कलापंढरी फ्लॉरेन्स

Rahul Hande's picture
Rahul Hande in जनातलं, मनातलं
26 Dec 2020 - 9:21 pm

७ फेब्रुवारी १४९७ चा दिवस इटलीतील एका शहरात एक अनोखी होळी रचण्यात आली. सॅव्हानारोला नावच्या धर्मगुरूने या शहरावर आपली धार्मिक दहशत कायम केली होती. त्याच्या आदेशानुसार त्याचे धार्मिक शिपाई 'ख्रिस्त अमर रहे','मेरी अमर रहे' च्या जयघोषात शहरातील प्राचीन पुस्तकं,हस्तलिखितं,शेकडो चित्रं,रेखाटनं,ऑईल पेंटिंग्ज,शिल्प,हस्तिदंती कोरीव काम केलेल्या वस्तू या होळीत टाकत होते. एका कलासंपन्न शहराचे वैभंव धगधगत्या अग्नीज्वाळांमध्ये बेचिराख होत होतं. शहरवासीयांची अलोट गर्दी या होळीच्या दर्शनासाठी जमलेली होती.या गर्दीत एक सतरा-अठरा वर्षाचा तरुण ही होता. जो या प्रकाराने अत्यंत दुःखी व हतबल अवस्थेत अश्रू ढाळत होता. हे शहर होते,जगाची कलापंढरी म्हणून ओळखले जाणारे फ्लॉरेन्स आणि हा तरुण होता,कलेच्या इतिहासावर सूर्यासारखा चिरंतन तळपणारा मायकेल अँजेलो. जगाच्या व कलेच्या इतिहासात 'Bonfire of the vanities' म्हणून ही घटना प्रसिद्ध आहे. दहाव्या-अकराव्या शतकात अब्राहमिक धर्माची पवित्र भूमी जेरूसलेमला भेट देणा-या यात्रा आणि ख्रिश्चन-मुस्लिम धर्मयुद्ध यांनी युरोपात व्यापाराचे युग निर्माण झाले. व्यापारवृद्धीसाठीच खरेतर धर्मयुद्धांचे आयोजन करण्यात आले, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. वाढत्या व्यापाराने युरोपचे कृषिकेंद्रित, सरंजामदारी व धर्मनियंत्रित समाजजीवन बदलू लागले. व्यापाराने भांडवलशाहीचे आगमन युरोपात झाले. यामुळे फ्लॉरेन्स,मिलान,व्हेनिस यासारखी व्यापारी शहरे उदयाला आली. फ्लॉरेन्स शहरात व्यापार-उदिमासोबतच कला क्षेत्राचा विकास होत गेला. कलेला उत्तेजन व संरक्षण देणारे राज्यकर्ते या शहराला लाभल्याने फ्लॉरेन्समध्ये कलाक्षेत्र बहरू लागले. फ्लॉरेन्स हे इटलीच्या टस्कनी भागातील मुख्य शहर,ज्युलियस सीझरने इ.स.पूर्व ५९ मध्ये आर्ना नदीच्या सुपीक खो-यात वसवलेले शहर. भरभराट होणारं शहर म्हणून फ्लॉरेन्स हे नाव ठेवण्यात आलं. युरोपाच्या इतिहासातील मध्ययुगीन कालखंडात(इ.स.६००ते१५००) राजकीय व आर्थिक आघाडीवर आणि कलात्मकदृष्टया नावाप्रमाणेच फ्लॉरेन्सची भरभराट झाली. हा कालखंड व्यापारीदृष्टीने फ्लॉरेन्सच्या भरभराटीचा काळ होता,तसाच तो त्याच्या राजकीय सामर्थ्याचाही काळ होता. लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य यामुळे कलेकडे बघण्याचा अधिक उदार दृष्टिकोन येथील नागरिकांमध्ये वृद्धिंगत होत गेला. जुन्या ग्रीक व रोमन कलेचे अवशेष,शिल्प यांच्याकडे आधुनिक दृष्टीतून पाहिले जाऊ लागले. नवे कलावंत व बुद्धिवंत त्यात पुन्हा लक्ष घालू लागले. दुस-या शब्दात पुनरुज्जीवन म्हणजेच रेनसान्स किंवा प्रबोधन काळाचा प्रारंभ येथे झाला. रेनेसान्स ही १४ व्या ते १७ व्या शतकातील कलात्मक,तत्त्वज्ञानात्मक,वैज्ञानिक,धार्मिक,सामाजिक इत्यादी सर्व क्षेत्रातील चळवळ बनली. अनेक बुद्धिवाद्यांच्या मते मध्ययुग आणि आधुनिक काळ यांना जोडणारा दुवा किंवा आधुनिक काळाची पायाभरणी करणारी चळवळ म्हणजे रेनेसान्स. फ्लॉरेन्स मध्ये रेनेसान्सचा आरंभ होऊन नंतर पूर्ण युरोपभर ही चळवळ पसरली. रेनेसान्स चळवळीचा आज जेंव्हा विचार केला जातो,तेंव्हा तिच्या बुद्विवादी,वैज्ञानिक,धार्मिक व सामाजिक अंगानाच अधिक प्राधान्य देण्यात येते. मात्र फ्लॉरेन्सच्या कलाविश्वातून हया चळवळीचा ख-या अर्थाने जन्म झाला,हा इतिहास काहिसा दुर्लक्षित केला जातो. फ्लॉरेन्समध्ये वास्तवतावादी,तसेच रेखाटनातून परिप्रेष्य दाखवणारी,छाया-प्रकाशाद्वारे घनता दाखविणारी चित्रकला सुरू झाली. ही ख्रिस्त चरित्र,बायबल व चर्च या तीन केंद्रांभोवती फिरणा-या युरोपीयन कलेतील क्रांतीच होती. लिओनार्दो दि विंची आणि मायकेल अँजेलो हे जगातील सर्वश्रेष्ठ कलावंत एकाच काळात फ्लॉरेन्सच्या भूमीवर वावरले,त्यामुळे कलाविश्वाची सर्व परिमाणं फ्लॉरेन्सने बदलवली. कलाकाराची क्षमता पूर्ण ओळखून,त्याच्या कलेचा विकास तिच्या सर्वोच्च शिखरापर्यंत होण्यासाठी भोवतालची परिस्थिती,लोकाश्रय व राजाश्रय यांचीही भूमिका तेवढीच महत्वाची असते. कलेसाठी फ्लॉरेन्सचा हा सुर्वणकाळ होता. त्यामुळे लिओनार्दो,मायकेल अùजेलो,राफाएल अशा कलावंतांची क्षमता ओळखली गेली व विकसित होऊ शकली. यामुळेच हे तीन कलावंत एका अर्थाने कलेतील रेनेसान्सचे जनक व अनभिषिक्त सम्राट ठरले. एखाद्या शिल्पकाराला किंवा चित्रकाराला त्यानं जगाच्या पाठीवर कुठं जन्माला यावं याची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभले असते,तर त्याने हा कालखंड आणि फ्लॉरेन्सचीच निवड केली असती. फ्लॉरेन्समध्ये ठिकठिकाणी कलावंतांचे 'बोटेगो' होते. यालाच आजच्या भाषेत आपण स्टुडिओ म्हणतो. या बोटेगोंमध्ये विविध स्वरूपाची सौंदर्यपूर्ण व सजावटीची कामं केली जात होती. पोशाखावर लावायच्या कलाकुसर असलेल्या पिनांपासून चर्चमधील कलाकुसरीनं नटलेलं लाकडी फर्निचर,मोठमोठे फ्रेस्कोंपासून इमारत-हॉल यांच्या बाहय-अंतर्गत सजावटीचे काम बोटेगोद्वारे होत असे. चर्च,सरकारी अधिकारी,सावकार,श्रीमंत व्यापारी,सरंजामदार इत्यादी लोक बोटेगोकडून ही कामं करून घेत. या सर्वांमुळे फ्लॉरेन्स शहर कला शिकण्याचं जागतिक केंद्र बनलं. विंची- अँजेलो यांच्यापूर्वी लॉरेन्झो गिबर्टी,ब्रुनेलेस्की, मॅसॅचिओ,जिओटो इत्यादी कलावंतांनी फ्लॉरेन्सचे कलाविश्व बहरवले होते. गिबर्टीचे ब्रॉन्झ शिल्पांनी नटलेले चर्चचे दरवाजे,ब्रुनेलेस्की डयुओमोचा घुमट यांच्या हया कलाकृती आजही फ्लॉरेन्सच्या प्रमुख आकर्षणांमध्ये गणल्या जातात. सन १४०१ नंतरच्या अल्पायुषी मॅसॅचिओ या चित्रकाराची संख्यने थोडी असलेली चित्रं शंभर वर्षांनंतर आधुनिक शैलीची चित्र संबोधण्यात येऊ लागली. त्रिमितीचा आभास चित्रांमध्ये देणारा तो पहिला चित्रकार. जिओटोने छायाप्रकाशाच्या प्रभावी वापरातून चित्रांमध्ये मानवी अवयवांना घनता प्राप्त करून दिली. हया दोघांनीही पारंपरिक चित्रकलेतील मनुष्याकृतींच्या अंगावरील भारी पोषाख,दागदागिने यांच्यापेक्षा कपडयांच्या आतील मानवी देहाचं चित्रण करण्यावर भर दिला. सिन्योरेली या चित्रकाराने नग्न देहाचं चित्रण करण्याचं धाडस सर्वप्रथम दाखविले होते. भविष्यात मायकेल अँजेलोनं चर्चमधील शवागरातील शवांच्या विच्छेदनातून मानवी शरीर रचनेचा केलेला अभ्यास त्याच्या शिल्पांमध्ये जिंवत केला. त्याने केलेली बॅकस्,डेव्हिड ही नग्न शिल्प ही मॅसॅचिओ -जिओटो यांच्यानंतरची संपूर्ण क्रांतीच म्हणावी लागेल. विंचीने मोनालिसा चितारून देव-धर्म यांच्या बाहेर येऊन मानवी प्रतिमेला आपल्या प्रतिभेनं अजरामर केलं. अँजेलो असो वा विंची यांना कलेला अलौकिकाच्या पातळीवरून लौकिक जगात आणतांना,एक कलावंत म्हणून प्रचंड ताण-तणाव पेलावा लागला. नवनिर्मितीचा व नवजागृतीचा हा काळ फ्लॉरेन्समध्ये सांस्कृतिक प्रगतीसाठी धर्मावर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वाने ज्ञानाची नवनवीन क्षितीजं शोधणा-या कलावंतांसाठी आव्हानात्मक होता. विंची- अँजेलो-राफाएल यांच्या कलाकृतींमध्ये त्यांची घुसमट-तणाव स्पष्टपणे जाणवते. मानवी समाजाच्या संक्रमण काळात त्यांच्यासारख्या कलावंतांनी जुन्या चौकटीत राहून नवीन जगाची बीजं अशा सफाईनं पेरली होती,की नजीकच्याच भविष्यात ही जुनाट चौकटच उद्ध्वस्त झाली. फ्लॉरेन्समधील ही कलाक्रांती शिल्पकला,चित्रकला,स्थापत्य इत्यादी कलांमध्ये प्रामुख्याने झाली असली,तरी काळाच्या ओघात सर्वच कलांना या क्रांतीने कवेत घेतले. धार्मिक दहशहतावादाच्या बळावर फ्लॉरेन्सच्या सांस्कृतिक वैभवाची होळी करणा-या सॅव्हानारोला या धर्मगुरूला त्याच पियाझा डेला सिन्योरिया चौकात फासावर लटकविण्यात आले. त्यानंतर फ्लॉरेन्सने आपले कलावैभव केवळ प्राप्तच केले नाही,तर शिखरावर नेले. यामुळेच सर्वाथाने जगाला बदलविणा-या रेनेसान्सच्या चळवळीचा प्रारंभ कलेच्या क्षेत्रातून करणारे फ्लॉरेन्स खरोखर जगाची कलापंढरी ठरली.
राहुल हांडे,
<strong></strong>लेखकाचा संपर्क – ८३०८१५५०८६

कलालेख

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

26 Dec 2020 - 11:44 pm | उपयोजक

आवडलं.

गामा पैलवान's picture

27 Dec 2020 - 2:46 am | गामा पैलवान

राहुल हांडे,

लेख सुंदर आहे. अतिशय आवडला. असे लेख मराठीत यायला पाहिजेत. तुम्हांस मराठीतनं व्यक्त व्हावसं वाटलं याबद्दल अभिनंदन व कौतुक आहे.

आ.न.,
-गा.पै.

रीडर's picture

27 Dec 2020 - 12:37 pm | रीडर

छान लेख. आणखी वाचायला आवडेल.

लेख आवडला. फ्लोरेन्सला जाऊन कांही वर्षांपूर्वी हे सगळे पहायला मिळाले. शाळेत चित्रकला परिक्षेसाठी थियरी अभ्यासली होती त्यात शिकलेले सगळे पहायला मिळाले आणि मायकल एन्जलो यांची मूळ कला अनुभवता आली. ते कलाकार पाळाण्यात झोपून स्वतःच दोरी ओढून इतक्या उन्च छताजवळ जात आणि लटकून चित्रे पूर्ण करत याची गोष्ट ऐकली होती. फार सुंदर आहे सगळे!
आपण चित्रकार आहात काय?

(परिच्छेद पाडले असते तर अजून सोपे गेले असते वाचायला.)

अनिंद्य's picture

27 Dec 2020 - 8:58 pm | अनिंद्य

सुन्दर लेख !

अथांग आकाश's picture

28 Dec 2020 - 10:46 am | अथांग आकाश

लेख आवडला!
कलेच्या इतिहासातील 'Bonfire of the vanities' ही घटना क्लेशदायक आहे. धर्मांधतेच्या तुलनेत ख्रिस्चन लोक मुस्लिमांपेक्षा बरेच आघाडीवर होते त्याचे अनेक दाखले जगाच्या इतिहासात आहेत!!
.

Rahul Hande's picture

28 Dec 2020 - 5:48 pm | Rahul Hande
सरिता बांदेकर's picture

28 Dec 2020 - 2:40 pm | सरिता बांदेकर

छान माहिती, अभ्यासपूर्ण लेख आहे. परत फ्लॅारेन्सला जावंसं वाटतंय.

चौकटराजा's picture

29 Dec 2020 - 8:28 pm | चौकटराजा

परत कशाला जाता .....?. ते खरे तर सेवानिवृतीनन्तर रहायला फार मस्त गाव आहे !!!

Rahul Hande's picture

28 Dec 2020 - 5:31 pm | Rahul Hande

छान आहे लेख 👍
मिपावर आपले स्वागत.

Rahul Hande's picture

28 Dec 2020 - 5:50 pm | Rahul Hande

लेख छान वाटला. अश्या प्रकारचे लिखाण मिपावर आणखी येत रहायला हवे. मात्र कलेसंबंधीचा लेख असल्याने यात चित्रांची कमतरता जाणवत राहिली.
वाटल्यास याच लेखाचा पुढला भाग लिहून त्यात फ्लॉरेन्सवर इ.स. 1434 ते 1737 या काळात सत्ता गाजवणारे आणि कलेचे मोठे आश्रयदाते असलेले मेदिची घराणे तसेच सॅव्हानारोला याला १४९८ साली जिवंत जाळण्याची शिक्षा देणारा तात्कालीन बोर्जिया पोप अलेक्झांडर सहावा, याचेविषयी पण माहिती दिल्यास उत्तम.

.'

नेटफ्लिक्स वरील 'बोर्जियाज'हे उत्कृष्ट सिरीयत मी दोन-तीनदा बघितले आहे. याने मी इतका भारून गेलो की रोम आणि फ्लॉरेन्समधील काही विवक्षित ठिकाणे मुद्दाम शोध घेऊन बघितली, आणि त्यातूनच माझ्या 'मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा' या लेखमालेत चेझारे आणि ल्युक्रेशिया बोर्जिया ही पात्रे आणणे भाग पडले. मेदिची वरील नेटफ्लिक्सवर असलेले सिरियल अजून बघायचे आहे.
सॅव्हानारोलाला जाळण्याचा प्रसंग यूट्यूबवर इथे बघता येईल.

तसेच या प्रसंगावरील १६५० सालचे एक चित्रः
.

उत्तम लेखनाबद्दल अनेक आभार आणि पुढील लेखाच्या प्रतिक्षत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Dec 2020 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! माहितीपूर्ण लेखन. आवडले. लिहिते राहा. मिपावर येत राहा.

-दिलीप बिरुटे

सिरुसेरि's picture

1 Jan 2021 - 8:02 pm | सिरुसेरि

माहितीपूर्ण लेखन. +१ . फ्लॉरेन्स शहराच्या या कला वैशिष्ट्यांमुळे अनेक चित्रपटांचेही तिथे चित्रीकरण झाले आहे . यातील लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे "डार्क नाईट राइजेस" ( The Dark Knight Rises ) . यामधे ब्रुस वेनचा एकनिष्ठ बटलर / केअरटेकर आल्फ्रेड आपल्या मालकाला होणारा त्रास सहन न होउन अखेर राजीनामा देताना आपले एक स्वप्न / ईच्छा व्यक्त करतो (Alfred reveals that during Bruce's absence, he frequently visited a restaurant in Florence with the fantasy that he would one day see Bruce there, settled down and happy.) चित्रपटाच्या अखेरीस त्याची ईच्छा पुर्ण झालेली पाहुन त्याला ( आणी प्रेक्षकांनाही ) सुखद धक्का बसतो . ( When Alfred returns to the Florentine restaurant, he looks across to see Bruce alive and dining with Selina Kyle. They exchange knowing smiles and Alfred leaves, happy that Bruce has begun moving on with his life.)
संदर्भ - विकी .