पुढे मागे गरज पडेल तेव्हा येऊन विकिन हे.

आता एकच प्रश्न!!" असं म्हणून आनंदने भिकुकडे बघितलं.

भिकू : मालक, मी माझ्या बायकोचा खून नाही केला. तो एक अपघात होता मालक. ती रोज डोकं खायची पोर हवं म्हणून. त्यादिवशी मी पिऊन आलो होतो. तिला ढकलली तर एकदम मागे जाऊन भिंतीवर ती आदळली आणि एकदम मेलीच. तुम्ही होता की समोर. अपघात होता तो मालक. मी तेव्हाच म्हणत होतो आपण पोलिसात जाऊ. मी जी काही लहान मोठी शिक्षा होईल ती घ्यायला तयार आहे. पण तुम्ही थांबवलंत. म्हणालात की पोलीस मला फासावर लटकवतील. मी पण घाबरलो होतो मालक. तुमचं ऐकलं. पण मग हातून खून झाला आहे या विचाराने मला खूप त्रास व्हायला लागला. तुम्ही म्हणालात वाड्यावर राहा. झोपडीत बायकोच्या आठवणींनी त्रास होत असेल. पण वाड्यावर अजून त्रास व्हायला लागला. मी एकदा झोपडीकडे आलो तर तुम्ही आत काय करत होतात माहीत नाही; पण इतके विचित्र आवाज येत होते की मी घाबरून गेलो. त्यानंतर मी वाड्यावरून बाहेर नाही आलो कधी.

एकदिवस मकरंद आला तर मला वाटलं सुटेन यातून. पण तो कच्च्या मनाचा निघाला. मी अडकत गेलो मालक तुमच्या जाळ्यात."

भिकूच्या बोलणं ऐकून आनंद कुत्सितपणे हसला आणि म्हणाला;"अरे भिकू, आता तर खुश हो. मी कायमचा जातो आहे आता. तू मोकळा झालास आता यासगळ्यातून.

त्यावर कसानुसा चेहेरा करत भिकू म्हणाला;"मालक, मोकळा होऊन मी काय करू आता? लोकांसाठी मी वेडा आहे. वाड्यावर राहू शकत नाही; कारण मी शहाणा आहे. तुमच्या बरोबर येऊ शकत नाही; कारण मी तुम्हाला नको आहे. आत्महत्या करणार नाही कारण मी घाबरट आहे."

आनंद भिकुकडे थंडपणे बघत होता.

अचानक भिकू उभा राहिला आणि आनंदकडे न बघता वाड्याबाहेर पडून भरकटल्या सारखा चालत निघून गेला.

आनंद उठून उभा राहिला आणि एकदा खांदे उडवून वाड्यातून बाहेर पडला..... कायमचा!!!

कथा

प्रतिक्रिया

हं आता कसं सगळ्या गोष्टींचा निट उलगडा झाला. खिळवुन ठेवणारं लेखन. आता पुढच्या शुक्रवारी नविन गोष्ट?

ज्योति अळवणी's picture

27 Feb 2021 - 7:38 am | ज्योति अळवणी

प्रयत्न नक्की करीन

शाम भागवत's picture

27 Feb 2021 - 10:03 am | शाम भागवत

आता कसं ठीक वाटतंय.
हमशकल का भुताटकी हे निश्चित व्हायला हवे होते.
भिकू का घाबरत होता? तेही येऊन गेलं.
मस्त.

नीलस्वप्निल's picture

27 Feb 2021 - 11:02 am | नीलस्वप्निल

छान

तुषार काळभोर's picture

27 Feb 2021 - 11:27 am | तुषार काळभोर

म्हणजे एकदा संगती लागेल..

मागच्या भागांचे दुवे द्या की इथे

त्यासाठी टर्मिनेटर जी मदत करतात. पण सध्या ते busy आहेत म्हणून राहून गेलं

त्यासाठी टर्मिनेटर जी मदत करतात. पण सध्या ते busy आहेत म्हणून राहून गेलं

त्यासाठी टर्मिनेटर जी मदत करतात. पण सध्या ते busy आहेत म्हणून राहून गेलं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2021 - 9:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धावत पळत असे लेखन चाळत गेलो. सलग निवांत असे वाचन झाले नाही.
बुकमार्क्स करुन ठेवले. करिता ही पोच.

-दिलीप बिरुटे
-

योगी९००'s picture

27 Feb 2021 - 9:59 pm | योगी९००

पहिले दोन भाग वाचून सोडून दिली होती. पण आता सर्व भाग आल्यावर एकत्र वाचले.

गोष्ट आवडली. एका सिरीयलची कहाणी होऊ शकेल अशी आहे.

पण एक गोष्ट कळली नाही की जेव्हा पहिल्या भागात मकरंद गाडी घेऊन निघतो त्यावेळी त्याच्या बाजूला नवीन, अनघा व इतर मागे असे कसे काय असू शकतात? त्या सर्वांना भिकू तर झोपडीत ओढून घेऊन गेलेला असतो ना?

ज्योति अळवणी's picture

28 Feb 2021 - 1:05 am | ज्योति अळवणी

मकरंदला भास होतो कारण आनंदच्या भितीने तो देखील भरकटलेला असतो. त्याच्या अस्वस्थ मनाचा उल्लेख शेवटच्या 2 भागात आहेच

Rajesh188's picture

28 Feb 2021 - 12:10 am | Rajesh188

आवडले

राजाभाउ's picture

1 Mar 2021 - 1:00 pm | राजाभाउ

जबरदस्त !!!! आता कस सगळ जुळुन आले आहे. मनापासुन धन्यवाद !!!!!

ज्योति अळवणी's picture

1 Mar 2021 - 9:24 pm | ज्योति अळवणी

तुमच्या मनापासूनच्या प्रतिसादाला मनापासून धन्यवाद