माणुसकी

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
12 Oct 2020 - 8:21 pm

*माणुसकी*
बदलापूर स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पहात उभी होते. दादर ला जायचं होतं. एका मैत्रिणीकडे सगळ्याच जमणार होतो, जवळजवळ चार वर्षांनी भेटून अख्खी रात्र गप्पा, गाणी असा बेत होता. एक मैत्रिण दादर स्टेशनवरच भेटणार होती. खुप उत्साही वाटत होतं सगळ्या भेटणार म्हणून.
तेवढ्यात बदलापूर लोकल आलीच. लेडीजच्या मधल्या डब्यातून सगळी बायकांची गर्दी चिवचिवत बडबड करत उतरली. मग चढणा-या बायका, मुली घाई न करता सावकाश चढल्या. मी हल्ली नोकरी सोडल्यापासून प्रवास करत नाही लोकलने. त्यामुळे अशी ही दुपारची वेळ मला फारच आवडली होती प्रवासासाठी.
आत चढून राईटविंडो ची सीट बघून बसले. आजुबाजूला कोणी अजून आलं नव्हतं. सगळे चढणारे आधी राईट विंडोच बघून बसतात म्हणजे गाडी चालू असते तेव्हा छान वारा येतो. मग हळूहळू उरलेल्या सीट भरतात.
थोड्याच वेळात एक मध्यमवर्गीय आजी कडेवर एक पाचेक महिन्यांचं बाळ घेऊन गाडीत चढल्या, सोबत एक तरूणी होती. दोघी येऊन माझ्या समोरच्या सीटवर बसल्या. बाळ गुटगुटीत गोरंपान होतं. पायात वाळे, हातात मनगट्या, कपाळावर तीट, कुरळं जावंळ झाकणारं टोपडं आणि अंगात गुलाबी झबलं. आजी आई सरावाच्या वाटत होत्या प्रवासाला. आईने बॅग वरच्या रॅकवर ठेवली. एक छोटी बॅग स्वतःच्या मांडीवर घेतली.
बाळ खेळकर वाटत होतं. आजीने त्याचं टोपडं काढून त्याला फुंकर घातली. तसं ते छान खुदकन हसलं. त्या बाळाशी बोलत होत्या "आता आपण कुठे चाललोय,? भुssर ! कशी मजा आहे बाळाची". आजीचं बोलणं समजत असल्यासाखं ते खुष होऊन हसत होतं. आजुबाजूचे सगळेच बाळाकडे बघत होते. आजी मांडी घालून बसली बाळ मांडीवर आरामात पहुडलं होतं.
बाळाची बहुधा झोपेची वेळ असावी. गाडी सुरू झाली कि गार वा-यावर ते लगेचच झोपलं.
आजी तरुणीला विचारत होती," त्याची दुधाची बाटली घेतलीस ना ?" ती म्हणाली, "हो घेतलीय. पण गुलाम आता मस्त झोपेल. दादरला उतरून घरी जाईतो भुकेची वेळ नाही व्हायची त्याची. पण बरोबर असावं म्हणून घेऊन ठेवलय दूध."
मग माझा निरीक्षणाचा उद्योग सुरू झाला.
त्याची आई पण सुरेखशी नाजुक पंचविशीची तरूणी होती. आजींना ती "आई" च म्हणत होती बहुधा माय लेकीच असाव्यात. चेह-यातही साम्य वाटत होतं. माहेरहून सासरी चालली असावी बाळाला घेऊन आई तीला सोडायला येत असेल. माझा आपला मनात तर्क चालू होता. तासभराचा प्रवास. स्टेशन्स येत जात होती. बाया चढत उतरत होत्या. हळुहळू पॅसेजमधे पण गर्दी झालीच. काॅलेज क्लासला जाणा-या मुलींचा एक घोळका पाठीला सॅक लावून पॅसेजमधेच
गलका करत उभा होता. कानात हेअरफोन्स लावून एकमेकींच्या खोड्या काढत, हसत खिदळत गाणी ऐकत, मधेच कोणाविषयी कानाफुसी करत टाळ्या देणं चालू होतं.
गर्दीत पिना टिकल्या, कानातली, फ्रीज कव्हर, रूमाल, पेरू, फरसाण, कोरडे खाऊ आणि इतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टी विकणारी मुलं बाया येत जात होत्या. एक गजरे विकणारी मुलगी पण होती. मस्त मोग-याचा घमघमाट डब्यात दरवळला. ताजा टपोरा मोगरा असल्याने तीचे गजरे लगेचच संपले.
मी ही घेतले पाच. गजरे बघून मैत्रिणी पण खुष होतील असा विचार आला.
तेवढ्यात एक जेमतेम अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी पेरू विकत होती तीच्याकडे माझं लक्ष गेलं. पेरूची टोपली, खांद्याला तिरपी लावलेली पिशवी., शिवाय खांद्याला एक झोळी पण बांधली होती पोटाशी त्यात तीचं मुल होतं. भुकेलं असावं बारीक आवाजात रडत, कुरकुरत होतं. ती एकदम किडकिडीत प्रकृतीची पण डोळे खुप स्वच्छ, पाणीदार होते. "ताई घ्या ना पेरू, ताजे गोड आहेत" असं गोड आवाजात म्हणत डब्याच्या त्या टोकापासून इथवर येईतो मी तीला बघत होते. मी ही घेतले पेरू. पण तीचे थोडेच पेरू विकले गेले होते. ती खूप अस्वस्थ झालेली वाटली. तीचं बाळ पण आता जोरातच रडायला लागलं होतं. तीनं तसंच टोपली सांभाळत रडणा-या बाळाला छातीशी धरलं होतं. पण ते खूपच भुकेलं असावं. खुप कळवळून रडत होतं. ती त्याला डोळ्यात पाणी आणून सांगत होती, "मलाच काही खायाला भेटलं नाही कालपास्न रे. उपाशी आई तुझ्या पोटाला काय देनार". काही बायका पण चुकचुकायला लागल्या. काही जणी काय कटकट आहे असं बघत होत्या. मी तीला माझी पाण्याची बाटली दिली. म्हटलं, त्याला पाणी तरी पाज. तीने बाटलीच्या बुचाने थोडं पाणी पाजलं. पण ती असहाय आई खूप हतबल वाटली मला. त्या पॅसेजमधल्या काॅलेजकन्या ज्या तीच्याच वयाच्या होत्या त्या पण आपसातली मस्ती थांबवून पुढे सरसावल्या, तीला पेरूची पाटी खाली ठेवायला मदत केली. तीला बसायला जागा दिली. पॅसेजमधेच ती त्याला घेऊन बसली खाली. थोडं पाणी प्यायलं त्याने. सहा सात महिन्याचच असेल ते मुल एकदम बारिक होतं . ती पण तर छोटीच होती वयाने.
काही बायका बडबडत होत्या मुलांना कशा जन्म देतात या खायला, प्यायला घालू शकत नाहीत तर.
तीची असहायता माझ्या लक्षात आली तशीच माझ्या समोरच्या दोघींच्याही. तरूणी पटकन उठली आजीच्या संमतीने तीने वरच्या बॅगेतून बाळाच्या कपड्यांमधून बाळाची स्वच्छ नॅपकीनमधे गुंडाळलेली दुधाने भरलेली बाटली काढली आणि त्या पेरू विकणा-या मुलीला दिली.."पाज त्याला दुध. भुकेलं आहे ना पोर.. "
ती क्षणभर बघतच बसली..तीच्या वाहणा-या डोळ्यात कृतज्ञता दाटून आली होती.
मग जरा सावरून तीने ती बाटली घेतली अन मुलाला दुध पाजू लागली. भुकेलं बाळ गुटूगुटू दुध पीत होतं.
त्या आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. सगळा डबा शांत होऊन हे दृश्य पहात होता.
© सौ वृंदा मोघे
25/3/19

कथालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

13 Oct 2020 - 5:30 am | विजुभाऊ

छान कथा आहे हो.
खूप आवडली. सहज साध्या कृतीतून त्या मुलीने खूप काही साम्गितले.