अंधविश्वास

Primary tabs

बहुगुणी's picture
बहुगुणी in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amअंधविश्वास

सीमा ची लगबग चालू होती. तिला प्रियाला घेऊन बाहेर जायचं होतं, पण त्याआधी तिच्या संवर्धन WhatsApp गृप मधील काहीजण बिल्डिंगच्या खाली भेटणार होते. त्यांना फुलझाडांची काही कटिंग्ज देऊन मग तिला गाडी घेऊन जायचं होतं. तिघाजणांना तिने तीन ते साडेतीन ही वेळ दिली होती. दोघीजणी तिला WhatsApp चॅट मधून personally ओळखीच्या होत्या, मेधा आणि विद्या, एक सभासद गृपमध्ये नवीन आलेले होते. फोन नंबर saved नसल्याने तिने नाव विचारुन घेतलं होतं, नीलेश कुलकर्णी नाव होतं. तिच्याकडील लाल आणि पांढऱ्या जास्वंदीची आणि तुतीची कटिंग्ज सर्वजण घेऊन जाणार होते.

जुलैची ११ तारीख उगवली तरीही करोना-प्रकरण कमी होण्याची काही चिन्हं दिसत नव्हती जगभर. करोना व्हायरसमुळे तिची आणि मुलीचीही शाळा online learning पद्धतीने, तर मकरंदचं ऑफिस work from home पद्धतीने चालू होतं. त्यामुळे बाहेर जाण्याची वेळ फार कमी. बाहेर जायचंच झालं तर सॅनिटायझर, मास्क, ग्लव्ह्ज असला सगळा जामानिमा घेऊन निघायला लागायचं.

प्रिया आणि तिची पूनम ही जवळची मैत्रीण या दोघींचा व्हायोलीन क्लास बराचसा online होत असला तरी दर दोन आठवड्यातून एका शनिवारी त्या काणे सरांकडे दुपारी चार ते पाच तासभर सरावासाठी जायच्या. तिथे प्रत्यक्ष भेटण्याची संधी म्हणजे दोघींसाठी आनंदाचे क्षण होते. अगदी social distancing पाळून जरी भेटणं होत असेल तरी तेही हवंहवसं वाटायचं दोघींना.

आज त्याच क्लाससाठी सीमा प्रियाला घेऊन निघाली होती. साडे तीन पर्यंत रोपं देऊन झाली की पुढे वीस-पंचवीस मिनिटं वाटेत पूनमला घेऊन काणे सरांच्या घरापर्यंत पोहोचायला पुरेसे होते. सीमाने ओल्या पेपरमध्ये गुंडाळून आणलेली रोपं आणि पर्स आपल्या हातात घेतली, आणि प्रियाने तिचं violin case. गाडीच्या किल्लीने बटन दाबल्यावर लिफ्ट मध्ये कुठेही स्पर्श करणं कटाक्षाने टाळत दोघीजणी चौथ्या मजल्यावरून खाली आल्या. पर्स आणि व्हायोलिन केस दोन्ही गाडीत ठेवून, गाडीचे दार बंद करून दोघीजणी तीन वाजून पाच मिनिटांनी बिल्डिंगच्या गेटच्या आत मध्ये येऊन थांबल्या. अजून कोणी आलेलं नव्हतं.

आणखी पाचच मिनिटांत मेधा आली. तिला कटिंग्ज देऊन तिच्याशी पाच-सात मिनिटे गप्पा मारल्या वर विद्या आली. तिनेही कटिंग्ज घेतली, आणि पाच सात मिनिटे तिघींनी rooting hormone, माती खुरपणे, जीवामृताचं वेळापत्रक इत्यादि विषयीच्या माहितीची देवाणघेवाण केली, मिनिटभर कोव्हिडही गप्पांमध्ये आलं.

प्रियाने आईचं लक्ष मोबाईल फोन मधल्या घड्याळाकडे वेधलं. "अग 3:25 झाले की! हे कुलकर्णी अजून आले नाहीत...." सीमा म्हणाली, "साडेतीन पर्यंत जर नाही आले तर मी सागरकाकांकडे ठेवून जाईन कटींग्ज, ते देतील." सागरकाका म्हणजे बिल्डिंगचे वयस्कर वॉचमन.

"अग मीही निघतेच," विद्या म्हणाली, "मलाही खरं तर घाई आहे, पण म्हंटलं नवीन मेंबर आहेत तर भेटून जावं." मेधानेही "हो गं, same here!" इतक्यात एक मास्क लावलेला, उन्हापासून बचावासाठी कॅप आणि गॉगल घातलेला ३०-३२ वर्षाचा वाटणारा तरुण टू-व्हीलरवर बिल्डिंग कडे बघत बघत आला, आणि गेट च्या आत चौघींना बघून थांबला. सीमाने WhatsApp group वर पत्ता व्यवस्थित दिला होता, त्यामुळे सापडण्यात काही अडचण आली नसणारच.

"नमस्कार! मी नीलेश कुलकर्णी," तिघींकडे पाहत तो म्हणाला, "सीमा साने..." सीमाने पुढे होऊन होकार दिला. त्याने एव्हाना security cabin च बाहेर आलेल्या सागर काकांनी दाखवलेल्या ठिकाणी टू-व्हीलर पार्क केली, आणि तो सीटच्या खालील प्लॅस्टिक पिशवी घेऊन आत आला.

"सॉरी, उशीर झाला."

"नाही उशीर नाही, अगदी वेळेत आलात, thank you! आणि मी घाईही नसती केली पण मला मुलीला घेऊन बाहेर जायचं आहे, एका ठिकाणी चार वाजता पोहोचायचं आहे, म्हणून. या संवर्धन मधल्याच दोघी मेंबर्स, मेधा काळे आणि विद्या नवाथे." सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. सीमाने कुलकर्णींना उरलेली कटिंग्ज दिली.

"Thank you! मीही माझ्याकडच्या डबल डिलाईट गुलाबाची तीन कटिंग्ज आणलीयेत, म्हटलं तुम्हाला आवडत असतील आणि तुमच्याकडे नसतील तर लावता येतील," पिशवीतून कटिंग्ज काढत कुलकर्णी म्हणाले.

"अरे वा आवडेलच की!" म्हणत तिघींनी आपापलं कटिंग त्यांच्याकडून हातात घेतलं.

"मी आता वरती जात बसत नाही हे कटिंग ठेवायला," सीमा म्हणाली, "तासभर राहील नीट गाडीतच, आल्यावर लावून टाकते."

"हो राहील की," मेधा म्हणाली "पण दोघीच जाताय तर फोर-व्हीलर कशासाठी काढतेस? टू व्हीलर वर गेली असतीस.."

"हो गं, सुटसुटीत झालं असतं, पण वाटेत पियूच्या मैत्रिणीला घेऊन जायचं आहे. तशा महिन्यातून दोनच trips असतात. आता पुढची पंधरा दिवसांनी, २५ तारखेला. आणि तसंही हे करोना प्रकरण आहे ना, तेवढंच एक्स्पोजर कमी बंद गाडीत असं वाटतं.."

आपापल्या गाड्या घेऊन सर्व निघाल्यावर सागर काकांनी गेट ओढून घेतलं.

****
पाच वाजता आपलं होमिओपॅथी क्लिनिक सुरू करण्याआधी थोडा वेळ हातात आहे हे पाहून दाबके डॉक्टरांनी फोनवर WhatsApp उघडलं आणि ते एकदा संवर्धन गृपवर फेरफटका मारून आले. हा बागकाम गृप जरी त्यांनी स्थापन केला असला तरी क्लिनिकच्या पसार्‍यात एकट्याला admin म्हणून लक्ष देणं अवघड जायचं, म्हणून त्यांनी आशाताई साठे आणि संजय शिंदे या समवयस्कांनाही admin करून घेतलं होतं. आज डॉक्टरांचा लक्ष देण्याचा वार होता, म्हणून त्यांनी एकंदरीत हालहवाल काय आहेत याची चटकन नोंद घेतली. नेहमीचीच निरोपानिरोपी चालू होती - फुलझाडांच्या प्रगतीबद्दल thumbs up, टाळ्या, smileys वगैरे emojis यांची रेलचेल होती. फुलझाडं वाढवण्याबरोबरच निसर्ग संवर्धन करण्याविषयीही आत्मीयता असलेल्या काही सभासदांनी आपल्या माहितीत होऊ घातलेल्या Zoom आणि Google Meet परिसंवादांची माहिती forward केली होती. सामाजिक जाणीव असलेल्या काही सभासदांनी कोव्हिडकाळात योग्य किंमतीत testing कुठे होतंय, blood आणि plasma donors नी आपला रक्तगट, फोन नंबर आणि नाव नोंदणी कुठे करायची याविषयीच्या याद्या पाठवल्या होत्या, त्यावर काही उत्साही सभासदांनी आपापली माहिती पाठवली होती. इतरही अशाच पोस्ट्स: कोणत्या भागातील दुकानं आजपासून संध्याकाळी सात ऐवजी नऊ पर्यंत उघडी राहणार आहेत त्याची माहिती, नारळ काढून देणाऱ्या नारळमित्रांचा फोन नंबर, जखमी पक्ष्यांना घेऊन जाणाऱ्या पक्षीमित्रांचा नंबर... अशा बऱ्याच फुलझाडांशी असंबद्ध पण सभासदांना उपयोगी अशा फॉरवर्ड्स होत्या. काही नवीन फुलांचे सुंदर फोटोही होते. कॉसमॉस सारख्या invasive species च्या रोपांची लागवड टाळून देशी झाडंच का लावावीत याविषयीही चर्चा चालू होती. फक्त कुणीतरी चुकून एक नारळाच्या वड्यांची पाककृती या ग्रुपवर फॉरवर्ड केली होती. आणि दोन अन्य सभासदांनी रेसिपी भारी असल्याची कॉमेंट केली होती! त्या सीमा सानेंना डॉक्टरांनी personal message पाठवून ती डिलीट करण्याची विनंती केली. बाकी एकंदरीत सर्व काही आलबेल होतं. पहिला पेशंट आल्याचं कळल्यावर डॉक्टर आपल्या कामाकडे वळले.
***

दहा दिवसांनी सीमाने मेधा आणि विद्या दोघींना कटिंग्जच्या प्रगतीविषयी विचारलं. 'अजून जिवंत आहेत ' असं दोघींनी कळवलं. निलेश कुलकर्णींचा काही रिस्पॉन्स दिसला नाही. आणखी तीन दिवसांनी मेधाने सीमाच्या आधीच्या मेसेजला टॅग करून उत्तर दिलं:

"जास्वंदीला दोन नवीन पानं! " सोबत फोटो.

संध्याकाळी विद्याचंही उत्तर आलं, "Me too! आणि तुतीचं कटिंगही वाढतंय असं वाटतं."

"ग्रेट!" सीमा, "मी २५ला जमलं तर चक्कर मारते पहायला. पियूच्या मैत्रिणीला घरी सोडून मग येईन."

"नक्की! सव्वा पाच पर्यंत येशील?" विद्याने विचारलं.

"नाही, सहा तरी नक्की होतील, त्या दिवशी मला तिथे जवळच मकरंदच्या आत्यांकडे जाऊन मग पियूला घ्यायला जायचं आहे. 80+, एकट्या असतात आणि करोनामुळे धास्तावल्या आहेत, तासभर गप्पा मारून निघेन. मी फोनवर कन्फर्म करीन."
****

२५ तारखेला प्रिया आणि पूनमला काणे सरांच्या घराबाहेर सोडून सीमा आत्याबाईंना भेटायला गेली. पोहोचल्यावर बाहेर ठेवलेल्या sprayer मधील sanitizer हातावर चोळत ती आधी सरळ बाथरूम मध्ये हात पाय धुवायला गेली.

"बैस, कसे आहात सगळे, पियू, मकरंद?" आत्यांनी विचारलं.

"छान! मकरंदचं अजून वर्क फ्रॉम होम चालू आहे, मला चार तास शाळेचं ऑनलाईन काम असतं तेही बऱ्यापैकी व्यवस्थित चालू आहे. आणि पियूचा अभ्यास बरा चाललाय, ऑनलाईनच आहे, फक्त व्हायोलिन क्लाससाठी पंधरा दिवसांनी बाहेर पडते, पण कंटाळलीये खरं तर! मैत्रिणी भेटत नाहीत ना!"

"हो गं, कठीणच आहे सगळं! किती, बारा वर्षांची झाली का गं?"

"तेरा!"

"अगं मग कंटाळा येईल नाहीतर काय? हे काय घरात बसायचं वय आहे का? बैस तू, मी पोहे भिजवून ठेवलेत, तेवढे फोडणीला टाकते मग चहा करते..."

"नाही, तुम्ही बसा आत्या, आज माझ्या हातचे चहा-पोहे..." म्हणत सीमा उठली.

****
प्रिया आणि पूनमचा क्लास ५ वाजताच संपला, पण सीमाला यायला साडेपाच वाजणार होते, म्हणून रस्त्यावर थांबण्यापेक्षा दोघी सव्वापाचपर्यंत काणे सरांकडेच थांबल्या, आणि मग बाहेर रस्त्यावर आल्या. बाजूच्या बसस्टॉपच्या थोडं पुढे जाऊन सावलीत थांबल्या. दुपारी तुरळकच असलेली रहदारी हळूहळू वाढायला लागली होती. करोनामूळे शहर बस-वाहतूक अद्याप बंदच होती, त्यामुळे स्टॉप रिकामाच होता. दोघी गप्पांत रंगत असताना एक लाल गाडी समोरून पुढे गेली. २०-२५ फूट पुढे जाऊन अचानक ब्रेक लावून थांबलेली पूनमने पाहिली. पूनमच्या नजरेला follow करत प्रियानेही वळून गाडीकडे पाहिलं. गाडी reverse करून मागे त्यांच्याकडे आली आणि समोर येऊन थांबली.

**
सीमाने आत्या बाईंकडून खाली उतरताना विद्याला फोन लावला. "विद्या साडेपाच होतायेत, मी पाच सात मिनिटात प्रिया आणि तिच्या मैत्रिणीला पिकअप करते, पूनमला घरी ड्रॉप करते आणि सहा पर्यंत तुझ्याकडे पोहोचते, चालेल ना?" विद्याने हो म्हटल्यावर तिने गाडी काढली.

ती 5:35 सुमाराला बस स्टॉप च्या पुढे येऊन थांबली. रस्त्यावर प्रिया आणि पूनम दिसल्या नाहीत तेव्हा की थोडीशी चकित झाली. आज सव्वापाच पर्यंत क्लासमध्ये थांबणार होत्या असं ठरलं होतं, पण एव्हाना इथे येऊन पोहोचायला हव्या होत्या. तिने बाजूचा फोन उचलून प्रियाचा नंबर लावला. फोन switched off असल्याचा मेसेज मिळाला. सीमाने कपाळावर आठ्या घालत पुन्हा फोन लावला. रोज सकाळी तिघांचेही फोन चार्ज करून ठेवलेले असायचे, 'स्विच्ड ऑफ कसा असेल?' पुन्हा तोच मेसेज 'फोन स्विच्ड ऑफ..'. पूनम कडे तर फोन नसतो, सीमाने मिनिटभर विचार करून काणे सरांना फोन लावला.

"सर नमस्कार, प्रिया आणि पूनम निघाल्या नाहीत का अजून?"

"अहो सव्वा-पाचपर्यंत थांबून निघाल्या दोघी... रस्त्यावर नाहीयेत?"

"नाही ना! मला ५-७ मिनिटं उशीरच झाला पोहोचायला, म्हंटलं येऊन थांबल्या असतील. फोनही बंद आहे तिचा...बघते मी उतरून, आजुबाजूला दुकानात वगैरे गेल्या असतील."

सीमा पर्स, फोन आणि गाडीची किल्ली घेऊन उतरली, आणि गाडी लॉक करून तिने आजुबाजुला पाहिलं. सर्व हाउसिंग सोसायट्याच, दुकानं अशी फारशी नव्हतीच, आणि जी चार-सहा होती त्यातली रेस्टॉरंट्स करोना restrictions मुळे बंदच, नाही म्हणायला एक भाजीचा स्टॉल, एक पेट्रोल पंप आणि दूरवर एक मेडिकल स्टोअर. भाजीवाले काका मागच्या बाजूला असलेल्या घरात होते. सीमाने 'कोणी आहे का?" म्हणून विचारल्यावर ते बाहेर आले.

"तुम्हाला दोन मुली इथे स्टॉपपाशी उभ्या होत्या त्या दिसल्या का?"

"नाही, मी आत्ताच बाहेर येतोय आणि दुकान उघडतोय."

सीमा पेट्रोल पंपाकडे चालत गेली. तिथले लाईट गेले असावेत, कारण मास्क बांधलेले ४ कर्मचारी एकत्र गप्पा मारत होते आणि एकही वाहन उभे नव्हते.

सीमा पुढे मेडिकल स्टोअर पर्यंत चालत गेली. आत दोन फार्मसिस्ट होते. तिने पायर्‍या चढून त्यांना विचारले, "दोन १३-१४ वर्षांच्या मुली काही घ्यायला आल्या होत्या का?" त्यांनी नाही म्हणून सांगितलं. आता मात्र सीमा panic व्हायला सुरुवात झाली. गाडीकडे परततांना तिने वेळ पाहिली: ५.५०! तिचा फोन वाजला. विद्या होती. "पोहोचते आहेस ना?" सीमाला रडूच कोसळलं. "अगं, पियू सापडत नाहीये!"...

**

आज तास दीड तास दोघी घरात नसणार हे लक्षात घेऊन मकरंदने पाच ते सहा त्याचा महत्त्वाचा कॉन्फरन्स कॉल ठेवला होता. सव्वा पाच होत आले होते. कॉल सुरू होऊन पहिल्या दोघांचं बोलणं झालं होतं. पुढची दहा-बारा मिनिटंच मकरंदच कॉलवर काम होतं कारण त्याचं मत मांडून झालं की पुढचं discussion आणि decision हे इतरांचं काम होतं. लॅपटॉप वरून कॉल चालू असल्याने distraction नको म्हणून त्याने त्याचा मोबाईल फोन बाजूच्या चार्जिंग पाऊच मध्ये ठेवला होता.
"So, Makarand, what's your take on how we should proceed?" खन्नांनी विचारलं. मकरंदने त्याचा मायक्रोफोन unmute केला. Video चालू होताच.
"Khanna ji, given the Covid situation, I think we should reformat our Q4 plan just a little bit. Not really restructure the workforce at this tough time, because that will be bad for the employee morale, but tone down our production expectations. We should probably...."

त्याला silent mode वर ठेवलेल्या फोनचं vibration ऐकू आल्यासारखं वाटलं. त्याने मागे वळून पाहिलं. फोन पाऊचमध्ये backward facing ठेवला असल्याने screen दिसत नव्हता. भास झाला असेल असं समजून तो पुन्हा कॉलकडे वळला.

..."I suggest we should probably reduce the Q4 production projection by about 20%, and recover that in the Q1 and Q2 next year, about 10% additional each."

"Well, that could work, what do you guys think?" खन्नांनी इतरांना विचारलं.

मागे मोबाईल फोनची murmur चालूच होती असं मकरंदला जाणवलं. त्याने audio mute केला आणि video feed बंद केला, आणि तो खुर्चीतून उठून फोनकडे गेला. एव्हाना कॉल बंद होऊन screen वर missed call notification दिसलं.

त्याने पाहिलं तर प्रियाचा कॉल होता. 5:22 झाले होते. किंचित विचारात पडत तो तिला फोन करणार इतक्यात त्याला ऐकू आलं की खन्ना त्याला काही विचारत होते.

"Makarand, can you share your calculations that you based your 20% number on, and explain how the additional 10% in each of the following quarters would work with the same workforce?"

मकरंदकडे दोन्हीसाठी व्यवस्थित explanations तयार होते. तो म्हणाला, "Sure, let me share with all of you the document that has the details. Let me know if that helps."

पुढील पाच मिनिटांत त्याने file share केली. आणखी पाच-एक मिनिटांत त्याचं स्पष्टीकरण इतरांना पटलंय हे लक्षात आल्यावर पुन्हा audio mute आणि video feed बंद करून त्याने फोन उचलला.

हातात घेतल्या घेतल्या फोनची रिंग पुन्हा वाजली. 5:32pm. Screen वर Mrs. Nahata असं दिसलं. पूनमच्या आई... आता त्याने कॉल घ्यायचा ठरवलं. Call receive करून त्याने त्यांना "Please hold for just a minute.." म्हणत त्यांना hold वर टाकलं, आणि audio unmute आणि video feed चालू करून raised hand दाखवत म्हंटलं:

"Sorry to interrupt, folks, but I need to drop off the call a little early, my daughter was calling me, is it OK?"

खन्ना आणि इतरांनी हो म्हंटल्यावर त्याने video call terminate केला, आणि फोन कॉलचा hold cancel केला. "Sorry to keep you waiting, Mrs. Nahata! काही हवं होतं का?..."

पूनमच्या आईंचा excited आवाज आला, "सीमा कशी आहे आता? तुम्ही कुठे आहात?"

***
"सीमा? तिला काय झालंय? मघाशी पियूचाही missed call दिसला, तिला आणि पूनमला घ्यायलाच सीमा जायची होती एव्हाना! काय झालं, पूनम काही बोलली का?" एकदम काळजीत पडलेल्या मकरंदने विचारलं.

"अहो तेच तर, पूनम रिक्षाने घरी आलीये आताच, आणि ती म्हणतेय..."

पूनमने सांगितलेलं सगळंच धक्कादायक होतं!

त्या दोघी सीमाची वाट पाहत थांबल्या असतांना म्हणे पुढे गेलेली एक लाल गाडी reverse करून मागे आली....

***
ड्रायव्हिंग करणाऱ्या तरुणाने गाडी थांबवली आणि तो उतरून दोघींकडे आला.

"तू सीमाताईंची मुलगी प्रिया ना? मला ओळखलं का? आपण दोन आठवड्यांपूर्वी भेटलो होतो."

"हो,..." प्रिया आठवून पहात म्हणाली.

"मी खरं तर तुला असं सांगायला नकोय कदाचित, पण तू दिसल्यावर न सांगता निघून जाणं योग्य नाही. तू आईची वाट पाहत थांबली असशील ना?"

"हो, येईलच ती आता तुम्हाला भेटायचं असेल तर..."

"नाही, तेच सांगायला थांबलो मी. आई नाही येऊ शकणार..."

"म्हणजे?"

"सीमाताई कुणाला तरी भेटायला जायच्या होत्या ना?" प्रियाने मान डोलावली. "तिथे जात असताना त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली! मला गृप वर माहिती मिळाली की सीमाताईंना शुश्रुषा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. She is out of danger, पण त्यांना urgently matching blood donors हवे आहेत. माझाही आईसारखाच AB blood group आहे, आणि हे माझे मित्रही AB आहेत, म्हणून आम्ही दोघेही हॉस्पिटलकडे निघालो आहोत. तुझे बाबाही तिथे आले आहेत म्हणे, मकरंद नाव ना?" प्रियाची तर वाचाच बंद झाल्यासारखं झालं होतं! तिने मान हलवली.
"आम्ही तुला हॉस्पिटल मध्ये नेऊ शकतो हवं तर, पण मला वाटतं तू या मैत्रिणीबरोबर तिच्या घरी जावं... हे सांगण्यासाठी मी थांबलो", हातातल्या फोनमधल्या घड्याळाकडे बघत ते म्हणाले, "साडेपाच होत आले आहेत! आम्हाला निघायला हवं, उशीर नको व्हायला! चलू?"

"नाही थांबा मी येते! मला यायचंय आईकडे!" प्रिया म्हणाली, "पूनम, तू कशी जाशील? रिक्षा बंद आहेत."

"अगं मी जाईन गं चालत, दोनच मिनिटांवर तर आहे इथून घर! पण तू ...फोन कर पोहोचलीस की लगेच!"

होकार देत प्रिया चट्कन गाडीचं मागचं दार उघडून आत बसली. ते काकाही घाईघाईत ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि गाडी चालू झाली.

हबकलेली पूनम तिच्या घराकडे निघाली.
***

"That's crazy!" मकरंद म्हणाला, "अहो, मी संपूर्ण दिवस घरीच आहे... मी लगेच पियूला फोन करतो... Many thanks, Mrs. Nahata....Oh, wait a minute, there is an incoming call... Oh, good, सीमाचा फोन येतोय! मी तिच्याशी बोलून तुम्हाला फोन करतो....बाय!"
****
सीमाने पुन्हा पियूला फोन केला तर switched off! आता सीमाच्या पायाखालची जमीन सरकली... पूनमच्या आई गैरसमज होऊन दोघींना त्यांच्या घरी घेऊन गेल्या असतील? सरळ मकरंदलाच फोन करावा...त्याचा कॉन्फरन्स कॉल संपतच आला असेल... तिने मकरंदचा नंबर speed dial केला. दोनच rings मध्ये त्याने उचलला.

"मकरंद, अरे, प्रिया कुठेय??"

"Calm down, Seema!" मला आताच पूनमच्या आईचा फोन आला होता..."

मकरंदने तिला सर्व सांगितलं. "कोण तिच्या ओळखीचा असेल? इतकी सगळी इत्थंभूत माहिती असणारा...I am just completely at a loss! तू घरी drive करू नकोस, मी येतो दहाच मिनिटात. आपण पोलिस स्टेशनला जाऊ!" त्याने दार बंद करून मोटरसायकल काढली. रस्त्यात विचारचक्र चालूच होतं, कोण effectively मदत करेल? सीमापाशी पोहोचेपर्यंत त्याचा निर्णय झाला होता. गाडी सीमाच्या गाडीमागे पार्क करून त्याने दोन ढांगात गाडीचं पुढचं डावं दार उघडलं. आत उजवीकडे ड्रायव्हिंग सीटवर शून्यात नजर लावून बसलेली सीमा थरथरत होती, त्याने तिला जवळ घेतलं आणि डोक्यावर थोपटलं, "मी तुझ्या बावधनकर काकांना फोन करतोय!"

तिच्या डोळ्यात एकदम चमक आली, तिने त्याचा डावा हात घट्ट पकडून ठेवला. त्याने त्या हातातील मोबाईल उजव्या हातात घेऊन मुंबईचे पोलिस कमिशनर बावधनकरांना फोन लावला. सीमाच्या मावशीचे यजमान. आज शनिवार, ते शिरस्त्याप्रमाणे त्यांचे गुरू आणि मुंबईत एकेकाळी ACP म्हणून कारकीर्द गाजवणारे नानासाहेब माने यांच्या घरी ठाण्यात होते.

बावधनकरांनी सर्व घटनाक्रम ऐकून घेतला, सीमाला मोजकेच पण नेमके प्रश्न विचारले, आणि "पंधरा वीस मिनिटे आहात तिथेच थांबा, a very capable police inspector will reach you soon. In the meanwhile, शक्य असेल तर त्या मैत्रिणीला आणि तिच्या आईला बोलावून घ्या." असं सांगून त्यांनी फोन ठेवला. मकरंदने पूनम आणि मिसेस नहाटा यांना येण्याची विनंती केली. त्या दोघी तात्काळ तयार झाल्या आणि यायला निघाल्या.

पंधराव्या मिनिटाला एक मोटरसायकल मागे येऊन थांबली. सिव्हिलियन पेहरावातील एक तरतरीत तरुण गाडी पार्क करून पुढे आला.

"नमस्कार, सीमाताई आणि मकरंद! मी स्टेट इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचा नीलकांत घारे." सावळा वर्ण, लक्षात राहील अशी शोधक नजर. "बावधनकर सरांनी मला सर्व कल्पना दिली आहे. काही मिनिटांतच माझे एक सहकारी सब-इन्स्पेक्टर शिंदे आणि काही constables आपल्याला join होतील. आम्ही शक्य तितक्या लवकर प्रियाला शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तुम्ही दोघांनी धीराने घेणं आवश्यक आहे! OK?" त्याच्या आश्वासक नजरेकडे पाहत दोघांनी मान डोलावली. नीलकांतने रस्त्यावर वळून डावीकडील काही दुकाने ते उजवीकडील मेडिकल स्टोअर यांची झटपट पाहणी केली.

थोड्याच वेळात नहाटा मायलेक, शिंदे आणि काही पोलीस असे सर्व जण जमा झाले. एव्हाना आसपासच्या हाउसिंग सोसायट्यांचे वॉचमन, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, मेडिकल स्टोअरमधील फार्मासिस्ट्स या सर्वांना काही police activity सुरू असल्याचा अंदाज आला होता.

"शिंदे," नीलकांतने सुरूवात केली, "पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही आहे, ५-६ या वेळातलं फूटेज पहायचं आहे, एका रुम किंवा ऑफिसमध्ये set up करा. मी आलोच."

सगळे कामाला लागल्यावर नीलकांतने मोर्चा पूनमकडे वळवला. तिच्या वर्णनात आणि सीमाने बावधनकरांना सांगितलेल्या घटनाक्रमात काही विसंगती नाही याची त्याने खात्री करून घेतली.

साडेसहाच्या सुमारास सर्व जण पेट्रोल पंपावरील फुटेज पहात होते. लाल गाडीच्या ड्रायव्हरचा, शेजारच्या सहप्रवाश्याचा आणि प्रियाचा असे सर्व चेहरे frames zoom करून आणि freeze करून त्यांचे मोबाईल मध्ये फोटो घेतले गेले. Recorded film copy करण्याची व्यवस्था शिंदे आणि सहकारी बघत असताना नीलकांत सर्व हाउसिंग सोसायट्यांच्या वॉचमेनना, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना फोटो दाखवत भेटला. मेडिकल स्टोअरमधील फार्मासिस्ट्सनी माणसांचे फोटो ओळखले नाहीत, पण ती गाडी ५ वाजल्यापासून लांब झाडाखाली थांबली होती म्हणून सांगितलं.

"KUV100 NXT" दोघांपैकी एकाने सांगितलं.

"कशावरून?"

"Front grille, headlights, fog lamps... Definitely NXT!"

"इतका confidence कशावरून? तुमच्याकडे हीच गाडी आहे?"

"नाही, पण जेव्हा केव्हा घेईन तेव्हा हीच घेणार आहे! मला हे मॉडेल खूप आवडलंय, दिसली की सर्व फीचर्स लक्षात ठेवतो."

"नंबर?"

"नाही पाहिला. खरं तर, नाही दिसला, इथून लांब आणि मला parallel उभी होती गाडी."

"Thank you!"

नीलकांतने गाडीचं वर्णन, प्रवाश्यांची माहिती, CCTV मधील images हे सर्व एकत्र करून शहरात आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर highest alert ने पाठवण्याची व्यवस्था केली.

एव्हाना सात वाजून गेले होते. नहाटा मायलेकीला धन्यवाद देऊन नीलकांतने त्यांना घरी पाठवलं. बाकी पोलिसांना वेगवेगळ्या checkpoints ना पाठवल्यावर शिंदे आणि नीलकांत सीमा-मकरंद यांना त्यांच्या घरी घेऊन आले. शिंदेंना वॉचमन सागरकाकांची जुजबी चौकशी करून यायला सांगून नीलकांत सीमा-मकरंदच्या फ्लॅट मध्ये आला.

नीलकांत पाणी पीत असतानाच बावधनकरांचा सीमाला फोन आला.

"नमस्कार, काका! नाही हो!" रडवेल्या स्वरात सीमा म्हणाली, "हो, इथेच आहेत नीलकांत. देते."

"येस सर," नीलकांतने म्हंटलं, "एक definite lead मिळालाय सर..."

"थांब, नीलकांत, मी speaker phone चालू. करतोय, म्हणजे नानासाहेबांनाही update मिळेल, मी इथे त्यांच्याकडे ठाण्यालाच आहे अजून."

"Oh, nice, नमस्कार सर," नीलकांतने नानासाहेबांना उद्देशून म्हंटलं.

"नमस्कार, नीलकांत, आणि सीमाताई, नमस्कार! Makarand, don't worry, with Neelkant, you have the best of the police support with you. We will find your little one, alright?"

सीमाने हुंदका आवरत 'थॅंक यू, सर' म्हंटलं.

"So what's the update, Neelkant?" बावधनकरांनी विचारलं.

"सर, ज्या गाडीतून प्रिया गेली तिचा रंग, मॉडेल आणि मेक मिळालाय. लाल Mahindra KUV होती. जिथे या दोन मुली उभ्या होत्या त्याच्या diagonally opposite एका पेट्रोल पंप बाहेरच्या कॅमेऱ्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय.... Picture grainy आहे, पण usable frontal photo मिळाले आहेत. As luck would have it, त्या पेट्रोल पंपाचा इलेक्ट्रिकल सप्लाय साडेपाच ते सव्वा सहा बंद पडला होता, पण प्रियाला घेऊन गाडी ५.२८ ला निघून गेली, त्यामुळे CCTV unit चा electrical supply बंद व्हायच्या आत fortunately video capture झाला!"

"शिंदेंनी आणि मी तो फोटो वापरून आसपासच्या दुकानांमध्ये आणि सोसायटीच्या security cabins मध्ये canvassing केलं. फोटोवरून काही माहिती मिळाली नाही, पण एका मेडिकल स्टोअरमधल्या फार्मासिस्टने ती लाल Mahindra KUV गाडी आधी १५-२० मिनिटे समोरच्या बाजूला पार्क केलेली पाहिलं असल्याचं सांगितलं. So this was premeditated. Photographs and information package is dispatched to all checkpoints for a follow up."

एव्हाना शिंदेही वर आले होते.

"Sounds like you have covered some ground," बावधनकर म्हणाले, "शिंदे आहेत की नाही?"

"आहेत तर, त्यांच्याशिवाय काय पान हलतं का?" हसत नीलकांत म्हणाला. " बोला, शिंदे!"

"नमस्कार, सर! नमस्कार, नाना!"

"नमस्कार, काय reading आहे तुमचं?" नानांनी विचारलं.

"सर, खूप तयारीनिशी आला होता, वेळेचं नियोजन कसं केलं शोधायला पाहिजे. काही तरी inside job आहे असं मला वाटतं. By the way, आता खाली बिल्डिंगच्या वॉचमनशी बोलून आलो. तुमच्या अविनाशच्या सिक्युरिटी एजन्सीकडून आलेला आहे!"

"अरे, small world! पण म्हणजे sharp असणार. त्याच्याकडून काही कळलं का?"

"सर, म्हातारा आहे, फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही..."

"शिंदे, मीही म्हातारा आहे, ८४! मलाही मोडीत काढता की काय?"

"नाही, सर! तसा हेतु नव्हता माझ्या म्हणण्याचा!"

"नाही, तुमचं म्हणणंही बरोबर आहे, वय वाढलं की रिफ्लेक्सेस कमी होतात. पण, काय आहे माहितीये का, अविनाश आर्मीतली रिटायर्ड माणसं घेतो. ही माणसं सवयीचे गुलाम असतात. Very detail-oriented. बोलून पहा, you never know. मी तर म्हणेन आत्ताच खाली जा, फोटो त्याला दाखवा, बघा काही क्लिक होतंय का."

"OK Sir, worth a try," नीलकांत म्हणाला.
"आणखी काही माहिती मिळत राहिली की update करतोच तुम्हाला."

फोन संपवून चौघेही सागरकाकांना फोनमधील फोटो दाखवायला खाली गेले.

त्यांनी एका फोटोच्या डोक्यावर, डोळ्यांवर आणि तोंडावर एकेक बोट आडवं ठेवलं. बोटं काढली आणि पुन्हा ठेवली. असं दोन तीन वेळा केल्यावर ते सीमाला म्हणाले, "हा आलावता पंधरा दिवसाखाली, तुमच्याचकडे!"

"माझ्याकडे? कोण? कधी?"

"नाव नाही माहिती, पण तुम्ही त्याला काड्या दिल्या आणि त्यानं तुम्हाला दिली एका रोपाची. कॅप घातलेली होती, गॉगल होता आणि मास्क लावला होता. दोन बायका बी आल्यावत्या त्याच दिवशी."

"तुम्हाला खात्री आहे का काका?" नीलकांतने विचारलं.

"२०० टक्के! हाच होता!"

"Oh, तो नीलेश कुलकर्णी!" सीमा excitedly म्हणाली.

"थांबा, मी तुम्हाला सांगतो का मला दोनशे टक्के खात्री आहे ते..." सागर काकांनी केबिन मध्ये जाऊन एक रजिस्टर बाहेर आणलं.
"काय तारीख होती?"

सीमा ने तिच्या फोन वरील WhatsApp उघडलं, आणि सांगितलं, "११, ११ जुलै"

अकरा तारखेच्या पानावर जाऊन सागरकाकांनी एक अर्धवट गाडी नंबर दाखवला...1773. "तो थांबला नाही, म्हणून पूर्ण नंबर नाही लिहिला."

"Four wheeler की two wheeler?"- नीलकांत.

"Two wheeler होती," सीमा म्हणाली.

"हो. ती बुटकी, स्कूटी की काय.." - सागरकाका.

"Wow! What a break! नानांचं बरोबर होतं!"

"Thank you, सागरकाका!" सीमा म्हणाली.

"मकरंद..आणि सीमाताई," नीलकांतने विचारलं, "प्रिया चं map location तुमच्या फोन बरोबर शेअर केलेलं आहे?"

"हो, पण मी लगेच follow केलं होतं," मकरंद म्हणाला, "तिचं location sharing ५.२५ पासून बंद झालं."

"Right! तिचा फोन त्याच सुमाराला स्विच्ड ऑफ मिळायला लागला..."

"सीमा ताई, त्यादिवशी दोघीजणी होत्या त्यांना बोलावून घ्या, लगेच! वर चला, आणि मला तुमचा फोन द्या!"

****
सीमा, मेधा आणि विद्याशी बोलून संवर्धन गृपविषयी -विशेषत: डॉ. दाबक्यांच्या विषयी- माहिती घेऊन नीलकांतने त्यांच्या घराचा पत्ता घेतला.

नीलकांतने हळू आवाजात शिंद्यांना काही सूचना दिल्या, आणि शिंदे मोटरसायकल घेऊन निघाले. नीलकांतने cyber and electronic investigations section ला आणि traffic section ला फोन करून कोणा दोन जणांना दोन गोष्टींची माहिती पाठवायला सांगितलं; एक म्हणजे प्रियाच्या फोनचं SIM track करून जर ते reactivate झालं तर last known लोकेशन dynamically track करायला सांगितलं, आणि १७७३ last digits असलेल्या Scooty च्या मालकाचे डिटेल्स मागवले.

नीलकांतने मग सीमा कडून नंबर घेऊन डॉ. दाबक्यांना फोन लावला.

"डॉ. दाबके, मी पोलिस इन्स्पेक्टर
नीलकांत घारे. तुम्ही इतर दोघांबरोबर संवर्धन WhatsApp group चे admin आहात."

डॉक्टरांनी 'हो' म्हंटल्यावर नीलकांतने सांगितलं, "संवर्धन गृपच्या सभासदांपैकी सीमा साने म्हणून आहेत, त्यांच्या मुलीचं अपहरण झालं असावं अशी शक्यता आहे."

"ओह!"

"आणि संवर्धन members पैकी एकाचा यात रोल असण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात तुम्ही तुमचा फोन घेऊन मला शक्य तितक्या लवकर भेटणं महत्त्वाचं आहे. Unfortunately, मी सीमाताईंच्या घरून हलू शकत नाही, त्यामुळे तुम्हालाच इथे यावं लागेल. ...हो... Thank you! माझे सहकारी सब-इन्स्पेक्टर शिंदे दहा मिनिटात तुमच्या घरी येतील. इतर कोणाशीही चर्चा न करता प्लीज लवकरात लवकर इथे या."

****

नीलकांतने सीमाच्या संवर्धन WhatsApp group वरचा १७ तारखेचा message पुन्हा एकदा वाचला...

"नाही, सहा तरी नक्की होतील, त्या दिवशी मला तिथे जवळच मकरंदच्या आत्यांकडे जाऊन मग पियूला घ्यायला जायचं आहे. 80+, एकट्या असतात आणि करोनामुळे धास्तावल्या आहेत, तासभर गप्पा मारून निघेन. मी फोनवर कन्फर्म करीन."

त्याने message select करून वर उजव्या कोपऱ्यातले तीन dots tap केले, आणि info select केलं. २५० पैकी १५६ सभासदांनी message वाचला होता. Alphabetically यादीत पाहताना नीलेश कुलकर्णी हे नाव नव्हतं, पण फक्त फोन नंबरने गृपमध्ये सहभागी असणाऱ्या २२ सभासदांपैकी ५ जणांनी सीमाचा message वाचला होता. त्यांत +91 80193 45530 होता.

नीलकांतने एक फोन करून काही माहिती घेतली. त्या नंबरचं SIM card हैदराबादला issue झालं होतं.

नीलकांतने पुन्हा संवर्धन ग्रुपच्या मेसेजेस मधून स्क्रोल केलं. दोन दिवसांनंतर म्हणजे २३ तारखेला +91 80193 45530 या फोन नंबर ने गृप सोडला होता!

नीलकांतने बावधनकरांना फोन लावला, आणि त्यांना speaker phone वर टाकायला लावून नानांना धन्यवाद दिले.

"सर, सीमाताईंच्या WhatsApp group चा एक member आहे, नाव म्हणे नीलेश कुलकर्णी, खरं की खोटं माहित नाही. It is possible he obtained the exact plan of her outing today from the discussion on the group. त्याने २३ तारखेला गृप सोडला, आणि त्याचा फोन सध्या switched off दिसतोय. So I am going to track him down."

"Good break!" बावधनकर म्हणाले, "Use the same social platform. Broadcast his photo and appeal for a personal feedback to you."

"तोच विचार केलाय."
****

आठ वाजेपर्यंत सीमा च्या घरी मकरंद, नीलकांत, शिंदे, डॉक्टर दाबके, विद्या आणि मेधा असे सर्वजण जमा झाले होते. काळजीपोटी पूनमच्या आईही येऊन दाखल झाल्या होत्या.

नीलकांतने summarize केलं: "This is what we know so far: एक बंद फोन नंबर, दोन संशयितांचे फोटो, त्यातील एकाचं खरं किंवा खोटं नाव, एक फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर यांची माहिती. आणि पूनम कडून मिळालेली सर्व महत्त्वाची माहिती. Now here's the hard part! अशा केसेस मध्ये four hours is the golden period. त्यानंतर झपाट्याने trace cold व्हायला लागतो. म्हणजे साडेपाच ते साडेनऊ, आता सव्वाआठ होताहेत. We barely have ONE hour or so left to find her location! So everyone, please work like your life depends on it!" जमलेल्या सर्वांच्या अंगावर काटा आला!

"डॉक्टरसाहेब, तुमच्या संवर्धन WhatsApp group मध्ये तब्बल २२ लोक असे आहेत की ज्यांचे तुम्हाला नंबर्सच फक्त माहिती आहेत, त्याची नावं माहीत नाहीत! हा किती मोठा सिक्युरिटी lapse आहे हे hopefully आत्तापर्यंत तुमच्या ध्यानात आलं असेलच! If anything untoward happens, then as Admins you and your two colleagues are legally liable for consequences!"

डॉक्टरांना घाम फुटला होता! "अहो, पण मी सगळी मदत करायला तयार आहे ना! आणि मी safety back up म्हणूनच कोणतेच messages कधीच delete करत नाही!"

"Very good! I am going to need all those messages.

आता सीमाताई, विद्याताई आणि मेधाताई: तुम्ही तिघीजणी नीलेश कुलकर्णीचा सोडून उरलेले २१ नंबर्स वाटून घेऊन प्रत्येकाला WhatsApp video call करायचे आहेत. SI शिंदे uniform मध्ये आहेत. त्यांना प्रत्येक call मध्ये include करा. ही police inquiry आहे हे सुरूवातीलाच स्पष्ट करा. प्रत्येक नंबरच्या सभासदाचं पूर्ण नाव, राहण्याचा विभाग आणि ते कोणत्या सभासदांच्या संदर्भाने join झाले ही सर्व माहिती एका मिनिटात note down करा. So you have a total of less than 10 minutes for the 7 numbers each!

Be aware, यांपैकीच दुसऱ्या एखाद्या नंबरने हा स्वत: नीलेश कुलकर्णी किंवा त्याचा कोणी accomplice अजूनही गृपवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. But we have to take that chance.

मकरंद आणि मिसेस नहाटा: तुमच्या फोनवर हा गृप नाही, पण तुम्ही वेगवेगळ्या कागदांवर या ३ lists करून द्यायला आणि calls झाले की नावं आणि इतर माहिती note down करायला मदत करा.

त्या दहा मिनिटात डॉक्टर आणि मी एक short video message record करणार आहोत, जो त्यांनी गृपवर टाकायचा आहे.

पण त्याआधी, डॉक्टर, मला तुमच्या group चे गेल्या महिनाभरापासूनचे सर्व messages पहायचे आहेत, जरा फोन देता?"

उकडलेला गरमागरम बटाटा टाकावा तसा डॉक्टर दाबक्यांनी आपला फोन नीलकांतच्या हातात टाकला.

बाकी सर्व जण २१ WhatsApp video calls करण्यात गुंतले असताना पुढच्या पाचच मिनिटांत नीलकांतने गृप वरील जून २० नंतरचे सर्व मेसेजेस वाचून पाहिले. २८ जून च्या रविवारी संवर्धन च्या admin टीमने ऑक्टोबर महिना sapling exchange drive असेल आणि सभासदांनी एकमेकांमध्ये रोपांची देवाण-घेवाण करावी असं आवाहन केलं होतं. नवीन सभासदांना गृप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक देखील पाठवलेली होती. पुढील आठ दहा दिवसात २२ नवीन सभासद जॉईन झाले. जुलै ४ च्या शनिवारी कोणी तरी forward केलेली link वापरून +91 80193 45530 या नंबरनेही सहभाग घेतला होता.

"Let's record the video now, doctor!"

तो video message record झाल्या-झाल्या डॉक्टरांनी "EXTREMELY URGENT REQUEST for all members" अशा पूर्वसूचनेसह गृपवर पोस्ट केला.

Message असा होता:

"नमस्कार, मी स्पेशल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट मधला इन्स्पेक्टर नीलकांत घारे. आणि हे तुमच्या संवर्धन WhatsApp group चे ॲडमिन डॉक्टर दाबके. आज संध्याकाळी संवर्धन सभासद असलेल्या एका ताईंच्या तेरा वर्षीय मुलीचं अपहरण झालेलं आहे. आणि या अपहरणात सहभागी असलेल्या संवर्धन ग्रुपच्याच एका सभासदाला शोधून काढणं ही अत्यंत तातडीची गरज आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. कृपया आपल्या हातातील इतर सर्व कामे थांबवा. तुमच्या एका मदतीवर एका निष्पाप मुलीचं आयुष्य अवलंबून आहे! माझ्या हातातील कागदावर लिहिलेला हा फोन नंबर काळजीपूर्वक वाचून नोंद करून घ्या. नीलेश कुलकर्णी या नावाने कदाचित हा सभासद ओळखला जातो. या सभासदाने ४ जुलैच्या शनिवारी गृप जॉईन केला. तुम्हाला हा नंबर ओळखीचा वाटला, किंवा हे नाव ओळखीचं वाटलं, तर व्यक्तिशः मला किंवा डॉक्टर दाबके यांना ताबडतोब फोन करा. माझा फोन नंबर या दुसऱ्या कागदावर लिहिलेला आहे, या नंबरचीही नोंद करा. तुम्हा सर्वांना मदतीसाठी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद!"

शनिवारची संध्याकाळ असल्याने असेल, पण २५० पैकी बहुतेक सभासद online होते. पुढील पाचच मिनिटांत २१२ सभासदांनी तो video पाहिल्याचं नीलकांतला message info वरून कळालं.

८:४५ होत आले होते. सीमाताई, विद्याताई आणि मेधाताई यांनी इतरांच्या मदतीने सर्व २१ फोन नंबर्सशी संपर्क साधून संबंधित सभासदांची नावं, पत्ते आणि संदर्भ सभासदांची नावं यांची यादी पूर्ण केली होती.

८:५० वाजता डॉ. दाबक्यांचा फोन वाजला.

"हॅलो, सर! मी संवर्धन सभासद वीणा शास्त्री...." डॉक्टरांनी फोनवर हात ठेवत नीलकांतला सांगितलं "वीणा शास्त्री म्हणून सभासद आहेत".

नीलकांतने त्यांना call speaker phone वर टाकण्याची सूचना केली, आणि म्हंटलं, "मॅडम, नमस्कार! मी इन्स्पेक्टर घारे. तुम्ही स्पीकर फोनवर आहात. बोला तुम्ही."

"नमस्कार, सर. मी तुमची व्हिडिओ पोस्ट पाहिली. तो नंबर आमच्या शेजाऱ्यांचा आहे. मी त्यांना फारसं ओळखत नाही, केवळ एक नवीन शेजारी म्हणून तोंड ओळख आहे इतकंच. पण तीन जुलैला संध्याकाळी आपल्या गृपच्या एक मेंबर मानसी काळे आणि मी आमच्या floor वरच्या लॉबीमध्ये sapling exchange drive विषयी बोलत असताना त्यांनी ऐकलं, आणि म्हणाले की मला गृप जॉईन करायला आवडेल. मी त्यांचा नंबर कॉन्टॅक्ट मध्ये ॲड केला आणि त्यांना WhatsApp message ने link पाठवली. पण त्यांचं नाव नीलेश कुलकर्णी नाही, ते दोन महिन्यापूर्वीच हैदराबादहून इथे renter म्हणून आले आहेत, त्यांनी आपलं नाव प्रतीक राव आहे असं सांगितलं. मी त्याच नावाने तो नंबर save केलेला आहे. त्यांचा नंबर दुसऱ्या दिवशी गृपमध्ये add झालेला मी पाहिला. बाकी नंतर त्यांच्याशी काहीच संपर्क झाला नाही."

नीलकांतने शिंद्यांना खूण केली आणि विचारलं, "मॅडम तुमचा पत्ता सांगाल?"

"Harmony society....." त्यांनी पूर्ण पत्ता सांगितला.

"Thanks a lot! त्यांच्या घर मालकाबद्दल आणि त्यांच्याकडील वाहनांबद्दल काही माहिती सांगू शकाल?"

"घरमालकांना मी ओळखते, त्यांचा नंबर मी दाबके सरांना पाठवते, ते दिल्लीला असतात. वाहनांचं म्हणाल तर.... मला माहिती नाही पण विचारून सांगते..."

त्यांनी फोनवर हात ठेवून घरातल्या इतर कुणाला तरी - कदाचित नवऱ्याला - काही विचारलं.

"सर, माझे मिस्टर म्हणतायत की त्यांच्याकडे एक लाल फोर-व्हीलर आणि एक टू-व्हीलर आहे. डिटेल्स तुम्हाला सिक्युरिटी गार्ड कडे मिळतील."

"खूप धन्यवाद, मॅडम! तुम्ही अतिशय महत्वाची माहिती पुरवली आहे! कृपया इतर कोणाशीही या माहितीबद्दल चर्चा करू नका. सब-इन्स्पेक्टर शिंदे थोड्याच वेळात आधी तुमच्या घरी आणि मग बिल्डिंगमध्ये इतर चौकशी करण्यासाठी येतील. तोपर्यंत हे तुमच्या शेजारी जर घरी आले दिसलेच तर मात्र ताबडतोब या नंबर वर फोन करा." वीणा शास्त्रींनी फोन disconnect केला.

शिंदे अधिक न बोलता निघाले.

ते बाहेर पडल्यावर एक मिनिटभरातच नीलकांतने RTO च्या कुणा अधिकाऱ्याला फोन लावला आणि प्रतीक राव या नावाच्या व्यक्तीच्या वाहनांच्या रेकॉर्ड्सची माहिती मागवली. पाचच मिनिटांत नीलकांतचा फोन वाजला. त्याला फोर-व्हीलर आणि टू-व्हीलर अशा दोन्ही गाडयांचे लायसन्स प्लेट नंबर्स आणि रजिस्ट्रेशन डिटेल्स मिळाले. त्याने लगेचच ते शिंदेंना कळवले. आणि मग आपल्या टीम मधल्या कुणालातरी फोन करून आधी ट्राफिक चेक पोस्ट्सवर पाठवलेल्या बुलेटीन मध्ये सर्व नवीन माहिती add करायला सांगितली.

"Now we wait!", इतरांकडे पाहत नीलकांत म्हणाला. घरातली शांतता सहन न होऊन सीमा देवघराकडे गेली. मघाशीच पाण्यात घातलेल्या देवांना तिने नमस्कार केला.

नीलकांतने बावधनकर सरांना आणि नानासाहेबांना फोन लावला, आणि आतापर्यंतचे सर्व अपडेट्स दिले.

"Great going! Stay on course," नाना म्हणाले, "तो जर घरी आलेला नसेल, तर तो शहराबाहेर जाणार हे नक्की. सध्याचा हायवे वरचा ट्राफिक restricted आहे. त्याच्या नावाने ई-पास issue झालाय का बघा, आणि असेल तर ते check posts ना कळला, आणि bulletin मध्ये vehicle seize order add करा."

"Right, Sir!"

नीलकांतने ई-पास section ला फोन करून ताबडतोब माहिती पाठवण्याविषयी सांगितले.

पाच सात मिनिटांतच शिंद्यांचा फोन आला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार two wheeler बिल्डिंगच्या खालीच parked होती, तर दुपारी चार वाजता लाल फोर-व्हीलर घेऊन बाहेर पडलेल्या श्रीपती रावचं आणि त्याच्या बरोबर असलेल्या सहप्रवाशाचं CCTV footage मिळालं होतं. त्यांनी ते नीलकांतला आणि सर्व check posts ना forward केलं होतं.

आणखी काही मिनिटातच नीलकांतला श्रीपती राव या नावाने आणि त्या four wheeler साठी issue झालेला e-pass नंबर मिळाला, आणि गाडीचा मार्गही कळाला. गाडी मुंबई-बंगलोर हाय वे ने कोल्हापूर कडे निघाली होती.

****
साडेनऊ वाजता नीलकांत च्या फोनवर कॉल आला. साताऱ्याच्या अलिकडे असलेल्या आणेवाडी टोल नाक्यावर श्रीपती राव, त्याचा सहप्रवासी आणि क्लोरोफॉर्मच्या गुंगीत पण सुखरूप असलेली प्रिया अशा सर्वांसह गाडी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं होतं.

****
एक ऑगस्टच्या शनिवारी जुलैच्या महिन्याभरातला रोपांच्या देवाण-घेवाणीचा उपक्रम संपल्याच्या निमित्ताने admins नी सर्व सभासदांसाठी Google Meet चा कार्यक्रम ठरवला होता. त्यावेळी नानासाहेबांनी सर्व सभासदांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना आणि बावधनकरांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं.

"तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी टू-व्हीलर स्वत: चालवली असेल किंवा इतरांना चालवताना पाहिलं असणार," नानांनी सुरूवात केली. "असे भरपूर चालक आपल्याला दिसतात जे आपलं थांबलेलं वाहन सुरू केल्यानंतर बिनधास्त रस्त्याच्या मध्ये चालवत येतात. डावीकडे-उजवीकडे, मागे-पुढे न बघता! अशा सर्व चालकांचा ठाम विश्वास असतो की मागून येणारे वाहन चालक त्यांची काळजी घेतील, कितीही वेगात असले तरी यांच्यासाठी थांबतील! आपलं स्वतःचं आयुष्य ते कोणताही विचार न करता अशा आंधळ्या विश्वासाने दुसऱ्याच्या ताब्यात देत असतात. नव्वद पंच्याण्णव टक्के वेळा त्यांचा अंधविश्वास खपून जातो, आणि ते अपघातातून वाचतात. पण कधीतरी, त्यांना अपघाताला सामोरं जावं लागतं.

आपणही असं दुसऱ्यांच्या भरवशावर अवलंबून न राहता डोळसपणे जगायला शिकलं पाहिजे, विशेषतः आजच्या आभासी सोशल मीडियाच्या जगात. ही तुमच्या गृप वर घडलेली सीमाताईंच्या मुलीविषयीची घटनाच घ्या.

२५० WhatsApp सभासदांपैकी २२ जणांची नावं कुणालाच माहिती नव्हती. म्हणजे जवळजवळ नऊ टक्के सभासद निनावी होते. सुदैवाने या २२ पैकी २१ जण genuine, सभ्य निघाले. पण सर्वच तसे असतील असं गृहीत धरणं हा admins चा अंधविश्वास! आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तुम्हां सर्वांचा अंधविश्वास!

एक जण - he was the only bad apple! अडीचशे पैकी एकच जण, म्हणजे फक्त शून्य पॉईंट चार टक्के! पण त्या एका माणसाने सीमा आणि मकरंद यांचं, आणि प्रियाचं आयुष्य उध्वस्त केलं असतं! So on a social media platform like WhatsApp, even one unknown person is one too many!

WhatsApp messages मध्ये end-to-end encryption असतं, आणि त्यामुळे निरोपांची confidentiality सुरक्षित असते, पण ती फक्त दोघांमधील निरोपाचीच! गृपमध्ये अशी सुरक्षितता अजिबात नाही! अशा प्लॅटफॉर्मवर आपल्या जाण्या-येण्याच्या वेळा, आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे, आपल्या घरातील वृद्धांची वये आणि त्यांच्या एकटे असण्याच्या वेळा, आपले ब्लड गृप्स, आपल्या घराचा संपूर्ण पत्ता, अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही एका व्यक्तीला उद्देशून लिहिल्या तरी इतर सर्व सभासद वाचू शकतातच. आणि त्यातील एखादाच सभासद त्या माहितीचा दुरुपयोग करू इच्छिणारा असेल तर दुर्घटना घडू शकतात.

सीमा ताईंनी गुन्हेगाराने सांगितलेल्या नावावर विश्वास ठेवला. त्याच्या उपस्थितीत वैयक्तिक माहिती मैत्रिणींना सांगितली, हा त्यांचा अंधविश्वास.

आयुष्यात केवळ एकदाच भेटलेल्या माणसाने आपल्या आईवडिलांविषयी माहिती दिली म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची प्रियाची तयारी हा तिचा अंधविश्वास.

म्हाताऱ्या वॉचमन काकांनी वयामुळे गुन्हेगाराचा चेहरा ओळखला नसता, किंवा त्यांनी त्या दुचाकीचा नंबर लिहून घेतला नसता तर ही केस पुढे सरकलीच नसती.

पोलिसांना दरवेळेस टेक्नॉलॉजीची मदत मिळेलच याची गॅरंटी नाही. त्या पेट्रोल पंपावरची सीसीटीव्ही सिस्टीम साडेपाच ते साडेसहा तासभर इलेक्ट्रिकल सप्लाय बंद पडल्याने निकामी झाली होती! केवळ आपण सुदैवी म्हणूनच गुन्हा घडतानाची ५:२८ ची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. विद्युत पुरवठा तीन मिनिटे आधी खंडित झाला असता, तर ती घटना CCTV मध्ये capture झाली नसती, मग काय झालं असतं?

म्हणून मी विनंती करेन की पोलिसांचं काम सोपं करा. तुमची सुरक्षितता ही तुमचीच जबाबदारी आहे! जी वैयक्तिक माहिती सार्वजनिकरीत्या मांडणं आवश्यक नाही ती तशी मांडू नका. माणसाने माणसावर विश्वास नक्की ठेवावा पण मानवांमध्ये काही दानवही आहेत हे लक्षात घेऊन अंधविश्वास अजिबात नको!"

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 7:53 pm | टर्मीनेटर

@बहुगुणी

'अंधविश्वास'

ही तुमची कथा आवडली  👍

अपहरणा मागचा उद्देश मात्र नाही समजला!

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

मनिम्याऊ's picture

19 Nov 2020 - 3:45 pm | मनिम्याऊ

जबरदस्त कथा

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 4:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

वेगवान रहस्यकथा आवडली,
प्रत्यक्षातही असे काही घडू शकते,
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 6:13 pm | प्राची अश्विनी

बापरे! असं होऊ शकतं हे पटलंच.
कथा आवडली हेवेसांनल.

जयन्त बा शिम्पि's picture

19 Nov 2020 - 7:06 pm | जयन्त बा शिम्पि

आआआ

जयन्त बा शिम्पि's picture

19 Nov 2020 - 7:10 pm | जयन्त बा शिम्पि

काळजाचा ठोका चुकवणारी कथा ! ! जबरदस्त थ्रिलिंग आलं ,कथा वाचतांना ! ! येथुन पुढे ग्रुपवर पोस्टिंग करतांना किती सावध रहावयास हवे हे उत्तमरित्या समजले. पुलेशु.

चौथा कोनाडा's picture

20 Nov 2020 - 12:59 pm | चौथा कोनाडा

जबराट ओघवती रहस्यकथा ! + १ बहुगुणी साहेब !

अधुनिक तंत्रातल्या सोशल माध्यमांवर वर आपण इतके विसंबलो आहोत की कळत नकळत अश्या वर्तुळातले लोक खुप ओळखीचे आणि सुरक्षित आहेस असा अभास निर्माण व्ह्यायला वेळ लागत नाही, पण फसवणारे फसवतातच ! अश्या गुन्ह्यांच्या शेकोडो घटना घडताना दिसतात !
या पासून सावध करणारी कथा !
+ १ बहुगुणी साहेब !

आनन्दा's picture

20 Nov 2020 - 4:26 pm | आनन्दा

आवडली

मित्रहो's picture

20 Nov 2020 - 5:39 pm | मित्रहो

भयंकर वेगवाण आणि अंगावर काटा आणणारी कथा. डोळे उघडणारी कथा.
एक शंका जेंव्हा कुणी अॅडमीन व्हॉटस अॅप ग्रुपमधे नवीन मेंबर घेतो तेंव्हा तो नंबर स्टोर केल्याशिवाय घेता येत नाही. त्या व्यक्तीने दिलेले नांव चुकीचे असू शकेल पण तो कॉटॅक्ट सेव्ह करावा लागतो.

तुषार काळभोर's picture

21 Nov 2020 - 7:41 am | तुषार काळभोर

सुरूवात केली, मग काही ओळी वाचून सोडून दिली. मग प्रतिसाद वाचले.
परत पूर्ण कथा वाचली. एकदम मस्त थ्रिलर!
कथेची थीम विचार करायला लावणारी आहे खरी!

कविता१९७८'s picture

24 Nov 2020 - 9:57 am | कविता१९७८

डोळ्यात अंजन घालणारी कथा, ही कथा तुमच्या नावाने शेअर केली तर चालेल का?

बहुगुणी's picture

27 Nov 2020 - 11:50 pm | बहुगुणी

जरूर करा, जितके अधिक लोक सजग होतील तेवढं बरं. धन्यवाद!

प्रणित's picture

15 Dec 2020 - 6:24 pm | प्रणित

वेगवानओघवती रहस्यकथा!