ज्ञात अज्ञात पंढरपूर ८ लोकमान्य विद्यालय

Primary tabs

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in भटकंती
15 Feb 2021 - 4:59 pm

ज्ञात अज्ञात पंढरपूर ८

लोकमान्य विद्यालय

लोकमान्य highshool साऱ्या पंढरपूरकरांना परिचित असणारी हि वास्तू आहे लोकमान्य विद्यालयाची. पुर्वीची हि मुख्य इमारत. मुळ इमारत. गावाच्या पुर्वोत्तर बाजूस नदिकाठावर जमिनीवर कमरे एवढ्या उंचीच्या जोत्यावर संपूर्ण २ मजली त्यावर १ खोली किंवा एकाच वर्गाचा तिसरा मजला अशी खाशा व्हिक्टोरियन कालखंडाच्या खुणा दर्शविणारे ब्रिटिश शैलीत बांधकाम असलेली बहु कमानींची दगडी आणि लाकडी वास्तु. आतले वर्गही प्रशस्त, भरपूर उजेड असणारे आणि हवेशीर असे आहेत. त्यातुन नदिकाठावर असल्याने नदीचा गार वारा सदैव वर्गात येत असतो. ज्यामुळे सुस्ती येवून अनेकांनी मास्तरांचा मार खाल्याच्या कथा पंढरीत अनेकजण सुरसपणे सांगतात. शिवाय शाळेला जायचे म्हणून घरी सांगून शाळेतच्या ज्ञानगंगेत डुंबण्या एेवजी अनेकांनी चंद्रभागेच्या जलगंगेत डुंबणे पसंत केल्याचे अनेकांना स्मरते. अन् त्या पायी कधी मास्तरांच्या तर कधी पित्याच्या ताडणाला तोंडही द्यावे लागलेले ही त्यांना आठवतेच.
पंढरपूर नगरपरिषदेकडून चालविले जाणारे शाळेची हि पश्चिमाभिमुख वास्तु ऐसपैस असुन दुसऱ्या मजल्यावरचे मध्यवर्ती ३ कमानी पैकी मधले कमानीत शालेची घंटा. त्याचे वरचे वर्गाला पश्चिमेला लहाना सज्जा ज्याठिकाणी ध्वजवंदनासाठी काठी, प्रयोगशाळा आदी व्यवस्थांनी सुसज्ज असलेली हि वास्तू म्हणजे पंढरपूरकरांचे स्मरणस्थान. कारण इथे पंढरीतील नुसते अनेक लोक नाही तर पिढ्या शिकल्या. त्या शिक्षणाच्या आणि शाळा बुडवून वाळवंटात खेळण्याच्या, पोहण्याच्या आठवणी याचे पिढ्यानपिढ्या पंढरी नगरीत स्मरण आहे. जे स्मरण येथिल द मा मिरासदार, बुवा गुरूजी आदी साहित्यिकांनी आपल्या विविधांगी लेखनातून व्यक्तही केले आहे. या शाळेतून प्रेरणा घेवून अनेक शाळा पंढरीत निर्माण झाल्या त्यामुळे या विद्यालयास पंढरीतील शिक्षणाची गंगोत्रीच म्हटले पाहिजे. इथे शिक्षलेले अनेक विद्यार्थी आज भारतभर विखुरले आहेत काही परदेशातही आहेत. शाळेत न जाता बुडविणे पसंत करणार्यांनी तयेच बॅक बेंचरस् नीही ही भरपूर कीर्ती मिळविलीय
इथे केवळ पुस्तकी शिक्षणच देत नसत तर जीवन जगण्यासाठीजी आवश्यक जीवनमुल्येही शिकविली जात असत. कौशल्येही शिकविली जात. येथील विद्यार्थ्यांना पूर्वी पोहायला शिकविले जायचे, त्याचे कडून व्यायामही करू घेतला जायचा. कुस्ती, मल्लखांब, लाठी, काठी, पट्टा सारखे मर्दानी खेळही शिकविले जायचे. ज्याच्या आठवणी कित्येक जण सांगतात.
सन १८७८ मधे शाळेच्या स्वतंत्र संस्थेची स्थापना करून सन १८८१ चे नोव्हेंबर महिन्यातील २३ व्या दिनांकाला या ठिकाणी शाळेच्या कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. तत्कालिन ब्रिटिश अमलाखालील मुंबई राज्याचे गवर्नर सर जेम्स फर्ग्युसन याचे हस्ते हा समारंभ झाला. नगरपालिकेच्या रकमेतून आणि त्यांचेच नियंत्रणात हि शाळा आजही उभी आहे. स्थापनेवेळी शाळेचे नाव होते व्हिक्टोरिया ज्युबिली हायस्कूल. भारतीय स्वातंत्रयुद्धाचे कार्यकाळात पंढरीतील देशभक्तांनी हि परकिय शिक्षण देणारी शाळा म्हणून ती जाळण्याचा प्रयत्नही केला होता. जो फारसा यशस्वी झाला नाही. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शाळेचे नाव बदलून लोकमान्य विद्यालय करण्यात आले. ते अद्यापी आहे. आमच्या बडवे कुटुंबातील अनेक पिढ्या इथेच शिकल्या कारण एन ए बडवे सर, वै. वा. श्रीकांत नारायण तथा अप्पासाहेब बडवे सर वै. गो. गो. बडवे सर वै. दत्ता बडवे हे तेथे घरचे शिक्षर असल्याने हक्काने मुले तेथे शिकायला नेली जात. सर मंडळीं पैकी काही जण मुख्याध्यापकही झाले होते. तसेच बाबा देवधर सर, नम्र सर, वसंतराव उत्पात, गोसावी सर, निकते सर गोपाळ पुजारी, तरकसबंद आदी मान्यवर शिक्षकही या शालेत होते तसेच भारतीय स्वातंत्रलढ्यात आपले जीवाची बाजी लावणाऱ्या क्रांतीकारकांचे सहकारी असलेले भिडे मास्तर इथे शिकवायला होते. त्यांनी इथल्या विद्यार्थांना शरिर संवर्धनाचे शिक्षण दिले.
तसेच शिक्षकही निर्भिड बाण्याचे पहार देतो म्हणून संस्था चालकाची चाटूगिरी करणारो नव्हते याचे बंडकाका सबनीसांनी सांगितलेली आठवण त्यांचेच शब्दात पुढीलप्रमाणे---
वै. का. दि. सबनीस सर ,हे एक गाजलेले हेड मास्तर होते.
त्यांचा एक किस्सा, पंढरपूरचे शिक्षण समितीचे सभापती, गणपतराव अभंगराव आपल्या मुलाला शाळेकडे घेऊन चालले होते. वाटेत त्यांना नगराध्यक्ष भगवानराव भादुले भेटले, त्यांनी विचारले '"काय गणपतराव, कुठे निघालात? तेही पोराला हाताला धरून?" गणपतराव बोलले ,सबनीस मास्तरांना जाब विचारायला "नगरपालिकेच्या हायस्कुलमध्ये सभापतींचा मुलगा फेल होतो म्हणजे काय?"
शांतपणे भगवानराव भादुले म्हणाले, घरी जावा "जेथे नगराध्यक्षांचा मुलगा नापास होतो. तिथे तुमचे काय?" असे निर्भिड शिकक्ष या शाळेला लाभल्याने तिचा लौकिक साता समुद्रापार गेलाय.
पंढरपूरातील उमा महाविद्यालयची सुरूवात झालेवर त्याचे प्रारंभीची काही वर्षे याच इमारतीत त्यांचे कामकाज चालत होते. त्यामुळे हि इमारत उमा महाविद्यालयाची मातृसंस्था म्हटले तरी चालेल.
महाराष्ट्रात इतक्या जुन्या काळापासूनच्या चालू असणाऱ्या शाळा क्वचितच असतिल. असतील त्याची पट्टी केली तर त्यात लोकमान्य विद्यालयाचा पहिला क्रमांक लागेल. १९८१ साली या शाळेने शताब्दी पुर्ण केल्याने पंढरपूर नगरपरिषदेने पुढे मोठा समारंभ घडवून आणला होता. ज्यात अनेक विविध कार्यक्रमांबरोबर महाराष्ट्रभुषण शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्र व्याख्यानमाला करण्यात आली होती. जी आजही माझे स्मरणात आहे.
पंढरी नगरीतील हि पहिली शाळा. सर्वात जुनी शाळा. आज जवळ जवळ १३९ वर्षे येथे विद्यादानाचे कार्य अविरत चालू आहे. पूर्वी हि एकच इमारत होती कालांतराने विद्यार्थी संख्या वाढल्याने दुसऱ्या जागेची गरज पडली म्हणून जुन्या कोर्टासमोर इमारत बांधून तिथे काही वर्ग चालले. नव्या महागड्या नावाजलेल्या परग्रामी शिक्षणसंस्थाच्या शिक्षणाचे लाट सर्वत्र पसल्यामुळे आता मात्र विद्यार्थीसंख्या घटली, जुनी इमारत जीर्ण झाली त्यामुळे इथले वर्ग सांप्रत बंदच झालेत. पुन:श्च या विद्यालयाला गत वैभव प्राप्त करून देणे हे खरेतर सर्व पंढरपूरकराचे हातात आहे. तरच हा पंढरीचा शैक्षणिक वारसा सांगणारा ठेवा सुरक्षित राहिल.
© आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर.