‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ च्या निमित्ताने

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Oct 2020 - 1:49 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

(पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशनाकडून 25 सप्टेंबर 2020 रोजी ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या निमित्ताने हा लेख):
‘ज्यांच्या चेहर्‍यासमोर प्रतिक्रिया मागणारे कॅमेरे नसतात!’ अशा ‘जगातील भल्या बुर्‍या घटनांची नोंद घेणार्‍या सर्व सहृदय माणसांना...’ हा ग्रंथ (‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’) अर्पण केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या वेदना वेशीवर टांगून त्यांना न्याय मिळावा म्हणून 2012 साली ब्लॉग लिखाणाला सुरुवात केली. (आणि म्हणूनच या ग्रंथाचीही आज निर्मिती झाली.) ब्लॉगमधून लिखाण करताना साहित्यिकापेक्षा सामाजिक होण्यात जास्त आनंद मिळतो! तो आनंद मी सलग आठ वर्षांपासून घेत आलो.
एकही पंधरवाड्याचा खंड जाऊ न देता आठ वर्षातील ब्लॉगवरील लेखांपैकी चार वर्षांतील निवडक लेखांचं पुस्तक म्हणजे हा ग्रंथ. (एक अपवाद. 15 ऑक्टोबर 2017 चा. या काळात सलग सतरा दिवस रुग्णालयात निमोनियाने मी अॅडमिट होतो म्हणून.) खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणीची लाऊन घेतलेली शिस्त आजपर्यंत पाळत आलो.
या पुस्तकातील सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, वैश्विक घटना, अतिरेकविरोध, शेती, चरित्र, व्यक्‍तीविशेष, भाषा, बोलीभाषा, अहिराणी भाषा आदी विविध पडसादांचं चित्रण आलं आहे. काही लेख देशात (वा विदेशात)त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वा भाष्य अशा स्वरूपाचे असलेत तरी असे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असं म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात ‘कालाय’ ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन लिहिले आहेत. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटना- प्रसंगांकडे नक्कीच निर्देश करेल याचा सजग विचार लिखाण करताना केलेला आहे. या लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईलच, पण एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा आहे.
काहीतरी आतून सांगायचं असतं. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणं आणि अप्रत्यक्षपणे झालंच तर प्रबोधन एवढ्याच जनहितार्थ ध्येयाने प्रेरित होऊन हे लिखाण केलेलं आहे. ब्लॉग सातत्यामुळे माझ्या इतर लिखाणावरही विपरीत परिणाम होतो, पण ब्लॉग लिखाणातून जो आनंद मिळतो त्याचं वर्णन मी शब्दांत मांडू शकत नाही.
ब्लॉग लिखाणाच्या सातत्याला आठ वर्ष झाली असली तरी या पुस्तकात पहिल्या चार वर्षातील निवडक लेख समाविष्ट झाले आहेत. या छोट्या लेखांची चार वर्षातील अचूक संख्याच सांगायची झाली तर ती एकशे साठ इतकी असून पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या पुस्तकात निवडक एकशे एकोणावीस लेख समाविष्ट आहेत. कला, साहित्य, भाषा, लोकसंस्कृती, लोकजीवन, समाजकारण, राजकारण, सत्ताकारण आदींवरचे वैचारिक‍ स्वतंत्र लेखन या पुस्तकाच्या मिमित्ताने एकत्र वाचून वाचकांना नक्कीच समाधान मिळेल. वाचकांच्या अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: वाचकांच्या प्रेमामुळे लिखाण करण्याची ऊर्जा मिळते. म्हणून ब्लॉगचं लेखनसातत्य मी आतापर्यंत टिकवून आहे. या लेखांवर सर्वदूरच्या मराठीतल्या विचक्षण वाचकांकडून प्रतिक्रिया येत असतात. (प्रतिकूल प्रतिक्रियांचं सुध्दा स्वागत करत असतो.)
ब्लॉगवरील लेखांचं पुस्तक प्रकाशित झाल्याने हा आनंद पुन्हा सगळ्या वाचकांसोबत सामायिक करत आहे. पुस्तकातील या लेखांमध्ये कोणी काही अधीकची भर सुचवणार असेल तर आनंदाने स्वागत करीन. आतापर्यंत आपण ब्लॉगवरील लेख सातत्याने वाचत आला आहात, तरीही समग्र लेखांचं हे पुस्तकही आपण आवर्जून वाचून, आपल्या प्रतिक्रियांतून मार्गदर्शन करावं ही विनंती. या ब्लॉगवरील लेखांमधून ‘नवीन माहिती मिळते, नवीन ज्ञान मिळतं, विविध विषयांचे प्रवाह खळाळतात, सामाजिक प्रबोधन होतं, सामाजिक प्रश्नांची मांडणी होते, सांस्कृतिक उजळणी होते, लेखांत चिंतन- मनन येत असून ते भावतं’; अशा आशयाच्या खूप प्रतिक्रिया (मराठी माणूस राहतो त्या जगाच्या कानाकोपर्‍यातून) आतापर्यंत आलेल्या आहेत. एखाद दुसर्‍या विषयांवर काही वाचकांनी असहमतीही दर्शवल्या आहेत. त्यांचं कायम स्वागत करत आलो. धन्यवाद.
(लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Oct 2020 - 10:14 am | डॉ. सुधीर राजार...

211 वाचकांनो. धन्यवाद.