आरंभशूर..

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
1 Jan 2021 - 11:02 pm

आरंभशूर....

चहासाठी आधण ठेवणार, इतक्यात फोन वाजला. कोणाचा असेल, म्हणून न बघताच घेतला. डॅनी, काय करतेस गं..? लवकर तयार हो आणि सीसीडी मध्ये काळे चौकात भेट.... अगं, हो हो.. मी हसत हसत हेमाला म्हणाले. पण आज तुझा गाण्याचा क्लास नाहीये का...? "ते सोड गं.. डॅनी, तू उगाच प्लॅनला फाटे फोडू नकोस. आपण साडेचारला भेटतोय. बाय".... घड्याळात ३.५५ झाले होते तरी, अर्धा कप चहा घ्यायचा ठरवून तयारीला लागले.
तर.. ही हेमा देव, माझी मैत्रिण..! खरंतर लहान आहे माझ्यापेक्षा, बारा-तेरा वर्षांनी.. पण एक अजब रसायन आहे ते..!! पाच एक वर्षापूर्वी मी मुंबईहून डेक्कनक्वीनने परत येत होते. "अहो काका, जरा या खिडकीत बसता..? मला तुमची जागा हवी आहे." असं बिनधास्त बोलून ती माझ्या शेजारी बसली. बाई शेजारी बसावं, या इच्छेने येत असेल, असं नुसतंच मनात येऊन गेलं. बायकी गप्पात वेळ कसा गेला, हे कळलच नाही. अचानक अंधार झाला. गाडी बोगद्यात शिरली होती. माझा हात कोणीतरी घाबरून घट्ट धरला होता. ती हेमा होती... बोगदे संपल्यावर, हळूच हसून म्हणाली.. मला अंधाराची खूप भीती वाटते नेहमीच. म्हणून तुमच्या शेजारी बसले. असू दे गं..इति मी. शेवटी पुणं यायच्या आत, फोन नंबर आणि पत्त्यांची देवाण-घेवाण झाली, आणि हसत एकमेकींचा निरोपही झाला. मी खरंतर काही दिवसात हा प्रसंग विसरलेही...
दीड एक महिना झाला असेल, एका दुपारी चार वाजता, हेमाबाई चक्क दोन डझन आंब्याची पेटी घेऊन, दारात हसत मुखाने हजर...! "येऊ ना..?" मीपण आश्चर्यचकित होत, हो म्हणाले. अगं, हे काय आणलंस....? "मग काय रिकाम्या हाताने येऊ पहिल्यांदा…? अहो, सारंगच्या मामाकडून दरवर्षी रत्नागिरीहून आठ-दहा पेट्या येतात. आम्ही दोघंच आहोत ना.. कोण खाणार एवढं..? म्हणून त्यानिमित्ताने तुमच्याकडे आले..." पाचच मिनिटात तिनं मला, कॉफी टाक ना गं ज्ञानदाताई... असं बिनधास्तपणे एकेरीवर येत विनवलं, आणि एकदम म्हणाली... सौ. ज्ञानदा आडिवरेकर, किती मोठं आहे आणि बोजड सुद्धा...! मी तुला डॅनी म्हणू का..? ज्ञानदा नाही आवडत मला... खरं तर हे सगळं नवं होतं मलाही, पण माझं मन मात्र फितूर होतं.. ती मला पहिल्याच भेटीत आवडली होती. असो..
बापरे सव्वाचार..! मी पटकन कुलूप लावून निघाले... वाटेत श्रीखंडाच्या गोळ्यांचं पाकीट मात्र न विसरता घेतलं. बाईसाहेब माझ्यासाठी हातात गजरा घेऊन सीसीडीच्या दारात उभ्या..!! नेहमी तूच आधी येतेस गं, मी म्हणाले. अगं हो, तुला भेटायची अनामिक ओढ असते ना.. आणि मी तुझ्यापेक्षा तरुण आहे नं डॅनी, त्यामुळे स्लो नाहीये.. पटपट आवरते मी... हात पुढे करत हेमा म्हणाली. मी पण तिच्या आवडीच्या श्रीखंडाच्या गोळ्यांचा टोल भरला, आणि आमची जोडगोळी सीसीडी मध्ये शिरली..
"काय गं, गाण्याचा क्लास नाही का आज..?" सोडला मी..! इति हेमा. कधी..? मागच्याच महिन्यात. मला कंटाळा आला गं डॅनी...! काय गं हे... आता कॉफी येईपर्यंत या कागदावर लिहून काढ, काय काय उद्योग अर्धवट केले आहेस ते.... मी खरंच कागद दिला. जिम, सूर्यनमस्कार, मॉर्निंग वॉक, पोहणं, कुकिंग क्लास, ट्रेकिंग, वर्षभरात दरमहा दोन नाटकं बघण्याची स्कीम, डायरी लिहिणे, दर चतुर्थीला गणपतीला जाणे... चल, मला कंटाळा आला. एवढंच लिहिलयं बघ.. तिनं कागद माझ्यापुढे नाचवत सांगितलं..! वेडाबाई आहेस नुसती. एक गोष्ट धडपणे करत नाहीस. नुसते सारंगचे पैसे वाया घालवत असतेस. हे बरं नाही.... अगं डॅनी, आम्हीतरी कुठे घेऊन जाणार आहोत हे पैसे..? दोघं तर आहोत.. "हो, पण तू म्हणजे नुसती आरंभशूर आहेस...!"
काय, काय... म्हणालीस तू..? आईपण मला सारखं असंच म्हणायची. तिचा शब्द आहे हा. म्हणजे नेमकं काय गं..? तिनं निरागसपणे विचारलं.... अगं, उत्साहाने एखाद्या गोष्टीची सुरुवात करून नंतर मध्येच ती सोडून देणं, याला आरंभशूरपणा म्हणतात. ते जाऊदे... आई कशी आहे तुझी..? काय सांगू डॅनी.. फोनच करायचा राहिला आहे तिला. ती दादाकडे अमेरिकेत आहे ना सध्या.. त्यामुळे दोन आठवड्यात जमलच नाहीये. मला आठवण येते, तेव्हा तिथली वेळच भलती असते आणि मग मी विसरते. कॉफी घे ना, थंड होईल की ती... मस्त गार हवा आहे आणि तू म्हणजे ना.... तसं नाही हेमा, आईचा विचार करत होते तुझ्या.. ती किती वाट पाहत असेल तुझ्या फोनची... मग तिनं करावा ना...इति हेमा. अगं फोनचं नीट जमत नसेल तिला. ते काही नाही. दर आठवड्यात एक दोन फोन तरी झालेच पाहिजेत हं तुझे. हे मनाशी पक्कं ठरव आणि काय तो तुझा अलार्म वगैरे मोबाईल मध्ये लाव.. रिमाइंडर म्हणतात गं त्याला....! तेच ते गं, पण इथे आरंभशूरपणा मी खपून घेणार नाहीये.... हं, बोलल्या आमच्या ज्ञानदाताई.. ऐकेन हं तुझं नक्की.. बोलता बोलता तिनं स्वतःचा फोन हातात घेतला. बहुतेक रिमाइंडर लावला असावा. डॅनी ऐक ना, अगं आता परवा एक जानेवारी आहे ना, मग मी आईला दर आठवड्यात रविवार- गुरुवार फोन करायचा नवीन वर्षाचा संकल्प करते, म्हणजे झालं..!! स्वतःवर खूष होत हेमा म्हणाली.
हो, पण आई बंगलोरला परत आली, तरी हे विसरू नकोस, आणि नेहमीसारखा तुझा आरंभशूरपणा दाखवू नकोस. आई आहे ती.. प्रेमानं वाट पहात राहील तुझी दरवेळेला...! हो गं डॅनी, कळलं मला आता. भावना पोहोचल्या तुझ्या.. वागेन मी नीट यावेळेस.. अगदी नक्की.. प्रॉमिस करते तुला.. मी आई नाहीये ना... मला अनुभव नाही गं..!! तिचे टपोरे डोळे पाण्याने डबडबले. मलाही थोडं गलबलून आलं.. यावेळी मी तिचा हात माझ्या दोन्ही हातात अलगद धरून ठेवला. काही क्षण असेच गेले... निःशब्द..!!
चल गं डॅनी, निघते मी. तिकडे नवऱ्याचा भवरा झाला असेल..!! तिने हसत हसत विषय बदलला. आम्ही आज नाटकाला जायचं ठरवलंय. सारंग तिकीटं काढीन म्हणाला होता. आता मला रंगकर्मीवर सहाला पोहोचायला हवं... पण हे कोण सांगणार गं मला...? इति अस्मादिक. आता सांगतेय ना.. अगं दोन मुलं असती तर शहाणा झाला असता. पण नाही. जीन्स, टी-शर्ट, परफ्युम असा नटून आला असेल आणि येणार्‍या-जाणार्‍या कोणत्याही वयाच्या मुलीवर लाईन मारत उभा असेल. एक नंबरचा भवरा आहे तो... गप गं हेमा, काहीही बोलतेस तू... मी दटावलं.
थांब, मी फोन करते आधी सारंगला... छे..! सापडतच नाहीये गं... डॅनी, रिंग दे ना प्लीज... मी फोन लावला. तर मिष्किल हसत हेमाने पटकन समोर फोन धरला. स्क्रीनवर नाव होतं, आरंभशूर..... "हे काय गं...?" मी माझा संकल्प यावेळी पूर्ण करणार आहे. आपले एकमेकींना फोन होत राहतात आणि तुझं हे फोन वरचं नवीन नाव मला त्याची आठवण देत राहील. बाय. भेटूया लवकरच.. असं म्हणत ते अजब रसायन, रिक्षात बसून गायब झालं....!!

जयगंधा..
१-१-२०२१.

कथालेख

प्रतिक्रिया

असा मी असामी's picture

6 Jan 2021 - 5:14 pm | असा मी असामी

आटोपशीर मस्त

Jayagandha Bhatkhande's picture

8 Jan 2021 - 7:32 pm | Jayagandha Bhat...

धन्यवाद

चलत मुसाफिर's picture

9 Jan 2021 - 11:01 pm | चलत मुसाफिर

नेमक्या शब्दात मांडलेले गोड व्यक्तिचित्र

Jayagandha Bhatkhande's picture

29 Jan 2021 - 10:42 pm | Jayagandha Bhat...

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

1 Feb 2021 - 9:39 pm | तुषार काळभोर

कोणते शब्द कोणाच्या ओठी आहेत, ते कळणं खरंच अवघड गेलं हो.
संवाद (शक्यतो दुहेरी) अवतरण चिन्हात टाकून टिंबं कमी केलीत आणि नवी ओळ्/परिच्छेदाचा वापर केलात तर थोडा सुटसुटीत पणा येईल.

हे वैयक्तिक मत. पटलं तर घ्या नायतर सोडून द्या.

उदाहरण :

"काय गं, गाण्याचा क्लास नाही का आज..?" सोडला मी..! इति हेमा. कधी..? मागच्याच महिन्यात. मला कंटाळा आला गं डॅनी...! काय गं हे... आता कॉफी येईपर्यंत या कागदावर लिहून काढ, काय काय उद्योग अर्धवट केले आहेस ते.... मी खरंच कागद दिला. जिम, सूर्यनमस्कार, मॉर्निंग वॉक, पोहणं, कुकिंग क्लास, ट्रेकिंग, वर्षभरात दरमहा दोन नाटकं बघण्याची स्कीम, डायरी लिहिणे, दर चतुर्थीला गणपतीला जाणे... चल, मला कंटाळा आला. एवढंच लिहिलयं बघ.. तिनं कागद माझ्यापुढे नाचवत सांगितलं..! वेडाबाई आहेस नुसती. एक गोष्ट धडपणे करत नाहीस. नुसते सारंगचे पैसे वाया घालवत असतेस. हे बरं नाही.... अगं डॅनी, आम्हीतरी कुठे घेऊन जाणार आहोत हे पैसे..? दोघं तर आहोत.. "हो, पण तू म्हणजे नुसती आरंभशूर आहेस...!"
काय, काय... म्हणालीस तू..? आईपण मला सारखं असंच म्हणायची. तिचा शब्द आहे हा. म्हणजे नेमकं काय गं..? तिनं निरागसपणे विचारलं.... अगं, उत्साहाने एखाद्या गोष्टीची सुरुवात करून नंतर मध्येच ती सोडून देणं, याला आरंभशूरपणा म्हणतात. ते जाऊदे... आई कशी आहे तुझी..? काय सांगू डॅनी.. फोनच करायचा राहिला आहे तिला. ती दादाकडे अमेरिकेत आहे ना सध्या.. त्यामुळे दोन आठवड्यात जमलच नाहीये. मला आठवण येते, तेव्हा तिथली वेळच भलती असते आणि मग मी विसरते. कॉफी घे ना, थंड होईल की ती... मस्त गार हवा आहे आणि तू म्हणजे ना.... तसं नाही हेमा, आईचा विचार करत होते तुझ्या.. ती किती वाट पाहत असेल तुझ्या फोनची... मग तिनं करावा ना...इति हेमा. अगं फोनचं नीट जमत नसेल तिला. ते काही नाही. दर आठवड्यात एक दोन फोन तरी झालेच पाहिजेत हं तुझे. हे मनाशी पक्कं ठरव आणि काय तो तुझा अलार्म वगैरे मोबाईल मध्ये लाव.. रिमाइंडर म्हणतात गं त्याला....! तेच ते गं, पण इथे आरंभशूरपणा मी खपून घेणार नाहीये.... हं, बोलल्या आमच्या ज्ञानदाताई.. ऐकेन हं तुझं नक्की.. बोलता बोलता तिनं स्वतःचा फोन हातात घेतला. बहुतेक रिमाइंडर लावला असावा. डॅनी ऐक ना, अगं आता परवा एक जानेवारी आहे ना, मग मी आईला दर आठवड्यात रविवार- गुरुवार फोन करायचा नवीन वर्षाचा संकल्प करते, म्हणजे झालं..!! स्वतःवर खूष होत हेमा म्हणाली.

"काय गं, गाण्याचा क्लास नाही का आज?"
"सोडला मी!" इति हेमा.
"कधी?"
"मागच्याच महिन्यात. मला कंटाळा आला गं डॅनी!"
"काय गं हे... आता कॉफी येईपर्यंत या कागदावर लिहून काढ, काय काय उद्योग अर्धवट केले आहेस ते."
मी खरंच कागद दिला. जिम, सूर्यनमस्कार, मॉर्निंग वॉक, पोहणं, कुकिंग क्लास, ट्रेकिंग, वर्षभरात दरमहा दोन नाटकं बघण्याची स्कीम, डायरी लिहिणे, दर चतुर्थीला गणपतीला जाणे...
"चल, मला कंटाळा आला. एवढंच लिहिलयं बघ." तिनं कागद माझ्यापुढे नाचवत सांगितलं.
"वेडाबाई आहेस नुसती. एक गोष्ट धडपणे करत नाहीस. नुसते सारंगचे पैसे वाया घालवत असतेस. हे बरं नाही."
"अगं डॅनी, आम्हीतरी कुठे घेऊन जाणार आहोत हे पैसे? दोघं तर आहोत"
"हो, पण तू म्हणजे नुसती आरंभशूर आहेस...!"
"काय, काय म्हणालीस तू..? आईपण मला सारखं असंच म्हणायची. तिचा शब्द आहे हा. म्हणजे नेमकं काय गं?" तिनं निरागसपणे विचारलं.
"अगं, उत्साहाने एखाद्या गोष्टीची सुरुवात करून नंतर मध्येच ती सोडून देणं, याला आरंभशूरपणा म्हणतात. ते जाऊदे. आई कशी आहे तुझी?"
"काय सांगू डॅनी. फोनच करायचा राहिला आहे तिला. ती दादाकडे अमेरिकेत आहे ना सध्या. त्यामुळे दोन आठवड्यात जमलच नाहीये. मला आठवण येते, तेव्हा तिथली वेळच भलती असते आणि मग मी विसरते. कॉफी घे ना, थंड होईल की ती... मस्त गार हवा आहे आणि तू म्हणजे ना..."
"तसं नाही हेमा, आईचा विचार करत होते तुझ्या. ती किती वाट पाहत असेल तुझ्या फोनची."
"मग तिनं करावा ना." इति हेमा.
"अगं फोनचं नीट जमत नसेल तिला. ते काही नाही. दर आठवड्यात एक दोन फोन तरी झालेच पाहिजेत हं तुझे. हे मनाशी पक्कं ठरव आणि काय तो तुझा अलार्म वगैरे मोबाईल मध्ये लाव."
"रिमाइंडर म्हणतात गं त्याला!"
"तेच ते गं, पण इथे आरंभशूरपणा मी खपून घेणार नाहीये."
"हं, बोलल्या आमच्या ज्ञानदाताई. ऐकेन हं तुझं नक्की."
बोलता बोलता तिनं स्वतःचा फोन हातात घेतला. बहुतेक रिमाइंडर लावला असावा.
"डॅनी ऐक ना, अगं आता परवा एक जानेवारी आहे ना, मग मी आईला दर आठवड्यात रविवार- गुरुवार फोन करायचा नवीन वर्षाचा संकल्प करते, म्हणजे झालं!!" स्वतःवर खूष होत हेमा म्हणाली.

-आगाऊपणाबद्दल क्षमस्व!

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2021 - 12:46 pm | चौथा कोनाडा

सहमत. धाग्यातल्या सारखं लिहिलं क्लिष्ट वाटून वाचणं टाळलं जाऊ शकतं. अवतरण चिन्हे, परिच्छेद असतील तर वाचताना खडा लागल्या सारखे वाटणार नाही, रसभंग होणार नाही.
पण आजकाल घाईच असते लोकांना.

चौथा कोनाडा's picture

30 Jan 2021 - 12:46 pm | चौथा कोनाडा

सहमत. धाग्यातल्या सारखं लिहिलं क्लिष्ट वाटून वाचणं टाळलं जाऊ शकतं. अवतरण चिन्हे, परिच्छेद असतील तर वाचताना खडा लागल्या सारखे वाटणार नाही, रसभंग होणार नाही.
पण आजकाल घाईच असते लोकांना.

Jayagandha Bhatkhande's picture

1 Feb 2021 - 3:15 pm | Jayagandha Bhat...